अरुंधती देवस्थळे
माझ्या स्कोलॅस्टिक अवतारात एक समृद्ध करणारी परंपरा वाटय़ाला आली. आमच्या वार्षिक संपादकीय बैठका जगातल्या बालसाहित्याच्या सर्वात मोठय़ा आणि जुन्या ‘बलोनिया बुक फिएरा’मध्ये भरत असत. आपापल्या देशात सफल होऊ शकणारी पुस्तकं निवडून हक्कांसाठी उभयपक्षी फायद्याच्या वाटाघाटी करण्याची व्यावसायिक दीक्षा मला तिथेच मिळाली. ४-५ दिवसांच्या मेळाव्यानंतर सरळ घरी परतणारी मी एकटीच, असं पहिल्या वर्षी लक्षात आलं. बाकी सगळे, जोडून येणाऱ्या वीकेंडसाठी रोम, फ्लोरेन्स किंवा व्हेनिसला जाणार असत!! पुढल्या वर्षीपासून ‘महाजनो येन गत: स पंथा:’ म्हणत मीही त्या ‘मोड’मध्ये गेले. इथंच रेनेसान्सबरोबर जन्मभर पुरणारा सिलसिला सुरू झाला. दोनच डोळे आणि एकाच मनाने किती पाहावं, ही दरवर्षीची कहाणी बनली. त्यातून यामधलं कोणीही एका वीकेंडवर संपणारं नव्हतं, पण जाणकार साथ असली की काय पाहायचं हे माहीत असतं. कुठल्याही सुंदर गावात पुन्हा पुन्हा जावंसं वाटतंच. त्यातून व्हेनिस तर शतदा प्रेम करावं असं गाव! माणसानं इथं येऊन स्वत:चा पत्ता विसरून जावा, असं सुंदर!!
व्हेनिस म्हणजे ११८ छोटी-छोटी बेटं एकमेकांशी बोटींनी जोडलेली, माणसांनी अक्षरश: दलदलीवर मजबूत लाकडाचे ओंडके टाकून पायाभरणी केलेलं शहर. यामुळे ती एक अभिजात कलानगरी राहिली, महानगरी झाली नाही. तिनं व्हेनिसला त्याचं व्हेनिसपण दिलं. व्हेनेशिअन मध्ययुगीन संस्कृतीची साठवण अस्तित्वाच्या गाभ्यात सांभाळून राहिली. तसा तर हा सुंदर देश, विशेषत: शहरं- माफियाने पिंजून काढलीयेत. पण अस्सल इटालियन माणूस अजूनही भेटतो तो इथंच! (चर्चमध्ये शिरलेल्या योकोपो हत्तीच्या कहाण्या किंवा इथं जन्मलेल्या संगीतकार विवाल्डीबद्दल विचारून तर बघा!) बेटं अनेक आहेत, पण असं तरंगल्यासारखं दिसणारं शहर जगात इतरत्र नसावं. कॅनालेत्तो, फ्रान्सेस्को गार्डी, बेलिनी, तिझीआनो ते शगाल किंवा पिसारोपर्यंत शतकानुशतकं कलाप्रवृत्तीच्या सर्वाना भावणारं. व्हेनिसच्या व्हेनिसपणाला अमाप प्रेम मिळालंय, त्याच्यावर साहित्याच्या सगळय़ा विधांमधून लिहिलं गेलं आहे. अनेक वर्ष फिल्मी प्रेमकथांचं चित्रणस्थळ बनूनसुद्धा व्हेनिस तारुण्यानं डवरलेलं वाटतं, ते अस्सल व्हेनिशिअन लोकांनी तसंच टिकवून धरण्याचा प्राणपणानं प्रयत्न केला आहे म्हणून. अर्नेस्ट हेमिंग्वे किंवा टॉमस मानसारख्या मातबर लेखकांनी व्हेनिसकेंद्रित कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आपल्याकडे असगर वजाहत लिखित आणि हबीब तन्वीर निर्मित नाटक ‘जिस लाहोर नै देख्या वो जम्याई नै’सारखंच, शहर जे जे असतं ते सर्व कवेत घेऊन त्याला दिलेली सलामी.
