चित्रकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, कलासमीक्षक, इतिहास आणि लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक अशी द. ग. गोडसे यांची चतुरस्र ओळख होती. अनेक विषयांत त्यांनी गती होती. त्यामुळे ‘मस्तानी’, ‘लोकघाटी’, ‘नांगी असलेले फुलपाखरू’ अशी अनेकानेक विषयांवरची अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. शंभरहून अधिक नाटकांचे कला-दिग्दर्शन त्यांनी केले. काही चित्रपटांकरताही त्यांनी कला-दिग्दर्शक म्हणून काम केले. अशा या चौफेर व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला दिसलेला एक विशेष कोपरा प्रख्यात रंगकर्मी विजया मेहता यांनी कथन केला आहे. विजयाबाईंच्या नाटय़प्रवासात गोडशांची साथ किती मोलाची होती, हे सांगणारा..
येत्या ३ जुलै रोजी द. ग. गोडसे यांची जन्मशताब्दी येत आहे..  त्यानिमित्तानं.

द. ग. गोडसेंशी माझी पहिली भेट नक्की कधी झाली मला आता आठवत नाही; परंतु ते साहित्य संघात येत-जात असत. मीही त्यादरम्यान संघाच्या नाटकांतून कामं करत होते. त्यांना रोज पाहत होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा एवढा होता, की त्यांच्याशी सहज गप्पा करणं मुश्कील होतं. पण म्हणतात ना, असा एखादा प्रसंग घडतो आणि  ice has broken! तसं झालं. मी तेव्हा साहित्य संघाच्या ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये काम करीत होते. त्याचवेळी मी अल्काझी आणि निस्सीम इझिकेल यांच्याकडे स्तानिस्लाव्हस्कीचे धडेही गिरवीत होते. त्यातला एक छोटासा धडा हा, की तुम्ही- म्हणजे तुम्ही निभावत असलेलं पात्र जेव्हा स्टेजवर एन्ट्री घेतं, तेव्हा एका मिनिटात लोकांना ते कोण आहे, त्याच्या मनात काय चाललंय, हे कळायला हवं. त्यामुळे तुमची एन्ट्रीच मुळी त्या पिचला व्हायला हवी. ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये मी उषाची भूमिका करीत असे. एका प्रसंगात उषा उन्हानं घामेजलेली आणि भावाला कसं झापायचं याचा विचार करत चिक्कार चिडलेल्या मन:स्थितीत एन्ट्री घेते असा प्रसंग होता. कारण तिच्या भावानं आचार्याना घ्यायला जायचं असतं. पण ते न करता तो परस्पर गाडी घेऊन कुठंतरी निघून गेलेला असतो. त्यामुळे उषा ज्याम संतापलेली असते. तशात बाहेरच्या उन्हाच्या तल्खलीनं ती कावलेली असते. त्या तिरमिरीत ती घरी येते आणि पाहते तो आचार्य आधीच पोहोचलेले असतात.. असा तो प्रसंग! उन्हाची ती काहिली, उषाचं ते चिडचिडणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी एन्ट्रीही त्या पिचला व्हायला हवी! म्हणून मी त्या एन्ट्रीपूर्वी रंगमंचाबाहेरच्या काळोखात येरझारा घालीत असे. बघणाऱ्यांना वाटे- मी नव्‍‌र्हस झालेय. त्यामुळे तसं करतेय.
एकदा दस्तुरखुद्द गोडशांनी मला असं येरझारा घालताना पाहिलं आणि विचारलं, ‘का हो, तुम्ही काही श्वसनाचे एक्सरसाइझेस वगैरे करताहात का?’ मी म्हटलं, ‘नाही हो. एक्सरसाइझेस वगैरे काही नाही. एन्ट्रीला आवश्यक तो पिच मिळाला पाहिजे ना- उन्हाच्या तल्खलीचा, भावावर भयंकर चिडल्याचा- तो आणण्यासाठी हे चाललंय..’
