भाटय़ाच्या समुद्रात मनसोक्त भिजून बाईक चालवत वळणांची वाट काढत मी वर रत्नागिरीत येऊ लागलो आणि मधे सुनीता देशपांडे यांचं जुनं घर जिथे होतं तो प्लॉट लागतो. तिथे आता (खरोखरच) ‘आशुतोष अपार्टमेंट’ या नावाची इमारत आहे; ती मी बघतो आणि शेक्सपिअरच्या ‘नावात काय आहे?’ या विधानाला धाब्यावर बसवत माझं नाव तिथे वाचून मला बरंच वाटतं. आणि मग सुनीताबाईंनी वर्णन केलेलं त्यांचं ते जुनं घरही डोळ्यासमोर उभं राहतं. अजूनही सुनीताबाईंनी वर्णिलेली भाटय़ाची खाडी आपलं सौंदर्य दाखवत तिथून दिसते आणि समुद्राची गाज अजूनही त्या रस्त्यावर रात्री ऐकू येते. इथेच तर पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचं झटपट रजिस्टर्ड लग्न लागलं नव्हतं का? इथल्याच खाडीत पु. ल. बोटीत हार्मोनियम घेऊन जवळच्यांना गाणी ऐकवत नव्हते का? आणि इथूनच सुनीता ठाकूर नावाच्या बुद्धिमान, देखण्या आणि मनस्वी तरुणीनं ताऱ्यांच्या, वाऱ्याच्या, समुद्राच्या लाटांच्या साक्षीनं झंझावाती, हीरॉइक स्वप्ने पाहिली असली पाहिजेत. त्याखेरीज सुनीताबाईंच्या बव्हंशी लेखनामध्ये तो ‘हीरो’-प्रतिमेचा शोध उतरला नसता! हा हीरो म्हणजे काजोलचा शाहरुख असतो तो नव्हे, हे सांगायला नकोच. पण ‘हीरो’-प्रतिमा ही फक्त सशक्त, धिप्पाड पौरुषाची असते असंही नसतं. हीरो हा हीरो असतो. तो तुम्हाला त्याच्या नुसत्या करिष्म्यानेच गार करतो. सुनीताबाईंच्या लेखणीला ज्या हीरो-प्रतिमेचा ध्यास होता त्यात स्वातंत्र्य अनुस्यूत होतं, त्यात असांकेतिकताही होती. त्यात कृष्णासारखं कणखर, मर्दानी बाण्याचं आणि तरी अति तरल असंही काही होतं. तुम्ही सुनीताबाईंचं सगळं लिखाण बघा. ज्या तडफेनं त्यांची लेखणी हीरो-प्रतिमेचा शोध आणि वेध घेते- मग ते जी. ए. कुलकर्णी असोत, माधव आचवल असोत, वसंतराव देशपांडे असोत, कुमार गंधर्व असोत- त्या शोधाला तोड नाही. आणि इथेच सांगायला हवं, की मला सुनीताबाई आणि त्यांचे हे मित्र यांच्या व्यक्तिगत संबंधांवर काहीही लिहायचं नाहीये. ते त्यांचं आयुष्य होतं- नाही का? आपण हे बघायला हवं की, त्यांच्या साहित्यावर या पौरुष-प्रतिमेचा काय ठसा उमटला आहे! आणि मी काही केवळ खऱ्या ‘हीरों’बद्दल बोलत नाहीये. जे हीरो कधीच सुनीताबाईंना भेटण्याची शक्यता नव्हती, तेही त्यांच्या लेखणीत घरची माणसं बनून वाचकांसमोर आले आहेत. जसा हा फ्रेंच पायलट-लेखक सेंट एक्झुपेरी!
जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाईंच्या पहिल्याच काही पत्रांमध्ये सेंट एक्झुपेरीचा उल्लेख झाला आणि उभयपक्षी तो संवाद वाढतच गेला. विमानविद्या बाल्यावस्थेत असताना धाडसी विमानोड्डाण करणारा तो शूर सेंट एक्झुपेरी आणि मग जमिनीवर येऊन तरल मनानं कागदावर उमटत जाणारे त्याचे ते लोकविलक्षण शब्द! आपल्या ‘दि लिटिल प्रिन्स’ या पुस्तकात तो लिहितो की, ‘What is most important is invisible.’(जे सर्वात मोलाचं असं आहे; ते कुठे डोळ्यांसमोर असतं?) पण जी. ए. काय किंवा सुनीताबाई काय; त्यांच्या तीक्ष्ण नजरेला एक्झुपेरी आणि त्याचा तो चिमुकला शूर शिलेदार अगदी स्वच्छ दिसले होते! सुनीताबाई पु. लं.च्या मागे लागल्या होत्या- त्यांनी याचं नाटक करावं म्हणून! पण पु. लं.नी काही ते मनावर घेतलं नाही. वाटतं, त्यांचा पिंडही नव्हता अशा लेखनाचं रूपांतर करणारा! ‘पिग्मॅलियन’चं ‘ती फुलराणी’ करताना पु. ल. कसे निवांत, आपल्याच घरात असल्यासारखे असले पाहिजेत. बर्नार्ड शॉ आणि पु. लं.चा जनाभिरुची ओळखायचा वकूब निर्विवाद एका जातीचा होता. पण एक्झुपेरी? तो सुनीताबाई, जी. ए. किंवा खानोलकर- ग्रेस यांचा वैचारिक सहोदर! जी. एं.नी सुनीताबाईंना मग पत्रोत्तरात लिहिलं- ‘आज मला ज्यांचा पूर्णपणे हेवा वाटतो, त्यापैकी तो (एक्झुपेरी) लेखक अगणित चांदण्यांचे आभाळ, सतत विस्तृत होणारे क्षितीज, त्यात एका (जुनाट) विमानाचे स्वत:चे स्वतंत्र जग..’ सुनीताबाईंनी हा हीरो मनाशी घट्ट धरून ठेवला नसता तरच नवल! तसा तो त्यांनी धरला आणि शब्दांतही उतरवला. एक्झुपेरीची भुरळच जणू त्यांच्या शब्दांना पडलेली आपल्याला दिसते. जी. ए. कुलकर्णीनी मग एक्झुपेरीचं दुसरं पुस्तक ‘सँड, विंड अॅण्ड स्टार्स’ सुनीताबाईंना वाचायला सुचवलं आणि त्याने तर दोघांचा पत्रसंवाद ओथंबून जाऊ लागला. जी. ए. आणि सुनीताबाईंचा पत्रव्यवहार मग झपाटय़ानं वाढला. दोघांच्या पत्रांमध्ये जगभरच्या साहित्याचे संदर्भ तर होतेच; पण एकमेकांविषयी आस्था, आदर, आत्मीयता असंही सारं होतं. त्या पत्रांचा अर्थकंद अरुणा ढेरे यांनी ‘प्रिय जी. ए.’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कमालीच्या कोमल, तरी कणखर नजरेने बघत मांडला आहे. ‘विपरीत अनुभवांची वेदनाच बरोबर घेऊन चालणारा एक हळवा, मनस्वी कलावंत जी. एं.च्या रूपाने भेटला आणि सुनीताबाईंनी त्याच्यावर स्नेहाचा वर्षांव केला..’ असं अरुणा ढेरे म्हणतात तेव्हा वाटतं, हाही त्या हीरो-प्रतिमेचा प्रत्यक्षात उतरलेला ध्यास तर नव्हे? माझ्या विशीच्या तरुण मैत्रिणीनं हे पुस्तक वाचून मला सांगितलं होतं ते आता आठवतंय. ती म्हणालेली : ‘आशुदा, इट्स अ स्टोरी ऑफ ए बिग टाइम क्रश!’ मला त्या ‘मॉडर्न’ निष्कर्षांने तेव्हा मजा वाटलेली. तिच्या वयाला साजेसा निष्कर्ष तिने काढला होता. तो अपुरा होता, सुलभीकरण करणारा होता, हे सारं खरं; पण ‘हीरो वर्शिपिंग’चा- पौरुष-प्रतिमापूजनाचा अंश तिच्या ‘निष्कर्षां’त दिसत होता आणि तो मोलाचा होता. दोघांचे वाद झाल्यावर मजा सुनीताबाई माघार घेतात तेव्हा त्यांचे शब्द हीरो वर्शिप करीत म्हणतात, ‘तक्रार करायचा अधिकार मला नाही हे मी जाणते. पण मीच माघार घ्यायला हवी होती ती घेत आहे. आणखी काय लिहू? शिवाय सगळं काही समजुतीनंच घेणं श्रेयस्कर नव्हे का?’ सुनीताबाईंचे एरवी कणखर, कडक नव्हे, प्रसंगी फटकळ होत जाणारे शब्द का घेत होते माघार? या शब्दांमध्ये त्या ‘हीरो’पुढे लीन व्हायची उबळ जी. एं. करता आली होती, की खूप आधीपासून ते शब्द ‘डॉमिनंट हीरो’पुढे लीन व्हायला उत्सुक होते? होते असावेत असं एकेकदा वाटतं. (‘होते असावे’ ही व्याकरणशैली सुनीताबाईंचीच.)
‘आहे मनोहर तरी’मध्ये सुनीताबाईंची लेखणी कशी तालेवार चमकते आहे! कार्लाईल या इंग्रजी लेखकाच्या आणि त्याच्या पत्नीवरच्या लेखाचं निमित्त होऊन पु. ल. आणि सुनीताबाई यांच्यात वाद होतात. अन् तेव्हा ही लेखणी कशी सडेतोड होत जाते! (कार्लाईलची प्रतिमा ‘हीरो’ सदरात आरामात मोडली जाऊ शकते. सुनीताबाईंना ते भावण्याचं तेही एक कारण असावं.) कार्लाईलच्या बायकोवर झालेला अन्यायही त्यांनी पुढे एका लेखात मांडला असला तरी खुद्द तोच संघर्ष ‘आहे मनोहर तरी’मध्ये सुनीताबाई- भाई यांच्या रूपानं पुनश्च उतरला आहे हे जाणवतं आणि कसं उदास, शांत वाटतं!
