प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
युद्धाविषयी आपल्या नेमक्या काय कल्पना असतात? शत्रू, द्वेष, गोळीबार, तोफा, विमानं, बॉम्ब, धूर, मृतदेह, शरणागती, विजयोत्सव, मेडल्स, झेंडा वगैरे वगैरे. पण या सगळ्या ‘रुटीन’ युद्धविषयक कल्पनांमध्ये ‘व्यंगचित्रं’ हा प्रकार कसा काय येऊ शकतो? ठीक आहे, युद्ध सुरू असताना वर्तमानपत्रांमधून त्या अनुषंगानं भाष्य करणारी, जनतेला विषय पटकन् कळावा म्हणून काढलेली व्यंगचित्रं आपण समजू शकतो व ती आपण पाहिलेलीही असतात. पण युद्ध सुरू असताना एका सैनिकाने समजा नियमितपणे व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली; आणि तीही आजूबाजूच्या परिस्थितीवर.. चक्क युद्धभूमीवरून.. तर? तर, ही कल्पनाच आपल्याला सहन होणार नाही. कारण सैनिकाच्या हातात बंदूक, मशीनगन शोभून दिसते.. ब्रश नाही! तसंच त्याने गंभीर मुद्रेने, चिडलेल्या आवाजात सतत गोळीबार केला पाहिजे.. त्याने हसता कामा नये.. त्याचा संबंध नेहमी लाल रक्ताशीच आला पाहिजे.. काळ्या शाईशी नाही.. अशा आपल्या ठाम कल्पना असू शकतात.
पहिल्या महायुद्धात इंग्लंडचा सैनिक कॅप्टन ब्रुस बेन्सफादर (Bruce Bairnsfather, १८८७ ते १९५९) हा फ्रान्सच्या भूमीवर जर्मनीच्या विरुद्ध लढण्यासाठी गेला. संपूर्ण चार र्वष लढला. नंतर दुसऱ्या महायुद्धात त्याने दोस्तराष्ट्रांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यथावकाश तो निवृत्त झाला आणि इंग्लंडमध्ये समाधानाने राहू लागला. हे वर्णन काही लाखो सुदैवी सैनिकांचं आहे. उरलेले लाखो दुर्दैवी सैनिक रणभूमीवरून परत आलेच नाहीत.
पण कॅप्टन ब्रुस हा थोडा वेगळा होता. तो रीतसर आर्ट स्कूलमध्ये शिकला होता. युद्ध सुरू झाल्यावर इंग्लंडतर्फे लष्करात भरती झाला आणि फ्रान्सच्या भूमीवर गेला. तिथे राहून त्याने मशीनगन चालवली आणि फावल्या वेळात व्यंगचित्रं काढली. एक-दोन किंवा पाच-पन्नास नव्हे, तर अक्षरश: हजारो! ही बहुतेक सर्व व्यंगचित्रं मासिकातून, साप्ताहिकातून प्रकाशित होत होती, गाजत होती. ब्रुसच्या व्यंगचित्रांचे अनेक संग्रह निघाले. अनेक संग्रहालयांमध्ये त्याची व्यंगचित्रं लावली गेली आहेत.
‘द बेस्ट ऑफ फ्रॅगमेंट्स फ्रॉम फ्रान्स’ हा असाच एक संग्रह. अंदाजे दीडशे व्यंगचित्रं यात आहेत. एका पानावर एक व्यंगचित्र. मोठय़ा आकारातलं. शंभर वर्षांपूर्वी काढलेली ही सर्व व्यंगचित्रं काळ्यापांढऱ्या व करडय़ा रंगांमध्ये आहेत. ब्रशने रंगवलेली. जणू काही एखादं पेंटिंग असावं अशी. चित्रात दोन-तीन व्यक्तिरेखा आणि एखाद् दुसऱ्या वाक्यात कॉमेंट किंवा संभाषण. त्यात छोटासा विनोद. पण जातिवंत चित्रकार असलेल्या ब्रुसने रंगवलेलं रणभूमीवरचं वातावरण मात्र आपल्या मनावर फार मोठा परिणाम करतं.