आणि कधी नव्हे तो, तो माणूस खळाळून मनमोकळेपणानं हसताना मी पाहिला. आणि out of the blue  त्यांनी कधी नव्हे ती माझ्या टपलीत मारली. बस्स! त्या क्षणापासून त्यांचा तो दरारा was over. मी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायला लागले. गप्पा मारायला लागले. गप्पा म्हणजे महत्त्वाच्या विषयांवरच बोलणं! उगाचच काहीबाही आचरट वगैरे नव्हे. त्यावेळी त्यांच्याबरोबर कामाचं- म्हणजे नेपथ्याबद्दल वगैरे असं बोलणं झालं नाही. कारण तेव्हा खूप gaps होत्या. मी एकाच वेळी साहित्य संघ, अल्काझी वगैरे सर्वत्र फिरत असे. म्हणूनही असेल कदाचित, त्यांचा-माझा कामासंदर्भात तेव्हा कधी संबंध आला नाही.
तो आला ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’च्या नेपथ्याच्या वेळी. १९६१ सालची ही गोष्ट. त्यात मी यशोदाची भूमिका करीत होते. मामा पेंडसेही या नाटकात होते. १९ वर्षांच्या या पेशवीणबाईचा वावर माधवराव पेशव्यांच्या दालनात कुणी नसताना होत असे. तेव्हा माझ्या डोक्यात प्रश्नांची खूप भेंडोळी असत. १९ वर्षांची तरुण पेशवीणबाई तेव्हा काय विचार करत असेल? कशी वागत, वावरत असेल? वगैरे. मामा मला पेशवीणबाईचा खोपा कसा हवा, त्यासाठी मान कशी ठेवायला हवी, पदर कसा घ्यायला हवा, वगैरेबद्दल सांगत. पण तरीही ही तरुण पेशवीणबाई नेमकी कशी असेल? तिच्या मनात काय चाललेलं असेल?.. असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते. गोडशांनी या नाटकाचा सेट केला होता. शनिवारवाडय़ाचा बारकाईनं अभ्यास करून त्यांनी तो बेतला होता. म्हणून मग मी गोडशांनाच विचारलं, ‘तुम्ही शनिवारवाडा पाह्य़लाय. अभ्यासलाय. तुम्हाला काय वाटतं? पेशवीणबाई कशी वावरत होती असेल तिथं?’
त्यांनी मग मुद्दाम मला शनिवारवाडय़ावर नेलं. सगळा शनिवारवाडा फिरवून दाखवला. माधवरावांचं दालन, तिथं पेशवीणबाई वावरत असलेली जागा.. त्याचबरोबर पेशवेकालीन सगळे ऐतिहासिक संदर्भही त्यांनी मला समजावून सांगितले. तो काळ आणि त्यावेळच्या माणसांचं जीवन कसं होतं, हे मला तपशिलात सांगितलं. ‘पेशव्यांच्या बायका जरी मुस्लीम स्त्रियांसारख्या गोषात वावरत नसल्या तरी त्यांचा वाडय़ातला वावर मर्यादितच असे. बाहेर काय चाललंय, हे जाणून घेण्यासाठी त्या खिडकीतून डोकावत..’ वगैरे.
तेव्हापासून गोडसे माझे एन्सायक्लोपीडिया झाले. मी त्यांना काहीही.. अगदी काहीही विचारत असे. गोडसे हे नेपथ्यकार असल्याचा समज आणि समीकरण असलं तरी ते निव्वळ नेपथ्यकार नव्हते, तर ते एक चौफेर रसिक आणि प्रचंड विद्वान होते. माझे घट्ट स्नेही आणि एक अवलिया होते. ते मला ‘देवीजी’ म्हणत.
माझी गोडसेंची १९५६ साली जरी ओळख झालेली असली तरी त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम मात्र मी खूपच उशिरा.. बऱ्याच वर्षांनंतर केलं. ‘अजब न्याय वर्तुळाचा’च्याही नंतर.. ‘मुद्राराक्षस’पासून!
आमच्या ‘रंगायन’च्या नाटकांना ते भुलाभाई इन्स्टिटय़ूटमध्ये बऱ्याचदा येत. शंभरेक खुर्च्यांचं ते छोट्टंसं थिएटर होतं. प्रयोग संपल्यावर आम्ही- म्हणजे मी, माधव वाटवे, वसंत सरवटे, कधी कधी किशोरी (आमोणकर) असे बरेचजण गप्पा मारत बसत असू. त्यावेळी आमचे ‘मादी’चे प्रयोग चालू होते. मी आणि डॉ. लागू त्यात काम करत होतो. तेंडुलकरांची एकांकिका. मी तीनदा तरी गोडशांना ‘मादी’च्या प्रयोगाला येताना पाहिलं होतं. एकदा प्रयोग संपल्यावर गप्पा मारताना मी गोडशांना विचारलं, ‘काय हो गोडसे, तुम्हाला ‘मादी’त एवढं काय आवडलं?’ ते म्हणाले, ‘निश्चितपणे मला   नाही सांगता येणार.. पण मला ती मिश्र रागाच्या मैफलीसारखी वाटते.’ आता अशी कमेन्ट फक्त आणि फक्त गोडसेच करू जाणे!
पुढे ‘रंगायन’ मोडली आणि ‘अजब न्याय वर्तुळाचा’पासून माझा जर्मन नाटय़प्रकल्पांचा प्रवास सुरू झाला. ‘अजब न्याय वर्तुळाचा’चं रूपांतर केलं होतं चिं. त्र्यं. खानोलकरांनी. साहित्य संघाची ती निर्मिती होती. या जर्मन प्रकल्पांत ‘मुद्राराक्षस’पासून गोडसे आमच्यासोबत आले. या प्रवासात आणखीही दोन सहप्रवासी.. सख्खे मित्र मला भेटले. फ्रिट्झ बेनेव्हिट्झ आणि भास्कर चंदावरकर! इथून माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं.
आमच्या दिवसभर सगळ्या तालमी चालत त्या साहित्य संघात. संघात आम्ही चक्क मुक्कामच ठोकला होता. या तालमींना गोडसे येऊन बसत. तेव्हा माझ्या प्रथमच लक्षात आलं, की हा मितभाषी माणूस कायम तालमीत असतो. प्रेक्षागृहात बसून शांतपणे ते तालीम पाहत असत. ‘अजब न्याय वर्तुळाचा’चा प्रयोग आमच्या सगळ्यांच्या कल्पनेपलीकडचा.. अप्रतिम असाच झाला. माझ्या मते, It was one of the best experience in my whole career in the theatre.‘अजब न्याय..’च्या पहिल्या प्रयोगाचा पडदा पडला आणि मी अक्षरश: ढसाढसा रडले. तेव्हा गोडसे मला म्हणाले, ‘देवीजी, तुम्ही अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नका. तुम्ही रडताय याचा अर्थ तुम्ही एक अत्यंत जादूई अनुभव घेतला आहात. मीसुद्धा प्रयोग पाहताना ही जादू अनुभवली. तुम्हा तिघांची मनं- तुमचं मराठी, फ्रिट्झ बेनेव्हिट्झचं जर्मन आणि भास्करचं (चंदावरकर) म्युझिक- असं काही एकत्रितपणे सुंदर विणलं गेलंय.. आणि त्यात पुन्हा सुहास भालेकर, भक्ती.. असे सगळे धागे इतके छान विणले गेलेयत, की आपण एक अप्रतिम वीणकाम पाहतो आहोत असं मला सतत वाटत होतं. आणि आज मी मुद्दाम एक गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय- ती म्हणजे यापुढे असा काही प्रकल्प हाती घेणार असाल तर मलाही त्यात भाग घ्यायला आवडेल.’
