दूरदर्शन ही जेव्हा एकच वाहिनी होती, तेव्हापासून प्रजासत्ताक सोहळय़ाचे दिल्लीच्या राजपथावरील (आता कर्तव्य पथ) नेत्रदीपक संचलन देशभरातील नागरिकांसाठी अमाप कुतूहलाने पाहण्याचे आणि त्यात आपापल्या राज्यातील चित्ररथांच्या विषयांना कौतुक करीत अनुभवण्याचे राहिले. १९५० पासून हे संचलन सुरू आहे, पण १९९३ ते ९५ अशी सलग तीन वर्षे आपलाच चित्ररथ त्यात पारितोषिकांवर नाव कोरत राहिला. हा विक्रम कुठल्याही राज्याला आजतागायत मोडता आला नाही, इतका राज्याचा चित्ररथ संचलनात लक्षवेधी असतो. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ कलोपासक नरेंद्र विचारे महाराष्ट्राच्या चित्ररथाचे सारथ्य करीत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या अज्ञात प्रदेशाच्या अंतरंगाचा त्यांनी घेतलेला धांडोळा.
प्रजासत्ताकदिनी होणारे पथसंचलन हा देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक. त्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संरक्षण मंत्रालयासमोर आपले वैविध्यपूर्ण चित्ररथ प्रस्तुत केले जातात. त्यात प्रत्येक राज्यांची अस्मिता-संस्कृती आणि भौगोलिक भिन्नतेचे दर्शन घडते. पण संचलनात दिमाखात मिरवणारे २० ते ३० चित्ररथ तिथपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सोपी नसते. या चित्ररथांची निवड प्रक्रिया केंद्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे केली जाते. देशभरात नावाजलेले १० ते १२ अनुभवी आणि तज्ज्ञ चित्रकार, वास्तुविशारद, शिल्पकार, संगीतकार, अभिनेते, अभियंते, नृत्यविशारद चित्ररथांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देतात. त्याबरहुकूम राज्यातील ऐतिहासिक घटना, वारसा, विकास कार्यक्रम आणि पर्यावरणाचे प्रतिनिधित्व करणारा विषय ठरतो. त्यानंतर मूळ विषयाला अनुरूप संगीत, नाटय़ आणि नृत्याचे सादरीकरण ठरते. प्रत्येक चित्ररथाला ५८ ते ६२ सेकंद ही वेळ मर्यादा आखून दिलेली असते.
Republic Day 2023 Live: शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते ध्वजावतरण संपन्न!
२०१४ साली महाराष्ट्राच्या चित्ररथात नारळी पौर्णिमेचे दर्शन देशाला घडले, २०१५ साली पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ ठरली, तर २०१८ साली शिवराज्याभिषेकाच्या विषयाला प्रथम पारितोषिक मिळाले. गेल्या वर्षी कास पठाराच्या विषयाद्वारे राज्याच्या जैवविविधतेचा चित्ररथ पुरस्कारप्राप्त ठरला नसला, तरी त्याचे कौतुक मात्र झाले.
‘अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल, तर आत्मविश्वास हा त्या यशाचा पाया आहे.’ असे कोणी तरी म्हटले आहे. १९८४ साली पहिल्यांदा मी तत्कालीन कला संचालक प्रा. बाबुराव सडवेलकर यांच्या सूचनेनुसार माझ्या आयुष्यातील पाहिलेवहिले संकल्पचित्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाला सादर केले. मी निवडलेला विषय होता ‘आंग्य्रांचे मराठा आरमार’. तज्ज्ञ समितीने अनेक निकषांनुसार माझ्या संकल्पचित्राची निवड केली. तज्ज्ञ समितीच्या पहिल्या फेरीतील चारही बैठकांमध्ये महाराष्ट्राच्या या डिझाइन्सची खूप प्रशंसा झाली. दरम्यान ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. नंतरच्या आठवडय़ात त्रिमितीय मॉडेलच्या अखेरच्या बैठकीसाठी दिल्लीला गेलो. सगळे सुरळीत सुरू असतानाच दोन सदस्यांनी अचानक प्रश्न उपस्थित केला, की ‘प्रत्येक वेळी चित्ररथात तुम्हाला शिवाजीच का हवा?’ त्यानंतर झालेल्या चर्चा आणि आक्षेपानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ वगळण्यात आला. माझ्या आयुष्यातले पहिलेच डिझाइन अपयशाच्या पहिल्याच पायरीवर ठेचाळले. त्यानंतर आणखी जोमाने दरवर्षी नियोजित विषयानुसार संकल्पचित्र तयार करून पाठवली. मी डिझाइन केलेला भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महाराष्ट्राच्या योगदानावरचा पहिला चित्ररथ १९८६ साली राजपथावर प्रदर्शित झाला. २०१८ सालापर्यंत माझी एकूण वीसएक डिझाइन्स निवडली गेली. त्यापैकी सहा चित्ररथांना पारितोषिके मिळाली. १९९३, १९९४ आणि १९९५ ही सलग तीन वर्ष अनुक्रमे ‘गणेशोत्सव’, ‘हापूस आंबा’ आणि ‘बापू’ या चित्ररथांवर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांकाची मोहर उमटवून हॅट्ट्रिक केली. आजतागायत सलग तीन वर्षे पुरस्कार मिळविण्याचा आपला विक्रम कोणत्याही राज्याला मोडता आलेला नाही.
