विलासरावांचे वर्तन सध्याच्या राजकारण्यांना मार्गदर्शक

या लेखात विलासराव देशमुख यांचे विविध पैलू, गुणविशेष लेखकाने सांगितले आहेत. लेखकाने विलासरावांची राजकारणातील सभ्यता, आकलन शक्ती, लोभस स्वभाव, अप्रतिम वक्तृत्व तसेच संगीत, नाट्य, कला, साहित्य आदी कलांचा आस्वाद रसिकतेने घेणारे व्यक्तिमत्त्व छानपणे उलगडले आहे. ३५ ते ४० वर्षे राजकारणात सत्तेच्या अनेक पदांवर विराजमान झालेला हा नेता… लेखकाने दिलखुलासपणे त्यांचे विविध पैलू वाचकांसमोर आणले आहेत. हा लेख म्हणजे व्यक्तिचित्रणाचा एक वेगळा वस्तुपाठच जणू. वाचन संस्कृतीवर शंका व्यक्त होत असतानाच्या काळात हा लेख वाचून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्यामुळे वाचक किती रसिकतेने, तन्मयतेने वाचत असतात याचा प्रत्यय आला. या लेखातील अनेक बारकावे, संदेश राजकीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावेत असे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका उद्याोगपतीबरोबर हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना लेखकाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्या प्रसंगातील प्रश्नांवरील प्रतिक्रियांची नोंद महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेने व असंख्य वाचकांनी आत्मियतेने घेतली. पदाची शान व प्रतिष्ठा कशी सांभाळावी याचा आदर्श विलासरावांच्या रूपाने महाराष्ट्राच्या लक्षात आला. कुठलाही विषय समजून घेण्याची त्यांची आकलनशक्ती या लेखातून प्रकर्षाने जाणवते. खेड्यातील शेतकऱ्यांवर प्रेम करणारा, ग्रामीण माणसाचे प्रश्न मुळातून समजून घेणारा, सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पदापर्यंत स्वकर्तृत्वाने पोहचलेला असा हा नेता. एखादी समस्या खेड्यांची असो, शेतमजुरांची असो, शेतकऱ्यांची असो, पाण्याची असो किंवा मुंबईतील मजुरांची, कर्मचारी, झोपडपट्टीवासीयांची- त्याची उकल तितक्याच तन्मयतेने करणारा, त्याचा अभ्यास, चिंतन याच्या जोरावर खंबीरपणे त्यावर त्वरित निर्णय घेणारा नेता असे त्यांचे सुंदर चित्रण या लेखात आले आहे. या लेखात वैशाली वहिनी यांच्या साधेपणा व नम्रपणाचा उल्लेख छानपणे आला आहे. टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा उपमर्द न करता संयमाने उत्तर देण्याचे व निवडक शब्दांत गर्भित परंतु कौशल्यपूर्ण सूचक इशारा देण्याचे कसब विलासरावांकडे होते.

एकदा पंडित जसरासजी यांच्या मैफलीचा कार्यक्रम वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अनेक नामवंत मंडळी तिथे होती. लेखक व मीही तिथे होतो. मैफल अत्यंत उत्तम झाली याबद्दल काही वादच नाही. सर्व जण मैफल ऐकत होते. जसराजजींच्या स्वरातील भावांचे सुंदर वर्णन लेखकाने या लेखात केले आहे. जसराजजींच्या गायनाने साक्षात पंढरीचा पांडुरंगच आमच्या डोळ्यासमोर उभा होता असे जाणवले. जणू काही पंडित जसरासजी पांडुरंगापर्यंत पोहचले आणि पांडुरंग या तिथपर्यंत धावत आला आहे. त्यांच्या मैफलीतील भजनाचा आनंद देवालाही झालेला असेल असेच त्यावेळी वाटले. मैफल संपली. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विलासरावांनी मला आभार मानायला सांगितले व मी आभार मानायला उभा राहिलो. त्यावेळी आभार मानताना मी एक किस्सा सांगितला, तो असा- १० ते ११ वर्षांपूवी पंडित जसरासजी यांची पुण्यात गणेश कला क्रीडा येथे संगीत मैफल होती. तिथे एका केवीलवाण्या मुलीला घेऊन तिचे मध्यमवयीन मामा आले होते. त्यांच्याकडे कार्यक्रमाचा पासही नव्हता त्यामुळे त्यांना कोणी आतही सोडत नव्हते. त्यावेळी मी तिथे होतो. मी त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही नांदेडवरून एस.टी.ने आलो आहोत. पंडित जसरासजींना भेटून केवळ त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मी त्यांना पंडित जसराज यांच्याकडे घेऊन गेलो. त्यावेळी त्या मुलीने त्यांना आपल्याला गायनाची आवड असल्याचे सांगितले. पंडितजींनी तिला तिचे नाव व गाता येते का, असे विचारले. पंडितजींनी स्वर लावला व ती मुलगी गायला लागली. पंडित जसरासजींना तिचे गाणे आवडले. ते त्या मुलीला म्हणाले, ‘‘गाणे शिकण्यासाठी तू माझ्याकडे माझ्या मुलीबरोबर राहशील का?’’ तेव्हा तिचे मामा म्हणाले, ‘‘आम्ही गावी जातो व मुलीचे आई-वडील व आजी-आजोबांना विचारून सांगतो.’’ नंतर ती मुलगी पंडित जसराजची यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन निघून गेली. पुढे ती मुलगी पंडित जसराजजी यांच्याकडे गेली की नाही हे मला माहीत नव्हते. तिथे हा प्रसंग सांगितल्यानंतर पंडित जसराज म्हणाले की, या मैफलीत तंबोरा वाजवते ती तीच मुलगी असून आता ती अंकिता जोशी या नावाने मोठी प्रख्यात गायिका झाली आहे.

या लेखात लेखकाने विलासरावांच्या अनेक बाजू सांगितल्या आहेत. कवी नामदेवराव ढसाळ यांचे विलासरावांशी चांगले संबंध होते. दोन वेळा त्यांना मी विलासरावांबरोबर हॉस्पिटलमध्येही भेटायला गेलो होतो. विलासरावांनी मदत केलेल्या कोणत्याही गोष्टीची बातमी त्यांनी कधीही केली नाही. ते सर्वांना समान वागणूक देत. या लेखातील घटना वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. सध्याच्या राजकारणामध्ये घडत असलेल्या पक्षापक्षांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर या लेखातून सर्वांना मार्गदर्शन मिळेल अशी आशा. -उल्हास पवार

प्रभावी शासक आणि रसिक

विलासराव उद्याोगमंत्री असताना मुंबईतील मुद्रण लघुउद्याोग व्यवसायातील यंत्रसामुग्रीच्या आयातीची मर्यादा २५ लाख रुपये इतकी होती. तेव्हा मुद्रण धंद्यात कलर स्कॅनर ही गरजेची बाब झाली होती. गणकयंत्रासारखे हे यंत्र असते. तेव्हा त्याची किंमत जवळजवळ ४० लाख रुपये होती. त्यामुळे या व्यवसायातील उद्याोजकांना हे यंत्र मुंबईत बसवणे शक्य नव्हते. त्यांची लघुउद्याोगाची कमाल गुंतवणुकीची मर्यादा त्यामुळे पार होत होती आणि जर ती पार झाली तर यंत्रावरची कस्टम ड्युटी अवाच्या सवा वाढत होती. एका संध्याकाळी विलासरावांशी बोलताना हा विषय सहज त्यांच्या कानावर घातला. मुद्रण व्यवसायातील माझे सहकारी शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटू इच्छित होते. मात्र तसे करण्याची काही गरज नाही असे सांगत आपल्याला विषय समजल्याचे ते म्हणाले. तीन दिवसांनी मंगळवारी मुंबईतील लघुउद्याोगातील भांडवलाची मर्यादा ५० लाखांवर नेण्याचे राजपत्र मंत्रालयातून निघाले. मुद्रण व्यवसायातील आमच्या सहकाऱ्यांनी फक्त तोंडात बोटे घालणेच शिल्लक ठेवले होते.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यजनक पराभव हा त्यांच्या कारकीर्दीतील एक दु:खद टप्पा. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी माझे वडील आणि मी त्यांना भेटायला रामटेकवर गेलो. निवडणुकीतील पराभवामुळे विलासराव अजिबात खचलेले दिसत नव्हते; उलट त्यांनी आपल्या पराभवाचा पूर्ण अभ्यास केला होता आणि ते पुढच्या कामाला लागले होते. पराभवानंतर मिळालेल्या साडेचार वर्षांचा पुरेपूर उपयोग करून विलासरावांनी फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेतली. या काळात त्यांनी मांजरा साखर कारखाना आणि सूतगिरणी यांची पुनर्बांधणी केली. त्यांचे मोठे चिरंजीव अमित देशमुख यांनी या काळात मेहनत करून त्यांच्या साखर कारखान्याला देशातील पहिल्या क्रमांकाचा कारखाना म्हणून पुरस्कार मिळवला.

