पूर्वी बालनाटय़ं करणारी व्यक्ती, संस्था कितीही आणि कुठल्याही असोत, त्या सर्वामागची प्रेरणा होती- सुधा करमरकर ! आज बालरंगभूमीचे सर्वच राजे-महाराजे, पऱ्या, राक्षस आणि चिंटे-पिंटे थंडावले आहेत. मुंबई, पुण्यात तरी नाटय़शिबिरांपुरतीच बालरंगभूमी उरली आहे. पालकांना, शाळा चालकांना, सांस्कृतिक खात्याला कुणालाच बालरंगभूमीबद्दल रस नाही.
कं पनी फुटण्याची घटना अन्य क्षेत्रात शाप ठरत असली, तरी नाटय़क्षेत्रात मात्र ही घटना नेहमी वरदानच ठरलेली आहे. प्रारंभी प्रतिस्पर्धेचं रूप घेतलेलं हे वास्तव मग काळाची गरज ठरतं. नवे उन्मेष घेऊन जन्म घेणारी संस्था रंगभूमीला प्रगती पथावर नेण्यासाठीच अवतरलेली असते. अण्णासाहेब किलरेस्करांपासून ते पी.डी.ए., थिएटर अ‍ॅकॅडमीपर्यंत, रंगायनपासून आविष्कापर्यंत हेच वारंवार सिद्ध झालं आहे. बालरंगभूमीही याला अपवाद नाही. सुधाताईंबरोबर ‘लिटल थिएटर बालरंगभूमी’ला दोन वर्षे सढळ साहाय्य करून ‘कळलाव्या कांद्याच्या कहाणी’ नंतर रत्नाकर मतकरी यांनी आपला वेगळा मार्ग अनुसरला आणि ‘बालनाटय़’ ही संस्था स्थापन केली.
सुसज्ज रंगमंचावर केली जाणारी मुलांची नाटकं कितीही गरजेची असली तरी त्यांचं आर्थिक गणित नुकसानीचंच होतं. आवश्यक लागणारा निधी गोळा करण्यातच सारी सर्जनता खर्ची पडते. शिवाय बालप्रेक्षकांना केवळ काही अंतरावरचे बघे न करता त्यांच्याशी गप्पा मारण्याच्या थाटात त्यांना नाटय़ानुभव द्यायला हवा. त्यांना नाटकात सामील करून घ्यायला हवं, या उद्देशाने मतकरींच्या बालनाटय़ाने अगदी साधेपणाने थेट भिडतील अशी मुलांची नाटकं सादर केली. त्यातून मुलांच्या कल्पनेलाही वाव मिळाला. ‘छोटे मासे मोठे मासे’ या नाटकात नदीमध्ये मासे पकडण्याचे एक दृश्य आहे. त्या दृश्यात नदीसाठी चक्क निळा पडदा आडवा धरलेला असायचा व त्यावर पुठ्ठय़ांचे मासे लटकलेले असायचे. मासे पकडणारा गळ टाकायचा आणि त्याच्या गळाला पुठ्ठय़ाचा मासा लटकायचा. मुलांना खूप गंमत वाटायची. ते दृश्य समजण्यात त्यांना कसलीच अडचण आली नाही, उलटपक्षी ती नदी आणि ते मासे मुलांचेच झाले. (मोठय़ांना मात्र ते पटलं नाही. त्यांना फक्त मासे खायचे माहीत!) ‘बुटबैंगण’ नावाचं मुलांचं नाटक त्यांनी पथनाटय़ाच्या स्वरूपात सादर केलं होतं. अलिबाबाचं खेचर आणि ३९ चोर (विडंबन नाटय़), सावळ्या तांडेल (ऐतिहासिक नाटक), अद्भुताच्या राज्यात (एकपात्री प्रयोग), गाणारी मैना (काव्यात्म नाटक), अदृश्य माणूस (वैज्ञानिक कथानाटय़) अशी विविध प्रकारची नाटकं करून बालरंगभूमीवर विविध प्रयोग या संस्थेनं केले. ‘चाय खोका थिएटर’ या नव्या संकल्पनेला घेऊन एक खोका व एक कपडय़ांचं