प्रशासनावरची हुकुमत आणि तरीही वागण्या-चालण्यात मोकळेपणा हे विलासरावांचं वैशिष्ट्य. सहिष्णुता, उदारमतवाद वगैरे शब्द फेकावे लागत नसत त्या वेळी. सत्ताधारी खरोखर तसेच वागत. हा माझा एकट्याचा अनुभव नाही. त्या काळात बातमीदारी करणाऱ्या सगळ्यांशीच विलासरावांचं वागणं असंच असायचं. आश्चर्य वाटावा असा मोकळा-ढाकळा स्वभाव, मधे मधे माफक शेरोशायरी, रगेल आणि रंगेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या आर्थिक विवंचना कधी मिटतील, असा प्रश्न पडलाय तुम्हाला? तुमच्या उजव्या बाजूला जे बसले आहेत ना त्यांनी बातम्या देणं बंद केलं की महाराष्ट्राच्या आर्थिक समस्या संपल्या म्हणून समजा…’’ हे वाक्य आणि नंतर स्वत:च स्वत:च्या विनोदावर शरीर घुसळवत हसणं…

हे विलासराव देशमुख यांचं वैशिष्ट्य. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.

झालं होतं असं की, माझी अर्थविषयक दैनिकातली बातमीदारी आणि महाराष्ट्र सरकारवर आर्थिक संकट यायला एकच गाठ पडली. आताचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील अर्थमंत्री होते तेव्हा. जयंतराव सारखे वैतागलेले असायचे. त्यावेळी एकदा तर त्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली होती शरद पवार यांच्याकडे- मी महाराष्ट्रविरोधी आहे म्हणून. इतकं ते संकट गहिरं होतं. आर्थिक परिस्थिती गंभीर आणि त्यात ही बातमीदारी. राज्याची अवस्था इतकी बिकट होती की सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून सरकारला उचल घ्यावी लागत होती. एका प्रकरणात तर देणं चुकलं म्हणून ‘आयडीबीआय’नं मुख्य सचिवांच्या कार्यालयाला सील ठोकलं. या सगळ्याच्या दणकून बातम्या द्यायची संधी होती त्यावेळी. मी तिचा पुरेपूर फायदा उठवत होतो. बँका, केंद्र सरकारी कार्यालयं वगैरेत चांगले सोर्स होते, त्यामुळे बातम्या मुबलक मिळायच्या. रोज मंत्रालयात जायचो त्यावेळी.

… तर या बातम्यांमुळे अर्थविषयक इंग्रजी वृत्त वाहिन्यांवरही मंत्रालयात बातमीदारीसाठी यायची वेळ आली. त्या वाहिन्यांतले काही संपादक चांगले दोस्त होते. ते बॅकग्राऊंड घ्यायचे आणि बातमीसाठी मंत्रालयात अर्थमंत्री, मुख्यमंत्री अशांची पत्रकार परिषद असली तर यायचे त्यावेळी. अशाच एका पत्रकार परिषदेला तुडुंब गर्दी झालेली. तेव्हा दर बुधवारी मंत्रिमंडळ बैठक आणि बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद असा रिवाज होता. पत्रकार परिषदा गांभीर्याने सत्ताधारी घेत तो हा काळ…! पत्रकारही आडवेतिडवे काहीही प्रश्न विचारत. अशाच एका पत्रकार परिषदेत एका अर्थविषयक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं मुख्यमंत्री विलासरावांना हा प्रश्न विचारला, ‘‘राज्याची अर्थावस्था सुधारणार कधी?’’ त्याआधी राज्याच्या परिस्थितीवर चांगलीच गरमागरमी झालेली. त्यात हा प्रश्न. वातावरणात एक अदृश्य तणाव. तो विलासरावांनी इतक्या सहजपणे फोडला! हा प्रश्न विचारणाऱ्याच्या बाजूला मी बसलो होतो. विलासरावांच्या म्हणण्याचा अर्थ सरळ होता… मी बातम्या देणं बंद केलं की समस्या संपली! त्यानंतर त्यांचं ते विख्यात हसणं…

प्रशासनावरची हुकुमत आणि तरीही वागण्या- चालण्यात मोकळेपणा हे विलासरावांचं वैशिष्ट्य. सहिष्णुता, उदारमतवाद वगैरे शब्द फेकावे लागत नसत त्यावेळी. सत्ताधारी खरोखर तसेच वागत. हा माझा एकट्याचा अनुभव नाही. त्या काळात बातमीदारी करणाऱ्या सगळ्यांशीच विलासरावांचं वागणं असंच असायचं. आश्चर्य वाटावा असा मोकळा-ढाकळा स्वभाव, मधे मधेे माफक शेरोशायरी, रगेल आणि रंगेल. विचार करून बोलायची वेळ आली तर विचार करताना खालचा ओठ चावायची सवय. आणि कधीही पाहा… आताच अंघोळ करून आल्यासारखे वाटावेत असं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. त्यावेळी प्रमोद महाजन आणि विलासराव दोन असे राजकारणी होते की स्वत:चा मोबाइल ते स्वत: घेत. फोन घेतल्या घेतल्या महाजनांचा पहिला शब्द- ‘‘बोल.’’ याच्या उलट विलासराव मीटिंगबीटिंगमध्ये असले तर फक्त ‘‘हू’’ आणि नसले तर ‘‘बोला.’’ ते काँग्रेसमधल्या जुन्या पिढीचे. खानदानी. स्वत:लाही आदरार्थी संबोधत. ‘‘आम्ही तिकडे गेलो होतो.’’ असं मराठी. त्यावेळी सबकुछ पांढरे कपडे घालणाऱ्यांची पिढीच होती. शिवराज पाटील चाकुरकर, सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव. सँडलही पांढरे. छानच दिसायचे. नायक सहज झाले असते मराठी चित्रपटात, राजकारणात आले नसते तर.

…पण नसतेही झाले. कारण त्यांचा स्वभाव, आदब लक्षात घेता नायिकेच्या मागे किंवा भोवती फिरणं त्यांना झेपलं नसतं. नायिका आपल्यामागे किंवा आपल्याभोवती असणं त्यांना जास्त आवडलं असतं. होत्याही तशा. असो. पण विलासरावांकडून स्वत:चा आब कधी सुटला नाही. एक अनुभव भारी आहे. एकदा त्यांच्याबरोबर दौऱ्यात होतो. हेलिकॉप्टरमधून. सकाळी जाऊन संध्याकाळी परतायचं होतं. हेलिकॉप्टरमध्ये चार जागा होत्या. समोरासमोर. मी त्यांच्या शेजारी बसलो. त्यांच्या समोर एक बॉडीगार्ड आणि त्याच्या शेजारी एक बडा उद्याोगपती. हे असणार आहेत ते मला माहीत नव्हतं आणि मी असणार आहे हे त्यांना माहीत नव्हतं, म्हणून एक अवघडलेपण. हेलिकॉप्टरमध्ये हेडफोन लावून बसावं लागतं. आवाज फार. त्या हेडफोनला असणाऱ्या माईकमधून बोलायचं. तरीही बाहेरचा आवाज त्रास देतोच. तर या उद्याोगपतीला काही महत्त्वाचं बोलायचं होतं. तो सांगायचा प्रयत्न करत होता. तो समोर बसलेला, पण नीट काही ते विलासरावांच्या कानावर जात नव्हतं. त्यामुळे तो उद्याोगपती पुढे वाकवाकून विलासरावांना जे सांगायचं ते सांगत होता. तासाभराच्या प्रवासात कानात काही सांगण्यासाठी विलासराव त्याच्यापुढे वाकलेत असं एकदाही घडलं नाही. सगळं वाकणं झुकणं तो उद्याोगपती करत होता. हे अगदी लक्षात येत होतं. येताना तो उद्याोगपती आमच्या बरोबर नव्हता. मी विलासरावांना त्याबाबत विचारलं. त्यांचं उत्तर मार्मिक होतं- ‘‘हे बघा, ते जे काही सांगत होते ते आमच्यासाठी नव्हतं, ते होतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी. या आठ कोटींचं प्रतिनिधित्व करणाऱ्यानं एका उद्याोगपतीपुढे वाकणं बरं नाही.’’ आता कोणी बडी असामी दिसली आणि त्यांच्यापुढे लव-लव करणारे मंत्री- संत्री पाहिले की विलासराव आठवतात.