‘अजब न्याय वर्तुळाचा’ बर्लिनमध्ये प्रेक्षकांनी इतकं प्रचंड उचलून धरलं! तिथली नट मंडळीही म्हणाली की, ‘तुमचे भारतीय नट भलतेच उत्स्फूर्त मुक्ताभिनय करतात!’ ती मंडळी स्तानिस्लावस्की वगैरे कोळून प्यायलेली असली तरी असला हा प्रकार त्यांच्यासाठी अनोखाच होता. त्यानंतर आणखीन एक नाटक.. भारतीय पद्धतीचं करण्याचा प्रस्ताव त्यांनी आमच्यासमोर ठेवला. ‘आपल्या मातीतलं असं कुठलं नाटक करता येईल?,’ मी गोडशांना विचारलं. ते म्हणाले, ‘तुम्ही तमाशा वगैरेंच्या भानगडीत पडू नका. आपल्या नागर नटांना तो करायला जड जातो. ते फक्त त्याची नक्कल करतात. त्यापेक्षा तुम्ही एखादं प्राचीन संस्कृत नाटक निवडा.’ पण मी म्हटलं, ‘आपल्याकडे ‘शाकुंतल’ वगैरे डान्स बॅलेच्या धर्तीची नाटकं झालेली आहेत. त्यात exotic  तेच्या पलीकडे काही हाती लागत नाही.’ तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही विशाखादत्तचं ‘मुद्राराक्षस’ करा.’
मी म्हटलं, ‘अहो, मला त्याबद्दल काहीही माहिती नाही. मी केवळ पुस्तकं वाचलीयत.’ गोडसे म्हणाले, ‘तुम्ही बिलकूल काळजी करू नका.’ आणि ते मला पुण्यातील भांडारकर इन्स्टिटय़ूटच्या गो. के. भटांकडे घेऊन गेले. भट संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक. त्यांनी मला संस्कृत नाटकांतील प्रघात वगैरे सांगितले. त्यांची अत्यंत तपशीलवार माहिती दिली. पण ते प्रघात ‘पुस्तकी’ म्हणण्यापेक्षा एका रिसर्चरने सांगितलेले प्रघात होते. परंतु त्या प्रघातांवर खरी वास्तू जी उभी केली, ती गोडशांनी. गो. के. भट मला समजावून सांगत होते आणि मी ऐकत होते. मला त्याचं नीटसं आकलन मात्र होत नव्हतं. गोडसे मला म्हणाले, ‘तुम्ही ते प्रघात फक्त समजून घ्या.’ त्यानंतर त्यांनी मला या प्रघातांकरता केरळमधील कुटियाट्टम् पाहा असा सल्ला दिला. संस्कृत नाटकांतले प्रघात त्यात असतात. मी कुटियाट्टम् पाहण्याचा आग्रह गोडशांचाच. त्याप्रमाणे मी केरळला गेले आणि कुटियाट्टम् पाहिलं. गुरू मणि माधव यांनी मला प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे ते प्रघात स्वत: करून दाखविले. संस्कृत रंगभूमीवरील जादूई क्षण आणि जबरदस्त ताकद मी त्यांच्या त्या सादरीकरणात अनुभवली. आणि तिथं मला माझं ‘मुद्राराक्षस’ सापडलं.
तोवर गोडशांनी नाटय़शास्त्रात म्हटल्याप्रमाणे साऱ्या बारकाव्यांनिशी नेपथ्याची डिझाइन्स तयार केलेली होती. मत्तवारिणी, रंगपीठ, कोरीव खांब आणि छत.. सगळं काही गुप्तकाळानुसार. ‘मुद्राराक्षस’ त्याच सुमारातलं- म्हणजे चौथ्या शतकातलं असावं, म्हणून. त्याकाळी शिंपी नव्हते. त्यामुळे लोकांचे पेहेराव हे फक्त अंगाभोवती लपेटलेले असत. धोतर, अंगवस्त्र, डोक्यावर पगडीसारखा दिसणारा फेटा. स्त्रियांच्या कंचुकीसुद्धा बांधलेल्या. अंगावर भरपूर दागिने.. लहान मुलाच्या उत्साहाने आणि कुतूहलाने गोडशांनी सगळी जय्यत तयारी केली होती.