गाठोडं घेऊन १० मुलांचा चमू कुठेही नाटक करत असे. नाटय़, संगीत, नृत्य यांचा अंतर्भाव असलेल्या या नाटकाच्या मागण्या खर्चिक नसल्यामुळे हे नाटक कुठेही होऊ शकत असे. ‘दोन बच्चे दो लुच्चे’ या चाय खोका नाटकानं बालमजुरीच्या प्रश्नाचे स्वरूप रंजकतेने प्रेक्षकांवर बिंबवले होते. ‘लिटल थिएटर बालरंगभूमी’ने ढोबळपणा, बटबटीतपणा न रुचणारा प्रेक्षक निर्माण केला, तर मतकरींच्या ‘बालनाटय़’ने भावी प्रायोगिक रंगभूमीला सजग प्रेक्षक मिळवून दिला. मुलांच्या मनातलं सूचकतेचं नाटय़ प्रभावी केलं. लोकप्रिय व प्रायोगिक रंगभूमी असे जे रंगभूमीचे मुख्य भाग मानले जातात त्यांचीच ही बाळरूपे होती. लिटल थिएटरला बालरंगभूमी समांतर होती. बालनाटय़ाचा थेरपीसारखा वापर करून अपंग, भिन्नमती मुलांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं, त्यांच्यातलं स्वत्व जागृत करण्याचं आणि त्यांना स्वतंत्रपणे उभं करण्याचं कार्य कांचन सोनटक्के यांनी आपल्या ‘नाटय़शाला’ या संस्थेतर्फे अव्याहत चालू ठेवलं. तीन दशके उलटली तरी आजही त्यांचं हे सामाजिक रंगकार्य तितक्याच नेटाने सुरू आहे. त्यांनी सादर केलेल्या एका नाटकात  भावनावेगात एका मुक्या मुलीने सबंध वाक्य उच्चारल्याचा चमत्कार मी अनुभवला आहे. त्यात अपंग मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करून घेताना त्यांना शारीर नाटय़ाचाही अनुभव दिला. या अपंग मुलांची नाटकं वा कार्यक्रम पाहून काही प्रेक्षकांना आपणच अपंग आहोत अशी भावना निर्माण झाली असली तर नवल नाही. शाळेतल्या अभ्यासक्रमावरची नाटकंही कांचनबाईंनी मुलांकडून करून घेतली. अपंग मुलांच्या शाळेत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची नाटय़शिबिरे घेतली. नाटय़स्पर्धा घेतल्या. उत्कृष्ट नाटुकल्यांची पुस्तकं छापली आणि या सर्व मोहिमेचे जाळे महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोचवले. वेगळ्या प्रकारच्या मुलांच्या सान्निध्यात राहूनही त्या आज थकलेल्या वा कंटाळलेल्या नाहीत. बालनाटय़ कुठल्या प्रकारचे समाजोपयोगी कार्य करते, याचे हे ज्वलंत उदाहरण थक्क करून टाकणारे आहे. त्यांच्या या रंगकार्यात पती- ख्यातनाम नाटय़शिक्षक प्रा. कमलाकर सोनटक्के यांचे त्यांना मोलाचे साहाय्य मिळते. प्रत्यक्ष कार्यउभारणीत शिवदास घोडके व अरुण मडकईकर यांचे अथक परिश्रम प्रत्येक योजना वा सादरीकरण यशस्वी करतात. आज महाराष्ट्रात कार्यरत असलेली ही एकमेव बालरंगभूमीची चळवळ आहे. ही संस्था अपंग मुलांसाठी असूनही आजही ती धडधाकटपणे आपलं कार्य अविरतपणे करत आहे. इतर बालनाटय़ संस्था मात्र अपंग अवस्थेत आहेत.
