बाबा कमालखाँ जाफराबादी करतूतवाले बंगाली यांनी आमुच्या माथ्यावरून मोरपिसाचा पंखा फिरवला. त्याच पंख्याने आम्हास उदाची धुरी दिली. त्यामुळे ताबडतोब दोन चमत्कार झाले. आमचा भांग मोडला व सटासट दोन शिंका आल्या! मग त्यांनी समोरच्या खुर्चीवर आपली तशरीफ ठेवली आणि म्हणाले-
‘बच्चा, तेरे पास एक काम था आपुनका. बोल करेगा? बाबा की दुवा लेगा?’
बाबाजींच्या त्या वाणीने आम्ही सद्गदितच झालो. वाटले, मूठकरनी, जादूटोणा, वशीकरण, लवमैरेज, सौतन, नौकरी अशी कोणतीही गंभीर समस्या चोबीस घंटय़ात गैरंटी के साथ सोडवून दाखविणारे बाबाजी- ज्यांनी केलेल्या कामाला जगातला बडय़ातला बडा लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टसुद्धा काटू शकत नाही असे बाबाजी- त्यांना आज पुन्हा आपल्या मदतीची आवश्यकता भासावी! केवढे आपण सौभाग्यपती!
पण मग आठवले, मागील वेळी बाबाजींना अशीच मदत केली, तो दीडशेचा फटका बसला. तरी बरे, ‘दोनशेशिवाय सोडणार नाही, नायतर जादूटोना कायदा लावतो,’ असे तो दुष्ट हवालदार म्हणत होता. किंतु बाबाजींच्या कृपेने अखेर त्यांची दीडशेवर सुटका झाली! आता किती जातात कोण जाणे?
‘काय काम होतं बाबा?’
‘बेटा, एक लेटर लिखना था तुम्हारे भटकरसाबको.’
‘कोण भटकरसाब?’
‘उनकू नहीं पहचानता? अरे, कित्ते बडे साब है वो. कैंपुटर बनाते वो बडे बडे..’
‘अच्छा ते.. त्यांना तुम्ही काय पत्र लिहिणार बाबा? मोठे सायंटिस्ट आहेत ते.’
‘तभी तो! बोल, लिखेगा?’
नाही कसे म्हणणार? बाबाजींनी रागात छूमंतर केले तर पुढचा जन्म वटवाघळाचा यायचा!
मुकाटय़ाने कागद-कलम पुढे ओढून म्हणालो, ‘बोला बाबा..’
बाबा बोलत गेले, आम्ही लिहीत गेलो.
त्या पत्राची प्रतिलिपी येणेप्रकारे..
प्रति,
मा. विजयजी भटकर साहेब यांस-
कमालखाँ जाफराबादी करतूतवाले तथा बाबा बंगाली यांचेकडून
अनेक दुवासलाम. विनंती विशेष-
पत्रास कारण की, आपण बहुत बडे सायंटिस्ट असूनसुद्धा अंधश्रद्धा मानत नाही ही खूप बडी गोष्ट आहे. त्याबद्दल पहले छूट तुम्हास आपला मनापासून सलाम. तुम्ही दोचार दिवसांपूर्वी भाषण केले, ते आमचा शागीर्द असदमियाँ बंगाली याने आम्हाला सांगितले. तो बोलला, की तुम्ही बोलला की परदेशात पोलीस तपासात अतिंद्रिय शक्तींचा वापर करतात. म्हणून तपासात प्लांचेटचा वापर करणे गैर नाही. तुमचे हे बोलणे ऐकून, लाहौलविलाकुवत, आमचा तर होशोहवासच उडाला! असदमियाँला मी बोललोपण- ‘बेटा, ये देख इसकू बोलते असली सायंटिस्ट! नहीं तो आजकल के पानीकम् सायंटिस्ट! हर चीजका प्रूफा मांगते!’
तुमच्या भाषणामुळे आमच्या पोळसाहेबांना किती बरे वाटले असेल. नाही तर त्यांना वाटत होते की, त्यांची प्लांचेटची सगळी मेहनत फुकटच गेली. वर पुन्हा बेइज्जतीपन झाली. पण त्यांनी तसे काय वाटून घेऊ नये. आरार आबा असले-नसले तरी बाबा कमालखाँ हमेशा त्यांच्या पाठीशी आहे.
सांगण्याचा मुद्दा काय, तर पोलीस तपासात प्लांचेट अलाऊड आहे हे तुम्ही सायंटिफिकरीत्या सांगितले ते बरे झाले. अखेर आत्मा हा अमर असतो. आमचा असदमियाँ तर म्हणतो- आत्मा प्लास्टिकसारखा असतो. नो बायोडिग्रेडेबल! तर आत्म्याला मौत नसते. म्हटल्यावर तो खालीपिली बिनकामाचा फिरत असणार. बोअर होणार. आणि असा बोअर झालेला आत्मा म्हणजे जाम खतरनाक. काय करील त्याचा नेम नाही. आपला बीस बरसचा एक्सपेरिन्स आहे. त्याच्यामुळे लॉ आणि ऑर्डरपण धोक्यात येऊ शकते. म्हणून त्याचा अच्छाखासा उपेग करून घेतला पाहिजे.
आमचा सल्ला असा आहे, की पोलीस डिपार्मेन्टमधी अलग प्लांचेट डिपार्मेन्ट तयार केले पाहिजे. त्याच्यामुळे आत्म्यांना रोजगार मिळेल. पुन्हा तुमच्या जादूटोणा कायद्यामुळे आज अनेक बाबा, देवरूशी, मांत्रिक बेकार झाले आहेत. त्या सगळ्यांचीपण भरती डिपार्मेन्टमधी केली पाहिजे. तसे झाले तर तुमच्या सगळ्या सायंटिस्टांना त्यांची दुवा मिळेल. तुमच्या संशोधनात बरकत येईल. डिपार्मेन्टमधी डॉगस्कॉड असते तसे हे पोळखोल प्लांचेट स्कॉड असेल. याच्यामुळे आमच्या पोळसाहेबांना पण आत्मिक समाधान मिळेल.
भटकरसाब, आपण बडे सायंटिस्ट आहात. तुमच्या शब्दाला वजन आहे. म्हणून तुम्हाला दिलसे विनंती करतो, की आमच्या या लेटरचा सहानुभूतीने विचार करून ही मागणी मा. मुख्यमंत्रीसाहेबांकडे कळवावी. जेणेकरून आपले पोलीस डिपार्मेन्ट स्कॉटलंड यार्डच्या वरताण होईल.
तकलीफसाठी माफी.
आपला,
बाबा बंगाली
(ता. क.- लेटरबरोबर अंगारेकी पुडी ठेवली आहे. दिवसातून अकरा वेळा गळ्याला लावावा. कोणताही प्रॉब्लेम चोबीस तासांत खतम होगा. साब, गैरंटी है अपनी.)
पोळखोल
बाबा कमालखाँ जाफराबादी करतूतवाले बंगाली यांनी आमुच्या माथ्यावरून मोरपिसाचा पंखा फिरवला. त्याच पंख्याने आम्हास उदाची धुरी दिली.
First published on: 03-08-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay bhatkar backs planchette