बद्री जगण्याशी इतके एकरूप होऊन जात असत, की एकदा दुपारच्या वेळेत खायला आणलेल्या फळांचं खाण्याऐवजी चित्रात कधी रूपांतर झालं हे त्यांनाही कळलंच नाही. त्यांना साहित्य, संगीत, कला, तत्त्वज्ञान, ज्योतिष, अध्यात्म यांसारख्या विषयांत विशेष रस होता. व्यवहारी जीवनात अनेक चढउतार येऊनसुद्धा बद्री कलावंताचं जगणं समृद्धपणे जगले आणि आपल्या परीनं कलाविश्वाला संपन्न केलं.
प्रसिद्ध चित्रकार बद्रिनारायण यांचे २३ सप्टेंबरला प्रदीर्घ आजारानं बंगलोरमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि एकदम अवसानच गळून पडलं. आमचे अगदी जवळचे स्नेही आम्हाला कायमचे सोडून गेले. आता त्यांना कधीही भेटता येणार नाही. त्यांचा आवाज फोनवरून ऐकता येणार नाही आणि त्यांची चित्रंही आता होणार नाहीत, याचं फार वाईट वाटतं.
खरं तर गेले अनेक दिवस ते आजारी होते. दोन वर्षांपूर्वी मी त्यांना भेटूनही आले. फोनवरून अधूनमधून त्यांची खुशाली विचारीत असे. तेव्हा ते आवर्जून मुंबईच्या कलाविश्वाची चौकशी करत. माझ्या तसेच शार्दुलच्या कामाविषयी विचारपूस करत. २२ जुलैला त्यांच्या वाढदिवशी मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा ते थोडंसंच, पण खूप मनापासून बोलले आणि मग एकदम त्यांच्या निधनाची बातमी ऐकली. खूप उदास वाटलं.
सामान्य माणूस जन्माला येतो आणि तसाच निघून जातो. आपल्यामागे तो काहीच ठेवून जात नाही. पण असामान्य माणूस आपलं कर्तृत्व मागे ठेवून जातो आणि त्या कर्तृत्वाच्या रूपानं जिवंत राहतो. बद्री हे असेच एक असामान्य कलावंत होते. त्यांच्या असंख्य सुंदर चित्रांतून ते निरंतर आपल्यात असणार आहेत. कारण खरा कलावंत हा त्याच्या कलाकृतीतूनच जिवंत राहत असतो.
बद्री मूळचे आंध्रातले. सिकंदराबाद येथे २२ जुलै १९२८ ला त्यांचा जन्म झाला. बालपणापासून चित्राची आवड. या आवडीमुळेच वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते मुंबईला आले आणि महाराष्ट्रातच स्थायिक झाले. मुंबईत त्यांना आसरा दिला. ओळख दिली. नावलौकिक मिळवून दिला. याचा त्यांनाही अभिमान होता. ते कानडी भाषिक असूनही मराठी फार छान बोलत असत. मराठी साहित्य आवडीनं वाचत असत. अनेक मराठी लेखक, कवी, चित्रकार त्यांचे स्नेही होते. २००६ साली मुंबई सोडून बंगलोरला स्थायिक होताना त्यांना खूप वाईट वाटलं होतं. मुंबईवर, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर त्यांचं खूप प्रेम होतं. बंगलोरला गेल्यावर ते अगदी एकाकी पडले.
आजच्या समकालीन भारतीय चित्रकारांत बद्रींचं स्थान एक कलावंत म्हणून फार महत्त्वाचं आहे. जवळजवळ सर्वच देशांत महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची चित्रे संग्रहित आहेत. अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. पण ते कधी प्रसिद्धीच्या, पैशाच्या मागे लागले नाहीत. आपल्याच तंद्रीत मस्त राहिले. आपल्या चित्रं काढण्याचा त्यांनी कधी कोरडा हिशेबी व्यवहार होऊ दिला नाही. तर रंगरेषांवर मनापासून भक्ती केली, प्रेम केलं. चित्रं रंगवणं ही त्यांची पूजा होती. ते त्यांचं प्रामाणिक जगणं होतं. मी त्यांना एकदा विचारलं की, ‘तुमच्या चित्रातल्या आकारांना-रेषांना इतकी सुंदर लय कशी येते?’ त्यावर ते खूप विश्वासानं म्हणाले की, ‘माझ्या मनात सतत गायत्रीचा जप चालू असतो. ती शक्ती मला ही लय आणून देते.’ खरंच! बद्रींच्या चित्रातली ही आध्यात्मिकता त्यांच्या चित्रांना फार वरच्या पातळीवर घेऊन जाते.
