विदर्भातील वऱ्हाडी बोलीचा प्रदेश म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे होत. या जिल्ह्य़ांतील बोली व बुलढाणा जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावरील वऱ्हाडी बोली यांत काही स्थळभेद असून काही वेगळी वैशिष्टय़े आहेत. घाटावरची वऱ्हाडी भाषा प्रमाण मराठीला जवळची आहे. आशयाच्या दृष्टीने दोन्ही बोली जवळपास सारख्याच असल्या तरी त्यांच्या ध्वनिप्रक्रियेत व शब्दप्रयोगात फरक आहे.
काही वर्षांपूर्वी लोकसाहित्यातील पीएच. डी.साठी बुलढाणा जिल्ह्य़ातील ७० ते ८० खेडय़ांमध्ये फिरून मी वीस हजारावर लोकगीतांचे संकलन केले आणि त्यांचा अभ्यास केला. त्यावेळी विदर्भ व घाटमाथ्यावरील वऱ्हाडी बोलींत काही फरक आणि वैशिष्टय़े आढळून आली. विदर्भात ‘नागपुरी’ व ‘वऱ्हाडी’ या प्रमुख बोली आहेत. मेहकर परिसरातील म्हणजे बुलढाणा जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावरील बोली ही वऱ्हाडीच आहे. भाषाशास्त्राच्या नियमाप्रमाणे बोली या चार-चार कोसावर बदलतात. विदर्भातील वऱ्हाडी बोलीचा प्रदेश म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे होत. या जिल्ह्य़ांतील बोली व बुलढाणा जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावरील वऱ्हाडी बोली यांत काही स्थळभेद असून काही वेगळी वैशिष्टय़े आहेत, हे पुढील लोकगीतांमधून स्पष्ट होते. लोकगीतातील उदाहरण द्यायचे महत्त्वाचे कारण असे की, लोकगीते ही त्या- त्या भूभागातील बोलीभाषेत असतात. लोकगीतांमध्ये जुने शब्द टिकून असतात. प्रकाशित ग्रंथांमधील लोकगीते व बुलढाणा जिल्ह्य़ाच्या घाटमाथ्यावरील लोकगीतांमधील वेगळेपण पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल.
प्रकाशित ग्रंथांमधील लोकगीते- १) सासुंचा सासुरवास भोगल्यान काय होत? २) नणंद, पाहुणी, नन्सबाई, ३) सासंचा सासुरवास नणंद नणंदची लावणी/ दीड दिसाची पाहुणी.
घाटमाथ्यावरील लोकगीते- १) सासुंचा सासुरवास भोगल्यानं काय व्हतं?, २) पाव्हणी, नणंदबाई, ३) सासुचा सासुरवास नणंदेची लावणी/ दिडा दिवसाची पाव्हणी.
आशयाच्या दृष्टीने दोन्ही रचना जवळपास सारख्याच असल्या तरी ध्वनिप्रक्रियेत शब्दप्रयोगात फरक आहे. क्रमांक १ मधील लोकगीतात ‘सासंचा’ म्हटले आहे, तर घाटमाथ्यावरील ओवीत ‘सासुचा’ म्हटले आहे.  घाटमाथ्यावर ‘व्हतं-पाव्हणी’ या शब्दांवर बोलताना आघात देण्याची खास लकब आहे. उदा.
सेताच्या बांधानं पुया पपूया राज बोले।
दिस पेरणीचे आले
पडला पाऊस गरजु गरजु राती।
बंधुच्या शेताले मोत्याचं सिख पळे
चाडय़ावर मुठ नंदिले म्हणते वल्हा बोलला
पपया दिवस पेरणीचा आला।
पडतो पाऊस गर्जू गर्जू राती।
बंधुच्या शेताले मोत्यांचे सिख पडे।
प्रकाशित ग्रंथांत आणि घाटमाथ्यावरील (कंसातील) बोलीतील शब्दांत पुढीलप्रमाणे फरक आढळतो- बांधानं (बंधुऱ्यानं), पपुया (पपया), गरजु गरजु (गर्जू गर्जू), दिस (दिवस), पळतो (पडतो)
घाटमाथ्यावर ‘पाऊस पडे’ तर विदर्भात ‘पाऊस पळे’ असे ध्वनिपरिवर्तन आढळते. ‘ळ’ हा जसा वारंवार येतो तसाच ‘ड’ऐवजी ‘ळ’ वापरण्याची वऱ्हाडची खास लकब इथे दिसते. बुलढाणा जिल्ह्य़ातील मेहकरच्या घाटमाथ्यावर ‘पडे’ हे शब्दरूप प्रमाण मराठी भाषेला जवळचे आहे. घाटमाथ्यावर ‘गर्जू, गर्जू’ या शब्दांवर जोर देण्यात येतो. आशयाने लोकगीते सारखीच असली तरी दोन्ही बोलींत फरक आहे तो वर्णप्रक्रिया व शब्दरूपे यादृष्टीने. ‘दगडातील पाझर’ या पुस्तकातील विदर्भातील लोकगीते व घाटमाथ्यावरील लोकगीते फरकाच्या दृष्टीने पाहता येतील.
