डॉ. आशुतोष जावडेकर

अरिन अंमळ खाकरून म्हणाला, ‘‘सेल्फी सेशन झालं असेल तर कॉफीची ऑर्डर करू या? आधीच मी कंटाळलोय. खोलीवर माझ्या रूममेटचा गावाकडचा बोअर मित्र आलेला. त्याची फुलांची शेती आहे. तो नुसते त्याच्या फुलांचे फोटो इन्स्टावर दाखवत बसलेला. मी वैतागल्याचं पाहून बोलतो कसा, ‘ह्य़ो मॅरीगोल्ड. हिथं दिसतायत ती जरबेरा.. दादा, तुमीबी चला आमच्या शेतावर. इथे शहरात कायबी मजा नाय.’’ माही हसत म्हणाली, ‘‘दादा! अरिनदादा!’’ अरिन म्हणाला, ‘‘हसू नको काय माही! इट वॉज क्रॅप! आधीच त्याचा तो अवतार. ब्रॅण्डेड कपडे घातले म्हणजे फॅशन जमतेच असं नाही, हे शिकवा या खेडूत पोरांना कुणी. आमच्या कॉलेजमध्येही अख्खा त्यांचा ग्रुप आहे. भयाण फॅशन्स आणि वर दादागिरी. सगळ्या स्पर्धात त्यांची पोरं असतातच. आणि वर त्यांच्या त्या गावठी अ‍ॅक्सेंटमध्ये माज करतात.’’

अरिनची वाफ जाऊ दिल्यावर तेजसने विचारलं, ‘‘तुला ग्रामीण भागातलं काहीच आवडत नाही का?’’ माही नाटकीपणे म्हणाली, ‘‘तेजस, अरिनला हे कसं आवडेल? आपला अरिन नुसता मुंबईचा नाही, पाल्र्याचा आहे!’’ अरिन तिला हलके पंच हातावर करत म्हणाला, ‘‘वेस्ट! पार्ला वेस्ट!’’ आणि मग हनुमान रोडवरच्या सीसीडीची आठवण येऊन आणि साठय़े व डहाणूकर कॉलेजच्या क्राऊडला आठवून त्याला भयानक हळहळ वाटली. हे पुणेदेखील तसं गावठीच होतं मुंबईपुढे!

टेबलवर नुकतीच आलेली कॉफी ओठाला लावताना तेजसला मात्र तो नांदेडहून पुण्याला पहिल्यांदा शिकायला आलेला, ते दिवस आठवले. तेव्हा निदान ब्रॅण्डेड कपडय़ांची तरी कटकट नव्हती. शहरातली तेव्हाची पोरंही साधीच होती आणि काही दिवस गेल्यावर त्यांचं आपापसात जमूनही जात होतं. अरिनच्या वाक्यामधले अ‍ॅटिटय़ूड सोडून देऊन त्यातल्या विधानांवर तेजसने लक्ष केंद्रित केलं. इन्स्टाग्राम वापरतात तर आता ग्रामीण भागातलीही मुलं. ‘गावठी भाषेत दादागिरी’ असं अरिन म्हणतो, म्हणजे मोठा सामाजिक बदल आहे हा!

साधा अर्थ आहे की, ही गावाकडची विद्यार्थी मुलं संघटित आहेत आणि स्मार्टही. आणि उगाच शहरी वातावरणालाही आता बुजून राहणार नाहीत. तेजसच्या कॉलेजकाळात खेडय़ापाडय़ातली मुलं घट्ट कोशात राहायची. मग तेजसलाच विचार करताना जाणवलं, की हे स्वाभाविकच आता. तो नांदेडहून पहिल्यांदा पुण्यात आलेला कॉलेजवयात, तेव्हा नांदेड हे अगदी लहान गाव होतं आणि पुणे हे तेव्हाही मोठंच होतं. तेव्हा तेजसला गुगल मॅप्सवर आधीच डेक्कन बघण्याची सोय नव्हती किंवा आत्ताची यूपीएससीची पोरं त्यांच्या गावातल्या घरात बसून ऑनलाइन क्लासची फी भरून मग थेट शहरात येतात तशी काही तेव्हा सोय नव्हती. अगदी परग्रहावर आल्यासारखं त्याला पहिले काही दिवस वाटत होतं. आताचे हे विशीचे विद्यार्थी तुलनेने सहज स्थलांतर करीत असणार. पन्नास वेळा टीव्हीवर, नेटवर त्यांनी शहरं पाहिलेली असणार. ज्या कॉलेजात जायचं तिथल्या वास्तूचे, वर्गाचे, लॅब्जचे, कॅन्टीनचे फोटो हे विद्यार्थी आधीच गावाच्या पारावार बसून बघत असणार!

मग एकदम तेजसला वाटलं की, आपण साला वीस वर्षे उशिरा जन्मलो असतो तर काय मस्त झालं असतं! या शहरात पुढे तो रुळत गेलेला आणि अखेर रुजलाही. पण अनेक जुने झाकीव अपमान आत घर करून असतात. कॉलेज लायब्ररीपाशी आपण सहज एकनाथांची गवळण गुणगुणत होतो, तेव्हा शेजारून जाणारी ती टंच पोरगी अचंबित होऊन आपल्याकडे आपण काहीतरी भयंकर अघोरी कृत्य करतो आहोत असा लुक देऊन गेलेली. हे जर आत्ता झालं असतं आणि आपण आत्ता विद्यार्थी असतो, तर तिला थांबवून तिच्या फोनवर एकनाथी भागवताचं अ‍ॅप डाऊनलोड करायला बजावलं असतं! किती माज असतो या शहरी मुलांना.. हा अरिनही बाकी इतका भारी आहे, पण हा माज! पार्ला वेस्ट म्हणे!

‘‘अरे, खड्डय़ात गेलं तुझं पार्ला वेस्ट!’’  तेजस जवळजवळ ओरडलाच. माही आणि अरिन थक्कच झाले. तेजसचा आवाज चढलेला त्यांनी पहिल्यांदाच पाहिलेला. आणि असं काही तो बोलेल असं त्यांना कधी वाटलंच नव्हतं. मग झाली बरीच वादावादी, तोडून बोलणं. आग्र्युमेंट्स. शेवटी माहीने दोन पुरुषांमधलं भांडण मिटवायचा प्रयत्न केला, तरी तो विषय पुढे व्हॉट्सअ‍ॅपवर चालू राहिलाच.

अरिनने बाहेरून अगदी भांडण धसाला लावलं असलं तरी तो विचारी मुलगा होता. एकदा तो त्याच्या रूम पार्टनरला कॉफीला घेऊन गेला बाहेर आणि या भांडणाची माहिती देत त्याने त्याला इनपुट्स विचारले. त्याचा रूम पार्टनर नगरचा होता. नगर म्हणजे ना थेट मेट्रो शहर, ना एखादं खेडं, ना निमशहरी भाग. त्यामुळे तो नगरचा पोरगा म्हटलं तर सगळ्या गावचा होता! त्याने काय काय सांगितलं! त्याला त्या दिवशी त्या गप्पांमध्ये एकदम पहिल्यांदाच जाणवलं की, अरे, आपला रूम पार्टनरही तसा स्मार्ट आहे की! म्हणजे भले पार्ला किंवा दादरची त्याला सर येणार नाही, पण तरी स्मार्ट आहे हे नक्की!

पुढच्या रविवारी भांडण मिटवायला पुन्हा सीसीडीत जेव्हा तिघे भेटले तेव्हा माही म्हणाली, ‘‘तेजस, तुला हे जास्त फील होतं ते तुझ्या वयामुळे! तुमच्या पिढीची मुलं शहरात जर एकटी पडत असतील तशी आता पडत नसणार.’’ ‘‘एक्झ्ॉक्ट्ली!’’ अरिन म्हणाला, ‘‘अगं, ही खेडय़ातली पोरं एकटी पडत नाहीत, कारण त्यांना पोरीही लगेच भेटतात. माझा रूममेटच सांगत होता! तेजसदा, तुमच्या वेळी पोरीशी इंट्रो व्हायलाच जमाना लागत असेल!’’ तेजस मनापासून हसला आणि म्हणाला, ‘‘‘य’ वेळ लागायचा!’’ ‘‘सो हे बघ,’’ अरिन मुद्दा रेटत पुढे म्हणाला, ‘‘त्यामुळे आत्ताच्या आमच्या पिढीतल्या रूरल मुलांनाही असं आयसोलेशन येत नाही.’’ माही म्हणाली, ‘‘फक्त प्रेमबिम नाही रे! एक्सपोजरच वाढलंय. माझी मावसबहीण तिकडे कोकणात पोमेंडीत राहते. माझीही रूट्स कोकणातलीच! तर.. ती मला सांगत होती- पोमेंडीतून मुंबईत गेलं, की आता कुणाला काही नवीन वाटत नाही. लोकलची गर्दी दमवते, बोलताना हेल येतात तेवढंच! तो मरिन ड्राइव्ह दहादा टीव्हीत दिसत असतो, घरचाच वाटतो.’’ तिघे हसले.

अरिन म्हणाला, ‘‘आणि असं गावाकडची रूट्स वगरेही नाही राहिलेली माही आता. माझ्या रूममेटला सुट्टीत त्याच्या गावाला घरी कंटाळाच येतो. लवकर येतो तो परत इथे!’’ तेजसनेही आठवडाभर सॉलिड होमवर्क केला होता. त्याने एकदम फोनवरून एक उतारा वाचायला सुरुवात केली : ‘एखादा शहरी माणूस खेडय़ात जातो, लोकनृत्यबित्य पाहतो आणि सापडतात त्याला आपली मूळं! कशाला एवढा दूर जातोस बाबा. बसल्या जागीच जरा आत बघ. सापडतीलच मूळं.’

‘‘चक्!  हे कुणी लिहिलंय?’’ अरिननं विचारलं. तेजस आदराने म्हणाला, ‘‘महेश एलकुंचवार!’’ अरिनला ते काही माहीत नव्हते, पण माहीला होते. तिला एकदम आठवलं की, ती पेनसिल्व्हानियात शिकायला होती तेव्हा एलकुंचवारांचं ‘मौनराग’ वाचत बसायची. आसपासचे गोरे विद्यार्थी तिला वेल, खेडूतच समजायचे! मग तीही फार जायची नाही पाटर्य़ाना आणि वाचत बसायची तिच्या छोटय़ा खोलीत. क्षणभर ती काही बोलली नाही आणि मग दोघा पुरुषांकडे वळून म्हणाली, ‘‘तेजस, कळलं ना मग? तुझी मूळं आता नांदेडची नव्हे, इथलीच होऊ बघत आहेत! आणि अरिन, एक सांगते, न्यू यॉर्कमधून जेव्हा पहिल्यांदा मुंबईत परत आलेले तेव्हा मला मुंबई छोटं गाव वाटलेलं आणि पुणे तर पार खेडंच! पुढच्या वेळेस जेव्हा तू ‘खेडय़ातली मुलं’ असं म्हणशील तेव्हा हे लक्षात ठेव!’’

अरिन वरमला, तेजस विचारात पडला आणि त्या क्षणी अजिबात तिघांचे हात हातात नसतानाही कुणीतरी त्या तिघांना जणू घट्ट बांधून घेत होतं! जणू त्यांची नांदेड, पोमेंडी, पाल्र्यापासून ते पेनसिल्व्हानियापर्यंतची अनेकपदरी मूळंच!!

ashudentist@gmail.com

Story img Loader