वंजारी बोलीभाषेचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. अनेक बोलींची मिश्रण असलेली ही बोली आहे. तीत राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, मराठी बोलीभाषांचे मिश्रण आहे. मात्र, या बोलीतील शब्दांच्या उच्चारांचा खास असा बाज आहे. त्या ठसक्यात आणि त्या ठेक्यात बोलली गेली तर तिच्यात कठोरपणा, उद्दामपणा जाणवतो. पण प्रत्यक्ष वागणुकीत मात्र तसे दिसत नाही. ती समोरच्याला लळा लावल्याशिवाय राहत नाही.
ठाणे जिल्ह्य़ातील पालघर आणि डहाणू तालुक्यांत मथुरी वंजारी समाजाची २२ गावं आणि विक्रमगड तालुक्यातील दोन अशा २४ गावांमध्ये ‘वंजारी’ बोली बोलली जाते. गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील नारगोळ व माणेकपूर-सरई ही दोन्ही गावे पूर्वी महाराष्ट्रात होती. द्वैभाषिक मुंबई राज्याच्या विभाजनाच्या वेळी ती गुजरातमध्ये गेली. विभाजनापूर्वी या गावांना ‘२४ गामना वंजारा’ अशी उपाधी लावली जायची. या मथुरी वंजारी समाजाची ही बोली आहे.
वंजारी बोलीचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. अनेक बोलींची मिश्रण असलेली ही बोली आहे. तीत राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, मराठी बोलीभाषांचे मिश्रण आहे. मात्र, या बोलीतल्या शब्दांच्या उच्चारांचा खास असा बाज आहे. त्या विशिष्ट ठसक्यात आणि ठेक्यात ती बोलली तर तीत कठोरता आणि उद्दामपणाचा भास होतो. परंतु या लोकांची प्रत्यक्ष वागणूक मात्र तशी नाही. ही बोली समोरच्याला लळा लावल्याशिवाय राहत नाही. तिच्यावर हा परिणाम होण्याचे कारणही तसेच आहे.
पूर्वी वंजारी समाज भटका होता. बैलांच्या पाठीवर धान्यांच्या गोणी लादून ते सतत भटकंती करीत. जिथे गरज असेल तिथे ते धान्यविक्रीचा धंदा, उद्योग करत. बैलांचे तांडेच्या तांडे बरोबर घेऊन वेगवेगळ्या प्रदेशांत धंदापाणी करत हा समाज फिरे. त्यामुळे कधी मैदानी प्रदेशात, कधी डोंगरदऱ्यांतून, तर कधी पठारी प्रदेशांतून त्यांचा प्रवास होई. जिथे जितका काळ धंदा चाले, तोवर त्या प्रदेशात ते मुक्काम करत. साहजिकच तेथील समाजजीवन, चालीरीती आणि तिथल्या सांस्कृतिक जीवनाचा परिणाम या भटक्या समाजावरही होत असे. परिणामी तेथील स्थानिक भाषेतल्या नवीन शब्दांची वंजारींच्या बोलीत भर पडत गेली. सततच्या भटकंतीमुळे या समाजाला खास वैशिष्टय़पूर्ण असे सांस्कृतिक जीवन व प्रगत अशी भाषा लाभली नाही. यासंदर्भात वंजारी बोलीतील काही नमुनेदार उदाहरणे पाहिली तर वेगवेगळ्या बोलीभाषांतील गाणी तीत कशी आली आहेत, ते चटकन् लक्षात येईल.
गुजरातीप्रचुर गीत
उतरो उतरो सोनल बिंगी
पेटये दागिना, किटय गिया,
अरगणिये, साडयो कोहबाय गियो
उतरो उतरो सोनल बिंगी
मराठीप्रचुर गीत
अळद लावितो सौरंगी
कोण बापाचा लाडकला
कोण आयसी लाडकली
अळद लावीतो सौरंगी..
