भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे पहिले कादंबरीकार, कवी, संपादक, तत्त्वज्ञ आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या लेखनाने तमाम भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जन्मास येत्या २७ जून रोजी १७५ वष्रे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने बंकिमचंद्रांच्या साहित्यसंपदेचा आणि त्यांच्या मौलिक जीवनकार्याचा घेतलेला हा मागोवा-
अ ठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी राजवटीने भारतात पाय रोवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुधारणांचे वारेही देशाच्या काही भागांमध्ये वाहू लागले. बंगाल आणि महाराष्ट्र ही त्याची केंद्रे होती. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र गुप्त, महाराष्ट्रात महात्मा फुले अशांनी आधुनिक भारताच्या सुरुवातीच्या सामाजिक जडणघडणीमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. या समाजसुधारकांप्रमाणेच साहित्य, कला आदी क्षेत्रांमधील व्यक्तींनीही आधुनिक भारताच्या घडणीत तितक्याच हिरीरीने सहभाग घेतला. अशा साहित्यिकांमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे नाव अग्रणी आहे.
त्यावेळी कलकत्ता ही इंग्रजांची राजधानी होती. कलकत्त्यापासून ३०-४० कि. मी. अंतरावरील नहाटी या छोटय़ाशा गावात २६ जून १८३८ रोजी बंकिमचंद्रांचा जन्म झाला. आपल्या अवघ्या ५६ वर्षांच्या आयुष्यात बंकिमचंद्रांनी अलौकिक अशी लेखनसंपदा निर्माण केली.
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी बंकिमचंद्रांचं वय अवघे १९ वर्षे होते. त्याच्या पुढच्या वर्षी- म्हणजे १८५८ मध्ये बंकिमचंद्र कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर झाले आणि पाठोपाठ मानाची सरकारी नोकरीही त्यांना मिळाली. एकीकडे नोकरी सुरू असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. गुरूस्थानी मानलेल्या ईश्वरचंद्र गुप्त यांच्या ‘संवाद प्रभाकर’ या नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. १८६५ मध्ये ‘दुग्रेशनंदिनी’-पाठोपाठ त्यांच्या ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘विषवृक्ष’, ‘इंदिरा’, ‘चंद्रशेखर’ अशा एकापाठोपाठ एक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आणि अल्पावधीत लोकप्रियही झाल्या. १८६४ मध्ये ‘राजमोहन्स वाइफ’ ही पहिली कादंबरी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिली. ती ‘दि इंडियन फिल्ड’ या वृत्तपत्रात क्रमश: प्रकाशित झाली. पुस्तकरूपाने मात्र ती बंकिमचंद्रांच्या निधनानंतर ४० वर्षांनी- म्हणजे १९३४ मध्ये प्रकाशित झाली. या इंग्रजी कादंबरीनंतर मात्र त्यांनी आपल्या सर्व कादंबऱ्या मातृभाषेत- बंगालीमध्येच लिहिल्या. केवळ काही वैचारिक व टीकात्मक लेखन इंग्रजीत केले.
सरकारी नोकरीत असहय़ ताण होता. आपल्या कार्यकालात बंकिमचंद्रांनी अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचीही गय केली नाही. वेळप्रसंगी मुजोर इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करून आणि कठोर शिक्षा ठोठावून त्यांना वठणीवर आणले. परंतु बंकिमचंद्र हे अत्यंत कार्यदक्ष अधिकारी असल्यामुळे इंग्रज सरकारला त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करता येत नव्हती. पण तरीही सूड म्हणून इंग्रजांनी त्यांच्या सतत बदल्या केल्या. या सततच्या बदल्यांमुळे बंकिमचंद्रांच्या स्वास्थ्यावर परिणाम होत होता. या काळात साहित्यनिर्मिती हाच त्यांचा विरंगुळा होता.
