प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
मुंबई म्हटल्यावर इथल्या उंच उंच इमारती, खारा वारा, दमट हवा, सतत घाम, अनाकर्षक आणि अशक्त समुद्र, सतत गडबडीत असणारी, धावणारी, धक्के मारणारी भयानक गर्दी, काचेच्या न्यू जनरेशन बिझनेस इमारती, फोर्टमधल्या शिष्ट वाटणाऱ्या, आर्किटेक्चरचा दबदबा असणाऱ्या खानदानी इमारती, पिवळट प्रकाशातल्या थकलेल्या चाळी, निळ्या रंगाचं प्लास्टिक अंथरलेल्या, फाटक्या गोधडीसारख्या दिसणाऱ्या अत्यंत बकाल, कोणताही पाचपोच नसलेल्या बेसुमार झोपडपट्टय़ा, मंद गतीने चालणारे रस्ते आणि अति जलद गतीने चालणाऱ्या आणि अति गर्दीने ओथंबलेल्या लोकल्स या साऱ्यांचं मिश्रण म्हणजे मुंबई! नेमकं कुठे सुरू होतं आणि कुठल्या समुद्रापाशी थांबतं, हे न कळणारं शहर म्हणजे मुंबई!!
मुंबई प्रत्येकाला वेगळी दिसते. कलावंतांना आणि त्यातही व्यंगचित्रकारांना ती आणखीनच मोहात पाडते. मुंबईवर आणि मुंबईकरांवर असलेली व्यंगचित्रं अनेकांनी रेखाटली आहेत. वसंत सरवटे यांच्या पुलंच्या बटाटय़ाच्या चाळीतली रेखाटनं ही व्यंगचित्रात्मक असली तरीही त्या काळातील समाजाचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात. पण ज्यात भाष्य आहे अशा अनेक मालिका त्यांनी मुंबईच्या जीवनावर रेखाटल्या आहेत. ‘हाय! हायराइझ! अर्थात BACKBAY योजना’ ही अशीच एक मालिका. समुद्र हटवून उंचच उंच बांधलेल्या इमारती आणि त्यांनी मुंबईला दिलेलं एक वेगळं परिमाण आणि साहजिकच त्याचे परिणाम!
त्या काळात इतक्या तीस-पस्तीस मजली उंच इमारतीकडे बघितल्यावर एरवी चाळीत किंवा छोटय़ा तीन मजली सोसायटीत राहणारा मुंबईकर हा गुदमरून गेला असणार, हे सर्व सरवटे यांनी नेमकं हेरलं आणि मग स्वच्छ हवेचा अट्टहास धरणारा पुतळारूपी समाजसेवक जन्माला आला. रविवारी फोर्टमधल्या या इमारती अक्षरश: ओक्याबोक्या वाटतात. त्यावेळी एका चुकार माणसाला त्याचा परिचित विचारतो, ‘काय आज सुट्टीत इकडे? ओव्हरटाइम का?’ हे अस्सल मध्यमवर्गीय मराठी माणसाचे चित्र आहे. त्यांची ‘मी मी मोच्र्यातला’ ही मालिका ही विलक्षण पाहण्यासारखी आहे. यात केवळ मोर्चा किंवा मोर्चेकरी यांच्यावर भाष्य नसून, एकूणच मुंबईच्या परिस्थितीवरही भाष्य आहे. तुटक तुटक येणारा मोर्चा हा वाटेतल्या सिग्नलमुळे तुटक होतो किंवा भव्य मोर्चा हा व्हाया वॉशरूममधून पुढे येतो.. हे चित्र मनोरंजक तर आहेच, पण विलक्षण प्रेक्षणीयही आहे. याचबरोबर या दोन्ही चित्रांतून मुंबईची एक अंगभूत शिस्त व्यक्त होते. म्हणजे सिग्नल असो वा शरीरधर्म.. किमान शिस्त हे शहर पाळतंच आणि इतरांनाही आपसूक पाळायला लावतं. (‘सावधान! पुढे वळण आहे!’ – मौज प्रकाशन)
मुंबईचे अधिकाधिक बकालीकरण होतंय हे अगदी खरं आहे. यामुळेच रोजच्या pocket cartoon मध्ये मला अनेक वेळेला अनेक विषय आपसूक मिळत गेले. इमारत खचली, भिंत खचली, रस्ता खचला अशा अनेक बातम्यांच्या पाश्र्वभूमीवर एक मुंबईकर निराश होऊन म्हणतोय, ‘वास्तविक सारं शहर खचतंय, पण नागरिकांचं मनोधैर्य अजून खचलं नसल्याने प्रशासन व राजकारणी मात्र स्थिर आहेत!’
जेव्हा ब्रेकिंग न्यूजचा शोध लागलेला नव्हता तेव्हाही दर पावसाळ्यात मुंबई एक-दोन वेळेला अतिवृष्टीमुळे थांबायची. त्यावेळच्या माझ्या एका चित्रात पाण्यात अर्धवट बुडालेले मुंबईकर एकमेकाला म्हणताहेत, ‘मुंबई हे शहर बेटाबेटांनी वसलेलं आहे हे आज पटतंय!!’ याच विषयावरील एका चित्रात बातमीदार म्हणतोय.. ‘‘मुंबई पालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केलेत, पण याचा गणेश विसर्जनाशी काही संबंध नाही!’’
मराठी व्यंगचित्रकारांचा असा हा स्वाभाविक मध्यमवर्गीय दृष्टिकोन बघत असताना व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्या काही चित्रांतली मुंबई मात्र सर्वस्वी भिन्न आहे. याचं कारण अर्थातच मारिओ यांचं मित्रवर्तुळ आणि त्यांची एकूण जीवनशैली यांचा त्या चित्रांवर प्रभाव असावा. दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू व अमराठी लोकांचं जीवन त्यांच्या चित्रांतून वारंवार दिसतं. त्यांची चित्रं पाहिल्यावर त्यातल्या पात्रांची आडनावं ही कदाचित पेस्तनजी, सालढाणा, सक्सेना, डिसुझा, बाटलीवाला असावीत असं वाटतं आणि ती पात्रं जिवंत वाटतात. नाजूक, नक्षीदार, लोभस, गमतीशीर चित्रं आणि नर्मविनोदी भाष्य यामुळे मारिओ यांची चित्रं पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटतात. मारिओ यांचं ‘बॉम्बे’ या नावाचं व्यंगचित्रांचं स्वतंत्र पुस्तकच आहे. ते अप्रतिम आहे. त्यांची शैली म्हणजे प्रचंड रेषांची, पात्रांची आणि प्रसंगांची गुंतागुंत! ही चित्रं पाहताना वाचक अक्षरश: गुंगून जातो आणि रेषांच्या या चक्रव्यूहात (किंवा चित्रव्यूहात) अडकून राहतो.. अगदी आनंदाने! (प्रकाशक : जराड डाकून्हा आणि आर्किटेक्चर ऑटोनॉमस)
‘क्राउडेड सिटी’ असं वर्णन मारिओ यांनी मुंबईबाबतीतल्या एका मालिकेमध्ये केलं आहे. या त्यांच्या मालिकेमध्ये प्रचंड गर्दी दिसते. उंचच उंच इमारती, लोकल ट्रेन, डान्स बार, हाय सोसायटीतली पार्टी, जाहिरातींचे फलक, बेस्ट बस, हॉटेल्स, राजकीय सभा, चौपाटी, सिनेमा थिएटर्स, रेसकोर्स, आँटीचा दारूचा अड्डा, रस्त्यावर पाणीपुरी खाणारी गर्दी हे सगळं त्यांनी अप्रतिम रेखाटलं आहे. या गर्दीत एखादा शेपटी उडवत जाणारा बैलही काढायला ते विसरत नाहीत. या रेखाटनातील बारकाव्यामुळे आपण अक्षरश: विस्मयचकित होतो.
मारिओ यांचं सोबतचं चित्र मुंबईतल्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींचं आहे. यातल्या अनेक गोष्टी मारिओ यांनी कल्पकतेने चितारल्या आहेत. त्या पाहताना त्यांची व्यंगचित्रकाराची दृष्टी किती तपशील पाहत असते हे कळतं. उदाहरणार्थ- यातली प्रत्येक व्यक्तिरेखा काही ना काही कृती करून आपलं अस्तित्व सिद्ध करत आहे. निर्विकारपणे वरच्या मजल्यावरून कचरा फेकणारी बाई, दुसऱ्या इमारतीतल्या तरुणीकडे पाहणाऱ्या प्रौढ नवऱ्याकडे रागाने बघणारी त्याची बायको, गॅलरीत येऊन पेपर वाचणारा पारशी बाबा आणि आतमध्ये त्याचा व्हायोलिन वाजवणारा मुलगा, दाढी करणारा माणूस, दात उपटणारा डेंटिस्ट, कवी, माऊथ ऑर्गन वाजवणारा मुलगा, अंघोळ करणारा पाठमोरा माणूस हे तर आहेतच; त्याशिवाय काही नेहमीच्या वस्तूही आपलं अस्तित्व दाखवत आहेत. वाळत घातलेले तऱ्हेतऱ्हेचे कपडे, ड्रेनेजचे पाइप, दुकानाच्या पाटय़ा, कावळ्याचं घरटं, पिंजऱ्यातला पोपट, कुंडीतला निवडुंग, (भसाडय़ा आवाजात) वाजणारा ट्रांझिस्टर, टॉवर घडय़ाळ इत्यादी इत्यादी. जास्त वेळ पाहत राहिलो तर या चित्रातून मुंबईतला गोंगाटसुद्धा ऐकू येईल असं वाटू लागतं!
मुंबई म्हटलं की लोकल ट्रेन आणि त्यातली गर्दी हे दृश्य कुणाच्याही डोळ्यासमोर येईल. तसं ते दृश्य मारिओ यांनीही पाहिलं आणि चितारलं. प्रत्येक चेहरा म्हणजे एक व्यक्तिरेखा या गृहितकानुसार ते चित्र काढतात. त्यामुळे या गर्दीचा त्रास न वाटता ती गमतीशीर वाटू लागते.
.. तर अशी ही मुंबई! अर्थात त्यात राहणारे मुंबईकरही विशेष असणारच! त्यांच्याविषयी पुढील अंकात!