वऱ्हाडी बोली ही विदर्भातील एक महत्त्वाची बोली. तिच्याविषयीचा पहिला लेख कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिला होता. अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांनुसार वऱ्हाडी बोलीत काहीसा फरक पडत जातो. हे भेद फार मोठे नसले तरी लक्षणीय आहेत. वऱ्हाडी बोलीच्या आणखीन काही वैशिष्टय़ांची चर्चा करणारा हा लेख..
कोकण, खानदेश, मराठवाडा व विदर्भ हे महाराष्ट्राचे उपप्रदेश होत. समुद्राची निळीशार किनार लाभलेली कोकणभूमी, गोदावरीच्या खोऱ्यातला मराठवाडा, तापीच्या खोऱ्यातला खानदेश अन् पूर्णेच्या खोऱ्यात वसलेला विदर्भ-वऱ्हाड. पूर्व विदर्भातले चार व पश्चिम विदर्भातले चार (आता गडचिरोली, गोंदिया, वाशीम यांची भर पडली आहे.) अशा आठ जिल्ह्यांचा महाविदर्भ- नागविदर्भ नावाच्या या प्रदेशाला अघळपघळपणे ‘विदर्भ’ म्हणतात. पण काटेकोरपणे नागपूर प्रदेशालाच- विदर्भ व अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ (वाशीम) या पाच जिल्ह्यांना ‘वऱ्हाड’ असे नाव रूढ आहे.
‘वऱ्हाड अन् सोन्याची कराड’ (कराड म्हणजे किनारा. कुऱ्हाड नव्हे!) असे या प्रदेशाचे वर्णन केले जाते. तसेच ‘विदर्भ विषय: सरस्वती जन्मभू:’ अशी तिची वाङ्मयीन व भाषिक महतीही गायिली जाते. वऱ्हाडीत सांस्कृतिक संचित आणि लोकपरंपरांचं धन विपुल आहे. दंढार, अवधुर्ती कीर्तन, तुकडोजी महाराजांचं भजन, नागपंचमीची नागगाणी, सोपीनाथ- गुलालशेष, नागमंदिरापुढच्या बाऱ्या-ठावा, नागदेवतेच्या आरबळ्याचे व्रतस्थ जीवन, पोळ्याची वृषभगीते यांची विपुलता या बोलीत भरून राहिलेली आहे.
तुह्यानं मारलं,
कासऱ्यानं आवरलं,
रात्र नोका मानू हो,
आज आवतन घ्या आन
सकाय ज्येव्याले या हो
असं पोळ्याच्या आदल्या दिवशी- खांदेमळणीच्या दिवशी बैलांना दिलेलं काव्यमय आमंत्रण, ‘यक व्हती हो सोनचिळी’ अशी नवरात्रातली जागृतगीते, लव्हाळ्याच्या दीपमाळेवरील कणकेच्या दिव्याच्या उजेडात-
आटे आटे गाई गोमाटे
हरणी तोळे ताला तोळे
गायी-म्हशींनी भरले वाडे
घरचा धनी मजा करो
अशी धेंडवाईची गाणी, कार्तिकातला काकडा, गाईगोंदणाची गाणी, कूटकाव्याचा प्रश्नोत्तरांचा रंगतदार फड, होळीची बोंबलगीते, लग्नविधीतले वीरपूजन, जेवणार पाटी, जात्यावरच्या ओव्या, बाहुल्यांची गाणी, डमरूवाला, मांगगारुडी, वासुदेव, गोंधळी या सर्व लोककलावंतांचं इथलं कलावैभव कैक पिढय़ांपासून ओसंडून वाहणारा आनंद देत आलेलं आहे. आताशा त्याला ओहोटी लागली आहे खरी; पण अजून ते अधूनमधून का होईना, कानावर पडतं. या लोककला व लोकसंस्कृतीतून वऱ्हाडीचा प्रवाह झुळझुळताना दिसतो.