कादंबरीलेखक म्हणून बंकिमचंद्रांचा लौकिक वाढत असताना ‘बंगदर्शन’ या अंकाचं संपादन करण्याचे काम त्यांनी स्वीकारले. ‘बंगदर्शन’च्या माध्यमातून त्यांनी वैचारिक लेखनाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आधुनिक भारतीय साहित्यामध्ये कादंबरीलेखनाची पायाभरणी बंकिमचंद्रांनी केली असे मानले जाते. कादंबरी हा वाङ्मयप्रकार त्यांनी वाचकांमध्ये रुजवला आणि लोकप्रियही केला. बंकिमचंद्र, मायकेल मधुसूदन दत्त आणि शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांनी बंगाली वाङ्मयसृष्टी समृद्ध केली.
त्यांच्या सुरुवातीच्या काही कादंबऱ्या सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवरच्या होत्या. पण पुढे मात्र ‘चंद्रशेखर’, ‘राजसिंह’, ‘आनंदमठ’ अशा ऐतिहासिक पाश्र्वभूमीवरील कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. १८८२ मध्ये पुस्तकरूपानं प्रकाशित झालेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीने भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासाला पुढच्या काळात एक वेगळे वळण दिले. ‘आनंदमठ’ ही कादंबरी आशयदृष्टय़ा जेवढी समृद्ध आहे, तेवढीच वादग्रस्तताही या कादंबरीने अगदी आतापर्यंत निर्माण केली आहे. ‘आनंदमठ’ आणि ‘वंदे मातरम्’ ही एकत्रित बांधली गेलेली एक अजोड कलाकृती आहे. १८७५ मध्ये लिहिले गेलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत त्यांनी या कादंबरीत अत्यंत चपखलपणे बसवले होते. या गीताने पुढे इतिहास घडवला.
स्वामी विवेकानंद, श्री अरिवद, सुभाषचंद्र बोस अशा अनेकांना ‘आनंदमठ’मधूनच प्रेरणा मिळाली. देशासाठी घरदार सोडून योद्धे संन्यासी झालेल्या वीरांची कहाणी ‘आनंदमठ’मध्ये आहे. १९२० मध्ये अलुरी सीतारामराजू या दक्षिणेतील एका तरुणाने लहान वयातच संन्यास घेऊन ‘आनंदमठ’मधील लेखनाप्रमाणेच आदिवासींचा सशस्त्र लढा उभारला.
बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्या सर्वाधिक लोकप्रिय झाल्यामुळे त्यांच्या इतर साहित्याकडे मात्र वाचक व जाणकारांचे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. ‘कमलाकान्तेर दफ्तर’सारखे ललितलेखन त्यांच्या कादंबऱ्यांइतकेच श्रेष्ठ आहे. त्यांचे ‘बंगदर्शन’मधून लिहिलेले वैचारिक लेखनही उदंड आहे. वाङ्मयीन टीकाही त्यांनी लिहिली. बंकिमचंद्रांचा संस्कृत वाङ्मयाचा उत्तम अभ्यास हे लेखन करताना त्यांना उपयोगी पडला. रामायणावर आणि िहदू धर्मावर वेडीवाकडी टीका करणाऱ्या टीकाकारांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला होता. ईश्वरचंद्र गुप्त हे त्यांचे गुरू व त्यांचे परममित्र- नाटककार दिनबंधू मित्र यांची चरित्रे व अप्रकाशित लेखन त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात बंकिमचंद्रांनी केवळ पुढाकारच घेतला असे नाही, तर त्यांच्या वाङ्मयावर त्यांनी स्वत: अभ्यासात्मक प्रस्तावनाही लिहिली.