बहुतेक सैनिक हे खंदकांतून राहत होते. हे खंदक अत्यंत अरुंद होते. त्यात बऱ्याच वेळेला प्रचंड चिखल असायचा. मोजे दिवस दिवस वाळायचे नाहीत. वरून सतत पाऊस. प्रचंड थंडी. सामान भिजायचं. चिखलात सतत राहून पाय सुजायचे. शिवाय केव्हा कुठून गोळी किंवा बॉम्ब येईल याची शाश्वती नाही. खाण्यासाठी एकाच प्रकारचा जाम आणि ब्रेड. एकूण वातावरण अत्यंत निराशाजनक. दररोज जखमी सैनिकांना सुरक्षितपणे मागे घेऊन जायचं. रोज आजूबाजूला मृतदेह पाहायचे. प्राणी मरून पडायचे. कानठळ्या बसवणारे आवाज आणि मृतदेहांना खाण्यासाठी उंदरांची फौज! या असल्या अत्यंत विषण्ण करणाऱ्या भयानक वातावरणात लाखो सैनिकांबरोबर ब्रुसही सरहद्द सांभाळत असे. ब्रुस त्याच्या व्यंगचित्रांत आजूबाजूला जे दिसायचं ते रेखाटायचा. सोबत एखादी छानशी खुसखुशीत कॉमेंट करायचा. सहकाऱ्यांना ही चित्रं जाम आवडायची. ते खूश व्हायचे. तेवढाच विरंगुळा.
एके दिवशी एका अत्यंत उद्ध्वस्त घरात चार-पाच सैनिकांसह ब्रुसने आसरा घेतला. त्या घराला धुरांडं होतं. ते पाहून ब्रुसला व्यंगचित्राची एक कल्पना सुचली. त्याने ती कल्पना भिंतीवर रेखाटली. नंतर कागदावर चितारली आणि आपल्या मेजरला भेट म्हणून दिली. पण दोन दिवसांनी जर्मनीकडून गॅसहल्ला झाला, त्यात हा मेजर धारातीर्थी पडला!
नंतर ब्रुसने ते व्यंगचित्र सहज म्हणून मिलिटरीच्या पोस्टाने ‘दि बायस्टॅण्डर’ या साप्ताहिकाला ९ एप्रिल १९१५ रोजी पाठवलं आणि सोबत पत्र लिहिलं.. ‘चित्र आवडेल ही आशा. जरी मी चित्रातल्याप्रमाणे धुरांडय़ावर चढून शत्रूवर नजर ठेवून नसलो तरी.. आय लिव्ह इन अ हाऊस, बाय ‘लिव्ह’ आय मीन वेटिंग फॉर नेक्स्ट शेल टू कम थ्रू रूफ!’ (ब्रुसला अशी शब्दांशी खेळण्याची सवय होती.)
चित्र प्रकाशित झालं आणि ‘दि बायस्टॅण्डर’ने ब्रुसला दोन पौंड मानधनही दिलं. संपादकांनी नंतर एका वार्ताहराला युद्धभूमीवर पाठवून ब्रुसला भेटायला सांगितलं आणि त्यानंतर ब्रुसने व्यंगचित्रांचा धडाकाच सुरू केला. त्याची चित्रं त्याच्या सहकाऱ्यांना आवडू लागली आणि तिकडे इंग्लंडमधल्या वाचकांनाही ती पसंत पडू लागली. आजूबाजूची आपली परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारा विनोद याचं सहकाऱ्यांना अप्रूप वाटू लागलं. द्वय़र्थी संवाद, रांगडी सैनिकी भाषा याचा काही वेळेस अडसर येत असला तरी चित्रं प्रकाशित होत होती.
ब्रुसच्या व्यंगचित्रांचे काही नमुने पाहता येतील. फ्रान्सच्या युद्धभूमीवर खूप पाऊस पडायचा. अशाच एका चित्रात सैनिक खंदकात कमरेएवढय़ा पाण्यात उभे आहेत आणि म्हणताहेत, ‘‘शत्रू आपल्याला आता बहुधा पाणसुरुंगाने ठार मारेल!’’
हळूहळू विध्वंसाची सवय होऊ लागते. शांतपणे सॅण्डविच खात सैनिक निर्विकार चेहऱ्याने म्हणतोय, ‘‘लवकर संपव.. वरून बॉम्ब पडायच्या आत!’’