विश्लेषण: प्रजासत्ताक दिनाचा चित्ररथ नेमकं कोण घडवतं? महाराष्ट्राची यंदाची थीम नेमकी काय असणार?
कसे होते काम?
चित्ररथ बांधणीसाठी मिलिटरी कॅन्टोन्मेंटमधील जंगलात सर्व बाजूंनी लोखंडी पत्रे लावून संरक्षण मंत्रालयातर्फे मोठा कॅम्प उभारला जातो. अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था पुरविली जाते. कॅम्पमध्ये चित्ररथ बांधणीचे काम करण्यासाठी एक स्वतंत्र सपाट जागा उपलब्ध करून दिली जाते. बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तींकरिता, चित्ररथाशी निगडित परफॉर्म करणाऱ्या महिला आणि पुरुष कलाकारांकरिता स्वतंत्रपणे, तसेच लष्करी अधिकारी व त्यांची कार्यालये वगैरेंकरिता लष्करी पद्धतीचे कापडी तंबू उभारले जातात. डॉक्टरांसहित सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा पुरविली जाते. संरक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येक राज्यांना किंवा भाग घेतलेल्या चित्ररथांसाठी प्रत्येकी नवा कोरा ट्रॅक्टर आणि एक ट्रेलर दिला जातो. चित्ररथांची लांबी ४५ फूट, उंची १६फूट आणि रुंदी १४ फूट अशी मर्यादित केलेली असते. विविध राज्यांचे संस्कार, आचार विचार, संस्कृती, भाषा, सभ्यता, कलात्मकता अशा विविध गुणांचा एक प्रकारे संगम त्या कॅम्पमध्ये दिसून येतो. एक छोटा हिंदूस्थान तिथे अनुभवायला मिळतो.
रंगीत तालीम..
दरवर्षी २३ जानेवारीला संचलनाची रंगीत तालीम होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रमुख पाहुणे इत्यादींच्या पेहराव्यातील डमी व्यक्ती त्यात परफॉर्म करतात. राष्ट्रपती भवनाजवळील विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या दोन्ही बाजूंना स्टेडियमसारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. हा सगळा परिसर सर्व बाजूंनी बंदिस्त केलेला असतो. या परिसरात आपण एकदा प्रवेश केल्यावर असा भास होतो की, जसे काही आपण एखाद्या प्रचंड मोठय़ा जत्रेला आलो आहोत.
बोचऱ्या थंडीतला ओसंडता उत्साह..