अखेरच्या काळात बंकिमचंद्रांचा ओढा अध्यात्माकडे वाढला होता. ‘आनंदमठ’ कादंबरीत शौर्य आणि अध्यात्म यांचा अपूर्व संगम दिसतो. पुढच्या काळात गीतेच्या अभ्यासामुळे बंकिमचंद्रांचे लेखन अध्यात्मिक प्रकारचे होऊ लागले. ‘कृष्णचरित्’मध्ये बंकिमचंद्रांनी कृष्णाची केवळ देव म्हणून नव्हे, तर एक माणूस म्हणून मांडणी केली आहे. महाभारतीय कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जो संस्कृतीचा सर्वोच्च साक्षात्कार बंकिमचंद्रांना आढळला त्याचे विवेचन ‘कृष्णचरित्’प्रमाणेच ‘धर्मतत्त्व’ या ग्रंथातही त्यांनी केले आहे. ‘कृष्णचरित्’ मांडताना बंकिमचंद्रांमधील विचारवंताचे प्रगल्भ दर्शन घडते. गीतेचा अनुवाद आणि त्यावरील भाष्य यावरचे लेखन बंकिमचंद्रांनी सुरू केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे ते अधुरे राहिले. बंकिमचंद्रांच्या निधनानंतर आठ वर्षांनी- म्हणजे १९०३ मध्ये हे अधुरे भाष्य प्रकाशित झाले.
बंकिमचंद्रांनी आपल्या ५६ वर्षांच्या आयुष्यात आणि त्यापैकी ३८ वर्षांच्या लेखन कारकीर्दीत दोन कवितासंग्रह, १४ बंगाली कादंबऱ्या व एक इंग्रजी कादंबरी, तीन विनोदी व उपहासात्मक लेखसंग्रह, एक टीकात्मक लेखसंग्रह, सहा निबंधसंग्रह, एक शास्त्रीय लेखसंग्रह, दोन शैक्षणिक पुस्तके व गीतेवरील भाष्य असे एकंदर ३१ ग्रंथ लिहिले. संख्यात्मकदृष्टय़ा हा आकडा फार मोठा नसला तरी त्यांच्या साहित्याने भारतीय साहित्यविश्वात केलेली क्रांती मात्र ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची आहे.
बंकिमचंद्रांच्या साहित्याची अनेक वैशिष्टय़े आहेत. बंकिमचंद्रांच्या कादंबरीतील ठसठशीत स्त्रीव्यक्तिरेखा, बहुतांश कादंबऱ्यांतून येणारी एखादी तरी संन्याशाची व्यक्तिरेखा, भारतीय तत्त्वज्ञानाची कादंबरी माध्यमातून केलेली मांडणी, आपल्या निबंधलेखनातून रामायण-महाभारतातील व्यक्तिमत्त्वांचा लावलेला वेगळा अर्थ अशा कितीतरी गोष्टी बंकिमचंद्रांच्या साहित्यातील वेगळेपण दर्शवतात. बंकिमचंद्रांनी कादंबरीलेखनाची वाट स्वत: घडवली. ही वाट भारतीय साहित्याला पूर्णत: नवीन होती. त्यांच्या या लेखनाचा प्रभाव त्या काळातील अनेक तरुण लेखकांवर पडला. रवींद्रनाथांच्या सुरुवातीच्या साहित्यावरही काही काळ बंकिमचंद्रांचा प्रभाव दिसतो.
बंकिमचंद्रांची लेखनशैली आजच्या काळात काहीशी कृत्रिम वाटेल. त्यामध्ये अद्भुत किंवा रोमांचकारी घटना असल्या तरी त्यांत विशिष्ट भारदस्तपणा आहे.. संस्कृतचा लालित्यपूर्ण वापर आहे. बंकिमचंद्रांच्या अनेक कादंबऱ्यांच्या चार-पाच आवृत्त्या त्यांच्या हयातीतच निघाल्या. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद इतर भारतीय भाषांमध्येही झाले. बंकिमचंद्र कादंबरीकार म्हणून जितके श्रेष्ठ होते, तितकेच निबंधकार, तत्त्वज्ञ, आदर्श संपादक व कवी म्हणूनही त्यांची थोरवी मोठी आहे.
१९०७ मध्ये बंकिमचंद्रांवर लिहिलेल्या एका लेखात अरिवद घोष लिहितात, ‘बंकिमचंद्र हे एक महान कवी होते. अतिशय सुंदर भाषेचे ते आचार्य होते. कल्पनाविश्वातील सुंदर, लावण्यमयी स्वप्न व प्रतिभासृष्टीचे ते निर्माते होते. परंतु आज बंगाल त्यांचा कवी किंवा शैलीदार कादंबरीकाराच्या रूपात सन्मान करीत नाही. भविष्यात मात्र साहित्याचे समीक्षक ‘कपालकुंडला’, ‘विषवृक्ष’ आणि ‘कृष्णकांतेर वील’ यांना उत्कृष्ट कलाकृतींचा मान देतीलच; शिवाय ‘देवी चौधुरानी’, ‘आनंदमठ’, ‘कृष्णचरित्’ आणि ‘धर्मतत्त्व’ यांचीही विशेष प्रशंसा करतील. म्हणूनच बंकिमचंद्रांची गणना त्यांच्या महान सृजनात्मक उत्कृष्ट साहित्यकृतींमुळे आधुनिक भारताच्या निर्मात्यांच्या श्रेणीमध्ये निश्चितच होईल..’
बंकिमचंद्रांच्या लेखनाची वैशिष्टय़े सांगताना अरिवद लिहितात, ‘पूर्वार्धातील बंकिम हे केवळ कवी वा साहित्यिक होते. पण उत्तरार्धातील बंकिम हे ऋषी किंवा राष्ट्रनिर्मातेच ठरतील. शैलीकार किंवा कवी म्हणून बंकिमचंद्रांनी जे महान काम केले, ते संपूर्ण भारतासाठी, बंगालसाठी होते. म्हणूनच नियतीने त्यांना राष्ट्रीय विकासातील अग्रणीची भूमिका बहाल केली. त्यांची भाषा पांडित्यपूर्णही नव्हती की पूर्णत: लोकभाषाही नव्हती; तर त्यांची भाषा मिश्रित लोकभाषा होती असा आरोप होतो. परंतु मूळ उद्देश सफल करण्यासाठी आम्हाला अशा एका भाषेची आवश्यकता होती, की ज्यामध्ये संस्कृत भाषेची शक्ती, सौंदर्य, ओजस्विता आणि उत्साहही असेल आणि आपल्या भाषेतील गतिशीलताही असेल. बंगालचा आत्मा स्वत:ला अभिव्यक्त करू शकेल असे एक माध्यम त्यांनी आम्हाला दिले. एखाद्या परीकल्पनेप्रमाणे त्यांनी राजकीय गरजांविषयीचे आडाखे बांधले. अशा महान विधिवेत्त्यानं तत्कालीन राजकीय आंदोलनातील निर्थकता व निरुपयोगिता ओळखली आणि ‘लोकरहस्य’, ‘कमलाकांतेर दफ्तर’ या कलाकृतींमधून त्यावर भाष्य केले.’
बंकिमचंद्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याने लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत केल्या. ‘वंदे मातरम्’ या मंत्राचे शस्त्र भारतीय जनतेने इंग्रजी सत्तेवर चालवले. या गीतातून त्यांनी देशाला राष्ट्रभक्तीचा मार्ग दाखवला.. देशभक्तीचा धर्म दिला. हीच चेतना आजही आपल्या देशाला नव्या पुनरुत्थानाच्या दिशेने मार्गदर्शन करीत आहे.
राष्ट्रभावनेचे जनक बंकिमचंद्र
भारतीय कादंबरीलेखनाचा पाया घालणारे पहिले कादंबरीकार, कवी, संपादक, तत्त्वज्ञ आणि ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या लेखनाने तमाम भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जन्मास येत्या २७ जून रोजी १७५ वष्रे पूर्ण होत आहेत.
First published on: 23-06-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande mataram writer bankim chandra