अंजली चिपलकट्टी

सध्या महाराष्ट्रात किंवा देशात घडणाऱ्या अनेक घटनांकडे ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ची उदाहरणे म्हणून पाहता येईल. बीड तसेच मुंबई-पुण्यात झालेली बेदम मारहाण, खून, बलात्कार किंवा नागपूरमधील दंगल… तुलनेने व्यापक आणि गंभीर अशी ही सामाजिक अवस्था बहुसंख्य लोकांचा जेव्हा वास्तवाशी संबंध तुटतो आणि भ्रामक कल्पनांनी ते वेढले जातात तेव्हा होते. पण त्याचा फायदा कोण घेते? फटका कुणाला बसतो? ‘मास हिस्टेरिया’ अर्थात ‘सामूहिक उन्माद’ ( Mass Psychogenic illness) एक अशी मानसिक अवस्था असते की, लोक सामूहिक संकेत धाब्यावर बसवून अनियंत्रित पद्धतीने वर्तन करू लागतात. याची अनेक उदाहरणे मध्ययुगापासून आधुनिक काळापर्यंत दिसतात. युरोपात स्ट्रासबर्ग इथे एका स्त्रीने रस्त्यावर येऊन नृत्याला सुरुवात केली. तिला बघून इतर स्त्रिया तिच्याबरोबर नाचू लागल्या आणि ती संख्या वेगाने ४०० पर्यंत वाढली. हे नृत्य काही आठवडे सतत चालू होतं, इतकं की पायातून रक्त आलं, दमून चक्कर येऊन काही स्त्रिया मृत्यू पावल्या तरी हे थांबेना. लंडनमध्ये १९३८ साली ‘रेझर-मॅन’ म्हणजे, कुणीतरी गर्दीतून येऊन चाकू मारून जातं अशी अफवा पसरली, शोध घेऊनही कोणी सापडेना तेव्हा लक्षात आलं, पुरुष स्वत:लाच चाकूने इजा करून घेताहेत! टांझानियामध्ये शाळेतल्या मुली अचानक अनियंत्रितपणे हसायला लागल्या. ही वेडसरपणाची साथ इतर १४ शाळांमध्ये पसरली आणि शाळा जवळजवळ दोन वर्षांसाठी बंद कराव्या लागल्या.

२०१६ मध्ये नेपाळमध्ये शाळेतील मुलांमध्ये रडणं, ओरडणं, शरीराला रॅश, स्नायूंना आकड्या अशा प्रकारची लक्षणे अतिशय जलदपणे साथीसारखी पसरली. या सर्व प्रकारांमधला समान धागा म्हणजे तिथल्या सामाजिक पर्यावरणात भरलेली भीती, तणाव चिंताग्रस्तता आणि अनिश्चितता. लंडनमध्ये त्याकाळातील बेरोजगारी, आर्थिक विवंचना, टांझानियामध्ये नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर माजलेले अराजक, नेपाळात २०१५ साली झालेल्या भूकंपामुळे विस्कटलेली समाजव्यवस्था त्यामुळे लोकांच्या मनावरचा असह्य ताण आणि चिंता याचे हे आविष्कार. भारतात तर याची असंख्य उदाहरणं सापडतात. दिल्लीत गाजलेली ‘मंकी-मॅन’ची साथ, गुजरातेत २०१७ मध्ये वेणी आणि केस कापण्याची साथ नंतर हरियाणा, उत्तर प्रदेशमध्येही पसरली. देव/देवी अंगात येणे, काही अघोरी अंधश्रद्धा हे तर देशभरात फारच सामान्य मानले जाते.

मात्र ‘मास सायकोसिस’ अर्थात ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ ही तुलनेने व्यापक आणि गंभीर अशी सामाजिक अवस्था आहे. समाजातील बहुसंख्य लोकांचा जेव्हा वास्तवाशी संबंध तुटतो आणि भ्रामक कल्पनांनी ते वेढले जातात; तेव्हा त्यांची मानसिक, बौद्धिक पातळी घसरते. खरं-खोटं चांगलं-वाईट याचं तारतम्य हरवून नैतिक पातळी घसरते. लोक बेजबाबदार, सतत भावना दुखावणारे, अनियंत्रित आक्रमकतेला प्रोत्साहन देणारे, विचारहीन बनतात. याचं मध्ययुगातील भयंकर उदाहरण म्हणजे ‘विच हंट’. १४ ते १७ व्या शतकात युरोपात ५० ते ६० हजार स्त्रियांचा चेटुक करण्याच्या आरोपाखाली अतोनात छळ आणि हत्या करण्यात आल्या. आर्थिक विवंचना, ख्रिाश्चन चर्च आणि धर्मगुरूंची दहशत या प्रभावाखाली असलेल्या पुरुषांनी समाजातल्या कोणत्याही वाईट घटनेसाठी जबाबदार म्हणून या स्त्रियांचा बळी घेतला. इथे सत्तेचा संचय असलेल्या लोकांनी दुुर्बल लोकांवर केलेले अत्याचार अशी समाजाची विभागणी दिसते. दोन्हीही बाजूचे लोक मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.