उदा. ‘सुरया उगवला अग्नीचा भडका, खेयाले निघला चांदमातेचा लाडका’
घाटावर : ‘निघाला सूर्यदेव जसा अग्नीचा भडका, शीतल चालला चंद्रमातेचा लाडका.’
‘सुरया’ऐवजी ‘सूर्या’ किंवा ‘सूर्यनारायण’, ‘निघाला’ऐवजी ‘निघला’, ‘खेयाले’ऐवजी घाटावर ‘खेळाले’, ‘उन्हाया’ऐवजी घाटावर ‘उन्हाळा’ असे उच्चार आढळतात. दोन्ही उदाहरणांमध्ये आविष्कार व आशय सारखाच आहे. ‘सूर्य’ हा शब्द घाटावरील भागात ‘या’वर आघात देऊन उच्चारला जातो. तसेच वऱ्हाडातील ‘ळ’चा ‘या’ असे ध्वनिपरिवर्तन आढळून येते. ‘खेळाले’- ‘खेयाले’ व ‘उन्हाया’चा उन्हाळा’ या शब्दांतसुद्धा फरक दिसून येतो. घाटावरील वऱ्हाडीत ‘नि’ या वर्णावर आघात देतात. ‘निघाला’ऐवजी ‘निघला’ असे उच्चारतात. ‘साहित्याचे मूलधन’ या लोकगीतांच्या वऱ्हाडीतील पुस्तकातील संदर्भ पाहू.
(१) गोरे भावजयी ‘तुसडे’ बोलाची,  घाटावरील उदाहरण-गोरे भावजयी ‘तुसंड’ बोलाची, (२) भाऊ आपला भावजय पराइर्, घाटावर- भाऊ आपला भावजय परायाची. घाटावरची वऱ्हाडी भाषा प्रमाण मराठीला जवळची आहे. घाटावरील संकलित लोकगीतांमध्ये- ‘मले, तुले, मपल्या, तुपल्या, निघला, येंधला, काहुन, करून राह्य़लो’ असे खास वऱ्हाडी शब्द आले आहेत. ‘सीता भावजय’ किंवा ‘भावजय’ हाच शब्द वापरण्याचा घाटावर प्राचीन परिपाठ आहे. ‘गोरेबाई.. बहिणीबाई’ असेसुद्धा शब्दप्रयोग आलेले आहेत. ‘महा-मव्हा, इवाही- इव्हाई, करतो- करते’.. वऱ्हाडी प्रकाशित लोकगीतांमध्ये वर्तमानकाळातील तृतीयपुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी क्रियापदाला प्रथमपुरुषी प्रत्यय लावण्याची प्रथा दिसते. ‘करतो, जातो, घेतो, करजो, घेनो’ असे स्त्रिया पुरुषांप्रमाणे म्हणताना दिसतात.
प्रमाण मराठीला जवळ असणारी वऱ्हाडी ही घाटावरील आहे. ‘ळ’ हा प्रमाण मराठीतील आहे. घाटावरील वऱ्हाडी बोलीत ‘आभाळ’ म्हटले जाते, तर विदर्भात ‘आभाय,’ ‘डोळा’ला ‘डोया’, ‘झुळझुळ’चे ‘झुयझुय’, ‘मळमळ’चे ‘मयमय’ असे म्हटले जाते. वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघांच्या रचनेतही ‘काळ्या मातीत’ऐवजी ‘काया मातीत मातीत’ असा उल्लेख आढळतो. उदा. ‘दिवाळीची चोळी’ तर वाघांच्या रचनेत ‘दिवासीची चोथी’ असा फरक आहे. ‘चंद्रकळा’ – ‘चंद्रकथा’ या प्रकारे अकोला जिल्ह्य़ातील विठ्ठल वाघ व वऱ्हाडी कथाकार बाजीराव पाटील यांच्या रचनेत ‘ळ’ऐवजी ‘ल’ येतो.

Story img Loader