समीर गायकवाड
हरीदास गवळ्याचं घराणं मूळचं कर्नाटकमधलं. कधीकाळी त्याचे बापजादे गुरं घेऊन इकडं येऊन इथंच स्थिरावलेले. त्याला दोन बायका होत्या. थोरली राधाबाई आणि धाकटी कलाबाई. अंबादास त्याचा थोरला मुलगा. बापाच्या अकाली मृत्यूनंतर कर्तासवरता झाल्यापासून त्यानं सावत्र भावकीशी संबंध तोडले होते. तसा तो तरकटी नव्हता, पण आडमाप होता. अंबादास गवळी म्हणजे आडातला बेडूक, पण त्याच्या गप्पा समुद्राच्या असत! गावातल्या हरेक मामल्यात आपण तोंड खुपसलं नाही तर आपली मोठी बेअब्रू होईल की काय असं त्याला वाटत असावं. मुळात त्याचा वकूब गुरांच्या शेणामुताचा; पण त्याची झेप स्कायलॅबपासून ते वेशीजवळच्या पारूशा म्हसोबापर्यंतच्या सगळ्या विषयांवर तो तोंड फाटेस्तोवर बोले. कुणी ऐकलं, नाही ऐकलं तरी त्याला फरक पडत नसे. तो बोलू लागला की त्याला अडवायचे प्रयत्न होत, पण तो दाद देत नसे. सुजलेल्या अंगठय़ाचा डोंगर करण्यात तो इतका पटाईत होता की शेवटी समोरच्यास नमतं घ्यावं लागे. लबाडी त्याच्या रक्तात मुरलेली होती असंही नव्हतं. त्याची आई राधाबाई एकदम सालस सरळ निष्पाप बाई, बायको सरूबाई म्हणजे भोळी गाय आणि त्याचे भाऊबंदही अगदी डुले बल, हा जे काही सांगे त्याला मान हलवून होकार देणारे! घरातलं कुणीच त्याच्या शब्दाबाहेर जात नसे. गल्लीतलंही कुणी वाटय़ाला जात नसे. पण त्याच्या तोडीस तोड असे काही नग होते, जे हटकून त्याच्या दावणीला आपला रेडा बांधण्यास आतुर असत. अंबादासची आणि त्यांची जुंपली की गावासाठी ती मेजवानी ठरे, जुगलबंदी इतकी रंगे की लोक पोट धरून खोखो हसत! दोन्ही बाजूनं सामना रंगात आलेला असताना अंबादासच्या बाजूनं म्हातारी राधाबाई येई, गावाला हात जोडून सांगे, ‘‘कहीणं कहीपती अन हेकणं हिकमती! ह्य़ो जरी बोलभांड असला तरी तुम्ही तरी हिकमती हायसा नव्हं? मग कशाला त्याचं तोंड उचकटून गमजा बघत बसता? कामंधामं करावीत. मोकार बसून काय मिळणार हाय?’’ तिनं गयावया करताच माणसं आपलं बूड उचलून चालू लागत. तोवर दिवस कलायला झालेला असे, गायी म्हशी धुऊन काढून धारा काढायची वेळ झालेली असे. धारांची आठवण होताच जो तो झपाझप पावले टाकीत आपल्या वाटंला लागे.
वेशीत आपल्या नवऱ्याचा तमाशा होऊन गावानं त्यावर हसावं याचं सरूबाईला विलक्षण दु:ख होई. पण आपल्या नवऱ्याला चार गोष्टी सांगणं तिच्या कुवतीबाहेरचं होतं. गाव आपल्याला हसतं हे अंबादासलाही कळायचं, पण वळायचं नाही. दिवसभराची कामं आटोपून तो रात्रीला अंथरुणावर आला की कंदिलाची वात बारीक करत ती त्याच्या तळपायांना तेल लावे, मालिश करे. मान, खांदे दाबून देताना त्याच्या राठ केसातून हात फिरवत हळुवार विषय काढे. ‘‘गावात आपल्याला हसतील असं वागू नये. उद्या वंशाला दिवा आला तर त्याला किती वाईट वाटंल..’’ मिणमिणत्या उजेडात ती बोलत राही आणि हा आपला दावणीला झोपलेल्या टोणग्यागत निपचित झोपी जाई. नवरा झोपी गेल्याचं लक्षात येताच सरूबाई स्वत:ला कोसत झोपेच्या अधीन होई. सरूचं आयुष्य एकदम सरळमार्गी होतं. त्यात कसलेही छक्केपंजे नव्हते. आठ पोरींच्या गोतावळ्यात जन्माला आलेली पाचवी मुलगी, त्यामुळं बापानं बिरोबाला चिल्लर वाहावी तसं पोरींना जमंल त्याच्या घरात वाहिलेलं. अंबादास आणि सरूचा जोडा एकदम विजोड होता. ती चवळीची कोवळी शेंग तर हा वासाडा बेढब मुळा! बलगाडीचं जू जसं मजबूत आडवं असतं तसं त्याचे भक्कम खांदे होते. घमेलं भरून मांस लोंबावं अशी भरदार मान होती. घटमूठ दणकट हातपाय, डोक्याचा गोल गरगरीत हंडा आणि काहीसं पुढं आलेलं, पण टणक असलेलं पोट अशी बिनमापाची अंगकाठी त्याला लाभली होती.
