कधी मानसिक पातळीवर, कधी शारीरिक पातळीवर सुप्त स्वरूपात वास करणारी कामप्रेरणा.. तिचे पदर उकलणे कठीणच. या प्रेरणेला कामवासना वगैरे संबोधून तिला आपण घाण, वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो. काही लेखकांच्या लेखनातील चित्रण तिला विकृती म्हणून चितारणारे आढळते, तर काही लेखकांचे त्याबाबतचे आकलनच अ-वास्तव वाटते. या कामप्रेरणेचा जरासाही बाऊ न करता तिचे नैसर्गिक सहजरूप कुठलाही बंडखोरीचा किंवा तथाकथित धीटपणाचा आव न आणता स्वाभाविकपणे वेगवेगळ्या शैलीत स्त्रियांच्या लेखनात अलीकडे दिसून येत आहे.
प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित माणसाच्या गैरवर्तनाची बातमी ऐकली की लोकांच्या तोंडातून पहिला शब्द निघतो तो ‘माज.’ मग त्याचे विविध प्रकार घटनेच्या अनुषंगाने सांगितले जातात. सत्तेचा माज, संपत्तीचा माज, लोकप्रियतेचा माज. खरे तर यापैकी कोणताच माज नसलेली माणसेदेखील गैरवर्तन करत असतात. पण प्रसिद्ध व्यक्तीच्या वर्तनाची चर्चा जास्त होते. त्यात अनेक धागेदोरे गुंतलेले असतात. अशा माणसांकडे लोक काही बाबतीत आदर्श म्हणून पाहत असतात. त्या प्रतिमेला तडा जातो, समाजावर अशा प्रतिमाभंगाचा विपरीत परिणाम होतो असे मानले जाते. म्हणून या प्रकाराची सर्वच पातळ्यांवर दखल घेतली जाते, त्यावर चर्चा झडतात. काहीजण यानिमित्ताने जुने हिशेब चुकते करून घेतात. प्रकरणाची उकळी काही दिवसांनंतर खाली बसते आणि सर्वाचीच नावीन्याची हौस ध्यानात घेऊन काळाच्या ओघात कोणीतरी नवीन प्रकरण जन्माला घालते.
त्यात आपली मानसिकता अशी झालेली आहे की, आर्थिक गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आपल्याला फारसे काही वाटेनासे झाले आहे. रुपयांचा आकडा फक्त लाखाचा असेल तर त्याकडे लोक फारशा गांभीर्याने पाहतही नाहीत. काही हजार कोटी असे, किती शून्ये पुढे द्यावीत हे न कळणारे आकडे ऐकण्याची, वाचण्याची आपल्याला सवय झाली आहे. अशा व्यक्तींवर कोर्टात खटले सुरू असले तरी अशा व्यक्ती सत्तास्थानी असतात, अनेक संस्थांच्या अध्यक्षपदी असतात; आपण त्यांना कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणूनसुद्धा बोलावतो आणि त्यांचे नीतिमूल्यांविषयीचे विचार शांतपणे ऐकून घेतो. त्यांच्या हस्ते पुरस्कारही स्वीकारतो. खरे तर आपण माफक भ्रष्टाचार मनोमन स्वीकारलेला आहे. त्याच्या समर्थनार्थ ‘तळं राखील तो पाणी चाखील’ अशा म्हणीही रूढ करून टाकल्या आहेत.
पण जिथे स्त्रीचा संबंध येतो तिथे समाज वेगळ्या दृष्टीने पाहतो. भ्रष्टाचारापासून व्यभिचार वेगळा करतो. येथे समाज सामान्य माणसाइतकीच सूट प्रसिद्ध व्यक्तीलाही देतो; पण ही बाब जोपर्यंत खासगी आहे तोपर्यंतच. ‘हमाम में तो सब नंगे होते है’ असेही तो समजून घेतो. मी तोपर्यंत साव आहे- जोपर्यंत मी चोरी करताना पकडला जात नाही. साहित्य, कला या क्षेत्रातील आर्थिक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्य़ांमुळे काहीजण कारागृहात जाऊन आलेले आहेत. (काहीजण जाण्याच्या रांगेत आहेत असे ऐकतो.) तरीही समाज त्यांच्या खपल्या काढत नाही किंवा भूतकाळ उकरून काढत बसत नाही. याचा अर्थ लोक सहनशील आणि क्षमाशील आहेत असाच होतो.