जॉर्ज ग्रिअर्सनने भारताची भाषिक पाहणी करून १७९ भाषा आणि ५४४ पोटभाषा व बोलींची नोंद केली. एकटय़ा मध्यवर्ती मराठीच्या त्याने ३९ बोलींची नोंद केली आहे. जिला आपण मध्यवर्ती किंवा प्रमाणभाषा म्हणतो, ती एखाद्या सैन्याच्या पलटणीसारखी शिस्तबद्ध असते. तिची प्रमाणमापं ठरलेली असल्यामुळे तिच्यात एक करडेपणा असतो, व्याकरणाचं रण असतं. या भाषेची अंतर्गत हालचालही एकसारखी असते. तंत्र व शिस्तीमुळे तिच्या आविष्कृत होऊ पाहणाऱ्या ऊर्मी दाबल्या जातात. त्यामुळे भाषेचं झुळझुळ प्रवाहीपण नष्ट होतं. एका विस्तृत समूहाला प्रमाणभाषेच्या वर्तुळात गुंफून ठेवता येत असेल, भाषिक व्यवस्था- एक सामाजिक संस्था म्हणून ते उपयुक्तही असू शकेल, पण बोलींची स्वच्छंद निर्भरता व सैरभैर, मनमुक्त आल्हाद तिच्यात असत नाही. त्यामुळे बोलीभाषेचं वेगळेपण उठून दिसतं. वऱ्हाडी बोली त्यापैकीच एक.
या बोलीत काव्यशब्दांची पखरण खूप दिसते. दयनपहाट (पहाटेची जात्यावरच्या दळणाची वेळ), जेवनरात, निठुर (किंचित राठ), डुंगं (अध्र्या-पाऊण एकराचा छोटासा शेतजमिनीचा तुकडा), हिंडगावने- येल पाडणे- ठोकने (‘नखरे करणे’ या वाक्प्रचाराच्या वेगवेगळ्या अर्थच्छटा), चांदूक (चंद्राच्या आकाराची तळहाताएवढी भाकरी), कडुसं पडने (सकाळ होणे), झ्याल पडने (सायंकाळ होणे), बांबय धरने (आभाळ भरून येणे), चंद्रमधासाला येणे (आकाशाच्या मध्यावर येणे), इत्यादी. याचबरोबर फुलझयकी कामं, लबरलबर जेवनं, चभरचभर करनं, मचमच करनं, झावझाव दिसनं (अंधुक), पाकयीपाकयीनं फुलनं, झोकाझोकानं चहळनं, रुंघळरूंघळ करनं, ठासेठुसे, टालमटुलम, कनंकनं चालनं (मध्यमगती) असे नादमय शब्दही तीत खूप आहेत.
अन्वर्थक व चपखल शब्दांनी गंभीर विचार व्यक्त करण्याची व इंद्रियगोचर अनुभव साक्षात् करण्याची भाषिक क्षमता वऱ्हाडीमध्ये पाहायला मिळते. उदा. जोळजिम्मा (अंतर्गत व्यवस्था), टिप्पनबाज (सोयीची), झाडोन (गर्द झाडझाडोरा), वडगन (ताटाखाली लावायचा अडका), जवन (आंबे पिकवणारी अढी), गावखोरी (गावाजवळ), खालताटे (हलक्या जातीतले), अवस (अमावास्या), पुनेव (पौर्णिमा), खिनभर (क्षणभर), काऱ्होळ (कालवड), कुटाणा (जिकिरीची मेहनत), अगास (आकाश), वटभरन (मधुचंद्र), बाजिंदा (चालूपणा करणारा), पांदण (दुतर्फा गर्द झाडीची कमान असलेला अरूंद रस्ता), विसा (वीस. अठरावीसा दारिद्रय़ म्हणजे २० ७ १८ = ३६० दिवस. वर्षांच्या सर्वच दिवशी दारिद्रय़) इत्यादी.
