म्हाइंभटाचा ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला आहे. एखाद्या प्रदेशातील बोली, त्या प्रदेशातील लोकजीवन आणि साहित्य मूल्य हे किती एकजीव होऊन येतात, हे सिद्ध
माझ्या वऱ्हाळी बोलीचं करू कितीक कीर्तन
तिच्या दुधावरची साय किस्नं खाये वरपून।।
माय मराठीच्या अनेक लेकी बोलीच्या स्वरूपात महाराष्ट्रात नांदताना आढळतात. कोकणी, कोल्हापुरी, माणदेशी, मराठवाडी, अहिराणी, खान्देशी, नागपुरी, झाडी बोली इ. त्यांपैकी वऱ्हाडी एक प्रमुख बोली आहे. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून ती बोलली जाते. अमरावती जिल्ह्य़ातील रिद्धपूर हे गाव महानुभाव पंथीयांची ‘काशी’ मानले जाते. रिद्धपूरची माती हीच आजच्या मराठीची मायकूस म्हटली पाहिजे. कारण तेथील महानुभावीयांनी १२व्या शतकापासून हजारो ग्रंथ वऱ्हाडी बोलीतच लिहिले आहेत. मराठीतील पहिले-वहिले काव्यही महंमदबेने कृष्णाच्या लग्नप्रसंगी गायिलेल्या ‘धवळ्यां’च्या रूपात उपलब्ध आहे. मराठीतील पहिला गद्यग्रंथ म्हाइंभटाने लिहिलेला ‘लीळाचरित्र’ हाच आहे. एखाद्या प्रदेशातील बोली, त्या प्रदेशातील लोकजीवन आणि साहित्य मूल्य हे किती एकजीव होऊन येतात, हे सिद्ध करणारा ‘लीळाचरित्र’ एवढा समर्थ ग्रंथ मराठीत दुसरा नाही. महानुभावीयांनी वऱ्हाडी बोलीला ‘धर्मभाषे’चे सिंहासन बहाल केले. आपल्याला सांगायचे आहे ते सर्वसामान्य, निरक्षर, अशिक्षित खेडय़ा-पाडय़ातील स्त्री-पुरुषांना कळायला हवे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक वऱ्हाडी लोकबोलीची लेखनासाठी कास धरली.
आपल्याला अवगत संस्कृती पांडित्य त्यांनी सुसंवादाआड येऊ दिले नाही. केशवराज सुरीने गुरूकडून पाठ थोपटली जावी म्हणून आपण लिहिलेला संस्कृत प्रचुर ग्रंथ नागदेवाचार्याना दाखवला. तेव्हा त्यांनी त्याची अशी कानउघाडणी केली- ‘नको गा केशवदेया: तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा : येणे माझा म्हातारीया नागवैल की: श्री चक्रधरे मऱ्हाटीची निरुपीली: तियेसीचि पुसावे:’. सामान्य माणसासाठी ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालताना त्यांचीच बोली कशी वापरली पाहिजे, याचा हा आदर्शपाठ शासनानेही गिरवायला हवा, एवढा महत्त्वाचा आहे.
कालानुरूप आक्रमक झालेल्या संस्कृत, अरबी, फारशी आणि इंग्रजी या भाषांच्या कितीतरी पूर्वीपासून या देशात लोकबोली अस्तित्वात होत्या. परंपरेने चालत आलेल्या मौखिक लोकसाहित्यातून त्याचा प्रत्यय येतो. प्रसंगानुसार अशा कथांची, गीतांची निर्मिती होत असे. ‘चिमणीचे घर मेणाचे, काऊळ्याचे घर शेणाचे’ किंवा स्वर्गात नेणाऱ्या हत्तीचे शेपूट धरले असताना, कापसाचे गाठोडे केवढे, हे सांगताना शेपूट सोडून दोन्ही हात सोडून ‘या एवढे’ सांगून जमिनीवर पडणाऱ्या बडबडय़ा धांदुलाची कथा, ही वऱ्हाडी बोलीचीच देणगी आहे. ‘काया मातीत तिफन टाके वला। उनाऱ्या झपी गेला, तुम्ही बयलासी बोला’, लोकजीवनाचे संदर्भ घेऊन येणारे हेकाव्य अस्सल वऱ्हाडी मातीचा सुवास लेवून येणारे असते.
