शंभराव्या अखिल भारतीय नाटय संमेलनाचा समारोप नुकताच झाला. प्रसारमाध्यमांनी संमेलनाचे वार्ताकन सालाबादप्रमाणे केले. पण वार्ताकनाच्या स्वत:च्या काही मर्यादा असतात. म्हणून त्यापलीकडे जाऊन गंभीर आणि तटस्थपणे काही निरीक्षणे नोंदवली जाणे अत्यावश्यक. फक्त अध्यक्षीय भाषणच संपूर्ण संमेलनाचा दस्तऐवज म्हणून मागे राहत असताना इतर बाबींकडे डोळेझाक नकोच..

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद ही संस्था प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन आयोजित करते. ‘अखिल भारतीय’ म्हटले की कसे भारदस्त वाटते. पण परिषदेने आधी ‘अखिल महाराष्ट्र’ तरी झाले पाहिजे. केवळ शाखांच्या संख्येपुरते नाही, तर रंगभूमीविषयक कार्य करण्याच्या दृष्टीनेसुद्धा! आत्ताचे परिषदेचे चित्र कसे आहे? तर वर्षभरात जन्मदिन आणि स्मृतिदिन साजरे करावे आणि ३०-३५ पुरस्कार प्रदान करावे. पण व्यावसायिक किंवा प्रायोगिक रंगभूमीची (आणि खरे तर बाल रंगभूमीचीसुद्धा) प्रतिनिधी अशी परिषदेची प्रतिमा अद्याप नाही. असे का? का नाही सगळय़ा नाटकवाल्यांना परिषदेबद्दल आस्था वाटत? प्रत्यक्ष मध्यवर्ती संस्थेमध्येच सभासद मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येत असतील तर काय करावे? आणि पुण्याच्या नाटय परिषदेने तर थेट मध्यवर्तीला शह देऊन १९७८ आणि १९८० मध्ये पुण्याचे भालबा केळकर आणि छोटा गंधर्व यांना नाटय संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आणले होते.. असो. मागची उणीदुणी न काढता यापुढे नव्याने कारभार करण्याचे संकेत विद्यमान अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिले आहेत ही स्वागतार्ह घटना. त्यांना शुभेच्छा!

PM Modi Inaugurates Grand ISKCON Temple in Navi mumbai
देशाच्या केंद्रस्थानी अध्यात्म!‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
PM Modi
PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Ramsar sites Maharashtra
राज्यातील रामसर स्थळांचे संरक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली, न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल

नाटय संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणत्याही व्यक्तीची निवड करताना परिषदेने आणि संबंधित मतदारांनी अधिक चोखंदळ असण्याची आवश्यकता आहे. १९०५ मध्ये झालेल्या पहिल्या नाटय संमेलनापासून अगदी अलीकडच्या संमेलनापर्यंतच्या अध्यक्षांची नावे पाहिली तर प्रकर्षांने लक्षात येते की, रंगभूमीशी साक्षात संबंध नसलेल्या व्यक्तींना परिषदेने वेळोवेळी अध्यक्षपदी विराजमान केले आहे. कारण एवढेच की, त्या व्यक्तींना समाजामध्ये प्रतिष्ठा होती. सुप्रसिद्ध गायक विष्णू दिगंबर पलुस्कर (१९११), पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. जयकर,(१९१८), चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके (१९२६) ही त्यातली काही नावे. आणि साठोत्तर रंगभूमीवरही ती प्रथा सुरू असलेली दिसते. कवी आणि गीतकार ग. दि. माडगूळकर (१९६९), संगीतकार वसंत देसाई (१९७३), कादंबरीकार रणजीत देसाई (१९८३), पत्रकार आत्माराम सावंत (१९९४), इत्यादी. यांच्यापैकी कोणाचा रंगभूमीशी संबंध असेलच तर तो फक्त नावापुरता होता.

