‘विश्वसंवाद’ हा पहिला मराठी पॉडकास्ट! काहीएक आगळंवेगळं कार्य करणाऱ्या मराठी मंडळींच्या मुलाखती त्यावर ऐकायला मिळतात. यातील ‘निवडक विश्वसंवाद’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुकटा गावातले गणिताचे शिक्षक प्रकाश यादगिरे हे ‘एक गाव गणिताचा’ हा आगळा प्रकल्प राबवितात. मन्दार कुलकर्णी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीतील हा
संपादित अंश..
यादगिरे सर, ‘एक गाव गणिताचा’ हा एक अतिशय वेगळा उपक्रम महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा खेडय़ात तुम्ही यशस्वी रीतीने चालवता. हा प्रकल्प काय आहे आणि त्यामध्ये काय घडतंय याची माहिती द्याल का?
‘एक गाव गणिताचा’ हा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम आहे. शाळेतच नाही, तर मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिकवणे हा त्यामागचा उद्देश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यत ‘सुकटा’ नावाचं आमचं गाव आहे. मी काय केलं, त्या गावामधील सर्व दर्शनी भिंतींवर सर्वात पहिल्यांदा कच्चा, प्राथमिक रंग (प्रायमर) दिला आणि त्यानंतर ऑइल पेंटने त्यावर गणिताची पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमांमधली सर्व सूत्रं, संकल्पना मोठय़ा आणि ठळक अक्षरात अशा पद्धतीने लिहिल्या, की जाता-येता लोकांना व मुलांना ती सहज दिसतील आणि त्यांच्या सहज लक्षात राहतील. गणिताची सूत्रं आणि संकल्पना विद्यार्थी आणि पालकांना कशा समजतील, लक्षात राहतील याचा विचार या उपक्रमामध्ये केलेला आहे.
असं काहीतरी करावं हे तुम्हाला का वाटलं? याची सुरुवात कशी झाली? लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणित हा विषय बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारा आहे. गणिताची ही भीती मला विद्यार्थ्यांच्या मनातून दूर करायची होती. गणित विषय विद्यार्थ्यांना मनोरंजक आणि सोपा कसा वाटेल, त्यासाठी मी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होतो. हे सगळं करायला तिथली परिस्थितीही कारणीभूत ठरली. ज्या वेळेस हा विद्यार्थी शाळेत येतो त्याचवेळी पालक शेतीसाठीही त्याचा उपयोग करतात. शाळेबद्दल आस्था आहे, सगळं आहे, परंतु नियमित शाळेत जायला पाहिजे असं त्यांना कधी वाटत नाही. मग विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो, त्यावेळेस त्याला कालचं काही आठवत नसतं किंवा काही येत नसतं. गणिताच्या शिक्षकाला विद्यार्थी थोडाफार घाबरून असतो. आपल्याला येत नाही, ही संकल्पना त्याच्या डोक्यात घर करून बसलेली असते. त्यामुळे विद्यार्थी शाळेत गणिताच्या तासाला तणावाखाली असतो. परंतु हाच विद्यार्थी शाळेच्या बाहेर असतो किंवा गावात असतो तेव्हा तिथं आनंदानं खेळतो, काम करतो. तेव्हा विद्यार्थी ज्या ठिकाणी दडपणाखाली नाही, आनंदात आहे, आपण त्या ठिकाणी त्यांना शिकवू या, ही कल्पना माझ्या डोक्यात आली. पण शिकवायचं कसं? मी आजूबाजूला बघितलं तर मोठमोठय़ा भिंती होत्या गावातल्या. मी ठरवलं की या भिंतींवरच गणिताची मोठमोठी सूत्रं लिहायची. कारण सूत्रं ही गणिताचा कणा आहे. सूत्रं जर विद्यार्थ्यांला आली तर गणित हा विषय त्यांना आपसूकच सोपा वाटेल. मी काय केलं, ऑइल पेंटने त्या गावातील जितका दर्शनी भाग आहे, चौक आहे किंवा कुंपणाची भिंत आहे, पाण्याची टाकी आहे- ज्या ठिकाणी विद्यार्थी बऱ्याच वेळेस जातात, खेळतात त्या ठिकाणी ही सूत्रं मोठय़ा अक्षरांत लिहिली. आणि फक्त सूत्रंच लिहिली नाहीत, तर गणिताच्या ज्या संकल्पना आहेत, भूमितीच्या ज्या आकृत्या आहेत आणि आकृत्यांवर आधारित जी सूत्रं आहेत, तीही लिहिली. भिंतीवर लिहिल्यामुळे असं झालं की विद्यार्थ्यांना तो विषय किंवा ती गोष्ट आवडली. सर, काहीतरी काही नवीन करतायत. विद्यार्थ्यांना नुसतीच आवडली नाही, तर ते येऊन सांगायला लागले की, ‘‘सर, आमच्या भिंतीवरसुद्धा सूत्रं लिहा.’’ विद्यार्थी वर्गात बसायले लागले. त्यांना वाटू लागलं, की सर काय शिकवणार, हे आपल्याला आता कळणार आहे. कारण भिंतीवर आपण जे बघितलंय, तेच आता आपण पुस्तकात पाहतोय.
तुम्ही हा प्रकल्प कधी सुरू केलात? मुलं तुम्हाला मोकळेपणाने सांगतायत की, हे आम्हाला आवडतंय. पण त्यांच्या अभ्यासात किंवा त्यांच्या वर्गातल्या परीक्षांमध्ये तुम्हाला काही फरक झालेला दिसतोय का ?
आता हे काम होऊन जवळजवळ सहा महिने होतायत. आणि सहा महिन्यांच्या कालावधीत मी बघतोय, ते सर्वप्रथम सूत्रलेखनामध्ये दिसलं. मुलांमध्ये खूप मोठा उत्साह होता. मुलं येऊन सांगत होती, की या भिंतीवर लिहिलेलं आमच्या पुस्तकातलं आहे किंवा ‘कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग.’ सातवीत असणारं हे सूत्र पाचवीचे विद्यार्थी सांगत होते. त्यांच्यात गणिताविषयी आवड निर्माण होत होती. हे सोपं आहे आणि सहज कळतंय अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा प्रतिसाद! पालक तर इतके खूश होते की ते जे त्यांच्या त्यांच्या काळात शिकले होते, त्याची त्यांची जणू उजळणी होत होती. विद्यार्थ्यांना पुस्तक उघडायची गरज पडत नव्हती.
बाकी काही शिक्षक आहेत का, की ज्यांना हा उपक्रम महत्त्वाचा वाटला, किंवा ज्यांनी तुम्हाला काही मदत केली किंवा निदान तुमचं कौतुक केलं. असं काही झालं का ?
आमच्या शाळेमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग आहेत. सातवी, आठवी, नववी, दहावी या चार वर्गाना मी गणित शिकवतो. पाचवी आणि सहावीला गणित शिकवणारे दुसरे एक शिक्षक आहेत. त्यांना फार चांगलं वाटलं, की पाचवी-सहावीचा अभ्यासक्रम पण सर घेतायत. विद्यार्थ्यांची तयारी आपसूकच व्हायला लागली आहे. गावामध्ये जिल्हा परिषदेचीही शाळा आहे पहिली ते सातवीपर्यंतची. त्या शिक्षकांनाही फार नवीन वाटलं, की आपलीही मुलं या माध्यमातून शिकायला लागली आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा ती चांगली गोष्ट वाटली आणि त्यांनीसुद्धा कौतुक केलं.’’
पण शेवटी हेच बघितलं जाईल की दहावीत गणितात पास होणाऱ्या मुलांची संख्या वाढली का, किंवा त्यांना मिळणाऱ्या गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली का?
निश्चितच! गेल्या वर्षीच्या निकालामधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्या वर्षी आमच्या शाळेमधून एक विद्यार्थिनी अशी होती, की तिच्या घरी वीज नाही आणि ती रोज शाळेत जवळजवळ चार ते पाच किलोमीटर चालत येत असे. त्या मुलीला गणितात शंभरपैकी शंभर मार्कस् मिळाले. दुसरं या वर्षी निकाल लागलेला आहे आपला एस. एस. सी. बोर्डाचा. त्यात दहा विद्यार्थ्यांना गणितात ९० च्या पुढे मार्कस् आहेत. दोन विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर मार्क स् आहेत. निश्चितच मुलांची गणितातली प्रगती वाढली आहे.
तुम्ही गावातल्या जेवढय़ा भिंती होत्या, त्यांच्यावर गणिती सूत्रं रंगवून घेतलीत. त्यासाठी कुणीतरी कुशल रंगारी लागणार. खर्च येणार. हे सगळं तुम्हाला कसं काय करता आलं?