पाप-पुण्याच्या कल्पना तशाही क्षीण होत चालल्या आहेत. पापाची भीती आणि पुण्याची जोडणी व्यावहारिक पातळीवर आता कोणी जुमानत नाही, किंवा ती कुणाला आकर्षित करीत नाही. पुन्हा पाप कशाला म्हणायचे, संमतीने ठेवलेल्या संबंधांना व्यभिचार म्हणायचा का, याचा कीस काहीजण पाडताना दिसतात. (पण विवाहबाह्य़ संबंध संमतीने ठेवताना, जिच्याशी देवाधर्माच्या साक्षीने आणि कागदपत्रांवर सह्य़ा करून विवाह केला त्या पत्नी नावाच्या स्त्रीच्या संमतीचा वा विरोधाचा विचार कोणी करायचा?) पाप, गुन्हा, अनीती यांमधील पुसट होत चाललेल्या सीमारेषांसंबंधी एका कवीने असे म्हणून ठेवले आहे.. नरेशकुमार ‘शाद’ असावेत ते-
महसूस हो भी जाये तो होता नहीं बयाँ
नाजुक-सा फर्क है जो गुनाह-ओ-सवाब में
पण हे तर्कवितर्क मागे पडतात, जेव्हा पापाच्या प्रांतातून गुन्ह्य़ाच्या राज्यात माणसाचा प्रवेश होतो. पापासाठी प्रायश्चित्त असते आणि गुन्ह्य़ासाठी शिक्षा हे प्रायश्चित्त घ्यायचे असते. शिक्षा दुसरे लोक देतात. शिक्षा देणारी देवता असते (म्हणजे स्त्री). तिच्या डोळ्यांवर पट्टी असते. म्हणून तिची भीती जास्त वाटते. ज्या स्त्रीची (किंवा स्त्रियांची) पुरुष फसवणूक करतो, तिच्याशी त्याची भावनिक गुंतणूक नसते. तसे असते तर फसवणुकीच्या पुढची (की खालची?) शोषण ही पायरी त्याने गाठली नसती. बाईला त्याने गृहीत धरलेले असते. हाताखालची स्त्री कर्मचारी नसून ती गुलाम आहे अशी माफक मानसिकता तयार होते. ही भावना प्रबळ झाल्यानंतर आधी विवेक नष्ट होतो, मग प्रमाद घडतो. तो उघडकीस येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि आतापर्यंत मोठय़ा कष्टाने, दीर्घकाळ परिश्रमाने मिळविलेली सामाजिक प्रतिष्ठा, पुरोगामी प्रतिमा मलीन होण्याची भीती घेरू लागते. पुढील विकासाच्या (आणि लाभाच्या) वाटा बंद होण्याची चिन्हे दिसू लागतात. मग यातून सुटण्याची केविलवाणी धडपड सुरू होते. पुरस्कार आणि पदव्यांची चांदी काळवंडून जाते. या सगळ्यात दु:खाची आणि सामाजिकदृष्टय़ा वाटचाल अवरुद्ध करणारी गोष्ट अशी की, अनुयायी, चाहते, मित्र हताश होतात.. खचतात. आपल्या माणसाचेही पाय मातीचेच निघाले म्हणून अस्वस्थ होतात. आणि आणखी एका मूर्तीवरचा शेंदूर खरवडून निघाला म्हणून उद्विग्न होतात.
अशा घटना आणि प्रसंग यांच्यामागच्या विचार आणि विकारव्यूहाचा विचार करताना मेंदू खूपच शिणवावा लागतो. त्वचा, स्पर्श, कातडी यांना उत्तेजित होण्याचे आदेश कोण देते? ‘हे सर्व कोठून येते’- हे समजणे तसे सोपे नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘विदूषक’ या वजनदार कथेत ज्ञानी आणि शूर पात्रे आहेत आणि त्यांचे थक्क करणारे डावपेच आहेत. पण शेवटी ध्रुवशीला या सर्वाना सोडून बलवान अशा काळ्या डोंबाच्या मिठीत सामावते. शरीराची हाक इतकी प्रबळ असते. सत्तासुंदरी शेवटी बाहुबलींची असते, हाही अर्थ या प्रतीकातून काढता येतो. वासनेच्या आवेगापुढे माणूस किती हतबल व्हावा? की, आपण येत्या निवडणुकीनंतर आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख होण्याची शक्यता आहे हे माहीत असूनही डॉमिनिक स्ट्रॉस कान्ह यांनी दुसऱ्या देशात ‘सोफिटेल’ या हॉटेलमध्ये प्रौढ वयाचे असताना कृष्णवर्णीय महिला अटेन्डन्टवर