बद्रींचं चित्रविश्व ‘मिथ’ (Myth) मधून निर्माण झालेलं दिसतं. जगण्यातला प्रत्येक क्षण ते मनाच्या पातळीवर नेऊन अनुभवत असत. त्यामुळे त्या साध्या अनुभवाचं रूपांतर अगदी सहजपणे सौंदर्यानुभवात होत असे. त्यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागत नसत. चित्राचा आशय अगदी विनासायास माध्यमातून चित्रित होत असे. ते कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये शिकले नाहीत. चित्रकलेचं मर्म आणि कौशल्य त्यांनी स्वत:च्याच प्रयत्नांनी आणि अनुभवांनी संपादन केलं आणि अथक साधनेतून स्वत:ची अशी वेगळी शैली निर्माण केली. त्यांची चित्रं अगदी साधी, सोपी लहान मुलांनी काढल्यासारखी निरागस वाटतात. कारण त्यात ओढूनताणून काहीही केलेलं नसतं. ती अगदी सहजपणे, निव्र्याजपणे मनातून कागदावर उतरलेली असतात. बद्रींच्या चित्रातले रंग काहीतरी वेगळीच जादू घेऊन आल्यासारखे वाटतात. ते ताजे, तरल आणि सुंदर दृश्यानुभव घेऊन येणारे असतात. आजूबाजूच्या नेहमीच्या निर्जीव वस्तूही त्यांच्या चित्रात सजीव होऊन येतात. म्हणजे जेवणाच्या टेबलावरील फळं असोत, की साधी सुरी असो, की एखादी फुलदाणी असो, नाही तर घरात वावरणारं एखादं मांजर असो, या गोष्टी वरवर अगदी साध्या वाटतात. पण बद्रींच्या सर्जनशील मनाचा आणि कौशल्यपूर्ण हाताचा स्पर्श झाला की याच गोष्टी चित्रात एक विलक्षण सौंदर्यानुभव घेऊन अवतरतात. कलावंताचा हा परिसस्पर्श फार दुर्मीळ असतो. तो त्याच्या जगण्यातूनच येत असतो. कलावंतांचं हे मनाच्या पातळीवरच जगणं खूप सुंदर असतं. कारण या मनाच्या पातळीवर सर्जनाचे फार सुंदर विभ्रम असतात. अशा जगण्यातूनच त्याच्या हातून विलक्षण कलानिर्मिती होत असते. ही कलानिर्मिती पुढे कित्येक कलासक्त मनांचा आधार बनते. त्यांना शुद्ध आनंद (pure pleasure) देण्यास समर्थ बनते. बद्रींची चित्रं असा शुद्ध आनंद देणारी असतात.
बद्रींचं व्यक्तिमत्त्व संकुचित नव्हतं. खूप व्यापक होतं. त्यांना साहित्य, संगीत, कला, तत्त्वज्ञान, ज्योतिष, अध्यात्म यांसारख्या विषयात विशेष रस होता. ते स्वत: इंग्रजीत लेखन करीत. त्यांनी अनेक सुंदर लघुकथा लिहिल्या होत्या. त्यांचं एखादं पुस्तक प्रसिद्ध व्हावं, अशी त्यांची फार इच्छा होती. पण ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्याकडे प्रचंड ग्रंथसंपदा होती. पुस्तकांवर त्यांचं खूप प्रेम होतं. चित्राचे पैसे मिळाले की, त्यातल्या निम्म्या पैशातून ते आपल्या आवडीची पुस्तकं विकत घेत. नंतर नंतर तर पुस्तकं ठेवायला घरात जागा शिल्लक नव्हती. तरी नवीन पुस्तकं विकत घेण्याची त्यांची इच्छा तीव्र असायची. बद्री फार प्रतिकूल परिस्थितीतून वर आले. मुंबईत चेंबूरला दोन छोटय़ा खोल्यांत ते आयुष्यभर राहिले. स्वत:च्या हक्काचा चित्राचा स्टुडिओ त्यांना कधी घेता आला नाही. पण चित्रनिर्मिती उदंड केली. त्या बाबतीत ते खूप श्रीमंत होते. आपल्या सर्जनशीलतेशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. स्वत:ला आवडेल तेच केलं.
