समीर गायकवाड
गावाकडे एक बरं असतं.. माणसांच्या चेहऱ्याला कल्हई केलेली नसते. माणसं जशी असतात तशीच राहतात आणि तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसं घरी सुखरूप परततील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव असते ते केव्हढे? शे-दोनशे ते पाचशे उंबरा इतकीच काय ती त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल, तर वेशीबाहेरचं आणि वेशीच्या आतलं जग. शहरी आणि खेडूत यांच्यात फारसा फरक नसतो. दोघेही हाडामांसाचेच असतात. पण गावाकडची माणसं मातीचीही असतात. त्यांची नाळ मातीशी घट्ट जुळलेली असते. डोईला रंगीत फेटे बांधून इथे-तिथे बसलेली म्हातारी माणसं हे यांचे खरे हाकारे असतात. गावातला सर्वात ज्येष्ठ म्हातारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या बुंध्याला. झालंच तर गावातली टाळकरी, भजनी मंडळीही सर्वाच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव आणि बामण. त्यांच्यावर यांची अपार श्रद्धा. अबीर, गुलाल, बुक्का हेच यांचे ब्रह्मा-विष्णू-महेश. चुरमुरे, लाह्य, बत्तासे हा इथला महाप्रसाद. आजघडीलाही टीव्ही, फ्रीज नसणारी घरं गावात सापडतील, पण गुलाल- बुक्का नसणारं घर गावात सापडत नाही. आषाढीला उपवास, नवरात्रात व्रतवैकल्ये, कुलदैवत आणि कुलाचार हा यांचा श्रद्धेचा विषय. याशिवाय गावातली दरसालची जत्रा आणि जत्रेत यांना येणारं उफाण हेदेखील अनुभवण्यासारखंच.
याचा अर्थ गावातली सर्व माणसं साधीच असतात असं नाही. काही इब्लिस, पक्की, कपटी, बेरकी अशीही असतात. बांधाच्या कोरभर तुकडय़ासाठी नरडीचा घोट घेण्यापर्यंत इथला माणूस घसरतो तेव्हा सारा गाव हळहळतो. आयुष्याच्या पारंब्या तुटण्याइतकं नातं ताणू नये हे इथल्या मुळामुळातलं तत्त्वज्ञान. ‘आई-बहिणीला कडंला जाईपर्यंत बघावं आणि भावकीला थुकावं’ असे भावही इथल्या रक्तात भिनलेले असतात. आपली सुखदु:खं आणि स्वप्नं काळीजकपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसं! कुणी धोतर, तर कुणी पायजमा घालून असतो. आजकाल कुणी जीन्सवाला तरणाही इथे हटकून दिसतो. डोक्यावरून नऊवारीचा पदर घेऊन वेस चुकवत, कुजबुजत लगबगीने जाणाऱ्या बायका पाहताना रंगीबेरंगी ठिपके थव्याने चालल्यासारखे वाटतात. भेगा पडलेल्या पायात फाटक्या काळपट वहाणा घालून अंगावर फुफाटा उडवत जाणाऱ्या रस्त्यावरून निवांत जाणारी ही मंडळी. सावलीच्या ज्ञानाची यांना उत्तम जाण. ‘पर्यावरण.. पर्यावरण’ म्हणून आपल्यासारखं छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपांतच देव शोधतात आणि पानाफुलांत रमतात.
इथल्या धुळकटलेल्या रस्त्यांच्या कडेनं घराघरांतून वाहणारं मोरीचं पाणी उघडय़ा गटाराला मिळतं.. जिथं माश्या आणि डास-चिलटांचं स्वतंत्र विश्व असतं. गावाला फेरी घालत हे गटार गावातल्या ओढय़ापाशी जातं. दरसाली ओढय़ाला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळं रूपडं मिळतं. ओढय़ाजवळच्या हिरव्याजर्द पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म- असे लहानपणापासून ऐकलेलं. त्यामुळे त्या पानवेलींची पाने कोणी तोडत नाही. या समजाला दृढ करणारं कारणही तसंच असतं. बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी वेगळी जागा नसते. ओढा आपल्या पोटात गावातली घाण आणि पावसाचे दान घेऊन विझलेल्या चितेतली राख, अस्थी गावच्या मातीतल्या कणाकणांत कालवून घेऊन मायेने आपल्या छातीशी घेत नदीत मिसळतो. मग ती चंद्रभागा असो वा गोदावरी, कृष्णा, पंचगंगा.. तिचं पाणी आपल्याला सिमदराला नेतं अशी धारणा. म्हणून गावात कोणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढय़ावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले. हीच माणसं पुढे तिथल्या पानवेलीत जन्म घेतात आणि आपल्या माणसांना भेटतात.. असं साधंसुधं लॉजिक!