व्हेनिसचा लॅगून म्हणजे तटाला लागून असलेला उथळ समुद्र, त्याच्या लाटा पायऱ्या ओलांडून कधीमधी बाजारपेठेत शिरण्याची लोकांना सवय. ‘acqua alta’ म्हणजे भरती, लॅगूनचं पाणी ८० सें. मी.वर गेलं की वॉर्निग मिळते. दुकानांसमोर आणि काठावर ‘रेजर्स’ (लाकडी स्टुलं, बाकडी) तयारच ठेवलेले. पाणी बाजारात शिरलं की हे पटापट मांडले जातात आणि लोक त्यावरून मागच्या बाजूला जाऊ शकतात. इंग्लिश र च्या आकाराच्या ग्रँड कॅनालमधून लॅगूनच्या कडेने इकडून तिकडे जाताना आकाशात रंगांची उधळण आणि किनाऱ्यावर स्थापत्य कलेचं प्रदर्शन मांडल्यासारखं. गॉथिक पलॅझोज ते सुंदर इटालियन व्हिलांच्या रांगा. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, नजरेत भरणारं, पण दिपवून टाकणारं नव्हे. बंगल्यांसमोर बागा, फुलांचे उत्फुल्ल रंग ऋतूंची खबर देणारे. बाराव्या शतकात कधी तरी ‘व्हेनिस कार्निव्हल’ची सुरुवात झालेली. यात वेगवेगळय़ा ऐतिहासिक स्त्री-पुरुषांचे मुखवटे लावून शहराच्या मध्यवर्ती चौकांत जमत, तिचीही चित्रं चित्रकारांनी काढली आहेत. ही परंपरा मध्यंतरी गुन्ह्यंचं प्रमाण वाढल्याने अनेकदा थांबवली गेली होती, आता पुन्हा सुरू आहे.
कोणे एके काळी या शहराने कला आणि स्थापत्याचं सुवर्णयुग पाहिलं आहे, याचे साक्षीदार इथल्या जुन्या इमारती, चारशेहून आधिक नक्षीदार पूल, कमानी, स्कुओला डी सान मार्को, पलाझो डय़ुकेल, फ्रारी, स्कुओला डी सान रोको, चर्च ऑफ सान झकारियामधली मध्ययुगीन भव्य चित्रं आणि शिल्पं अंगाखांद्यावर वागवत पुराणवास्तू आजही ताठ उभ्या.. त्यात सान जॉर्जिओ मॅगीओरीची वेगळीच कहाणी. सोळाव्या शतकातल्या शेकडो स्थापत्याच्या नमुन्यांची, पर्यायाने ऐतिहासिक इमारतींची आणि चित्रांची जबाबदारी यूनेस्को वल्र्ड हेरिटेजने घेतली आहे. पण त्यामुळे साधारण जनजीवनावर इतक्या मर्यादा घातल्या जातात आणि कर इतके वाढतात की व्हेनिसची लोकसंख्या वर्षांनुवर्ष घटतच चालली आहे. आणखी काही वर्षांत ते ‘घोस्ट टाउन’सारखं फक्त प्रवासी आणि विक्रेते असंच चित्र दिसेल, असं बोललं जातं. जगातल्या आधुनिकतेशी जुळवून घेत, आपली अभिजातता टिकवून धरणारं हे शहर, मध्ययुगीन काळाची एक झलक तुम्हाला नजर करत असतं. या पार्श्वभूमीवर १८९५ पासून इथं विश्वातल्या कलेचा द्वैवार्षिक उत्सव (व्हेनिस बिनाले) भरवण्यात येतो हे सुसंगतच. कलेच्या विविध विधांमध्ये (ज्यात आता संगीत, नृत्य, सिनेमा आणि पॉप आर्टही सामील झाले आहेत) उत्तम ते शोधू पाहणारा बिनाले सहा महिने चालतो.