प्रख्यात गायक रामदास कामत २००९ मध्ये बीड येथील नाटय संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि लगेचच २०१० मध्ये अमेरिकेत न्यू जर्सी इथे झालेल्या विश्व नाटय (अरे बापरे!) संमेलनाचेही अध्यक्ष रामदास कामतच होते. आणि आधीच्या वर्षी वाचलेले भाषणच आपण या वर्षीचे भाषण म्हणून वाचणार आहोत असे सुरुवातीलाच जाहीर करून त्यांनी वेळ मारून नेली! – प्रस्तुत लेखक त्या ‘नाटयपूर्ण’ क्षणी प्रेक्षागृहात उपस्थित होता.
एखाद्या प्रतिष्ठित/ लोकप्रिय व्यक्तीप्रति केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला नाटय संमेलनाचे अध्यक्ष करण्याची काहीही गरज नाही. ती

रंगभूमीशी प्रतारणा ठरेल. अध्यक्षपदी कोणा व्यक्तीची निवड करताना आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असतेच; पण त्याचबरोबर त्या व्यक्तीचा नाटक आणि रंगभूमीसंबंधातला अनुभव आणि एकूण विचार लक्षात घेता, त्या व्यक्तीकडून आपली काही अपेक्षाही असते; आणि ती असायला पाहिजे. आपल्या आठवणी आणि अनुभवांच्या आधारे त्या व्यक्तीने अध्यक्षीय भाषणात प्रकट चिंतन करावे इतकी तरी अपेक्षा असायला हवी. ‘स्वरसम्राज्ञी’ कीर्ती शिलेदार यांनी त्यांच्या आई-वडील आणि बहिणीप्रमाणे आयुष्यभर ‘संगीत रंगभूमीची चिंता वाहिली. ती रंगभूमी जगली पाहिजे एवढेच एक स्वप्न त्यांनी पाहिले. त्यांचे अध्यक्षीय भाषण (२०१८) याच एका मुद्दय़ाभोवती फिरत राहिले. पण संगीत रंगभूमीचा भर का ओसरला त्याची सामाजिक- कलात्म चिकित्सा त्यांनी केली नाही. असलीच तर उद्याची संगीत रंगभूमी कशी असेल याचे चित्र त्यांनी समोर ठेवले नाही. ‘सदाबहार’ श्रीकांत मोघे यांच्या गाठी आपल्या व्यावसायिक रंगभूमीचा पुरेपूर अनुभव होता, पण त्यांचा स्वभाव स्मरणरंजनात रमण्याचा. परिणामी त्यांच्या भाषणातून काहीच हाती आले नाही.

एक शक्यता अशी आहे की, कलाकारांना, विशेषत: नटनटींना त्यांचे अनुभव आणि विचार शब्दबद्ध करता येत नसतील, अशी परिस्थिती असेल तर परिषदेने त्या व्यक्तीशी चर्चा करून तिला योग्य तो अनुभवी व प्रगल्भ साहाय्यक उपलब्ध करून द्यावा. त्या व्यक्तीचे अनुभव आणि विचार यांची अध्यक्षीय भाषणाच्या दृष्टीने तिच्याशी वेळोवेळी चर्चा करून निवड करणे, ते शब्दबद्ध करणे आणि भाषणाची मांडणी करणे, यामध्ये तो साहाय्यक त्या नट-नटीला मदत करील. तो साहाय्यक एका मर्यादेत अध्यक्षीय भाषणाला दिशा देईल.
आणखी एक पर्याय म्हणजे, भर संमेलनात अध्यक्षांच्या भाषणाऐवजी त्यांची प्रकट मुलाखत आयोजित करता येईल. मुलाखत रंगतदार आणि सखोल होईल याची काळजी मुलाखतकाराने घ्यावी. अर्थातच त्याने आवश्यक तो गृहपाठ करावा हे ओघाने आले.
हे सविस्तर लिहिले, कारण फक्त अध्यक्षीय भाषणच संपूर्ण संमेलनाचा दस्तऐवज म्हणून मागे राहणार असते. आणि म्हणूनच अनुभवी तसेच स्वत:चे स्वतंत्र असे काही म्हणणे असणारी व्यक्तीच संमेलनाची अध्यक्ष होईल, याची काळजी आणि आवश्यक ती जबाबदारी सगळय़ा संबंधितांनी घेतली पाहिजे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठांच्या नाटय संगीतादी विभागांना शासनाने भरघोस अनुदान देण्याची मागणी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. जब्बार पटेल यांनी केली. तिथल्या नाटय विभागातील विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉर बोर्डाचा अडसर नसावा असेही त्यांनी सुचविले. या दोन्ही सूचना योग्यच आहेत. पण त्या सगळय़ाच विभागांची सध्याची एकूणच परिस्थिती, तिथले सध्याचे वातावरण ठीक असल्याची डॉ. पटेल यांची खात्री असल्याचे गृहीत धरावे लागेल किंवा डॉक्टरी भाषेत म्हणायचे तर ‘सेकंड ओपिनिअन’ घ्यावे लागेल. आणि त्यांनी सेन्सॉर बोर्डाचा उल्लेख केलाच होता तर राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार पुरस्कृत करीत असलेल्या रस्त्यावरील सेन्सॉरशिपचा- झुंडशाहीचा- मुद्दा त्यांनी उपस्थित करायला हवा होता. राजकीय पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी होणाऱ्या शिबिरांमध्ये भारताच्या घटनेनुसार आचरण करण्याचे त्या तरुणांच्या मनावर बिंबवले जाते किंवा नाही असाही मुद्दा त्याला जोडून आला असता. डॉ. जब्बार पटेल हे समन्वयवादी आहेत.