स्वभावातला मिस्कीलपणा कधी लोभस तर कधी कुजका वाटेल असा. एकदा त्यांनी मुख्यमंत्री नसताना घरी बोलावलं होतं गप्पा मारायला. वरळीचा त्यांचा फ्लॅट अत्यंत कलात्मक असा. आत जाऊन बसलो तरी बराच वेळ ते येईनात असं कधी व्हायचं नाही. मग आले. म्हणाले, ‘‘सॉरी हां… अहो मिस्टर प्रेसिडेंट आलेत काम घेऊन, म्हणून निघता येईना.’’ मला काही उमगलं नाही. मग चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून स्वत:च उत्तर देते झाले… ‘‘प्रतिभा पाटील यांचे मिस्टर होते. त्या प्रेसिडेंट, हे मिस्टर प्रेसिडेंट.’’ आणि मग ते हॉ हॉ असं स्वत:च हसणं. त्यांच्या काळात माहिती अधिकार कायदा झाला. त्याच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना आणि त्यांच्याद्वारे नागरिकांना उद्देशून विलासराव म्हणाले, ‘‘घ्या… घ्या माहितीच माहिती!’’ हे म्हणताना त्यांची बॉडीलँग्वेज सांगत होती- या माहिती अधिकारामुळे तुमच्या हाती काहीही लागणार नाही. या कायद्याची आजची अवस्था पाहिली की जाणवतं, विलासरावांना द्रष्टाच म्हणायला हवं ते.

त्यांच्याकडून- खरं म्हणजे जुन्या, खानदानी काँग्रेसजनांकडूनच- एक गुण घेण्यासारखा खचितच. या विश्वाची, देशाची, भावी पिढीची, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आपल्याच डोक्यावर असल्यासारखे ते कधी वागत नाहीत. साहित्य, संगीत, चित्र अशा सगळ्याचा आनंद चवीचवीनं घेतात ही माणसं. एकदा तर विलासरावांनी मुख्यमंत्री असताना पं. जसराज यांची एक बैठक ठेवली होती ‘वर्षा’च्या हिरवळीवर. मोजके पन्नास-एक जण. स्वागताला विलासराव आणि डोक्यावरचा पदर कधीही न ढळलेल्या वैशालीताई. जसराजजींची बैठक रंगली नाही, असं कधी होत नाही. त्या दिवशीचीही रंगलीच. पण कहर केला तो ‘चंद्रघंटा चंद्रास्तव धारिणी…’ या दुर्गा-पार्वती भजनानं. जसराजजींनी त्याची पट्टी आणि लय असं काही वाढवत नेलं की उपस्थितांचा श्वास अक्षरश: कोंडला. आता पुरे… थांबा असं जसराजजींना म्हणावं असं वाटू लागलं. मुळात ते भजन आहेच सुंदर. त्यात वेळेची मर्यादा नाही आणि समोर उत्साही जन. जसराजजी थांबायलाच तयार नाहीत आणि जेव्हा तिहाई घेऊन थांबले तेव्हा विलासरावांनी आपण मुख्यमंत्री आहोत हे विसरून कडकडून मिठी मारली जसराजजींना. ती बैठक इतकी कमालीची रंगली की तिथं असलेल्या प्रत्येकाला विलासरावांनी जे केलं तेच करावंसं वाटत होतं. मग जसराजजींनी या भजनाचा अर्थ समजावून सांगितला. दुर्गा, नवरात्र वगैरे… विलासराव मन लावून ऐकत होते. आपला पक्ष सेक्युलर, मग या भजनाचं काय करायचं वगैरे प्रश्न पडला नाही त्यांना. ते वातावरणच वेगळं होतं. धर्म, संस्कृती, जात सगळं आपापल्या ठिकाणी होतं.

विलासराव गप्पांत काँग्रेसमध्ये अंतर्गत संतुलनाची कशी एक यंत्रणा आहे ते छान समजावून सांगायचे. ‘‘इसापनीतीतल्या आपल्या बकऱ्यांचं वजन वाढू नये म्हणून काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यासारखे आमचे श्रेष्ठी वागतात. तो शेतकरी आपल्या शेळ्यामेंढ्यांना दिवसा भरपूर खायला घालायचा… पण रात्र झाली की समोर वाघाचं खरं वाटेल असं चित्रं त्यांच्यासमोर टांगायचा. तसं असतं आमचं.’’ मग पुन्हा ते खळाळून हसणं. त्यांचं खरं होतं. काँग्रेस पक्षसंघटनेत विलासराव मुख्यमंत्री असताना मार्गारेट अल्वा यांच्याकडे ही जबाबदारी होती. विलासरावांचे पाय खेचत राहायचं. विलासरावांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर श्रेष्ठींनी निरीक्षक नेमलेलं. त्यांनी एस. एम. कृष्णा यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपदासाठी धरमसिंग अशा नवख्याच्याच पारड्यात आपलं वजन टाकलं. मग काँग्रेसश्रेष्ठींनी विलासराव मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कृष्णा यांना बसवलं. ‘‘संतुलन… ते महत्त्वाचं,’’ अशी खास ओठ मुडपत त्यांची यावर शेलकी प्रतिक्रिया.

