स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ

व्हिएतनाम हा एक चिमुकला देश. अमेरिकेसारख्या महासत्तेला पाणी पाजणाऱ्या या देशाने गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने प्रगती केली आहे. जागतिक क्षितिजावर आपल्या पाऊलखुणा उमटविण्यासाठी तो आता सज्ज झाला आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटन व्यवसायास उत्तेजन देऊन हौशी भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता त्याने कंबर कसली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

व्हिएतनाम म्हटले की गुगलच्या माध्यमातून जगाशी संबंध ठेवणाऱ्या बहुतांश लोकांना माहिती असतो तो चीनमधून बाहेर पडणाऱ्या जागतिक उत्पादक कंपन्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारा एक धडपडय़ा, विकसनशील देश! तर थोडी इतिहासाची माहिती असणाऱ्यांना अमेरिका-व्हिएतनाम युद्ध आणि त्यात या इवल्याशा देशाने गनिमी काव्याचे तंत्र वापरून अमेरिकेला जेरीस आणल्याचा त्यांचा पराक्रमी, धाडसी बाणा! आग्नेय आशियातील हा देश आता जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांबरोबरच जगातील एक मोठा उद्योग असलेल्या पर्यटन क्षेत्रातही पर्यटकांना आकर्षित करण्याची धडपड करत आहे. त्याकरता जगातील नवनवीन देश पाहण्याची आकांक्षा असलेल्या भारतीय पर्यटकांना आता व्हिएतनाम साद घालत आहे.
व्हिएतनामच्या किनारपट्टीवरील निळाशार प्रशांत महासागराकाठी वसलेली टुमदार शहरे, बीच रिसॉर्ट्स, नैसर्गिक सौंदर्याने नटलेले सुंदर घाट, थंडगार पर्वतराजींचा प्रदेश, नैसर्गिक व मानवी पुरातन वारसा दर्शविणाऱ्या गुहा, मंदिरे आणि राजप्रासाद, तसेच मानवी कल्पकता व जिद्दीतून तयार झालेली नयनरम्य, मनोरंजक प्रेक्षणीय स्थळे असा वैविध्यपूर्ण पर्यटन अनुभव देणारा आपला देश हौशी भारतीय पर्यटकांना नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास व्हिएतनाम मनी बाळगून आहे. त्यासाठी भारतातील दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमधून थेट व्हिएतनामची राजधानी हनोईसह दा नांग, हो चि मिन्ह सिटी आणि फ्युकोक या चार प्रमुख शहरांशी जोडणारी माफक दरातील विमानसेवाही सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवेतील फेऱ्यांची संख्या वाढावी असाही प्रयत्न सुरू आहे. भारतीय पर्यटकांना युरोप, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या तुलनेत खूपच रास्त दरात नवा देश पाहता येईल, हा विचार तर त्यामागे आहेच. युरोप-अमेरिका न परवडणाऱ्या, पण परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण असलेल्या सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांत सहलीला जाणाऱ्या पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध करून देण्याचा व्हिएतनामचा प्रयत्न आहे. चार-पाच दिवसांची लहान सहल करायची असेल तरी व्हिएतनामचा विचार भारतीय पर्यटकांनी करावा याकरता तेथील पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. इतकेच नव्हे तर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी हनिमूनसाठी व्हिएतनामला यावे आणि येथील पर्वतराजी, बीच रिसॉर्ट्सचा आनंद लुटावा अशी संकल्पना घेऊन ते पुढे येत आहेत.

दा नांग या प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील शहरापासून एखाद् तासाच्या अंतरावर असलेला बाना हिल्स हा एक नयनरम्य परिसर. या नैसर्गिक देणगी लाभलेल्या परिसरात मानवी कल्पकता आणि परिश्रमांची जोड देत आता जगप्रसिद्ध झालेला ‘गोल्डन हॅंड ब्रिज’ साकारण्यात आला आहे. दोन हातांच्या तळव्याच्या आकाराच्या आधाराने हा सोनेरी रंगाचा पूल तोलून धरला आहे. त्या हातांना ‘हॅंड्स ऑफ गॉड’ असेही संबोधण्यात येते. हा पूल देखणा आहेच; शिवाय उंचावरील या पुलावर फिरणे आणि छायाचित्रे टिपणेही रोमांचक आहे. यापेक्षाही अधिक रोमांचक आहे तो तिथवर जाण्यासाठी करावा लागणारा केबल कारचा प्रवास! तब्बल पाच किलोमीटर लांबीचा- खरे तर उंचीचा म्हणणे जास्त योग्य ठरेल- असा हा केबल कारचा प्रवास अवतीभोवतीच्या निसर्गरम्य प्रदेशामुळे डोळ्यांचे पारणे फेडतो. हा प्रवास या पुलावरच संपत नाही. तेथून आणखी उंचावर जाऊन लागते ते मानवी परिश्रमांतून साकारलेले आणि युरोपियन वास्तुकलेतून नटलेल्या टुमदार गावाचा आनंद देणारे फ्रेंच व्हिलेज! पर्वतराजीवरील गारवा, अचानक येणारी पावसाची सर आणि हा परिसर हा अनुभव रमणीय व अविस्मरणीयच आहे. या फ्रेंच व्हिलेजमध्ये जेवणखाण्याचे वैविध्यपूर्ण अनुभव देणारी अनेक रेस्टॉरंट्स आहेत.