अध्यक्षपदाच्या या वर्षभरात राज्यामधील निरनिराळय़ा राजकीय पक्षांच्या नेतृत्वाशी चर्चा करून त्यांनी निदान हा झुंडशाहीचा प्रश्न मार्गी लावला तर आपापल्या राजकीय धारणा असलेले मराठी रंगकर्मी त्यांचे उतराई होतील. आपापल्या राजकीय धारणांशी निष्ठा ठेवताना रंगकर्मीच्या हे लक्षात येत नाही की, ते सुपात, म्हणजे सुरक्षित असले तरी न जाणो, उद्या ते जात्यात भरडले जाऊ शकतात.. मराठी रंगभूमीवरील नाटकवाल्यांच्या राजकीय धारणांचे सर्वेक्षण केले तर येणाऱ्या काळामध्ये या रंगभूमीचे स्वरूप कसे असणार आहे याचा बऱ्यापैकी अंदाज लागू शकेल. आणि आता राजकारणी. कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, नाटय संमेलनाकडे फक्त एक विरंगुळा, एक करमणूक म्हणून सर्व राजकारणी पाहतात अशी शंका यावी असे त्यांचे संमेलनातील बोलणे असते. आपण एका अति महत्त्वाच्या अशा सांस्कृतिक उपक्रमामध्ये सहभागी होत आहोत आणि अशा प्रसंगी नाटय क्षेत्राशी संबंधित अशा विविध प्रश्नांविषयी आपण गांभीर्याने बोलले पाहिजे याचे किंचितही भान त्यांना नसावे ही या प्रदीर्घ परंपरा असलेल्या सांस्कृतिक उपक्रमाची शोकांतिका म्हणायची! राजकारण्यांचा एखाददुसरा औपरोधिक- उपहासात्म उद्गार आपण समजू शकतो. पण राजकीय उखाळय़ापाखाळय़ा काढाव्या आणि राजकीय देणी चुकती करून टाकावी अशा एकाच हेतूने आलेल्या आणि आमचे प्रतिनिधी म्हणविणाऱ्या या राजकीय धुरंधरांबद्दल काय म्हणावे? आणि जाताजाता अनेक आश्वासने फेकून ते कृतकृत्य होतात. आता परिषदेला मुंबईत एक भूखंड मिळणार, कलाकारांना घरे मिळणार, नाटयगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळणार, ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ होणार, अशी आश्वासने अनेकदा देऊन झाली आहेत, हेही त्यांच्या गावी नसते. आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचे भाषण न ऐकता जावे लागलेल्या मुख्यमंत्र्यांनी रंगभूमीच्या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी डॉ. पटेल यांना एक तास देण्याचे मान्य केल्याचा पटेल यांनीच विशेष उल्लेख केला. गमतीने म्हणायचे तर तशी भेटीची वेळ मिळेपर्यंत, जब्बार पटेल नव्याने बसवू म्हणत असलेले ‘घाशीराम कोतवाल’ बसवून होईलसुद्धा! समारोपाच्या सोहळय़ात संमेलनाचे हस्तांतर होऊन पुढच्या वर्षी सोलापूरला संमेलन होणार आहे. परिषद आणि संमेलनाचे आयोजक एकत्र बसून काही नवे सकारात्मक निर्णय घेतात की संमेलन ‘मागील पानावरू न पुढे चालू’ राहते, ते पाहायचे.

(लेखक ज्येष्ठ नाटयकर्मी आहेत.)
vazemadhav@hotmail.com

Story img Loader