याच काळात ‘ग्रंथाली’च्या एका कार्यक्रमात विलासराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी निवडणुकीत झालेल्या विलासरावांच्या पराभवामुळे सूत्रसंचालन करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने खोडसाळपणाने ‘महाराष्ट्राचे माजी- भावी मुख्यमंत्री’ असा त्यांचा उपहासात्मक उल्लेख केला. त्या वेळी विलासरावांच्या डोळ्यांत आग दिसत असली तरी बाकी देहबोली शांत होती. भाषणाला उभे राहिल्यावर त्यांनी आपल्या झालेल्या अपमानाचा उल्लेख करत ‘‘नजीकच्या भविष्यात मी महाराष्ट्राचा एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री होऊन दाखवेन,’’ असे आव्हान दिले. नंतर त्यांनी शांतपणे पुढचे भाषण केले. त्यानंतर खरोखरच ते एकदा नव्हे, तर दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुढच्या निवडणुकीत लातूरच्या मतदारांनी आपली चूक मतदान पत्रिकेद्वारे सुधारली आणि विलासरावांना भरघोस मतांनी निवडून दिले. ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ आणि नोव्हेंबर २००४ ते डिसेंबर २००८ असे दोनदा म्हणजे एकूण ८८ महिने त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळले.

१९९७ मधील काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक अटीतटीची होती. शरद पवार ही निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात केंद्र सरकारच्या गोटातून सीताराम केसरी उभे होते. या विषयात काही बोलण्यासाठी मी विलासरावांच्या ‘पूर्णा’ या निवासस्थानी गेलो होतो. विषयाला सुरुवात करताच विलासराव उखडले आणि म्हणाले, ‘‘पवार मला गढीवरचे म्हणतात ना? आहोत आम्ही गढीवरचे! मी आताच समोर वैतरणामध्ये सुधाकररावांकडे जातो. त्यांना (पवारांना) सांगा, आम्ही त्यांना ५ हजार मतांनी पाडणार आहोत.’’ आणि झालेही तसेच. केंद्राच्या पाठिंब्यामुळे केसरी ५३४२ हजार मतांनी जिंकून आले.

शरद पवार विलासरावांचा उल्लेख गमतीने ‘गढीवर’चे असा करत असत. त्यांच्या गढीला सहा बुरूज होते. गढीवरील बुरुजांच्या संख्येवरून देशमुखीच्या ऐश्वर्याचे मोजमाप होते. गढीवरून आठवले, देशमुखांच्या गढीवर घोड्यांच्या पागा होत्या. त्यात घोडी होती. तिचा उल्लेख करताना विलासराव म्हणाले, ‘‘देशातील सर्वात मोठी भटक्या-विमुक्तांची जत्रा माळेगावला भरते. गढीवरून घोड्यावर बसून देशमुख आल्याशिवाय जत्रेला सुरुवात होत नाही म्हणून आम्हाला घोडा बाळगणे परंपरेनुसार सक्तीचे आहे. आता मी घोडा बाळगला म्हणून आमच्या भागातील इतर नेतेसुद्धा घोडा बाळगू लागले आहेत. त्यांच्या घोड्यांची नावे काय तर माधुरी, काजोल अशी फिल्मी. त्यांना कोण सांगणार एक घोडा बाळगणे म्हणजे मर्सिडीज ठेवण्यापेक्षा महाग पडते. खरारा करायला एक, रपेटीला एक, अंघोळ घालायला एक अशी तीन माणसे घोड्याच्या देखभालीसाठी लागतात. पण विलासरावांकडे आहे ना घोडा मग आपल्याकडेही पाहिजे, अशी अवास्तव ईर्षा हे नेते करतात. त्याचे मला आश्चर्य आणि कीव वाटते.’’

विलासराव केंद्रीय मंत्री झाल्यावरची गोष्ट. काही कामानिमित्त दिल्लीत गेलो असता त्यांची भेट घेतली. त्या वेळी एका टेम्पो चालकाचा त्यांना मोबाइलवर कॉल आला. त्याला काहीजण विनाकारण त्रास देत होते, त्यासाठी तो पोलीस ठाण्यात दाद मागायला गेला होता. तिथे दाद लागेना म्हणून त्याने विलासरावांना फोन लावला. विलासरावांनी पोलिसांना तडक फोन करून त्याची दखल घेतली. विलासरावांनी स्वत:हून तळागाळातल्या लोकांना मनापासून मदत केल्याच्या अशा अनेक कथा आहेत.

विलासरावांची ३५-४० वर्षे लाभलेली मैत्री मला स्नेहानंद देऊन गेली. मी त्यांच्याकडे स्वत:साठी कधी काही मागितले नाही, अगदी १० टक्के कोट्यातील फ्लॅटसुद्धा. त्यामुळे या मैत्रीची निखळता आम्हाला जपता आली. असा मित्र अकाली जाणे यासारखे दु:ख नाही. पण आता आठवणी जपणे, एवढेच आपल्या हाती आहे. -जयराज साळगावकर