असाच मानवी कल्पकतेतून साकारलेला एक अनुभव म्हणजे होयान या भागातील विनवंडर थीम पार्क आणि अॅडव्हेंचर पार्क! पाण्यात खेळण्यासाठी वॉटर पार्क, साहसी खेळांसाठी वैविध्यपूर्ण थरार अनुभवता येईल असे मोठमोठे पाळणे व इतर खेळ, नयनरम्य लॅंडस्केपिंग असा संपूर्ण दिवस घालवता येईल इतका प्रचंड मोठा परिसर आहे हा. पण याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कृत्रिम कालव्यातून जाणाऱ्या बोटीतून प्रवास करत केलेली सफारी. आपण छानपैकी बोटीतून जात असताना आजूबाजूला वाघापासून ते कांगारूपर्यंत जगभरातील विविध प्राणी पिंजऱ्यांतून पाहता येतात. हे पिंजरे छोटे नाहीत. एक प्रकारे या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास त्यांच्याभोवती तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्राणीही मोकळेपणाने येथे बागडत असतात आणि त्यांना पाहण्याचा एक वेगळाच आनंद इथे लुटता येतो. होयानमध्येच आपल्याला तेथील कोळी लोकांच्या गोल नावेतून खाडीतून प्रवास करण्याचा आनंदही घेता येतो. या प्रवासावेळी नावाडी ‘स्पिनिंग बोट’ नावाचा चित्तथरारक खेळही करून दाखवतात.

होयानशेजारील मिसान हा परिसर खरे तर प्रत्येक भारतीयाने पाहावा असा आहे. कारण भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्या देशापासून हजारो किलोमीटर अंतरावर आपल्याला आढळतात. चंपा किंवा चाम घराण्यातील लोक हिंदूधर्मीय होते आणि ते शिवाचे उपासक होते. त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी मिसान या डोंगराळ भागात दूर डोंगराच्या सान्निध्यात शिवमंदिरांचे एक संकुलच उभारले होते. आज तिथे जीर्ण अवस्थेतील मंदिरांचे अवशेष असले तरी कोणे एकेकाळी या ठिकाणी किती सुंदर मंदिरे असतील याची खात्री पटते. भारतीय पुरातत्व खात्याच्या मदतीने या परिसराचे व तेथील मंदिरांच्या अवशेषांचे संवर्धन करून ते पुढच्या पिढीला पाहण्यासाठी जतन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणच्या मूर्ती खराब होऊ नयेत यासाठी त्यातील अनेक सुबक मूर्ती दा नांग शहरातील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. गणेश, शिव, शेषशायी विष्णू, पद्मनाभ, नंदी, शिवाचे गण, कार्तिकेय स्वामी यांच्या अत्यंत देखण्या कोरीवकाम असलेल्या दगडी मूर्ती पाहताना आपण दक्षिण भारतातच आहोत असा भास होत राहतो. या संग्रहालयाजवळच नदीवर ड्रॅगनच्या आकाराची कमान असलेला एक भलामोठा पूल आहे. आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसांत रात्री नऊच्या सुमारास या ड्रॅगनच्या तोंडातून खऱ्या आगीच्या ज्वाळा बाहेर पडतील अशी व्यवस्था करून पर्यटकांसाठी एक आकर्षण तयार करण्यात आले आहे. नदीच्या काठावरील बोटींमध्ये अत्याधुनिक रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यापिण्याचा आनंद घेत या ज्वाळा पाहणे आणि रोषणाईने झगमगणारे रात्रीचे दा नांग पाहणे ही एक आगळीच मौज आहे.

swapnasaurabha.kulshreshtha@ expressindia.com