विलासरावांचं हे संतुलन एक-दोनदा चुकलं. पहिल्यांदा खाजगीत. नंतर जाहीरपणे. मुंबईत २००५ साली २६ जुलैच्या प्रलयकाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विलासरावच होते. सगळेच मुंबईत अडकून पडलेले. आम्हा काही जणांना ‘वर्षा’वरनं फोन आला… येताय का? दक्षिण मुंबईतनं ‘वर्षा’ गाठणं काही अवघड नव्हतं. आम्ही चार-पाच जण गेलो गप्पा मारायला. विलासरावांना म्हटलं, ‘‘तुम्ही नाही बाहेर पडत मुंबईतली परिस्थिती पाहायला?’’ त्यांचं उत्तर तर्कदृष्ट्या योग्य होतं. ‘‘मी जाऊन काय करू? उलट अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वगैरे आले की मदत करणाऱ्या यंत्रणांना मदत करायची की या व्हीआयपींना सांभाळायचं, असा प्रश्न पडतो.’’ हे त्याचं उत्तर. पण राजकीयदृष्ट्या ते तितकं योग्य नव्हतं. त्यांना म्हटलं, ‘‘मुख्यमंत्री रस्त्यावर उतरलाय… पँट चिखलानं बरबटलीये… शर्ट भिजलाय वगैरे पाहायला लोकांना बरं वाटतं.’’ पण विलासरावांना हा असला दिखाऊपणा मान्य नव्हता. ते गेले नाहीत. आपल्याकडच्या देखाव्यांच्या राजकारणात हे जरा चुकलंच. दुसरा त्यांचा प्रमाद जगजाहीर आहे. मुंबईतला २००८ सालच्या नोव्हेंबरातला ताज, ट्रायडंटवरचा दहशतवादी हल्ला आणि नंतर चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांच्या समवेत रितेश देशमुखनं त्या स्थळांना भेट देणं. ही भेट चांगलीच वादग्रस्त ठरली. पुढे त्यांना त्यातूनच पायउतार व्हावं लागलं.

नंतर ते केंद्रात मंत्री झाले. पण दिल्लीत त्यांचा जीव नव्हता. महाराष्ट्रीय नेत्यांना राष्ट्रीयपण सहसा भावत नाही. विलासराव त्यातलेच. पण ते याबद्दल कटू बोललेत असं कधी झालं नाही. दिल्लीच्या गमतीजमती ऐकायला मजा यायची त्यांच्याकडून. पण अजूनही ते प्राधान्यानं लक्षात राहतात ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणूनच.

एकदा झालं असं की, महाराष्ट्र सरकारविषयी अत्यंत नकारात्मक म्हणता येईल अशी बातमी मी दिलेली. त्यादिवशीची ती लीड होती. मुख्य मथळा. बातमीदाराची छाती ५६ इंची होत असते असं झालं की. ती बातमी छापून आली आणि सकाळपासून अनेकांचे फोनवर फोन. दुपारी मंत्रालयात गेलो. आत शिरतोय तर समोरच्या लिफ्टमधून मुख्यमंत्री बाहेर येत होते. मला जरा कानकोंडं वाटलं… आता कसं काय जायचं यांच्या समोर? काय म्हणतील… किती चिडतील वगैरे प्रश्न. त्याची उत्तरं विलासरावांनीच दिली. म्हणजे ते प्रश्न पडूच दिले नाहीत. मला पाहिलं आणि अंगठा आणि पहिलं बोट जोडून ‘छान’ची अशी खूण केली… जवळ आले म्हणाले, ‘‘झकास बातमी.’’ मलाच ओशाळं झालं. काय बोलायचं कळेना. काही तरी थातूर-मातूर बोलायचा प्रयत्न करणार तर विलासरावच आपल्या त्या टिपिकल झुलत्या शैलीत म्हणाले, ‘‘अहो तुमचं कामच आहे ते, तुम्ही केलंत… आता आमची जबाबदारी!’’ आणि बाहेर ताटकळत असलेल्या गाडीकडे हसत हसत निघाले.

उमदेपणाही त्यांच्या बरोबर गेला की काय… असा प्रश्न पडतो आता.

आब आणि आदब कधी सुटली नाही विलासरावांची. हे दोन असेल तर मागोमाग आदर आपोआप येतो. तो मागावा वा जबरदस्तीनं घ्यावा लागत नाही.

girish.kuber@expressindia.com