माधव आचवल असोत, ‘आमचा वसंता’सारखा लेख असो, नाहीतर कुमार गंधर्वावरचा लेख असो; सुनीताबाईंनी ज्या तऱ्हेने या मित्रांचा, त्यांच्या पौरुषाचा वेध घेतला त्याला तोड नाहीच! तत्कालीन काळाचे संकेत बघता एखाद्या स्त्रीने पुरुषांकडे पुरुष म्हणून बघत केलेलं हे लेखन अपवादात्मक आणि आश्चर्याचं असंही आहे. फक्त एकेकदा वाटतं की, एरवी फेमिनिस्ट असणाऱ्या सुनीताबाई या साऱ्या हीरोंवर लिहिताना तशा स्त्रीवादी नजरेने बघत नाहीत की काय! ज्या एक्झुपेरीच्या त्या प्रेमात होत्या त्याच्या बायकोनं लिहिलेलं पुस्तक पुढे २००० साली प्रकाशित झालं. कॉन्स्वेलोनं लिहिलेले ते कागद त्यांचं घर आवरताना त्यांच्या मृत्युपश्चात मिळाले आणि ‘दि टेल ऑफ दी रोज’ हे पुस्तक जगासमोर आलं. त्यावर मी मागे एका दिवाळी अंकात दीर्घ लेखही लिहिला होता. कॉन्स्वेलो तिच्या लहानपणी दक्षिण अमेरिकेच्या जंगलात कपडे काढून अंगाला मध फासून जायची आणि मग सारी वनातली फुलपाखरं तिच्या अंगाला चिकटून त्याचा ‘फ्रॉक’ तयार व्हायचा! आणि अशी स्वतंत्र कॉन्स्वेलो पुढे सेंट एक्झुपेरीसोबत लग्न करून इतकी विलक्षण परावलंबी होत गेली; त्यानं तिला असं काही खेळवलं, की तिच्या पुस्तकातली ती नवरेशाही वाचताना आपल्या अंगावर काटा येतो! सुनीताबाईंना आपल्या हीरोची ही दुसरी बाजू असेल असा अंदाजही नसावा. पण असता, तरी हीरो-प्रतिमेपाठी धावताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असतं, ही शक्यता नाकारता येत नाही! आणि याचा अर्थ सुनीताबाई या चांगल्या लेखिका नव्हत्या असाही नाही. शेवटी जो- तो आपल्या नजरेतून बघतो, लिहितो. सुनीताबाई मला विलक्षण आवडतात. त्यांच्या लेखनातले आणि व्यक्तिमत्त्वातले अनेक दुवे मला रुचले नाहीत तरी त्यांच्या शब्दांचा ओज आजच्या तरुण लेखिकांमध्येदेखील पटकन् आढळत नाही! पौरुष- प्रतिमेचा शोध घेणारी स्त्रीदेखील तितकीच सक्षम स्त्री असायला लागते!
सुनीताबाईंच्या शेजारी एक पुरुष राहायचा. कधी गायचा, कधी अभिनय करायचा, विनोदाने लोकांना मोकळं करायचा, अन् गप्पांची अखंड बैठक जमवायचा त्याच्या स्नेह्यांसोबत! बघता बघता त्याचा गोतावळा इतका वाढला, की लोकांचा तो खराच ‘हीरो’ झाला! सुनीताबाईंच्या आत्मीय नजरेला ते पौरुष दिसलं का? तो तर त्यांच्या लेखी ‘लिटिल प्रिन्स’ होता! सर्वगुणसंपन्न ‘प्रिन्स’; पण लहान मुलासारखा परावलंबी असलेला ‘लिटिल’ही! ‘आहे मनोहर तरी’मध्ये सुनीताबाईंनी पु. लं.च्या या वैशिष्टय़ाचा कितीदा तरी उल्लेख केला आहे. पण एक प्रसंग मात्र वेगळा आहे. वादावादीचे तीन प्रसंग पुस्तकात आधी येतात आणि मग हा प्रसंग मधे येतो. पुण्याचा सुंदर पाऊस पडत असताना सुनीताबाई आत झाकून ठेवलेली पेटी पु. लं.समोर ठेवतात, त्यांना वाजवायचा आग्रह करतात. तेही कित्येक काळानंतर पेटी वाजवतात. अधा-पाऊण तास मैफल रंगते, तोवर बेल वाजते आणि ती खासगी मैफल अवचित सुरू झाली तशी संपतेदेखील! तो प्रसंग वाचताना मात्र मला आई आणि लहान मूल दिसत नाही; हीरो आणि लीन स्त्रीही दिसत नाही. जिव्हाळ्याने बांधलेले दोन मित्र दिसतात. आणि मग एक्झुपेरीचं वाक्य आठवतं- ‘It is such a secret place, the land of tears.’ भाई आणि सुनीताबाईंनी कौशल्यानं झाकलेला त्यांचा अश्रूंचा गाव मग मला स्वच्छ दिसतो.
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा