डॉ. आशुतोष जावडेकर
‘‘ए साल्या, स्क्वाट्स नीट मार. तुझे पाय तिरके पडताहेत. मगापासून डोळ्यांसमोर फोनच समोर धरतो आहेस तू.’’ तेजसने अरिनला झापलं. अरिनला हे आवडत असे. म्हणजे तेजसची ही अशी दादागिरी.
‘‘अरे, या येडय़ा माहीलाच मगापासून मेसेज करतोय. काल रात्रीपासून तिने काही मेसेज टाकला नाहीये आपल्या ग्रूपवर. सकाळी तिला पर्सनल मेसेज केला, त्यावरही काही ती बोलली नाहीये. आणि दोन ब्ल्यू टिक्स झाल्यात. मॅड आहे का ही?’’ अरिन बोलला.
‘‘ बरं मग? त्यात काय? करेल नंतर रिप्लाय.’’ तेजस म्हणाला.
‘‘अरे तेजसदा, पण दोन्ही टिक्स निळ्या झाल्या आहेत ना! म्हणजे समोरच्याने पाहिलाय मेसेज. मग अशा वेळेस रिप्लाय आला नाही की वाटतं, काय बरं झालंय नक्की? मूड गेलाय का? राग आलाय का समोरच्याला आपला? का नुसता माज करत इग्नोर मारतोय समोरचा? मग कधी राग येतो, कधी टेन्शन..’’ अरिन भराभर बोलत गेला.
तेजसला हसू आलं. किती उतावीळ.. हायपर झालीय ही पिढी. साध्या साध्या गोष्टी असतात यार! कधी मूड नसतो. कधी वेळ नसतो. कधी समोर माणसं असतात. कधी बॉस! कधी वाहनावर असतो माणूस. कधी आपल्याच नादात. कधी चिंतेत. कधी प्रेमात दुसऱ्याच कुणाच्या. नेहमीच ठरवून इग्नोर मारायचं असतं असं नसतं. पण या पिढीला असले कुठले सल्लेही फार आवडत नाहीत, हे ऑफिसातल्या विशीच्या फ्रेशर्समुळे माहीत असल्याने तेजस अधिक काही न बोलता उत्तरला, ‘‘अरे आऱ्या, माहीला स्पेस दे रे तिची! थांब थोडं.’’ अरिन एक क्षण थांबला आणि मुळात हुशार असल्याने त्याला कळलं- कळायचं ते. मग पुशअप्स मारायला दोघे आतल्या फ्लोअरवर गेले तेव्हा अरिन स्वतशी आणि जगाशी बोलत असल्यासारखं म्हणाला, ‘‘तर स्पेस! ..अॅण्ड व्हॉट इज इट?’’ चाळीस पुशअप्स मारून घाम पुसताना तेजस बोलला, ‘‘स्पेस म्हणजे जागा. तुमची हक्काची.’’ आणि पुढे त्यालाच त्याचं जाणवलं, की तुमची हक्काची जागा म्हटली की चौकटही सोबत आलीच. त्याच्या घराची चौकट त्याला आठवली. साठीची आई, सत्तरीचे बाबा, नव्वदी ओलांडलेली व अजून बदाम, अक्रोड खाणारी तुकतुकीत आजी आणि बारा वर्षांचा, घरच्या सगळ्यांना पुरून उरणारा त्याचा पोरगा. बायको पस्तिशीची! परवाच त्याचा मित्र म्हणाला तशी पस्तिशीची बर्फी! सगळ्यांच्या अंतिम जबाबदाऱ्या नकळत त्याच्या. घरात मानही आहे त्याला. पण तो मान त्याला चौकटीबाहेर जाऊ देत नाही पटकन्!
तोवर अरिनने प्रामाणिक कुतूहलाने विचारलं, ‘‘तुला तुझी स्पेस घरात, ऑफिसमध्ये कशी मिळते तेजसदा?’’
‘‘नाहीच मिळत!’’ तेजसला उत्तर द्यायला काही विचारही करावा लागला नाही. न कळता कामात संपतो दिवस आणि रात्रही. मग दोघे बर्पी मारायला लागले. अंग कसं मोकळं मोकळं होत होतं. अंगाला अंमळ विस्तारायला जी स्पेस लागते, ती कुठे बस, मेट्रो, लोकल किंवा चारचाकीमध्येही मिळत नाही. इथे जिममध्येही आज काकू-मावश्यांची एरोबिक्स बॅच नाहीये म्हणूनच आज मोकळी स्पेस मिळालीय! बर्पी झाल्यावर आधीचा धागा उचलत अरिनने कुतूहलाने विचारलं, ‘‘मग तू काय करतोस स्पेस मिळत नाही तर?’’
‘‘काही करत नाही खरं. अॅक्सेप्ट करतो यार! पण मग तुझ्यासारखा झकास विशीचा दोस्त मला जिममध्ये रेटून आणतो आणि मग इथे छान वाटतं. आणि कळतं, की सगळंच सारखं स्वीकारायची गरज नसते. भांडावं. चतुर व्हावं. मुळात धाडसी, मोकळं व्हावं. पण आपली स्पेस मिळवावी!’’
अरिन हे उत्तर ऐकून चांगलाच प्रभावित झाला. म्हणाला, ‘‘तेजसदा, तू असलं काही भारी बोलला आहेस ना हे! मी ट्विट करणारये तुझं हे वाक्य!’’ दोघे हसले. तेजसने टाळीसाठी हात पुढे केला; आणि अरिनने वळवलेली मूठ!