चौदाव्या शतकातला ‘डोजेस पॅलेस’ म्हणजे भव्य राजवाडा. त्यात आता व्हेनिसच्या राजघराण्याचं म्युझिअम केलं आहे. रेनेसाँच्या काळात आणि नंतरही याची पुनर्बाधणी होत राहिली. भव्य दगडी जिना आणि शिल्पांनी सुशोभित मुख्य दरवाजा. भित्तिचित्रांनी सजवलेला भव्य दरबार. असेच काही कक्ष कामकाजाच्या बैठकींसाठी आणि कलादालनांसाठी. मध्ये नक्षीदार ‘Bridge of Sighs’ सफेद चुनखडीच्या दगडाने बांधलेला आणि पलीकडे तुरुंग. तुरुंगाकडे नेणारा म्हणून ब्रिज ऑफ साईज. याला सुंदर जाळीच्या खिडक्याही आहेत- बाहेरची दुनिया अखेरची दाखवणाऱ्या. इथून जवळच असणारं नवव्या शतकात बांधलेलं भव्य ‘सेंट मार्क्स बॅसिलिका’ म्हणजे व्हेनिसच्या चर्च स्थापत्याचा प्रातिनिधिक नमुना. रंगीबेरंगी चित्रं आणि कलेनं नटलेलं सजलेलं चर्च. इथंही डॉजेसच्या राजवाडय़ासारखं सोन्याच्या पत्र्यानं मढवलेलं छत, त्यावर बायबलमधल्या कथा चितारलेल्या. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बेलिनी, वेचचिओ, टिशिअन, तिनोरेत्तो, जोर्जिओनी वगैरेंनी चित्रकलेत जरा वेगळीच ‘व्हेनेशिअन’ शैली त्यांच्या चित्रांतून वापरायला सुरुवात केली. ठळक आकार आणि नमुन्यांचा वापर, गडद, संपृक्त रंग आणि मुख्य म्हणजे स्वच्छ प्रकाशाचा या सर्वावर होणारा परिणाम, ही तिची वैशिष्टय़ं ‘Ecstasy of Saint Francisl, kSan Zaccaria Alterpiece’ किंवा ‘Lady at Her Toilet’ या चित्रांतून दिसणारी. नेपोलिअनने व्हेनिसवर धाडी टाकून बऱ्याच कलावस्तू पळवून नेल्या खऱ्या, पण स्थापत्य आणि शिल्पांचं ऐश्वर्य व्हेनिसचंच राहिलं. इथंच कुठे तरी त्याच्या बहिणीचं पॉलीन बोर्गेस बोनापार्टचं विख्यात शिल्पकार अँटोनिओ कॅनोवांनीं प्लास्टरमध्ये केलेलं (Venus Victrix,, १८०४) कमनीय शिल्पं पाहण्यात आलं होतं. याच्या ३ प्रतिकृतींपैकी क्रिस्टलमधली व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. ‘Art & Music in Venice’ या हिलिअर्ड गोल्डफार्ब लिखित आटोपशीर पुस्तकात वेनेशिअन सुवर्णयुगातील कला आणि कलाकारांच्या कामगिरीबद्दल महत्त्वाचे सचित्र संदर्भ मिळतात. येल युनिव्हर्सिटीनं कलेच्या अधिकृत शोधकार्यातून जन्मलेली अशी अनेक अतिशय सुंदर पुस्तकं छापून अभ्यासकांची सोय करून ठेवली आहे. ‘A Thousand Days in Venicel’ हे मार्लेना डी ब्लासीचं सत्य घटनांवर आधारित अत्यंत वाचनीय पुस्तक, व्हेनिसच्या कोणा ‘ट्रॅव्हल गाइड’पेक्षा महत्त्वाचं मनोरंजक आणि माहितीपूर्ण. दिवसभर पायपीट करून अनेक प्रकारची मिश्र संस्कृतीतली माणसं न्याहाळण्याचा छंद असणाऱ्यांनी संध्याकाळी ‘हॅरीज बार’ किंवा दुपारी ‘कॅफे फ्लोरिअन’मध्ये