‘आविष्कार’ या संस्थेची बालनाटय़ करणारी एक शाखा म्हणून अरविंद देशपांडे यांनी ‘चंद्रशाळा’ स्थापन केली. त्यानंतर सुलभाताईंच्या अधिपत्याखाली प्रामुख्याने माधव साखरदांडे यांच्या बालनाटय़ांद्वारे या संस्थेने काही वर्षे लक्षणीय कामगिरी केली. सुमारे ८० मुलांना सामावून घेणारे, नृत्यदिग्दर्शक पार्वतीकुमार यांनी सिद्ध केलेलं ‘दुर्गा झाली गौरी’ हे या संस्थेचं नृत्यनाटय़ म्हणजे डोळ्यांचं आणि कानांचं पारणं फेडणारं एक आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या तोडीचं नृत्यनाटय़ होतं. नृत्य, नाटय़संगीत, प्रकाश योजना या सर्वच बाबतीत या दुर्गेनं जे काही अवतारकार्य केलं, त्याला तोड नाही. न भूतो न भविष्यती अशा या ‘दुर्गे’पुढे कुणी आजतागायत जाऊ शकलं नाही. ‘चंद्रशाळे’लाही ते शक्य झालं नाही.
रामनाथ थरवल यांनी ‘पृथ्वी थिएटर’द्वारा हिंदी बालरंगभूमी सचेतन ठेवली. कुमार कला केंद्र, रविकिरण मंडळ या संस्थांनी शालेय रंगभूमीची जबाबदारी सांभाळली. मीना नाईक यांनी आपल्या ‘कठपुतळी’ या संस्थेतर्फेही काही बालनाटय़ं सादर केली. वंदना विटणकर, कुमार साहू यांनी लिटल थिएटरच्या अनुकरणातून काही बालनाटय़ं लोकप्रिय केली.
फ्रेंच ग्रिप्स रंगभूमीचा एक नवा प्रवाह मोहन आगाशे व श्रीरंग गोडबोले यांनी बालनाटय़ाच्या क्षेत्रात आणला. मुलांचे प्रश्न त्यांच्या नाटकांनी आपल्या सामाजिक बालनाटय़ातून रंजकतेनं मांडले. मुलांच्या भूमिकाही प्रौढांनी केल्या. आजूबाजूच्या सामाजिकतेचं भान देणारा असा बालनाटय़ाचा प्रकार मुलांच्या आवडीचा झाला. ठाण्याच्या नरेंद्र बल्लाळांनी काही र्वष शास्त्रीय शोधावरची बालनाटय़ं सादर केली. सई परांजपे, माधव वझे, श्रीधर राजगुरू, तारे कुटुंबीय ही पुण्यातील बालनाटय़ कार्यरत ठेवणारी काही वर्षांपूर्वीची आघाडीची मंडळी. व्यक्ती, संस्था कितीही आणि कुठल्याही असोत, त्या सर्वामागची प्रेरणा होती- सुधा करमरकर, संस्थापक ‘लिटल थिएटर बालरंगभूमी.’ विनोद हडप या नाटककार दिग्दर्शकानं काही र्वष लिटल थिएटरचं रंगकार्य जोमानं सुरू ठेवलं. असाध्य व्याधीचे ते बळी ठरले नसते तर आणखी काही र्वष सुधाताईंचं नाव त्यांनी यशस्वीपणे पुढं चालवलं असतं.