गावात असतं वेशीजवळचं मारुती मंदिर वा उभ्या-आडव्या आळीतलं विठ्ठल मंदिर. क्वचित नमाजासाठीचे मातीचे मीनार. ही गावकऱ्यांची श्रद्धास्थानं. इथले उत्सव, उरूस हा यांचा घरचा जलसा. गावातली चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षीदार असते. गावातले अनेक तंटे निवाडे, वाद, संकटं आणि त्यांचं निवारण याचे ती दार्शनिक असते. चावडीच्या कणाकणांत गाव इतका भिनलेला असतो, की चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास-नि:श्वास, उसासे ऐकू यावेत. इथला पार म्हणजे हजारो बाहूंनी आसमंताला आपल्यात सामावून घेणारा विश्वनियंताच. जसा गाव असतो, तसा पार असतो. वटवृक्ष असणारा पार जणू स्वर्गासमानच. क्षणभराच्या उसंतीत विचारलेल्या ख्यालीखुशालीपासून, निवांतपणीच्या संवादात सासुरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणींपासून ते मायबापाच्या आजारपणापर्यंतच्या गावगप्पा इथे रंगतात. कुणा घरी पाहुणे आले इथपासून ते आज कुणाच्या घरी ‘देव..देव’ आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पाराने गावातली पंचांची पंचायत पाहिलेली असते. त्यातले आसू आणि हसूचे लक्षावधी भाव आपल्यात साठवलेले असतात. पोराटोरांच्या विटय़ा पाराने अलगद झेललेल्या असतात, तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. पारावरचा कट्टा गावच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा मंच म्हणून जेव्हा जगत असतो तेव्हा तो प्रतिभेच्या नवनवोन्मेषाचा सर्वव्यापी हुंकार बनतो. कधी सभेचे, तर कधी बठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी पाराभोवती गोळा झालेले असतात. पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात लोळणारं पोरांचं लेंढार पारानं आपल्या कुशीत घेत त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावातला पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत आणि शिस्तीत चालल्याचं ते प्रतीक असतं. पाराभोवती कचरा साठून पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्याची, कुणीतरी गेल्याची ती चाहूल असते. गावाच्या मस्तीचा, रंगेलपणाचा अंदाजही पार देत असतो. मिशीवर पीळ देत दिली/ घेतलेली आव्हानं आणि जीवावर उदार होऊन लावलेल्या पजा यांचे स्मृतीतरंग पारावरल्या पारंब्या शिवताक्षणीच मस्तकात भिनतात. पारात कैद असतात अपेक्षा आणि उपेक्षांची जीवघेणी गाऱ्हाणी- जी तो आपल्या एकटय़ाच्या अंत:करणात ठेवून असतो. त्याचं शेअिरग होत नसतं. पाराचं ते असहाय दुखणं असतं.. ज्याचं प्रकटन तो कधीही करत नाही.
गावाबाहेरचं तळं म्हणजे अनेक आख्यायिकांचं आगार असतं. पावसाचं तांडव आपल्या पोटात साठवून तळ्याचं पाणी कधी तळाला जाऊन विचारमग्न होतं, तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायऱ्या शिवून ‘राम राम’ घालतं. तळ्यातील पाण्याच्या तरंगांत अनेक प्रतिबिंबं दिसतात. तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी-पिवळी पानं पानगळीतला आपला मरणसोहळा साजरा करत, फिरकी घेत, वृक्षगाणी गात, नाचत नाचत पाण्याशी एकरूप होत जलतरंगांत उतरतात. तळ्याकाठची ही झाडं म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण! सूरपारंब्यांपासून लंगडीपर्यंतच्या विविध खेळांचे अनेक डाव इथे मांडलेले. उंबराच्या झाडाची लालसर मऊ गोड उंबरे खात झाडावरचा डिंक, लाख गोळा करताना चावणाऱ्या लाल-काळ्या तिखट मुंगळ्यांच्या तीक्ष्ण डंखाला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या कोलाहलात आपला सूर मिसळणारे सकल पक्षीगण तिथल्या वातावरणाला भारून टाकायचे! एक जादुई माहौल असायचा तिथे. तळं कोरडं पडल्यावर मात्र गाव उदास भासे. मेलेल्या माणसाची आतडी-कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ सुकून गेल्यावर पोटातले मोठाले दगडधोंडे वर घेऊन यायचा. तळं जर सलग दोन-तीन वर्ष आटलं की देवाला भाग बांधला जायचा. सारा गाव अनवाणी राहून उपासतापास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की देवळाला आतून-बाहेरून काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे. तळ्यातल्या पाण्यावरून जुनी खोंडं वेगवेगळ्या दंतकथा रंगवत असत. तळ्याचं पाणी कुणा एकाच्या घरचं नसूनही ते सर्वाच्या डोळ्यात असायचं. चरायला गेलेली गुरं गावात परतताना तिथं आळीपाळीनं पाणी प्यायची तेव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज आणि त्याच वेळी त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचा मंजूळ आवाज ऐकताना मावळतीचा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा, काही कळायचे नाही.
गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था- जो दु:खाचे अवडंबर करत नाही आणि सुखाचे उच्छृंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबांतही गावकथा ऐकू येते. ओढय़ातल्या अवखळ पाण्यातही गावाचे उष्म अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चतन्यमय सोहळा. मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा! गाव असतो माणूसपणाचा उरूस, देणाऱ्या हातांचे हात घेणारा आणि त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा! गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी, अखंड ऊर्जा देणारी सावली! गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली! गाव म्हणजे काही वस्ती, वाडी वा घरं नव्हे. गाव म्हणजे भूमिपुत्रांच्या ठायी विसावलेले मातीच्या काळजाचे अनंत तुकडे! गाव म्हणजे आई. गाव म्हणजे बाप. गाव म्हणजेच विठ्ठल-रुखमाई. गाव म्हणजे आकाशाची निळाई आणि निसर्गाची हिरवाई. गाव म्हणजे डोळ्यांत पाझरणारा खारट झरा. सरतेशेवटी गाव म्हणजे फाटक्या कपडय़ांत दु:ख लपवून, जमीन गहाण टाकून, जीवाला जीव देऊन आई-बापाची सेवा करणाऱ्या आणि मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर खाऊन, त्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरित्रीच्या चरणी अर्पण करणाऱ्या शेकडो माणसांचा एकसंध देह असतो!
sameerbapu@gmail.com