जाऊन बसावं, इथली इटालियन कॉफी चाखत नि:शब्द होऊन वातावरणाची नशा चढू द्यावी, हा माहौल इतर कुठे नाही मिळणार- अगदी इटलीतल्या इटलीतसुद्धा! व्हेनिसचे गोंडोला वगैरेंचं जरा जास्तच कोडकौतुक केलं गेलं आहे, खरी मजा गल्ल्यांमधून पायी हिंडण्यात आहे. छोटी छोटी सुंदर कलात्मक वस्तूंची दुकानं, हस्तकलेचे सुंदर नमुने. सर्व गल्ल्या-बोळ अगदी स्वच्छ, अगदी रोज झाडून, धुऊन काढल्यासारखे. इथली नंबिरग सिस्टीम अगदीच गुंतागुंतीची, त्यामुळेही इथं आला आणि एकदाही हरवला नाही असा कुणी नसावा. इतका सुंदर भुलभुलैया आहे हा की, हरवल्यामुळे होणारी पायपीट व्यर्थ वाटत नाही. सेंट मार्क चर्चचा बेल टॉवर शहरात सर्वात उंच, म्हणून कुठूनही दिसणारा, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. इथले इटालियन वेशातले सार्दिन्स आणि प्रॉन्स म्हणजे ‘सी फूड’ चवीनं खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीच! दरवर्षी इथं जवळजवळ दोन कोटी पर्यटक येत असतात. वर्षभर लोक व्हेनिसची रूपं न्याहाळत असतात. व्हेनिसमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं ते बोटीने किंवा पायी, हे दोनच पर्याय. बोटीच्या टॅक्सीज, बोटीच्या बसेस (वेपोरेत्ती). ज्यांना व्हेनिस कमी पडतं ते बोटीनं मोरानोला जातात. तिथं काचेच्या वस्तूंचं आणि क्रिस्टल्सचं अत्यंत सुंदर, रंगीबेरंगी परीकथेत शोभणारं मार्केट आहे. विशेष म्हणजे काच सामानाचे अनेक कारखाने म्हणून दुकानातल्या वस्तूंमध्ये प्रचंड वैविध्य!
इथं एका अतिशय सुसंस्कृत, पिढीजात श्रीमंत जोडप्यानं त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला फारशी ओळख नसूनही छोटय़ाशा मित्रमैत्रिणींच्या कोंडाळय़ात आमंत्रण दिलं होतं. मला काही खोल्यांची सैर करवून अॅनाबेलानं संग्रही असलेली कला मोकळेपणे दाखवली होती. नंतर कधी तरी टोस्टसाठी वाइन बघताच ‘आहा’ अर्थाचे उद्गार कानी आले : ‘शातो लाफाएत – रोथशिल्ड.’ माझा अनभिज्ञ चेहरा पाहून एका मित्रानं कुजबुजत सांगितलं : ही कॅबर्ने सॅव्हिनॉन. चव आणि वास लक्ष देऊन घे. ग्रीन बेल पेपर आणि सेडारचा स्पायसी, दाट राजस गंध. परतताना मित्रांनी त्या अभिजातपणाचं मोल सांगितलं. जाणवेल न जाणवेल अशा मखमली अमलाखाली मी मनोमन परत एकदा त्या दोघांना आकाशभर चमचमत्या शुभेच्छा देऊन टाकल्या. पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात न्हालेलं व्हेनिस आणि समोर लॅगूनवर विवाल्डीच्या फोर सीझन्सची निळी-सावळी चंदेरी सुरावट उलगडत जाताना पाहत राहणं म्हणजे मनावर एक जिवंत व्हेनेशिअन शिल्पं कोरलं जाणं.. आयुष्यभरासाठी!
arundhati.deosthale@gmail.com