वऱ्हाडी बोलीत लयबद्धता आणि नृत्यभावही विलसताना दिसतो. या शब्दांच्या नादाने तिचा सांगीतिक देह झंकारत राहतो. तर तिचं ठसकेबाज व रूबाबदार रूप तिला राजबिंडं बनवतं. नादानुकारी क्रियाविशेषणांमुळे तिच्यातला भावाभिव्यक्तीचा हळुवारपणा आस्वाद्य बनतो. तर लोकोक्ती, वाक्प्रचार आणि म्हणी या बोलीचं सर्वच बोलींप्रमाणे एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. उदा. ‘गोगलगायीच्या दुदाचं लोनी नस्ते निंघत’, ‘अत्तरानं ढुंगणं धुतलं तर राज्यई नस्ते पुरत’, ‘हेला ना भादराव देवळा जोळ आन् पंगत ना द्याव गोदरी जोळ’, ‘शिदोळ कितीकई लांबला तरमा शेशनाग व्हत नसते’, ‘अंधारात तूप सांडलं तरमा सुगंद लपत नाई’, ‘वादीसाटी म्हईस कापू नोय’ इत्यादी.
वाक्प्रचार आणि म्हणी जशा जीवनाचा सारांश सांगतात, तशा त्या आयुष्यातल्या अडथळ्यांची जाणीवही करून देतात. ही जाणीव कधी विनोदाच्या अंगाने, तर कधी उपहास-उपरोधाच्या माध्यमातून केली जाते. त्याचे काही मासलेवाईक नमुने पाहण्यासारखे आहेत. ‘खाते कनगीले अन् गाते उरल्याले’ (कणगीवरचे झाकण), ‘निक्सू निक्सू खाये, त्याच्या घाटीत केस जाये’, ‘दिवस गेला गोठीमाठी, चांदन्यानं कापूस वटी’, ‘गोंडाचा जवाई अन् ताकासंगं शेव्या खाई’, ‘नखरा नखो-बोटी अन् सुरत खापरकुटी’, ‘सकवार सई अन् बोरातली अई’, ‘मनात नाई नांदनं अन् पोवाडे बांधनं’, ‘हिडग्याले देली गाय धावू धावू गोठानावर जाय’ इत्यादी..
वऱ्हाडी बोलीचं लिखित रूपही आकर्षक आहे. परंतु तिचा खरा रुबाब आणि ठसका तिच्या उच्चारणात आहे. किंचित हेल काढून तिचा मूळ लहेजा सांभाळत वऱ्हाडी लोक बोलतात तेव्हा तिची खुमारी ऐकणाऱ्याच्या लक्षात येते. तरटपट्टीवरची गावखेडय़ातली पोरं गावच्या टिनोपॉल गुर्जीकडून अक्षरांची संथा घेतात तेव्हा असा संवाद घडतो-
‘हं, पोट्टेहो, बानातला ‘न’ म्हना.’
पोरंही मग बानातला ‘न’ म्हणतात.
‘हं, शाब्बास. अशानं तुमचं याकरन कप्प व्हते.’
‘न’ आणि ‘ण’ या दोन व्यंजनांच्या बाबत वऱ्हाडीत बरीच गंमत आहे. जसे- आनी, बानी, पानी. ‘मी’ हा दीर्घस्वर वऱ्हाडीत ऱ्हस्व होतो, तर शब्दाच्या सुरुवातीचा ‘ए’चा उच्चार ‘ये’ आणि ‘ओ’ऐवजी ‘वो’ येतो. एकचा ‘यक’, ओंगळचे ‘वोंगळ’, चमचा, चादर, चमचम यांचे उच्चार हिंदीसारखे ‘च्यमचा’, ‘च्यादर’, ‘च्यमच्यम’ असे केले जातात. मिळणे, भेटणे, मागवणे, बोलावणे या शब्दांच्या अर्थाचाही हिंदीच्या संपर्कामुळे घोटाळा होतो. जसे -‘म्या गजाननले पाह्यलं पन तो मिळालाच नाई’, ‘वच्छल्लाले तीसच मार्क भेटले’, ‘याहीनं कालच पाच किलो गूय बलावला..’ ‘जमलं’ हा प्रमाण मराठीतला शब्द वऱ्हाडीत ‘ज्यमलं’ असा जमून येतो. साखरचा ‘साखऱ्या’ आणि भाकरच्या ‘भाकऱ्या’ होतो.