बद्री चित्रकार म्हणून तर मोठे होतेच. पण एक माणूस म्हणूनही ते मोठे होते. सज्जन होते. कदमांचे ते पूर्वीपासूनचे चांगले मित्र. दोघेही चेंबूरला राहत. कदम अधिष्ठाता होते, तेव्हा अनेक वेळा त्यांनी बद्रींना जे. जे.मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. बद्रींना कदमांबद्दल खूप आदर होता. कदमांमुळे माझी बद्रींशी ओळख झाली. मग मैत्री झाली आणि ते आमचे फार जवळचे कौटुंबिक मित्र बनले. ते चेंबूरला राहत असताना आम्ही अनेक वेळा त्यांच्या घरी जात असू. त्यांच्या पत्नी इंदिरा, कन्या मोनिशा आणि अर्चना यांच्याशीही आमचा स्नेह फार छान जुळला. खरंच, ते दिवस खूप छान होते.
कदम गेल्यावर मी खूप एकटी पडले. त्यावेळी बद्रींचा फार आधार वाटला होता. त्यांनी प्रत्यक्ष कदमांसारखं मला शिकवलं नाही की, व्यावहारिक मदतही केली नाही. पण त्यांच्या नितळ, प्रेमळ आणि कलासक्त जगण्यातून मला जगण्याची ऊर्मी मिळाली. पंडोल आर्ट गॅलरीने त्यांना सायनला सुरेश अहियांच्या घरी स्टुडिओसाठी जागा दिली होती. त्या स्टुडिओत मी अनेक वेळा जात असे. त्यांचं चित्र रंगवणं पाहत असे. त्या नुसत्या पाहण्यातून, त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून, सहवासातून मी खूप काही शिकले.
त्यांचं वाचनही चांगलं होतं. त्यांच्या वाचनात योगवासिष्ठ, रामायण, महाभारत यासारखे महत्त्वाचे ग्रंथ असत. ते कृष्णमूर्तीची व्याख्यानं ते ऐकत. अरविंदोंचे सौंदर्यविषयक, कलाविषयक विचार समजून घेत. त्या संदर्भातही आमच्या गप्पा होत असत. विचारांच्या या आदान-प्रदानातून आमच्यात एक निखळ मैत्रीचं नातं जुळलं होतं. बद्रींच्या वागण्यात एक नम्रता होती. ममता होती. स्त्रीदाक्षिण्य होतं. त्यामुळे व्यक्ती म्हणूनही ते खूप वेगळे होते. जगण्याशी ते इतके एकरूप होऊन जात असत की एकदा दुपारच्या वेळेत खायला आणलेल्या फळांचं खाण्याऐवजी चित्रात कधी रूपांतर झालं हे त्यांनाही कळलंच नाही. त्यांना एकदा मी सुंदर फुलांचा गुच्छ देऊ केला. दुसऱ्या दिवशी ती फुलं, संवेदना आणि मी त्यांच्या चित्रात सहजपणे चित्रित झालेली दिसली. जे जे सुंदर, लयपूर्ण दिसेल, भावपूर्ण दिसेल ते सगळं ते आपल्यात सामावून घेत. त्यामुळे त्यांची चित्रं कधी कोरडी, नीरस, कृत्रिम झाली नाहीत. व्यवहारी जीवनात अनेक चढउतार येऊनसुद्धा बद्री कलावंताचं जगणं समृद्धपणे जगले आणि आपल्या परीनं कलाविश्वाला संपन्न केलं. यातच त्यांच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
त्यांच्या कलासक्त पवित्र आत्म्यास शांती मिळो. ही सर्व कलावंतांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना.
बद्रिनारायण : एक कलासक्त जीवन
बद्री जगण्याशी इतके एकरूप होऊन जात असत, की एकदा दुपारच्या वेळेत खायला आणलेल्या फळांचं खाण्याऐवजी चित्रात कधी रूपांतर झालं हे त्यांनाही कळलंच नाही
आणखी वाचा
First published on: 13-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran artist badri narayan