वंजारीतली होळीची बहुतेक गाणी मात्र विविध प्रदेशांतल्या बोलीभाषांतील आहेत. या गाण्यांतील हेल आणि सुरावट मात्र गुजरातीची असते.
गुजरातीचा प्रभाव  
गरबो खुंदा यो रे, खुंदायो
कोण गामे खुंदायो
गरबो खुंदा यो रे, खुंदायो
दापोली गामे खुंदायो
मराठीचा प्रभाव  
उसिनिसी जागेनी सडकु रे हरी सडकु
सडता, सडता पडलू रे हरी पडलू रे
पायना पोलरा भंगायारे हरी भंगाया रे
सुरतना सोनारु बोलावसु रे हरी बोलावसू
खास वंजारी बोलीतील गाणीही आहेत. पूर्वी पहाटे उठून ओव्या गायला जात. आता मात्र सगळे कालबाह्य़ झाले आहे. वानगीदाखल हे करुणरुदन करणारे गीत-
अे दिगरा ऽऽऽ काहटी रागयो
आमन्न्ो होडीने गि यो रे ऽऽऽ
कोणता गाम गियोतू, कोणता शेरे फरतरे ऽऽऽ
तारा सिलापिला, ताराशी हुजय गियातरे ऽऽऽ
आहूं टाकीने तारी वाट जोतरे! अे दिगरा ऽऽऽ
या बोलीचे वैशिष्टय़ हे की, अनेक बोलीभाषांचे (राजस्थानी, जोधपुरी, गुजराती, मराठी, हिंदी) बेमालूम मिश्रण तिच्यामध्ये झाले आहे. त्यामुळे ती समजायला महाकठीण. विविध भाषांतील शब्द-संमिश्रतेमुळे वंजारी लोक इतर भाषा लवकर शिकतात. अगदी मराठी प्रमाणभाषा, हिंदी, गुजराती, इंग्रजी या भाषा ते पटकन् अवगत करतात. मराठीतील अनेक बोलीभाषा (वाढवळी, आगरी, भंडारी) ते बोलतात. त्यांना त्या समजतात. मात्र, इतरभाषिकांना अनेक वर्षे  सान्निध्यात राहूनदेखील त्यांची वंजारी बोली बोलता वा शिकता येत नाही.
वंजारी बोलीतील काही वाक्प्रचार आणि म्हणी भाषिकदृष्टय़ा सौंदर्यपूर्ण आहेत. काही बोधवचनांचाही या बोलीत वापर केला जातो. याची वानगीदाखल काही उदाहरणे-
वाक् प्रचार-
१) अे डह आहडतो कां फरत.
२) लोकोंनी नानी तानी वार्ता तू काहटी करत
३) नांगो माणूस नांगी वात
४) हाणनो किडो हाणमा नय रेतो
या बोलीत म्हणींचा वापरही वारंवार होतो.
१) मुवली बेहेने हेरबरी, दुध वधारी
२) आहीने हेत पडत तो आही दकाटत
बाफूने हेत पडत तो बाफू दकाटत
३) उठय़ा उठय़ा मांगहू तोही थोडो चाल हे?
४) वन पेटत तो जन जोत, मन पेटत तो कोण जोत?
५) कटलो पेर धोत्यामा हंदा नांगात
बोधवचनांचाही वापर वंजारीत मोठय़ा खुबीने करून भाषेची रंगत वाढवली जाते.
१) कोंबडी पाणी पित ते आबाळे जोत केत अटलोतो विसार कऱ्हु गा नय?
२) अटलो मोटो लाख्यो वंजारानो नय रियो, ता तामारो काय, रेवानो हे?
३) फरी फरिने कां जाही परत नात आवही.
४) कटलो तरी रडयो तो गियलो आवनो हे गा.
५) राख, लगना बेरनी, हर देवानी हे गा.
वंजारी बोलीतले व्याकरण पाहता जाणीवपूर्वक व्याकरणाच्या अनुषंगाने या बोलीची शास्त्रशुद्ध (व्याकरणशुद्ध) घडण झाली आहे असे वाटत नाही. उदा.- कर्ता, कर्म, क्रियापद, लिंग यानुसार चालतात.
वंजारीत- गोपाळ शाळमा हिकत.
मराठीत- गोपाळ शाळेत शिकतो.
वंजारीत स्त्रीलिंगी वाक्य- वेणू शाळमा हिकत.
मराठीत- वेणू शाळेत शिकते.
या बोलीत स्त्रीलिंगी रूप नाही. तसेच तृतीयपुरुषी अनेकवचन नाही. लिंग, वचने यांची निश्चितता नाही. अर्थात व्याकरणाशिवाय या बोलीचे काही अडते असे नाही. अनेक भाषांतील शब्दांची उचलेगिरी, संस्करण झाल्यामुळे ही बोली बहुतांशी ओबडधोबड अशीच आहे. ती रसाळ नाही. मातृभाषेला वाईट म्हणू नये, पण तिचे खरे स्वरूप मांडायला हरकत नाही. तरीही आमची वंजारी बोली आम्हाला आवडते. कारण ती आमची मातृभाषा आहे.
वंजारी लोक भटके. राजस्थानच्या जयपूर, उदयपूर भागांतून बैलांचे तांडे घेऊन त्यांच्या पाठीवर धान्यांच्या गोणी लादून धान्यविक्रीचा भटका व्यवसाय करत करत ते निघाले. त्यामुळे बैल हा एकमेव प्राणी त्यांच्या धंद्याचे साधन. उपजीविकेचे साधन म्हणजे बैलाचा तांडा. राजस्थानमधून गुजरातेतील माळवा, कमख्ल मार्गे नारगोळ, माणेकपूर-सरई करत करत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्य़ातल्या पालघर तालुक्यातील मुरबे, मासवण, दापोली अशा २४ गावांत त्यांचे तांडे स्थिरावले. जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी वस्ती केली. बदलत्या परिस्थितीनुसार त्यांचा व्यवसाय व उपजीविकेचे साधन बदलले. थोडीफार शेती करणे, बैलजोडय़ांनी गवताचा धंदा करणे, लाकूड वाहतूक, ऐनाच्या सालीची विक्री करणे, मीठ विकणे, बैलगाडी घेऊन भाताची खरेदी-विक्री करणे, पालामोड (पैसे व्याजी देणे) असे आपापल्या ऐपतीप्रमाणे जो- तो धंदा व व्यवसाय करत असे. स्वातंत्र्यानंतर या समाजात कमालीचे चैतन्य निर्माण झाले. त्याचे कारण- शिक्षण. जो- तो हिरीरीने शिकू लागला. त्यातून शिक्षकी पेशा, कारकुनी, अधिकारीवर्ग निर्माण झाला. खऱ्या अर्थाने हा समाज सुशिक्षित झाला. उच्च मध्यमवर्गाच्या तोडीला गेला. परंतु एक झाले, सुशिक्षित मुले शिक्षण, नोकरी, जोडधंदा यासाठी गाव सोडून शहरांकडे वळली. शेती ओस पडली. जुने धंदे-व्यवसाय कालबाह्य़ झाले. गावे रिकामी झाली. सर्व बाहेर गेले. त्यामुळे त्यांच्या मातृभाषेचा लोप होत गेला. आज ही बोली दहा टक्केच बोलली जात असावी. तीत मराठी, हिंदी, इंग्रजीचे शब्द घुसून ती आणखीनच सरमिसळ झाली आहे. बोलणारी माणसेच राहिली नाही, तिथे भाषा तरी कशी टिकणार?
या बोलीत शिवराळपणा असला तरी तो ऐकायला खमंग वाटतो. आजही आमच्यासारख्या जुन्या लोकांनी ती बोलायची म्हटली तरी ती गदगदून हसवल्याशिवाय राहत नाही. आज काळाच्या ओघात ही बोली कालबाह्य़ होऊन नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे.