साहित्य अकादमीचे युवा साहित्य पुरस्कार नुकतेच घोषित झाले. मराठीत या पुरस्काराचा बहुमान औरंगाबादचे कवी वीरा राठोड यांना त्यांच्या ‘सेनं सायी वेस’ या कवितासंग्रहासाठी मिळाला. ‘सेनं सायी वेस’ म्हणजे सर्वाचं कल्याण कर. वीरा राठोड यांच्या कवितेतून हा भाव जागोजागी प्रकटतो. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी आपल्या एकूणच कवितेच्या संदर्भात व्यक्त केलेले हे मनोगत..
आज मी कवी म्हणून जो काही आहे त्यात अनेकांचे सहकार्य, संस्कारांची घडण माझ्या कवितेवर आहे. त्यात माझी याडी (आई), दादी अन् माझ्या तांडय़ातल्या असंख्य बायाबापडय़ा- ज्यांनी पहिल्याप्रथम माझ्यावर लोककवितेचे संस्कार केले, कवितेची भूमी तयार केली- यांचाही सहभाग आहे. तांडय़ातल्या कुठल्याही सण-समारंभात स्त्री-पुरुष, लहानथोर मिळून दिवस- दिवस, रात्र-रात्र नाचत-गात अस्वस्थ जगण्याचे ओझे लीलया पेलून नेण्याची अवघड कला या गीतकाव्याच्या साहाय्यानेच शिकले आणि माझ्यापर्यंत ती पोचती केली. पुढे चालून शिक्षण घेत असताना डॉ. शत्रुघ्न फड आणि कवी पी. विठ्ठल यांनी माझ्यात दडलेल्या कवीचा शोध घेऊन त्याची मशागत केली.
कवितेकडे वळण्याचे नेमके एक कारण मला सांगता येणार नाही. पण जसजसे जीवन कळू लागले, जीवनातील दाहकता पोळू लागली, वास्तव अंगाला भिडू लागले तेव्हा माझ्यातली कालवाकालव, अस्वस्थता, भरून आलेल्या मनाचा बांध आसवांसोबत शब्दाचे रूप घेऊ लागला. तांडय़ातल्या इतर बापांप्रमाणेच माझाही बाप दारूत आकंठ बुडालेला. याडीनं (आईनं) सारं सारं सोसलं. मरणापलीकडे. मी हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. शिकत असताना घरचे निरोप मिळाले. लोकांनी टोचण्या दिल्या. माझ्यासाठी, घराच्या आब्रूसाठी लहान्याने स्वत:च्या आयुष्याचा जिवंतपणी बळी दिला. नात्यागोत्यातल्या आप्तस्वकियांनी या काळात हात वर केले. तेव्हा कुणाला सांगणार होतो हे दु:खभरले गाणे? सांगायला, ऐकायला कविताच तर होती तेवढी जवळची. मला कधी वाटले नव्हते की आपल्या हातून कविता लिहिल्या जातील म्हणून. पण अपघाताने मी कवितेच्या वाटेवर आलो. आज काहीतरी गंभीर लिहिण्याचा मी प्रयत्न करतोय याचं समाधान आहे. मला माहीत नाही, मी जे लिहितोय त्याला काय नाव देता येईल. आपण त्याला कविता म्हणता. त्यात काव्य किती आहे, ते मला शोधायचं नाही; तर मला जे सांगायचं आहे ते तिच्या साह्याने मला सांगायला सोपं जातं, म्हणून मी कवितेकडे अधिकाधिक खेचला जातो. माझ्या कवितेत काय असतं, तर मी जे जगलोय, जगतोय त्या सुखदु:खाचा जाहीरनामा असतो. यात मी जगण्याचं आत्मपरीक्षण करताना स्वत:बरोबरच इतरांनी दिलेल्या शिव्याशापांचाही समावेश आपोआपच होतो, असं माझं स्वत:चं प्रांजळ मत आहे. जगण्यातल्या सुंदर बाबी तर आपण आस्वादल्या पाहिजेतच, पण त्याचबरोबर जगण्याचा दुसरा चेहराही का म्हणून झाकून ठेवायचा? तोच तर खरा आपल्या जगण्याची परीक्षा घेत असतो. तोच आपल्याला चकाकी देतो अन् मातीतही मिसळवतो. म्हणून मला कुठल्याच अनुभवांशी प्रतारणा करावीशी वाटत नाही. हे सर्व करताना माझ्यासमोर असतो-तुकाराम, कबीर, गालिब, सुर्वे आणि ढसाळ, इत्यादी इत्यादी.
मी दुर्लक्षिलेल्यांच्या जगातला; म्हणून माझ्या कवितांचे विषयही दुर्लक्षित जगातले. या जगण्याने मला जीव दिला. भोवतालच्या मातीने माझी मुळं पोसली. इथलं अभावग्रस्त जगणं माझा श्वासोच्छ्वास झालं. बरीचशी दमछाक होत राहिली. रस्त्यावर उतरून मुठी आवळत झिंदाबाद-मुर्दाबाद करायलाही तिने बळ दिलं. ही कविता युगानुयुगं मूक राहिलेल्या सनातन प्रश्नांच्या विरोधात दंड थोपटून रान उठवण्यात आपली सार्थकता मानू लागली. याच मुक्यांच्या हातचा दगड बनून व्यवस्थेच्या अंगावर भिरकावण्याचं तिनं धाडस केलं. ती क्षणभराच्या विरंगुळ्यासाठी बोलती झाली नाही, तर तिला आपले हक्क आणि अधिकार हवे आहेत. यासाठी कुठल्याही परिणामांची पर्वा न करता तिनं भंडारा उधळायला सुरुवात केली आहे; एवढय़ावरच हा प्रवास थांबणार नाही. वेळप्रसंगी तिला अंगावर जाळ घेत अस्तित्वाच्या युद्धात उतरावं लागणार, याची पुरती कल्पनाही आहे. तिला कोणत्याच बदल्याचं रान उठवायचं नाही, तर जगण्याच्या, समाजव्यवस्थेच्या सर्व पैलूंना पारखून घेऊन परिवर्तनाचं चक्र गतिमान करायचं आहे.