छबिलदास शाळेच्या सभागृहात समीप नाटकं सुरू झाली आणि तशा प्रकारच्या नाटकांना ‘छबिलदास चळवळ’ असे नामाभिधान दिले गेले. पण चळवळ म्हणण्याजोगे ‘आविष्कार’ला त्यासाठी काहीच करावे लागले नाही. सुधाताईंची लिटल थिएटर किंवा बालरंगभूमी ही खऱ्या अर्थाने चळवळ होती. त्यांनी स्वकष्टाने साऱ्या महाराष्ट्रालाच आपल्या खेळात सामील करून घेतलं होतं. मोरारजीभाई, इंदिरा गांधी अशा शासनातील थोरामोठय़ा व्यक्तींना पाचारण करून त्यांना आपल्या बालनाटय़ांचं प्रेक्षक बनवलं. व्यावसायिक निर्मात्याशी संगनमत करून त्यांच्याच दौऱ्यात आपल्या लिटल थिएटरच्या नाटकांची सांगड घातली. बाहेरगावी एकाच नाटय़गृहात सकाळचा प्रयोग लिट्ल थिएटरचा असे तर रात्री व्यावसायिक नाटकाचा- एकाच मंडपात दोन लग्नं! कार्याचं सातत्य टिकवताना त्याचा प्रसार आणि प्रचारही केला. त्यांना अनेकांचं साहाय्य झालं हे खरंच, पण हिंमत आणि जिद्द होती ती एकटय़ा सुधाताईंचीच. इतर बालनाटय़वाले टाइमपास म्हणून, जोड कार्य म्हणून, दुसरं काही करता येण्याजोगं नव्हतं म्हणून बालरंगभूमी करत होते. सुधाताई बालरंगभूमीसाठीच बालरंगभूमी करत होत्या. एकटीच्या हिमतीवर साऱ्या महाराष्ट्रात बालरंगभूमीचं वारं पसरवून त्यांनी पाव शतकभर संस्था नेटानं, जोरानं चालवली. बालरंगभूमीची झुकझुक गाडी मामांच्या गावांना फिरवून ठेवली. त्या काय नव्हत्या? उत्कृष्ट अधिनेत्री होत्या, दिग्दर्शिका होत्या, नाटककार होत्या, नृत्यांगना होत्या, नृत्यदिग्दर्शिका होत्या. संगीत दिग्दर्शन तर त्यांनी केलंच, पण गरज पडली तेव्हा एक-दोन नाटकांचं नेपथ्यही त्यांनी आकारास आणलं. इतकी हरहुन्नरी बाई मराठी नाटय़क्षेत्रात दुसरी झाली नाही, पण तरीही त्याची योग्य ती आणि योग्य वेळी दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली नाही व नाटय़परिषदेनेही! स्वत:च्या कार्याची जाहिरातबाजी करण्याची एकच कला त्यांना अवगत नव्हती. ती असती तर ‘भिंगोऱ्या’ नावाचं एक आत्मचरित्र त्याही लिहू शकल्या असत्या.
आज बालरंगभूमीचे सर्वच राजे-महाराजे, पऱ्या, राक्षस आणि चिंटे-पिंटे थंडावले आहेत. राजू तुलारवार सारखे काही रंगकर्मी  शाळांना सुट्टय़ा पडल्या की मोसमी बालनाटय़ रंगमंचावर आणतात आणि शाळा सुरू झाल्या की निघून जातात. मुंबई, पुण्यात तरी नाटय़शिबिरांपुरतीच बालरंगभूमी उरली आहे. रत्नाकर मतकरींचा बालरंगभूमी बाबतचा उत्साहही संपुष्टात आला आहे. पालकांना, शाळा चालकांना, सांस्कृतिक खात्याला कुणालाच बालरंगभूमीबद्दल रस नाही. अशा परिस्थितीत आम्ही तरी किती श्रम घ्यायचे आणि कुणासाठी, असा मतकरींचा सवाल आहे.