खरं तर ही एक अफलातून कल्पना होती. सुरुवातीला जेव्हा मी ही कल्पना गावातल्या काही लोकांना सांगितली, तेव्हा त्यांना खरं तर नीट कळलं नाही. आणि आपली भिंत द्यायला नको अशीच लोकांची कल्पना होती. ही संकल्पना काही लोकांना रुचली नव्हती. मग मी माझे काही माजी विद्यार्थी होते, जे शाळेत शिकलेले होते, पण गावातच होते, त्यांचं शिवशाही क्रीडा मंडळ नावाचं एक मंडळ आहे. त्यांना मी हाताशी धरलं आणि त्यांना सांगितलं, ‘‘माझी अशी अशी कल्पना आहे.. आपण काय करू, की गावातल्या सर्व भिंतींवर गणिताची सूत्रं लिहू.’’ मग भीतीपोटी म्हणा, प्रेमापोटी म्हणा, ते म्हणाले, ‘‘सर, काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सर्व मदत करतो. आम्ही रंग आणतो, सगळं आणतो.’’
ही फार महत्त्वाची गोष्ट शिवशाही क्रीडा मंडळाच्या आमच्या मुलांनी केली. त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, की ‘‘सर, तुम्ही चालू करा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. मला इतका मोठा आधार मिळाला- की चला, आपल्या पाठीमागे गावातील काही लोक आहेत. पैशाच्या बाबतीत त्यांना जेव्हा मी म्हटलं, तर त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा गावातले जे शिक्षणप्रेमी नागरिक आहेत त्यांना त्यांनी विचारलं, असं असं सर करतायत, तर तुम्हाला काही मदत द्यायची आहे का? असं करून चार-पाच हजार रुपये जमा झाले. त्यांनी पाच हजार रुपये माझ्या हातावर टेकवले. मग मला इतका उत्साह आला की मी प्रायमर आणला आणि गावातल्या रंगाऱ्याला सांगितलं, की ‘‘तू प्रायमरनं रंग दे. भिंती ठरवल्या आणि प्रायमरनं त्या रंगवायला सुरुवात केली. पण मग मंडळाच्या विद्यार्थ्यांना आणखी पैसे मिळवण्यात अडचणी येऊ लागल्या. मग मी विचार केला, की आपण सुरुवात केलेली आहे, आता आपण मागे पाहायचं नाही. मग परत लागणारा रंग मी आणला आणि गावातल्या सर्व दर्शनी भिंतींवर प्रायमर दिला. ऑइल पेंट आणला. त्यानंतर बाहेरगावचे रंगारी आणून त्यांना पूर्ण गाव दाखवलं. असे नऊ-दहा रंगारी आम्ही पाहिले. ते लोक स्क्वेअर फुटावर भाव सांगायचे. मला ते शक्य नव्हतं. कारण एकेक भिंत जवळजवळ दहा बाय पंधराची, पंधरा बाय दहाची. अशा वीस मोठमोठय़ा भिंती होत्या. स्क्वेअर फुटाचा भाव ही फार मोठी रक्कम होती. एकामागून एक रंगारी आणत होतो गावात. लोक बघायचे, सरांनी दुसरा रंगारी आणलाय, तिसरा आणला, चौथा आणला. मला भीती वाटायला लागली, की आपण प्रायमर तर देऊन ठेवलाय आणि आपल्याला रंगारी तर मिळत नव्हता. पण शेवटी मला एक असा रंगारी मिळाला, की जो त्या तुटपुंज्या पैशांत काम करायला तयार झाला. त्याला मी काम दिलं. त्याचे ८० ते ८५ हजार रुपये बिल झाले. त्यापैकी पाच हजार रुपये मुलांनी दिले. बाकी ८० हजार रुपये मात्र मी माझ्या खिशातून खर्च केले.
या उपक्रमात आपण हे पैसे घातले त्याचं दु:ख नाही. एकच भावना होती सुरुवातीला- की विद्यार्थ्यांना गणित विषय सोपा वाटावा, आणि पालकांना वाटावं की सरांनी विद्यार्थ्यांसाठी काही केलं आहे. सर आपल्या घरापर्यंत येऊन शिकवण्याचा प्रयत्न करतायत.. एवढीच माझी भावना होती.