अजून तरी मला कविता पूर्णत: कळलीय, असा दावा मी करणार नाही. मी तिचा शोध घेतोय. कविता माझ्यासाठी काय आहे, असा प्रश्न मी जेव्हा स्वत:ला विचारतो; तेव्हा ती आई, सखी आणि मित्र बनून माझ्यासमोर उभी असते. माझ्या मनाची, जगण्याची, अस्तित्वाच्या शोधाची ती सहकारी आहे. मनाला मोकळं करण्याची एक हक्काची जागा आहे. माझ्या कवितेला मी माझ्या आजवरच्या जगण्याचं रेखाचित्र मानतो. मुक्या राहिलेल्या या यातनांच्या तांडय़ाला आता कुठे वाचा फुटलीय. मी काही केवळ कलेच्या प्रेमापोटी म्हणून कविता लिहिली नाही, तर माणसाच्या कल्याणाची करुणा मी भाकत असतो. वातीसारखा जळत असतो. कवितेने मला जरी जळण्याचा शाप दिला असला तरी इतरांना उजळण्याचं वरदानही सोबत बहाल केलं आहे. माझं जळणं इतरांच्या उजळण्यासाठी कामी येणार असेल तर मी तहहयात जळायला उभाच आहे. कदाचित कबीराची लुकाटी धरण्याचं बळ तरी माझ्या कवितेच्या हातात येईल. माझ्या कवितेची नाळ दु:खभोगाच्या वाटेवरच्या हरएक माणसाशी जोडलेली आहे. आणि या दु:खावर फुंकर घालणाऱ्या समाजक्रांतीच्या वाटेवर विद्रोहाचा जाळ पेरणाऱ्या त्या प्रत्येक कवीशी आहे.
मला कवितेच्या साह्याने कल्पनेचे पंख लावून प्रतिजग वगैरे काही शोधायचं नाही. कारण माझ्या अवतीभवतीच्या जगाचा खरा चेहरा शोधायचा असल्याने आहे त्या जगाशी सामना करून जगण्याची वाट सुकर कशी होईल, याकरिता ही सारी आदळआपट चालू आहे. जगण्यातल्या असंख्य अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायचा आहे. भवतालच्या गोंधळाचा, कोलाहलाचा वेध घ्यायचा एक केविलवाणा प्रयत्न मी कवितेच्या मदतीने करतो आहे. मला याची कल्पना आहे की, मी याच जगातल्या सोंगाढोंगापलीकडच्या वास्तव जगाचा पथिक आहे. कुठल्याच वायफळ, भ्रामक, फसव्या समजुतींना मी कधीही माझ्या शब्दांना स्पर्शही करू देणार नाही, एवढी ठाम माझी कवी म्हणून व माणूस म्हणून धारणा आहे. या संपूर्ण वाटचालीत कवितेने मला काय दिलं? ..तर तिने मला स्वत:चं नाव दिलं, स्वत:ची म्हणून स्पष्ट विचारांची वाट दिली.
कवितेला मी केवळ कविता मानत नाही, तर जीवनशोधाची परिक्रमा मानतो. या प्रवासात माझी पावलं कुठे अडखळू नयेत, माझा आवाज कुठे दाबला जाऊ नये, माझ्या मनात कुठल्याही भीतीने घर करू नये म्हणून मी तिच्या हातात हात दिलाय. कविता मला प्रामाणिक जगण्याचं बळ देते, जीवनासाठी प्रचंड विश्वास निर्माण करते. काळोखाच्या निबीड अरण्यातून जाताना अंधाराचा कुठलाच डाग लागू न देण्याचं जणू ती मूकवचनच घेते. मला मनोमन वाटतं की, माझी कविता कधीच सोवळ्याओवळ्यात अडकू नये. तिने ‘नाही रे’च्या विश्वाशी आपलं सोयरसुतक शाबूत ठेवावं. मला कवितेच्या जाळाने विझलेल्यांच्या चुली पेटवायच्या आहेत. कवितेच्या फाळाने पडीक रान पेरायचं आहे. ती कोंडलेल्यांचा आवाज व्हावी, ज्या पावलांना रस्त्यांनी स्वीकारलं नाही, त्यांच्यासाठी तिने रस्ता तयार करावा. ज्या डोळ्यांना माहीत नाही स्वप्न काय असते, त्या डोळ्यांना स्वप्नं दाखवावीत. असं जरी घडलं नाही यदाकदाचित कालचक्रात, पण तिच्या स्वरांनी, शब्दांनी मला जरी अस्वस्थ करण्याचं काम केलं, तरी मी समजेन माझी कविता जिवंत आहे. कवीमधील ही संवेदना जिवंत असणं कवितेसाठी महत्त्वाचं असतं. जगातल्या जेवढय़ा मानवी कल्याणाच्या प्रार्थना गायल्या गेल्या आहेत त्या सर्व कविताच तर आहेत! जिने जगाची मनं सांधली, जिच्या लय-तालावर माणसं हातात हात घालून नाचली, जीवनोत्सव साजरे झाले, हीच कारुण्याची कवणं मानवाला अंतिमत: तारू शकतील, याबद्दल तर माझ्या मनात कुठलीच शंका नाही.
शब्दांकन- विष्णू जोशी – vishnujoshi80@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vira rathod on poetry
Show comments