या संचलन काळात प्रचंड धुकं असतं. खुर्च्यावर दवाचे पाणी साचलेले असते. कधी कधी पाऊसदेखील पडतो. बोचरी थंडी असते. तरी रंगीबेरंगी उबदार कपडय़ांतील लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचा उत्साह नुसता भरभरून वाहत असतो. ऊर्जा, उत्साह, आनंद, देशाबद्दलचा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. राष्ट्रपतींनी तिरंगा फडकवल्यानंतर विजय चौकापासून परेडला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. राष्ट्रपतींच्या मंचासमोर ठरावीक अंतरावर पोहोचल्यावर चित्रथावरील कलावंत आपल्या संगीत व नृत्य सादरीकरणाला सुरुवात करतात आणि ठरावीक अंतरावर पोहोचल्यावर त्याची समाप्ती होते. हा कालावधी साधारण ५८ ते ६२ सेकंदांचा असतो. त्यानंतर सादरीकरणाची पुनरावृत्ती करीत चित्ररथ इंडिया गेटपर्यंत जातात आणि इंडिया गेटनंतर लाल किल्ल्याकडे कूच करतात. लाल किल्ल्यासमोरील एका पटांगणामध्ये तीन दिवसांसाठी हे चित्ररथ लोकांना पाहण्यासाठी ठेवले जातात. सर्व कार्यक्रमाची समाप्ती झाल्यानंतर साधारण २७-२८ तारखेच्या दरम्यान पारितोषिकाची घोषणा होते.
काही कटू अनुभव..
चित्ररथांच्या यात्रेचे काही वाईट अनुभवही गाठीशी आहेत. डिसेंबर-जानेवारीची बोचरी थंडी, पाऊस, धुके यात बांधणी करताना १९९० साली आमच्या बाजूचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाले आणि बांधणी करणारे कारागीर कसेबसे बचावले. १९९४ साली मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे तंबूत साचलेल्या पाण्यातून इलेक्ट्रिक हिटरच्या विद्युतप्रवाहाचा झटका मला बसायचा राहिला आणि मी त्यातून वाचलो. त्याच वर्षी महिलांच्या कॅम्पमधील तंबूंना भीषण आग लागली. १९९८ साली जम्मू-काश्मीरच्या चित्ररथावरील नृत्यात भाग घेतला म्हणून एका तरुण मुलीच्या काश्मीरमधील घरातील आठ ते नऊ कुटुंबीयांची अतिरेक्यांनी हत्या केल्याची बातमी पसरली आणि त्यामुळे कॅम्पमध्ये माजलेली दहशत मला अजूनही अस्वस्थ करते. २००१ साली २६ जानेवारीच्या सकाळी गुजरातेत झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे दिल्लीसुद्धा हादरली होती. संध्याकाळी कॅम्पमध्ये शोकाकूल वातावरणात एसटीडी फोनवर गुजरातच्या भेदरलेल्या तरुण मुलींची उडालेली झुंबड आणि फुटलेले अश्रूंचे बांध आठवतात. १३ डिसेंबर २००१ रोजी जुन्या महाराष्ट्र सदनमधून ‘गोिवदा आला’ चित्ररथाचे त्रिमिती मॉडेल घेऊन राष्ट्रपती भवनाकडे बैठकीसाठी आम्ही निघत असताना संसदेवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्यानंतर इंडिया गेटजवळ अर्ध्या रस्त्यावर आमच्या अंगावर पोलिसांनी रोखलेल्या बंदुकांचा प्रसंग अजूनही लख्ख आठवतोय.
Republic Day 2023 : जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि इतिहास
अभिमानाचे क्षण..
राज्याच्या चित्ररथाचे सारथ्य करताना नवनवे अनुभव गाठीशी आले. वेगळा विचार करण्याची ऊर्जा प्रत्येक प्रकल्पात मिळत गेली. चित्ररथ बांधणीसाठी उभारण्यात आलेल्या कॅम्पमधील विविध राज्यांच्या प्रतिनिधींकडून, सादरीकरण करणाऱ्या कलाकारांकडून, चित्रकार आणि शिल्पकारांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. केवळ शिवाजी महाराजांवरील डिझाइन म्हणून माझ्या पहिल्या संकल्पनेला नाकारलेल्या मला ‘शिवराज्याभिषेक’ या चित्ररथासाठी २०१८ साली पारितोषिक मिळाले, तेव्हा पुरस्कार स्वीकारते वेळी प्रेक्षकांमधून ‘जय भवानी, जय शिवाजी’ या गगनभेदी घोषणा ऐकताना अंगावर उमटलेले शहारे फुलायचे थांबत नव्हते. महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे इतर सर्वच कलाकारांचे खास लक्ष असते. दरवेळी त्यातल्या संकल्पनेला पुरस्कार मिळाला नाही, तरी प्रेक्षकांची दाद आणि कौतुकाची थाप पुढल्या वर्षी आणखी उत्साहाने त्यात सहभागी होण्याचे इंधन पुरवते. netravichare1951@gmail.com