हेकोळी तेकोळी बाभुई तिचा हिरवा हिरवा, सखाराम पाटील मेला म्हणून तुकाराम पाटील केला- हा विनोदी अंगाने जाणारा उखाणाही एका लग्न परंपरेला अधोरेखित करून जातो. सारी रात पारवळलं, काही नाई सापळलं; पारंबी होजो लेका, वळाले देजो टेका; आंधी करे सून सून, आता करे कुनकुन; सासू मेली उनायात, लळ आला हिवायात; खंदाळीत तीन कन्सं, मेळ कुठी रोवू; अशा म्हणीही कौटुंबिक अन् सामाजिक जीवनाचं सर्वागानं दर्शन घडवत असतात. सिंधू संस्कृतीचे गाढे अभ्यासक यवतमाळचे अॅड. प्र. रा. देशमुख मला एकदा म्हणाले, ‘तुमच्या कवितेत काही वऱ्हाडी शब्द असे आहेत की, संस्कृताचे सारे ग्रंथ चाळले तरी त्यात ते शब्द सापडणार नाहीत.’ वऱ्हाडी बोलीचा कालखंड किती प्राचीन पुरातन आहे हे सांगायला एवढे विधान पुरे व्हावे. बोलीतील शब्दांवर संस्कार करूनच ‘संस्कृत’ भाषा निर्माण करण्यात आली. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात संस्कृताच्या ‘कृपणु’ वृत्तीनेच सामान्य वर्ग ज्ञानापासून दूर ठेवला गेला. त्याला ज्ञानाच्या जवळ आणण्याचे कार्य पुढे गाडगेबाबांनी कीर्तन, प्रबोधनासाठी वापरलेल्या त्यांच्या वऱ्हाडी बोलीनेच केले- ‘माय बापहो, संसार सुखाचा करा, नेटाचा करा, रिन काढून सन करू नोका, फाटकं तुटकं नेसा, घरातले भांडेकुंडे इका पन लेकराले शिकवा. शिक्शानानं मानूस देव होते, गांधीबाबा देव झाले, शिक्शनानं आंबेडकर बाबा देव झाले. या गाळग्याचा गाळमेबॉ करू नोका, माहे मठ पुतळे उभारू नोका..’
प्रमाण मराठीहून वऱ्हाडीची काही वेगळी वैशिष्टय़ं आहेत. प्रमाण मराठीतील ‘ड’चा ‘ळ’, ‘ळ’चा ‘य’ करणे ही वऱ्हाडीची प्रवृत्ती आहे. वड, झाड, खोड यांची रूपं वऱ्हाडीत अशी होतात-
एका वळाच्या झाळाले साक्षी आपून ठेवलं
एकमेकाचं नावही खोळावरते कोरलं
तसाच ‘ळ’चा ‘य’ होतो –
नदीच्या गायात, गाय फसली
माझ्या मायच्या गायात तुमसीची माय आय
अकोला, अमरावती भागात मराठीतील मोठा ‘ण’ नाहीच. (बुलढाणा-यवतमाळात तो आहे.) त्यामुळे मानूस, कनूस, दाना, पानी, लोनी असेच उच्चारण होते. ज्ञानेश्वरीत देईजो, येईजो, घेईजो अशी जी रूपं येतात ती वऱ्हाडीत आजही प्रत्ययी वापरली जातात- ‘बाजारात जाजो-मीठ-मिर्ची, भाजीपाला घेजो, आंधी घेजो मंग पैसे देजो. झाकट पळ्याआंधी घरी येजो. हात-पाय धुजो, मंग जेवजो.’ मराठी स्त्री येते, जाते, करते, न्हाते असे म्हणते, वऱ्हाडी स्त्री मात्र नवऱ्याला म्हणते- ‘मी तुमच्या संगं येतो. माहेरी जातो. तठीच मुक्काम करतो. न्हातो धुतो. चार रोज रायतो. मंगसन्या दिवाईले वापस येतो.’
वऱ्हाड काही काळ मोगलाईत, मध्य प्रदेशात होता. त्यामुळे अरबी, फारशी अन् हिंदीचा मोठा प्रभाव या बोलीवर आहे. प्रथम पाहुणे म्हणून आलेले परदेशी शब्द ठिय्या देऊन बसले अन् घरजावई होऊन गेले. अराम, हराम, मालूम, खबरबात, खकाना, आयना, बिमार, देखना, मतलब, हक, फॉज असे असंख्य शब्द वऱ्हाडीचे ‘घररिघे’ झाले आहेत. वाक्यरचनेवर हिंदीचा प्रभाव असा- मी येऊन राह्य़लो, जाऊन राह्य़ले, जेवून राह्य़लो ( मैं आ रहा हूँ, जा रहा हूँ, खा रहा हूँ इ.) सडकेवर रिक्षा ठरवताना किंवा बाजारात सर्रास हिंदीचा वापर होत असतो.
वऱ्हाडी शब्दांचं एक वैशिष्टय़ असं की त्या शब्दांचा तंतोतंत आशय व्यक्त होईल असे पर्यायी शब्द मराठीत नाहीत. आशयाच्या उंबरठय़ापर्यंत जाता येतं, पलीकडे घरात जाता येत नाही. एलपाळनं, हिडगावनं, ठाकनं, हिरस, चवना, इगार, डचांग, रन्नावनं, वला, आंगोळ, गोद्री, संड वंड.. पाहिल्या तीन शब्दांसाठी ‘नखरा करणं’ इथपर्यंत येता येतं, पण त्यापुढेही बरंच काही असतं, ते पकडता येत नाही.
वऱ्हाडी बोलीत पर्यायी शब्द येतात, तसे मराठीत येत नाहीत. मराठीत एकमेव असलेल्या ‘आई’साठी वऱ्हाडीत मा, माय, मायबाई, माबाई, मायमावली, म्हतारी, बुद्धी असे सात तर एका मिठासाठी मीठ, नमकं, लोन, गोळ, संदुरी, समुंद्री असे पाच-सहा पर्याय येतात.