बलात्काराचा प्रयत्न करावा आणि आपलीच कारकीर्द धुळीस मिळवावी? नेमकं काय होतं? विकार हे विचारांवर मात करतात का? भावना या सामाजिक संकेतांपेक्षाही प्रबळ होतात का? की हा तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून होणारा उद्रेक असतो? नाहीतर एक उच्चविद्याविभूषित शिक्षिका सात वर्षांच्या पोराला हात मोडेपर्यंत का मारते? किंवा परीक्षेच्या वेळी कॉपी तपासण्याच्या नावाखाली प्राध्यापक एका विद्यार्थिनीचा पोशाख ती लाजेनं मरेल अशा तऱ्हेनं का चाचपतो? नंतर तिला तो पेपर सोडवेल तरी कसा? याबाबतीत काहीजण सराईत असतात, काही निर्लज्ज असतात. ते ओळखूही येतात. त्यांच्याविषयी तुकोबांनीच सांगितले आहे-
सूकरा कस्तुरी चंदन लाविला । तरी तो पळाला । विष्ठा खाया ।।
पण काही आवरणाखाली कार्यरत असतात. कधी मानसिक पातळीवर, कधी शारीरिक पातळीवर ही कामप्रेरणा सुप्त स्वरूपात वास करणारी. तिचे पदर उकलणे कठीणच असावे. म्हणूनच जयवंत दळवींनी या प्रेरणेला ‘अथांग’ असे संबोधले असावे. या प्रेरणेला कामवासना वगैरे संबोधून तिला आपण घाण, वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो. काही लेखकांच्या लेखनातील चित्रण तिला विकृती म्हणून चितारणारे आढळते, तर काही लेखकांचे तिच्या बाबतचे आकलनच अ-वास्तव वाटते. म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकरांच्या काही कादंबऱ्यांमध्ये अशी अपूर्ण सौंदर्यवती नायिका असते- की सगळे पुरुष तिच्यासमोर नांगीच टाकतात. तर जयवंत दळवींच्या ‘पुरुष’ या नाटकात ही कामप्रेरणा सत्तेचे हिडीस रूप घेऊन प्रकट होते. अनेक लेखक भीतभीतच या प्रेरणेच्या अवतीभोवतीच खेळ मांडताना दिसतात. उल्लेखनीय सद्य:कालीन बाब अशी की, या कामप्रेरणेचा जरासाही बाऊ न करता तिचे नैसर्गिक सहजरूप, कुठलाही बंडखोरीचा किंवा तथाकथित धीटपणाचा आव न आणता स्वाभाविकपणे वेगवेगळ्या शैलीत स्त्रियांच्या लेखनात दिसून येते. ते रूप मेघना पेठेंच्या कथांमध्ये, प्रज्ञा पवारांच्या कवितांमध्ये, कविता महाजन यांच्या कादंबऱ्यांमध्ये नवी, मोकळी, स्वच्छ दृष्टी घेऊन प्रकट होते. हाही या लेखिकांसाठी एक प्रकारचा आत्मशोधच असावा. आणि त्यासाठी खऱ्याखुऱ्या आत्मक्लेशाच्या निबीड अरण्यातून त्यांना वाटचाल करावी लागली असावी, याच्या खुणा त्यांच्या लेखनातच सापडतात.
प्रसिद्ध लोक खूपच संवेदनशील असतात, हा एक भ्रम. कलावंत माणूस म्हणूनही महान आणि नीतिवान असावेत, हा लोकांचा एक आग्रह. परंतु वास्तव यापैकी कुठेतरी अधेमधे आहे. माझा एक कविमित्र जेव्हा घराबाहेर रमायला लागला तेव्हा त्याची बायको- म्हणजे माझी वहिनी त्याची परोपरीने समजूत घालायची. तेव्हा तो एकदम देवदासच्या भूमिकेत शिरायचा. मुकेशची गाणी ऐकायचा. प्यायचा आणि रडायचा. वहिनींनी एकदा माझ्यासमोरच त्याला झापले, ‘‘भावजी, हे पाहा नं- मुकेशचं गाणं ऐकून रडायलो असं म्हणायलेत. अवो अन् इथं जित्त्या बाईमान्साचं दुक्कं यांना समजंना झालंय..’ आणि त्या दोघांचा प्रेमविवाह झालेला होता.
मानवी वर्तनाला प्रभावित करणाऱ्या या प्रेरणेचा गुंता लिहिणाऱ्या स्त्रियाच नीट सोडवू शकतील असे सध्या तरी वाटते आहे आणि त्यांना मदत करायला विज्ञान नवीन नवीन साधने पुरवेल असे चिन्ह दिसते आहे.