काही शब्दांवरच्या अनुस्वाराचा उच्चार केला जात नाही. कुंकू- कुकू, थुंका- थुका. उलटपक्षी काही शब्दांवर नसलेला अनुस्वार दिला जातो. मुग-मुंग, मग-मंग. हिंदूीप्रमाणे इंग्रजी शब्दांनीही वऱ्हाडी रूप स्वीकारले. ‘आज माह्यावलं मूळच (मूड) नाई बाई’, ‘टीवीवर शिन्मा नसला की लयच बोर (बोअर) व्हते.’
शिव्या हे कोणत्याही समाजाचं राग व्यक्त करण्याचं अहिंसक माध्यम आहे. मराठी माणसाला जेवढी ‘ओवी’ प्रिय, तेवढीच ‘शिवी’ही! सोडावॉटरच्या बाटलीतून फस्सदिशी आवाज करून वाफ बाहेर पडावी, तशी शिवीच्या रूपाने मनातली रागाची वाफ बाहेर पडली की माणूस हलका हलका होतो. कुणीतरी म्हटलंच आहे की, ‘ज्या भाषेत जास्तीत जास्त तिखट, झणझणीत शिव्या असतील ती भाषा श्रेष्ठ!’ वऱ्हाडी याही निकषावर उतरते. वऱ्हाडीतल्या मिर्चीखोर शिव्यांचा ठसका ऐकण्यासारखा आहे. ॅउदाहरणार्थ, वह्याळथुत्ता (बावळट), सोयभोग्या (मंदबुद्धीचा बावळट), हेंबाळा (निर्बुद्ध), भादऱ्या (मधे मधे बोलणारा), भंटोल (उनाड), भुईफुक्या (दरिद्री), पालुखोच्या (बायकी), सयकेल, रन्नावेल (माजलेला), बाजिंद्या (बनवाबनवी करणारा), पादरफिसक्या (मोक्याच्या वेळी अवसान गाळणारा), धांगड (थोराड), चलवादी (चवचाल), साताय (चालू स्वभावाचा), नसानकुकडी (प्रत्येक गोष्टीला नाक मुरडणारी), इ. ‘मेवनगंडीच्या’, ‘ससरीच्या’ या शिव्या आता काहीशा मागे पडल्या आहेत.
वऱ्हाडी बोली जशी नजाकतदार अन् कुर्रेबाज आहे तशीच ती शालीन व कुलवंतही आहे. महानुभावी गद्याशी आपलं कूळ सांगणाऱ्या या बोलीत उद्धव शेळके (‘धग’), मनोहर तल्हार (‘माणूस’), पुरुषोत्तम बोरकर (‘मेड इन इंडिया’), प्रतिमा इंगोले (‘बुढाई’), रमेश इंगळे उत्रादकर (‘निशाणी डावा अंगठा’), किशोर सानप (‘पांगुळवाडा’), रा. गो. चवरे यांनी कादंबरीलेखन केलेलं आहे. कवितेच्या क्षेत्रात शरच्चंद्र सिन्हा, विठ्ठल वाघ, तर कथाप्रांतात प्रतिमा इंगोले, सतीश तराळ यांनी वऱ्हाडी बोलीत आपला कस दाखवला आहे.
‘गोगलगायीच्या दुदाचं लोनी नस्ते निंघत’
वऱ्हाडी बोली ही विदर्भातील एक महत्त्वाची बोली. तिच्याविषयीचा पहिला लेख कवी विठ्ठल वाघ यांनी लिहिला होता. अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांनुसार वऱ्हाडी बोलीत काहीसा फरक पडत जातो.
आणखी वाचा
First published on: 23-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व मायबोली बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varhadi boli