अडाणी, खेडूतांची बोली म्हणून कोशकारांनी उपेक्षित, दुर्लक्षित ठेवलेले हे अवघे लक्षावधी शब्दधन कोशात आले असते तर मराठी भाषाच किती समृद्ध, संपन्न झाली असती! गेल्या काही वर्षांत प्रयत्न करून मी चाळीस हजार वऱ्हाडी शब्दांचा कोश केला. तो आणखी खूप वाढू शकतो. महाराष्ट्रात अशा आणखी कितीतरी बोली आहेत. त्या सर्व बोलीतील शब्द मराठी कोशात आले तर ते भांडार केवढे समृद्ध होईल. असे घडेल तेव्हा यशवंतराव चव्हाणांचे ‘मराठी ज्ञानभाषा’ होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने त्या दिशेने पावलं टाकली आहेत, ही मोठी आशादायी घटना आहे.
ही वऱ्हाडी थोरा-मोठय़ांनाही भुरळ घालते. एवढा गोडवा, माधुर्य, सौंदर्य या बोलीत आहे. भय्या उपासनींनी माझी ‘पिपय’ कविता पुलंना ऐकवली. ते पुलकित झाले. भय्या म्हणाला, ‘तुम्ही प्रत्यक्ष वाघांच्या तोंडूनच ऐका.’ पुलंनी राघवेन्द्र कडकोळांहातून मला घरी बोलावले. पुलं, सुनीताबाई, वसंतराव देशपांडे तीन तास कविता ऐकत होते. नंतर त्यांचं पत्र आलं. माझ्या कवितेपेक्षा ते वऱ्हाडी बोलीच्या गोडव्यावरच प्रकाश टाकणारं आहे-
‘‘तुमची वऱ्हाडी बोलीतील कविता, मनाला ‘सहेदाची गोळाई’ म्हणजे काय ते सांगून गेली. मला प्रमाण भाषांपेक्षा बोली अधिक जवळच्या वाटतात. प्रमाणभाषाही नाइलाजापोटी लागणारी व्यावहारिक सोय आहे. तिच्या वापरामागे प्राणांचा स्पर्श जाणवत नाही. ती माणसा माणसातल्या जिव्हाळ्यापेक्षा व्याकरणाशी अधिक एकनिष्ठ राहण्याला महत्त्व देत असते.
काया मातीपोटी कोंब टरारून वर आले.
सावत्याच्या गाथेतून गीत इठूचे फुलले
असं तुम्ही सावता माळ्याच्या कवितेच्या सहज फुलण्याला म्हटलं आहे. बोलीही मनाच्या मातीतून अशा सहज फुलतात. प्रतिमांनी व्यक्त होणे हे काव्याचं व्यवच्छेदक लक्षण मानलं जातं. बोलीतला सारा व्यवहार हा प्रतिमेतूनच फुलत असतो. म्हणूनच ‘परकरातली पऱ्हाटी जशी लुगळ्यात आली’ असं तुमची कविता बोलीतून सांगायला लागली की सांगणं आणि सांगण्याची भाषा एकरूप होते. लुगडय़ाचं ‘लुगळं’ करण्यातलं बोबडेपण भाषेच्याही बालस्वरूपाचं दर्शन घडवतं आणि त्या कवितेला आंजारावं गोंजारावंसं वाटायला लागतं. बहिणाआईची खान्देशी अंगडंटोपडं ल्यालेली गाणी किंवा बोरकरांची कोकणी गाणी हीच जादू करतात. गाव, शेतमळा, कुटुंब या रिंगणात भिरभिरणारी तुमची कविता वऱ्हाडीचं लोभसवाणं रूपडं घेऊन आली आहे. तिला ग्रामीण मायमाऊलीच्या जात्यातून पडणाऱ्या पिठासारख्या गाण्यांची सच्चाई आहे.’’ (पु. लं. देशपांडे ७ फेब्रुवारी १९८३)
वऱ्हाडी बोलीचं स्वरूप दर्शन पुलंनी असं हुबेहूब घडवलं आहे. या बोलीतील त्यांना जाणवलेली सहेदाची गोळाई मी ‘वऱ्हाडी’ शीर्षकाच्या कवितेतूनही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.-
असी सोभते हे भाषा मानसाच्या रे मुखात
दाने कवये हुळ्ळ्याचे वानीच्या रे कनसात
काय सांगता गोळाई इच्यामंदी सहेदाची
अखोजीच्या चिचोन्याची दिवाईच्या पुरनाची
इन्द्राघरच्या परीचं नाच नाचता पाऊल।
अमृताच्या घागरीले एक दिवस लागलं।
कलंडल्यानं घागर सारं अमृत सांडलं,
थेंबाथेंबातून त्याच्या काही निपजले बोल।
थेंब मातीनं झेलले जसं मिरगाचं पानी।
म्हनूनच शब्दाईले वास चंदनाच्या वानी.
माझ्या वऱ्हाडी बोलीचं करू कितीक कीर्तन
तिच्या दुधावरची साय किस्न खाय वरपून.