अंबादासच्या अंगाला सदानकदा शेणाचा दर्प यायचा. तो जवळून जरी गेला तरी म्हैस गेल्याचा भास व्हायचा. त्याच्या कपडय़ांवरही शेणकुटाचे डाग असत. हात कितीही धुतलेले स्वच्छ असले तरी तेही पिवळट असत! तळहातांच्या रेषा अगदी ठळक घोटीव होत्या, पण त्याचा त्याला लाभ झाला की तोटा झाला याच्या फंद्यात तो कधी पडला नव्हता. डोईवरल्या केसांच्या बेचक्यात वळून खडंग झालेल्या शेणाच्या काडय़ा तरंगत असत. कानाच्या पाळ्यांत कडबाकुट्टीतनं उडून गेलेलं बारीक तणकट लांबूनही स्पष्ट दिसे. नखे वाढलेली नसत, पण बोटांची पेरं सदैव चिरलेली असत. त्यातलं पिवळट काळसर द्रव्य नजरेत भरे. अंगानं रेडय़ाच्या ताकदीचा आणि डोक्यानं बलबुद्धीचा हा इसम नाकीडोळीही नीटस नव्हता. फेंदारलेलं नाक, एसटीच्या फलाटागत पसरट नाकपुडय़ा, त्यात हिरवापिवळा भरीव ऐवज असे! डोळे मिचमिचेच होते पण घारे पिंगट होते, त्यानं कधी डोळे वटारले तर तो भीतीदायक वाटायच्या ऐवजी कसनुसाच दिसायचा. त्याच्या मोठाल्या भुवयांना इतके राठ दाट केस होते की त्यानं ते फणीनं विंचरले असते तरी कुणीही हसलं नसतं. चहा पिताना बशीत बुडाव्यात अशा भरघोस मिशा होत्या. विशेष म्हणजे त्या मिशा बशीत, ताटलीत वा ओगराळ्यात बुडल्या तरी या बहाद्दराला त्याचं सोयरसुतक नसे. तो आपला ओरपत राही. खाण्यापिण्याचा मोह त्याला कधीच आवरत नसे. कुणाच्या पंगतीत गेला तरी हात आखडता घेत नसे नि प पाव्हण्याच्या दारी गेला तरी ‘आपला हात जगन्नाथाच्या पुढचा’ असं निर्लज्जासारखं सांगून तो खात राही. घरी तर एका घासात एका भाकरीचं भुस्कट पाडे. जेवायला बसला की भाकऱ्याची दुरडी मोकळी करूनच उठे. राधाबाई त्याला दटावून पाही, ‘‘आरं, बायकू करून घालती म्हणून किती बी खाऊ नये, गाव म्हणंल अंबादासला भस्म्या झालाय. चार घास कमी खाल्लं की डोस्कं बी बरुबर चालतं!’’ आईनं असं म्हणताच तो नंदीबलागत मान डोलावत पुढच्याच घासात ताट रिकामं करी!
अंबादासचा आहार अफाट होता तसेच त्याचे कष्टही डोंगरतोडीचे होते. गुरं वळायला नेल्यावर त्यांच्याकडं चक्कर मारून येताना पाच कोस चालून व्हायचं, रानात जाऊन भावांच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामं करायचा. बलगाडी एकटय़ानं ओढावी इतकी ताकद त्याच्या अंगी होती, पण त्यानं त्याचा कधी गैरवापर केला नव्हता की त्याची मिजासही केली नव्हती. त्याचे तिन्ही भाऊ शेतात राहायचे आणि हा गुरांसह गावात राहायचा. गावानं त्याची किती कुचाळकी केली तरी त्यानं कधी कुणावर हात उगारला नव्हता. नाजूक साजूक देखण्या सरूबाईसोबत त्याचा संसार सुखाचाच होता. मुलाच्या मोहापायी त्यानं सरूच्या पोटाला उसंतच दिली नव्हती. पाचही पोरी मोठय़ा झाल्या. त्यांची लग्नं झाली, पोरगाही मोठा झाल्यावर त्याचंही लग्न झालं. अंबादासच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या. अंगावरचं मांस ढिलं झालं. हातपाय जड झाले. वाढत्या वयाबरोबर सगळं बदललं, पण त्याची खोड काही बदलली नाही.
मधल्या काळात गावात अनेकदा दुष्काळ पडला, कैकांच्या विहिरी आटल्या, शेतं करपली, गुरं खाटकाच्या दारात गेली, कैक तालेवार घरं बसली. अपवाद अंबादासचाच होता. त्याची विहीरच आटली नाही, त्याचं शेत बारोमास हिरवं राहिलं आणि डझनावर कॅण्डं भरून दूधदुभतं येत राहिलं. तेव्हा अर्ध्याहून अधिक गावाला त्यानं दूध दिलेलं. नंतर अनेकांनी गुरं कमी केली आणि अंबादासच्या दुधाचा वरवा लावला. कित्येक घरांनी त्याचं दूध घेतलं. दरम्यानच्या काळात त्याच्या नियतीत खोट आली. जे लोक आपली टवाळकी करतात अशांच्या दुधात त्यानं पाणी घालायला सुरुवात केली. दुधाचं फॅट वाढावं म्हणून युरियाही घालू लागला. गायीम्हशीचं दूध एकत्रित करून देऊ लागला. बघता बघता त्याची जंगम स्थिती भक्कम होत गेली. त्याच्या एकुलत्या पोरालाही लग्नानंतर पोरगाच हवा होता, तो पहिल्या फटक्यात झाला. अंबादासनं गावभरात अस्सल खव्याचे पेढे वाटले, आनंद साजरा केला. पण हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही.
अंबादासच्या सुनेचा पान्हाच फुटला नाही. तिच्या स्तनातलं दूध एकाएकी आटलं. तान्ह्य लेकराची आबाळ होऊ लागली. दवाखाने झाले, औषधोपचार झाले, वैदू झाले, अंगारे-धुपारे झाले, पण काहीच गुण येईनासा झाला. वरचं दूधही पचेनासं झालं. दूध पावडरच्या डब्यातलं दूधही त्याला झेपेनासं झालं. इवल्याशा जीवाचे हाल होऊ लागले. घरात इतकं मोठं दूधदुभतं असूनही आपल्या वाटय़ाला हे दु:ख आल्यानं अंबादास कासावीस झाला. अंबादासची दुधातली लबाडी ओळखून असलेल्या राधाबाईनं त्याचे कान टोचले. त्यालाही चूक पटली. त्यानं नेकीनं धंदा सुरू केला. पण तरीही त्याच्या सुनेला दूध आलंच नाही. बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर सावत्र भावाच्या सुनेचं दूध त्या बाळाला चाललं. तान्हुल्यासाठी ती दाईच झाली! गावानं आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याचा बदला घेतला यात आपल्या नातवाला शिक्षा कशाला याचं कोडं अंबादासला अखेपर्यंत सुटलंच नाही. राधाबाई मात्र जाणून होती. हरीदास बलानं शिंग खुपसल्यानं मरण पावला तेव्हा सख्ख्या दिरांनी मदत केली नव्हती, पण सावत्र दिरानंच जाफराबादी म्हशींची जोडी देऊन तिला उभं केलं होतं. बथ्थड अंबादासनं सावत्र भावकी म्हणत त्यांचं ऋण कधीच मानलं नव्हतं, पण नियतीनं न्यायाचं वर्तुळ पुरं केलं होतं!
sameerbapu@gmail.com