एका चित्रात लांबवर एका ऐतिहासिक राजवाडय़ावर बॉम्ब पडताना दिसत आहेत. खंदकात राहून वैतागलेला एक जण म्हणतोय, ‘‘त्या राजवाडय़ात काही दिवस राहायला मिळालं तर किती बरं होईल!’’ तर त्याला दुसरा उत्तर देतोय, ‘‘आपण तिथे पोहोचेपर्यंत तो क्षणभरही राहण्याच्या लायकीचा असणार नाही!’’
या अशा विनोदाने खरं तर विषण्णपणे हसू येतं. त्यातली दाहकता जाणवते. पण रणभूमीवरचे सैनिक मात्र या चित्रांवर खूश असायचे आणि त्याच्या काही प्रती ते खंदकामध्ये चिकटवायचेसुद्धा!
कॅप्टन ब्रुसने एक व्यक्तिरेखा तयार केली. तिचं नाव ‘ओल्ड बिल’! त्याला ‘सी लायन’सारख्या मिशा होत्या. हा ओल्ड बिल खूपच लोकप्रिय झाला. एका चित्रात हा ओल्ड बिल आणि त्याचा सहकारी यांनी धुमश्चक्रीत एका खड्डय़ाचा आश्रय घेतलाय आणि त्याबद्दल त्याचा सहकारी कुरबुर करतोय. तर ओल्ड बिल त्रासून त्याला म्हणतोय, ‘‘तुला जर यापेक्षा चांगला खड्डा कुठे दिसला तर अवश्य जा.’’ या व्यंगचित्रातील हे ग्रामीण इंग्रजीतलं वाक्य प्रचंड गाजलं! विशेषत: त्यातला ‘बेटर होल’ हा शब्दप्रयोग. कुठेही जा, तिथे यापेक्षा चांगलं काही असणार नाही, हा याचा भावार्थ. पण हा शब्दप्रयोग पुढे इतका लोकप्रिय झाला की ब्रिटनचे पंतप्रधान चेम्बरलेन आणि अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनीही तो आपल्या भाषणातून वापरला. या ओल्ड बिल व्यक्तिरेखेवर आणि ‘दि बेटर होल’ या शब्दप्रयोगावर नाटकही निघालं- जे खूप गाजलं. चित्रपट निघाला. रेस्टॉरंट निघालं. इतकं च नव्हे, तर सर्कशीत जेव्हा सी लायनचे खेळ व्हायचे तेव्हा त्याला ‘ओल्ड बिल’ असं नाव दिलेलं असायचं.
युद्ध हे बऱ्याचदा सैनिक सोडून इतरांना मात्र हवंहवंसं वाटत असतं. सैनिक बिचारे घरापासून शेकडो मैल दूर सदैव अनिश्चिततेच्या वातावरणात जगत असतात. याला कंटाळून व्यंगचित्रातील एक सैनिक म्हणतोय, ‘‘इतक्या लांब येऊन युद्ध करण्यापेक्षा हे युद्ध इंग्लंडमध्ये झालं असतं तर किती बरं झालं असतं.’’
युद्धकाळात एकदा इंग्लंडचा दारूगोळा संपुष्टात आला. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी इंग्लंडने आठवडय़ातील दोन दिवस मांसविक्रीवर बंदी घातली आणि त्यातून नवीन बॉम्ब बनवले. (जर्मनीने तर काही आठवडे मांसविक्रीवर बंदी घातली होती.) त्यावरचं ओल्ड बिलचं भाष्य खूपच भेदक आहे. तो म्हणतो, ‘‘त्यापेक्षा आठवडय़ातून एक दिवस बॉम्बफेक बंद असा निर्णय घेतला असता तर अर्थव्यवस्था नक्कीच सुधारली असती.’’
पुढे फ्रान्स आणि अमेरिकेने कॅप्टन ब्रुसला अधिकृतरीत्या आपल्या सैन्यासाठी पूर्णवेळ व्यंगचित्रं काढायला बोलावलं. सैनिकांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी, त्यांना आनंदी ठेवण्यासाठी व्यंगचित्रं हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे हे सिद्ध झालंच होतं; आणि युद्ध जिंकण्यामध्ये व्यंगचित्रकाराचाही थोडाफार वाटा असतो याचीही त्यांना खात्री पटलेली होती.