गोडसे मला म्हणाले, ‘तुमच्या एक लक्षात आलंय का? हे अरभाटी स्टाईलचं नाटक आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्रावर आधारीत. राजकीय आहे. हे जर्मनीत चालणार नाही. (तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे!) ‘युद्धात कुणीच जिंकत नाही. विजेतासुद्धा हरतोच. त्यापेक्षा कपटकारस्थानानं त्याला जिंकावं आणि त्याची मैत्री संपादन करावी-’ हे चाणक्यनीतीचं तत्त्व! ते जर्मनीत पचणं अवघड. आणखीन एक : यामुळे या नाटकात तंतुवाद्यं चालणार नाहीत. तालवाद्यं वापरावी लागतील.’ मी हे भास्करला सांगितलं. तो म्हणाला, ‘बरोबर आहे गोडशांचं. यात तालवाद्यंच वापरायला हवीत.’
गोडशांनी नेपथ्यात इतके बारकावे योजले होते, की मत्तवारिणी वगैरेचं कोरीवकाम अत्यंत तपशिलांसह त्यांनी साकारलं होतं. प्रेक्षागृहातील लोकांना ते बारकावे दिसोत वा न दिसोत; त्यांना त्याच्याशी काही संबंध नाही. प्रेक्षकांना काहीतरी कोरीवकाम केलंय, एवढंच कळे.
जर्मनीतली नट मंडळी तर गोडशांच्या एवढय़ा प्रेमात पडली! तिथले ते सहा- सहा फुटी धिप्पाड नट! त्यांना शेला कुठल्या रंगाचा द्यायचा? त्याची किनार कशी असायला हवी? त्यांनी पेहेराव कसा करावा? हे सगळं ते स्वत: त्यांना शिकवीत. करून दाखवीत. त्यामुळे सारे नट त्यांच्या प्रेमात! They just loved him.
गोडसे विविध विषयांतले एन्सायक्लोपीडिया तर होतेच; त्याचबरोबर माझ्यासाठी ते थोरल्या भावासारखे एक वडीलधारी व्यक्ती होते.. माझ्याकरता एक भक्कम सपोर्ट सिस्टम! तसंच ते निव्वळ नेपथ्यकार वा वेशभूषाकार नव्हते, तर एक चौफेर ‘सेन्शुअस’ व्यक्तिमत्त्व होते.
‘हमिदाबाईची कोठी’च्या वेळची गोष्ट सांगते. अनिल बर्वेचं हे नाटक. तोही एक अवलियाच. त्याला मी विचारलं, ‘या नाटकातला काळ नेमका कुठला?’ तो म्हणाला, ‘१९४०-४४ चा काळ असेल.’ त्यावर गोडसे म्हणाले, ‘याच सुमारास कोठीवरचं संगीत अस्तंगत व्हायला लागलं आणि ते चित्रपटात आलं. तेच मग पुन्हा कोठीवर वाजायला लागलं.’ आणि मला म्हणाले, ‘मला आठ दिवस द्या.’ त्याप्रमाणे आठ दिवसांनी ते आले. त्यांनी एक मोठ्ठा थाळा आणला होता. एक दिंडी आणली होती. कुराणातली काही वचनं फ्रेम करून आणली होती. माहीमच्या दग्र्याच्या आसपास फिरून त्यांनी मुस्लीम संस्कृती, त्यांची रहनसहन, खाणंपिणं वगैरेंबद्दलचे संदर्भ गोळा केले होते. मुस्लीम लोक एकाच थाळ्यात जेवतात. त्यांच्यात उष्टंबिष्टं असं मानत नाहीत. माझा एक अख्खा सीन त्यांनी आणलेल्या या गोष्टींवर उभा राहिला. गोडशांनी त्या काळातली पोट्र्रेट्स आणि सिनेमाची पोस्टर्स पाहिली आणि तेव्हाच्या मुस्लीम कोठी संस्कृतीचा बारकाईनं अभ्यास करून नाटकातला कपडेपट बेतला. मला.. म्हणजे साठीच्या हमिदाबाईसाठी सुती-चीटचा घागरा आणि अध्र्या बाह्य़ाचं पोलकं, अंगभर ओढणी. बिनकिनारीची. माझी शिष्या सईदा हिला गरारा-कुडता. त्यावर किनार लावलेली तलम ओढणी. माझी मुलगी शब्बो पुण्यात राहत असली, साडय़ा नेसत असली तरी त्या टिपिकल मुस्लीम कलर्सच्या- म्हणजे हिरवी वगैरे. गोडशांचं इतकं बारीक निरीक्षण!