‘लिटल थिएटर बालरंगभूमी’ ऐन उमेदित होती त्यावेळच्या सुधाताई आठवतात. त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह, आनंद आजही डोळ्यांसमोर उभा राहतो.  प्रयोग सुरू झाला की पडद्यामागे दिग्दर्शिका सुधा करमरकर यांची धावपळ सुरू व्हायची. पात्रांची हालचाल फ्रंट स्टेजवर, तर दिग्दर्शकाची बॅक स्टेजवर. या विंगेतून त्या विंगेत, त्या विंगेतून या विंगेत. मी सुधाताईंना एकदा म्हणालो होतो, ‘सुधाताई, नेपथ्यकाराला तुमच्यासाठी पडद्यामागे एक धावपट्टी करायला सांगा ना!’ त्या हसायच्या आणि परत विंगेतून सूचना द्यायला धावायच्या. आम्हाला हे सगळं ज्ञात असल्यामुळे आम्ही चुकूनदेखील विंगेत बघायचो नाही. सुधाताईंचं हे पडद्यामागचं जॉगिंग पहिल्या प्रयोगापासून शंभराव्या प्रयोगापर्यंत आणि त्यानंतरही चालू असायचं.
सुधाताईंनी डॉ. काशिनाथ घाणेकर, भक्ती बर्वे, मनोरमा वागळे, भावना, नीलम प्रभू, लक्ष्मीकांत बेर्डे असे थोर मोठे कलावंत दिले. रघुवीर तळाशिलकर, पांडुरंग कोठारे असे नेपथ्यकार दिले. बालरंगभूमीचा एक दर्जेदार लक्षणीय माहोल महाराष्ट्रभर सतत जागता ठेवला.
आज सुधाताई वयाच्या ऐंशी-ब्याऐंशीच्या घरात असतील. दोन कर्त्यांसवरत्या पोटच्या मुलांचा आणि पतीच्या निधनासारखे जबरदस्त धक्के पचवत त्या कशाबशा उभ्या आहेत. त्यांच्या पायातला सारा त्राणच गेलाय. त्या धावपळीचं रूपांतर आता हातापायांच्या बोटांतून थरथरण्यात झालंय. पूर्वीच्या नाटकातली, समारंभातील सगळी छायाचित्रं पाहताना मला म्हणाल्या, ‘कमलाकर, मला हे सारं खोटंच वाटतं. खरंच का मी केलं? मागचं मला काही म्हणजे काहीच आठवत नाही. माणसं ओळखता येतात, हेच खूप म्हणते मी. एक गोष्ट मात्र अजूनही मी विसरलेली नाही.’ स्पष्ट शब्दोच्चारासाठी आणि आवाजाच्या आरोह अवरोहासाठी पाश्र्वनाथ आळतेकरांनी नाटय़शिक्षण घेताना तरुणपणी शिकवलेलं ते वाक्य. लांबलचक तीन मिनिटांचं वाक्य त्यांनी मला धाडधाड म्हणून दाखवलं. अगदी स्पष्ट शब्दोच्चारासह, कुठेही न थांबता न अडखळता.
पायातली शक्ती कमी झाल्यामुळे बसल्या जागेवरून फोनपर्यंत यायला त्यांना बराच वेळ  लागतो. मी त्यांना म्हणालो, ‘गळ्यात मोबाइल का नाही अडकवत?’ ‘नको, त्यानं हार्टबिट्सवर परिणाम होतो. मला अजून जगायचंय!’ मध्येच केव्हा तरी त्यांची नजर शून्यात जाते. रंगभूमीला मरण नाही. बालरंगभूमीलाही नाही. त्या शून्यात सुधाताई कुणाची वाट बघताहेत? येणाऱ्या वेगळ्या बालरंगभूमीवर त्यांना भूमिका करायचीय का? मात्र शिथिल झाली तरी रक्ताची ओढ कशी थांबणार? माझ्या डोळ्यांसमोरच्या सुधाताई कुठे तरी आशादायी नजरेनं टक लावून पाहताहेत. त्यांना तसं पाहताना मला बा.सी. मर्ढेकरांच्या काव्यपंक्ती आठवतात-
अशीच जावी काही वर्षे
आणि ‘महात्मा’ यावा पुढचा
आम्हास आम्ही जरा पहावे
काढुनी चष्मा डोळ्यावरचा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा