प्रत्येकाच्या वाटय़ाला नियतीने काही वाटा आणि वळणे राखून ठेवली असतात. कवीच्या वाटय़ाला थोडी वळणे अधिक असतात आणि त्याच्या वाटेवर चकवेही अधिकच! ज्ञानेश्वर लेंडवे यांच्या ‘दृष्टांत’ मधील कविता वाचताना हा अनुभव अनेकदा येतो. वाचक त्यांच्या कवितेने थोडा सुखावतो. डोहाकाठी पाऊस, सावल्या, सांज, मी, चंद्र आणि पांथस्थ अशा सात विभागांमध्ये ही कविता आपल्यासमोर येते. म. द. हातकणंगलेकरांसारख्या रसिक आणि विचक्षण समीक्षकांनी या कवितेची वास्तपुस्त केलेली आहे. तिच्यातील ‘सच्चेपणा’ पारखून पाहिलेला आहे आणि त्या कवीच्या अनाप्रातपणाला कुठेही धक्का न लागता ही कविता तिच्या रूप गंधासह समोर ठेवली आहे, ही या कवितेची जमेची बाजू आहे.हा कवी डोहाकाठी अधिक रमतो. त्याला सावलीचे वेड आहे. पावसाच्या प्रतीक्षेतही मन कुठल्यातरी गुपिताचा शोध घेत आहे आणि भर पावसात आपली नौका भरकटली आहे. खाली समुद्रावर पाऊस आणि डोळयात साठवलेली सारी स्वप्ने थेंबा थेंबाने विरघळत चालली आहेत. असा अत्यंत तरल अनुभव ‘धुन’ मधून प्रकट होतो.त्याची ‘ती’ ही फारच गूढ. तिचे अस्तित्व म्हटलं तर आहे, म्हटलं तर ती केवळ विभ्रमच आहे की काय अशी शंका यावी अन् तिचे विभ्रम तर कवीचे मोठेच भांडवल असते. ती येतानाच झाडांच्या पहाऱ्यात येते. तिची येण्याची वेळही सांजवेळच. दिवस बुडतो अन् ती येते. तिचे चांदणरूप प्रकाशते. तसतसा त्याचा मनाचा डोह अधिक गूढ आणि गहिरा होत जातो. अलीकडे निखळ प्रेमकविता, निखळ निसर्ग कविताही फार दुर्मीळ झाली आहे. ही कविता निसर्गाच्या रम्य रूपासह प्रकट होते. ती खुलते न खुलते तोवर मिटूनही जाते. ही हुरहुर हा कवीचा जणू स्थायी भावच आहे. इथला डोहही सावळाच, कृष्णप्रीतीसी राधेचे नाते डोहाच्या प्रतिकाने अधिक गडद करीत जाते. म्हणून डोहावर येते तेव्हा ती राधाच असते. भारतीय माणसाच्या मनामध्ये हे प्रीतीचे अलवार रूप खोलखोल दंश करीत असते. त्याचा प्रत्यय लेंडवें यांची कविता देते.कधी तरी तो तिला समजावूनही सांगतो आहे, की माझ्याशी प्रीत म्हणजे खोलच खोल उतरणे आहे. तिन्हीही काळाला सामावून घेणारी ही गहराई आहे आणि एकदा उतरत उतरत गेले की पुन्हा परतीचा प्रवास नाहीच इतका तो स्वत:च्या बुडण्याशी ठाम आहे. या प्रवासात कवीला ‘शब्द’ फार महत्त्वाचा वाटतो. तो मुक्याने चाललेला असला तरी पावलागणिक शब्द भेटे ही त्याची नियती आहे. कधीकधी हा प्रवास इतका दीर्घ होतो, की अगदी जन्म मरणाचेही थांबे येतात आणि जातात, पण प्रवास अखंडपणे सुरूच असतो. हा ठामपणा कवीला का प्राप्त होतो? तर त्याच्या जवळ असलेला ‘प्रेमाचा दिवा’ होय. अंधार उजेडाची भीती त्याने कधीच हद्दपार केलेली आहे. कारण काळजातला हा दिवा हेच त्याचे खरे सामथ्र्य आहे.कवीची इथली भाषा ही ‘चंद्रभाषा’ आहे. ओठ न उघडताही, हाक न देताही तो तिच्याशी बोलतो आहे. या संग्रहातील ‘प्रवास’, ‘पांथस्थ’, ‘सावल्या’, ‘धुन’ या कविता अप्रतिम आहेत. उगीच वाचकांना दमवणाऱ्या दीर्घकविता लिहिण्यापेक्षा आशयसंपन्न चार ओळी लिहिणे या कवीने पसंत केलेले आहे.शेवटी कवीस हेही माहीत आहे, की आपली ही वाट दृष्टांताच्या पलीकडे जाणारी आहे. त्यालाही तिकडेच जावयाचे आहे. कारण सोबत ती असली की मग कवीच उमरखय्याम होऊन जातो. ‘एक वही कवितेची साथ मला प्रिय सखीची बंधन नच उरले मज अक्षांश रेखांश’ अशीच त्याची गत होते. ‘दृष्टांत’मधील ज्ञानेश्वर लेंडवे यांची ही कविता आवर्जून वाचलीच पाहिजे अशी आहे.
‘दृष्टांत’ – ज्ञानेश्वर लेंडवे
पद्मगंधा प्रकाशन, पुणे<br />पृष्ठे-८८, मूल्य- ९० रुपये