एकीकडे हे! आणि दुसरीकडे भास्कर (चंदावरकर)! दृश्य आणि श्राव्य! मी या दोघांचा हात धरून पुढे गेले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. They were my creative force.. ते नसते तर माझं काय झालं असतं, कुणास ठाऊक!
त्यानंतर आलं- ‘बॅरिस्टर’! जयवंत दळवींच्या ‘अंधाराच्या पारंब्या’ कादंबरीवर आधारीत. दळवींबरोबर मी खूप काम केलं. कारण कादंबरीचं नाटकात transformation करायचं होतं. वेगळय़ाच  texture ची ही कादंबरी होती. एका जुनाट वाडय़ात घडणारी ही कथा. १००-१५० वर्षांपूर्वीचा तो वाडा. गोडशांनी स्वत: काढलेली दोन पुरातन पुरुषांची पेंटिंग्ज त्यासाठी घेऊन आले. मला ‘बॅरिस्टर’साठी डोळ्यांसमोर जो नेपथ्याचा आराखडा दिसत होता त्यात बॅरिस्टरांच्या वाडय़ाचा काही भाग आणि समोर भाऊरावांचे घर होते. गोडसे त्यात चार मजबूत शिसवी खांब उभारतो म्हणाले. मी म्हटलं, ‘चार नको.’ ते म्हणाले, ‘ठीकय्. दोन उभारतो.’ त्याचबरोबर त्यांनी एक कर्णा आणला. चकचकीत. दिलीप कोल्हटकरच्या प्रकाशाचा झोत त्यावर पडला की तो उजळून निघे.
गोडशांबरोबर मी केलेलं आणखीन एक नाटक म्हणजे ‘शाकुंतल.’ तेही मूळ संस्कृत असल्यानं त्यातही रंगशीर्ष, रंगपीठ, मत्तवारिणी असं गोडशांचं नेपथ्य.. थेट नाटय़शास्त्राबरहुकूम. छतावर आणि रंगमंचाभोवतीच्या भिंतींवर भित्तिचित्रं रेखाटलेली. त्यांनी केलेली कपडेपटाची रंगसंगतीही अप्रतिमच होती. आश्रमातल्या ऋषिमुनी आणि स्त्रियांची वल्कलं तपकिरी-मातकट. गळ्यात आणि हातांत रुद्राक्षांच्या माळा. कानांत रुद्राक्षाची कुंडलं. शकुंतला, प्रियंवदा आणि अनसूया यांची वस्त्रं भगवी. गळ्यात आणि मनगटांवर शुभ्र फुलांचे गजरे. कानातही फुलं अडकवलेली. मत्तवारिणी आणि रंगपीठ यांच्या कोरीव खांबांवरून झेंडूच्या फुलांची तोरणं लावलेली. या सगळय़ा पाश्र्वभूमीवर मुनीकन्यांच्या हालचाली एखाद्या दृश्यकाव्याप्रमाणे भासत.
मला गोडसेंची भित्तिचित्रं (फ्रेस्कोज) मात्र आवडली नाहीत. अप्रतिम कोरीव नेपथ्यामागे थोडय़ा अंतरावर पंधरा फूट उंचीच्या गुप्तकालीन स्त्री-पुरुषांच्या कॅलेंडर आर्टची आठवण करून देणाऱ्या प्रतिमा. नटांना आणि नेपथ्याला गिळून टाकणाऱ्या. तब्बल १५ फुटी. मला काही त्या पसंत नव्हत्या. पण गोडशांना हे सांगणार कोण? धि गोवा हिंदू असोसिएशनचे रामकृष्ण नायक नाटकाचे निर्माते. पण त्यांचीही गोडसेंना सांगायची छाती झाली नाही. दोन-तीन प्रयोग झाले. लोकांना ते आवडलेही. पण मला काही ते फारसं पटलेलं नव्हतं.