‘‘तेजसदा, अशी टाळी देणं हे खूप जुनं, म्हातारं आहे. आम्ही कॉलेजमध्ये आता सगळे अशी मूठ वळवून एकमेकांना अलगद पंच करतो.’’ मग तेजसनेही लगेच मूठ वळवली आणि एकमेकांना टाळी देण्याऐवजी त्यांनी मुठी आपटल्या. तेजसला म्हणावंसं वाटलं, ‘अरे, मी विशीत असताना धपाधप व्यायाम करत असे. गडावर, टेकडीवर झरझर चढून मला थकवा येत नसे. कितीही वेळ पाण्यात पोहलं तरी सर्दी होत नसे. उन्हात उभं राहून दिवस दिवस फुटबॉल खेळलं तरी उन्हाचा चटका बसत नसे! मग ते एकदम मागेच पडलं सगळं. हरवून गेलं. तुझ्यामुळे अरिन मला पुन्हा मस्त विशीचं झाल्यासारखं वाटतंय.’ .. पण तो काही हे बोलला नाही. शांत राहिला. अनेकदा पुरुष शांत राहतात तसा.
स्ट्रेचिंग करताना अरिन एक जांभई देत कॅज्युअली म्हणाला, ‘‘मला तर स्पेसच स्पेस आहे यार. आई-बाबांपासून दूर इथे या गावात एकटं राहणं ही आधी शिक्षा वाटलेली. आता ऐष वाटते. आणि फ्लॅटचं भाडंही मला भरायला लागत नाही. घरचेच भरतात. अजून काय हवं?’’ तेजस हसून विशीसारखं म्हणाला, ‘‘कूल!’’
‘‘हां. साला माझा रूममेट नेहमी खरं उशिरा रात्री येतो, पण माझी मत्रीण फ्लॅटवर आली असेल आणि यू नो, काही प्रायव्हेट आम्हाला करायचं असेल, यू नो..’’ अरिनने डोळा मारत म्हटलं. ‘‘येस, आय नो!’’ तेजस धपाटा हाणत बोलला. ‘‘.. तर नेमका हा त्या दिवशी बरोब्बर वेळेत परततो रूमवर. तेवढं सोडलं तर स्पेसचा काही प्रॉब नाही!’’ अरिन म्हणाला. तेजस हसत पुटपुटला, ‘‘साला, कर काही वर्षे एन्जॉय ही स्पेस!’’ आणि तेव्हा नेमके त्यांच्या दोघांच्या फोनचे बीप एकाच वेळेस वाजले. माहीनं ‘‘हाय..’’ केलेलं ग्रूपवर. तेजसने पटकन् टाईप केलं- ‘‘माही, बाकी सोड; पटकन् सांग, तुझी हक्काची अशी स्पेस कुठली? आम्ही त्याची चर्चा करतोय इकडे जिममध्ये.’’ माहीनं तिकडे दात ब्रश करता करता एक क्षण विचार केला. चूळ भरली आणि टाईपलं, ‘‘वेल, आज स्वयंपाकघर ही माझी स्पेस आहे. कारण आठवडाभर मी ऑफिसच्या कामात इतकी अडकले होते, की आईला मी काही मदत केली नाहीये. आज, निदान रविवारी तरी काहीतरी चिरूनबिरून देते.’’ आणि तिने पाच स्माइली खाली टाकल्या. मग तिनं एक क्षण विचार करत लिहिलं, ‘‘जिथे माझी हक्काची, प्रेमाची माणसं असतात ती माझी स्पेस आहे. बाबांशी लग्नावरून भांडले तरी बाबा ही माझी स्पेस आहे. आईसोबत स्वयंपाकघरात वैतागले तरी आई तिथे आहे तोवर ती माझी स्पेस आहे! आणि माझी बेस्टी आहे ना- राधा- तिच्याबरोबर जिथे जिथे मी जाते, ती- ती माझी स्पेस होते. आणि वेल, सध्या काही महिने जेव्हा इथे या आपल्या ‘विशी-तिशी-चाळिशी’ ग्रूपवर काहीही लिहिते तेव्हा जाणवतं- हीदेखील माझीच स्पेस आहे!’’
दोघं पुरुष कपडे चेंज करायला लॉकर्सपाशी गेले आणि काही बोलले नाहीत. पण मग तेजस म्हणाला, ‘‘घरी बायकोला विचारायला हवा हाच स्पेस-प्रश्न आता!’’ आणि अरिन स्वतशीच म्हणाला, ‘‘ही माही भारीय्!’’ तितक्यात तेजसच्या कॉलनीत राहणाऱ्या रेळेकाकांचा फॉरवर्डेड मेसेज तेजसला फोनवर आला. ते रेळेकाका रविवारी सकाळी तर अधिकच उत्साहाने सगळ्यांना व्हॅट्सअॅपवर काय काय पाठवत असतात. तेजसने वाचलं आणि त्यांच्या तिघांच्या आगळ्या ग्रूपवर मग फॉरवर्ड केलं. मंगेश पाडगावकरांची ती छान कविता होती. ‘‘इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन!’’ माही टाईपली, ‘‘झकास!’’ अरिन घाईत स्टीम घ्यायला चाललेला. तेव्हा त्याने नुसता एक अंगठा उंचावला चॅटवर. आणि अरिनचा निरोप घेऊन घरी परत निघालेल्या तेजसला का कुणास ठाऊक, एकदम एकटं वाटलं. भरून आलं. आणि मग जिमबाहेर पडता पडता त्याने रेळेकाकांना ‘थँक यू’चा नवाकोरा व्हॉट्सअॅप स्टिकर पाठवला! तितपत जवळकीचं बंधन त्याला हवं होतं!
ashudentist@gmail.com