अशात टाटा थिएटरच्या उद्घाटनाला ‘शाकुंतल’चा प्रयोग करायचं ठरलं. टाटा थिएटरमध्ये हे फ्रेस्कोज उभे करणं शक्यच नव्हतं. मी गोडशांना म्हटलं, ‘नाइलाज आहे. फ्रेस्कोजशिवाय आपण हा प्रयोग करून बघूयात का?’ दुसरं काही करणं शक्य नसल्यानं त्यांना परवानगी देण्यावाचून गत्यंतर नव्हतं. आम्ही तसा- फ्रेस्कोजविना प्रयोग सादर केला. प्रयोग चांगलाच रंगला. लोकांच्याही पसंतीस उतरला. मी मात्र चूक केलेल्या मुलीसारखी गोडशांसमोर उभी राहिले. म्हणाले, ‘चांगला झाला ना प्रयोग!’ गोडसे हसले. म्हणाले, ‘तू एक नंबरची लबाड आहेस.’ त्यानंतर ते फ्रेस्कोज वापरणं आम्ही बंद केलं.
महेश एलकुंचवारचं ‘वाडा चिरेबंदी’ करायचं ठरलं तेव्हा सेट गोडसे करणार हे ठरलेलंच. मी महेशचं अकोल्यातला वाडा पाहायला गेले तोवर गोडशांनी नेपथ्य जय्यत तयारही केलं होतं. गोडशांचं बालपण विदर्भातल्या वाडय़ातच गेलेलं. त्यामुळे तशा वास्तूची त्यांना खडान्खडा माहिती होती. पण त्यामुळेच सगळा घोळ झाला होता. त्यांनी खराखुरा वाडा तयार केला होता. मला खरा वाडा नको होता, तर प्रयोगासाठी वाडय़ासारखं नेपथ्य हवं होतं. मी तसं गोडशांना म्हणाले. तेव्हा ते चिडले. खरं म्हणजे त्यांनीच ‘बॅरिस्टर’साठी वाडय़ाची अप्रतिम वास्तू उभी केली होती. ते वाडय़ाचं ‘नेपथ्य’ होतं. पण इथं गडबड झाली होती. विदर्भातल्या वाडय़ावर त्यांचं फार प्रेम असल्यानं त्यांनी मूर्तिमंत वाडाच साकारला होता. नाटकात त्याची गरज नव्हती. नेपथ्यात वाडय़ाचा केवळ ‘फील’ येणं आवश्यक होतं. गोडशांना माझं म्हणणं रुचलं नाही. त्यांनी नेपथ्य करायला नकार दिला. मग रघुवीर तळाशिलकरांनी ‘वाडा’चं नेपथ्य केलं. पहिल्या प्रयोगाला गोडसे आले. माझ्या पाठीवर हलकेच थोपटून म्हणाले, ‘प्रयोग उत्तम, पण नेपथ्य मात्र चुकीचं.’
‘वाडा’नंतर गोडशांनी माझ्यासाठी नेपथ्य केलं नाही. पण त्यामुळे आमच्या संबंधांत मात्र कुठलाही दुरावा आला नाही. पुढं ‘नागमंडल’चं नेपथ्य त्यांनी करावं असं आमचं बोलणं चाललेलं असतानाच अचानक गोडसे गेले. एक प्रदीर्घ एकत्रित प्रवास संपला.
गोडसे माझ्यासाठी काय होते, हे मला नेमक्या शब्दांत नाही सांगता येणार. त्यांना मी काहीही.. अगदी काहीही विचारलं तरी त्यांच्याकडे त्याची उत्तरं असायची. कामासंबंधीही आणि व्यक्तिगत जीवनातल्या प्रश्नांसंबंधीचीही. इंग्रजीत एक शब्द आहे-  confidantel .. त्याला एक व्यापक, गहिरा अर्थ आहे. केवळ ‘अत्यंत विश्वासू व्यक्ती’ एवढय़ापुरताच तो सीमित नाही. माझ्यासाठी गोडसे ते होते.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
Ratnagiri Municipal Council Administration Radiographs Statues in the City
मालवण दुर्घटने नंतर धास्तावलेल्या रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून पुतळ्यांची रेडिओग्राफी
Story img Loader