याबाबतची विसाव्या शतकातली उदाहरणे अंगावर काटा आणणारी आहेत. सत्तेची आकांक्षा असणाऱ्या नेत्यांनी ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ कसा घडवून आणायचा याचा ठरवून अभ्यास आणि त्याची अंमलबजावणी केलेली दिसते. वंश, धर्म, विचारधारा याचा उपयोग करून मानवी मनाला कसं अंकित करता येतं याचे आधुनिक अभ्यास आयतेच यांच्या हातात पडले. स्टॅलिनने आपल्या विचारधारेचा उपयोग करून लाखो लोकांना बंदिस्त केले, न ऐकणाऱ्यांचे हत्याकांड घडवले. पहिल्या महायुद्धानंतर सामाजिक घडी विस्कटलेल्या, निराशेच्या भोवऱ्यात सापडलेल्या जर्मन जनतेला हिटलरने गोबेल्स-नीती वापरून, ज्यू लोक सामाजिक अवनतीला कसे जबाबदार आहेत, असा प्रचार करीत इतके बेमालूमपणे पटवले की लोकांनी त्याला बहुमताने निवडून दिले! ‘मानसिक ऱ्हासाची महासाथ’ असं कार्ल युंग या द्रष्ट्या मानसशास्त्रज्ञाने त्याचं वर्णन केलं आहे. तो म्हणतो, ‘‘भूकंप, दुष्काळ किंवा कर्करोगासारख्या आजारापेक्षाही ही साथ जास्त घातक आहे, कारण ती अव्यक्तपणे माणसांच्या नेणिवेमार्फत पसरते आणि समूहांना दुर्बल बनवते.’’

हे सगळं आठवायचं कारण काय? सध्या महाराष्ट्रात आणि देशात इतरत्र घडणाऱ्या अनेक घटना नीटपणे पाहिल्या तर ही ‘सामूहिक भ्रमिष्टपणा’ची उदाहरणे आहेत हे लक्षात येईल. बीड, मुंबई-पुण्यात झालेली बेदम मारहाण, खून, बलात्कार, रस्त्यावर सहज होणाऱ्या मारामाऱ्या ही सामाजिक पर्यावरणातील वाढत्या आक्रमकतेची आणि हिंसेची पृष्ठभागावर आलेली उदाहरणे आहेत. अशा गुन्ह्यांचे राजरोसपणे चित्रीकरण करून समाजमाध्यमांत व्हायरल करणे यात राजकीय कुरघोडीबरोबरच लोकांमध्ये भीती आणि दहशत वाढावी असा हेतू असावा का, अशी शंका येते. होळी सणाच्यानिमित्ताने हा उन्माद आणि आक्रमकता सर्वत्र दिसून आली. दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळांसमोर थांबून, लाऊड स्पीकर लावून केलेली नाच-गाणी, स्त्रियांना, परदेशी पाहुण्यांना हिंसक पद्धतीने फासलेला रंग, दिल्ली, डोंबिवली आणि इतर अनेक ठिकाणी ‘विशिष्ट धर्मीयांकडून वस्तू किंवा काहीही खरेदी करू नका’, असे केलेले आवाहन आणि त्याला लोकांनी दिलेली दादही एकंदरच बौद्धिक, नैतिक ऱ्हासाची उदाहरणे आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची दंगल.

छावा चित्रपट, यातून औरंगजेबाबद्दल संताप उत्पन्न झाला. नंतर औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत राजकारणी लोकांनी केलेली वक्तव्ये, जाळपोळीच्या व्हिडीओंचा प्रसार, यावरून या दंगलीला राजकीय आश्रय होता, असा आरोप अनेकांकडून होतो आहे. औरंगजेबाला स्वराज्याचा, महाराष्ट्राचा शत्रू म्हणूनच इतिहासात शिकवले गेले. पण तीनशे वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनांचा उपयोग इथे ‘मास सायकोसिस’साठी केला जात आहे. ते कशासाठी? बेरोजगारी, गरिबी, शिक्षणाची आबाळ, गुन्हेगारी या जगण्याशी संबंधित वास्तववादी प्रश्नांकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी धार्मिक तेढ यापेक्षा चपखल तोडगा नाही. जनमानसात तयार झालेली भीती, चिंता, द्वेष या नकारात्मक भावनांमुळे बुद्धीचा ऱ्हास फार वेगाने होतो. विवेकाची पातळी खालावली की लोक प्रश्न विचारण्याऐवजी दैववादी, हतबल बनतात. बेरोजगार तरुण बेकारी का आहे, असा प्रश्न विचारण्याऐवजी देवाला साकडे घालतात, बेकायदा कामे करायला तयार होतात. अशा तरुणांच्या फौजा गावागावात दहशत माजवण्यासाठी राजकारण्यांच्या जाळ्यात अलगद येतात. ज्यांनी अशा राजकारण्यांना मत देऊन निवडून दिले त्यांना सामाजिक परिस्थिती बरी नाही, असं आकलन होतं का? स्वत:च्या धारणांचा आणि वास्तवाचा जेव्हा ताळमेळ घालणं जमत नाही; तेव्हा अशी माणसं गोंधळात पडतात, त्याला ‘कॉग्निटिव्ह डीझोनन्स’ असं म्हणतात. या गोंधळापासून वाचण्यासाठी मेंदू सत्य परिस्थितीला नाकारतो आणि माध्यमे दाखवत असलेल्या सकारात्मक कथा, कारस्थानं, चमत्कार, दैवी कल्पना याचा आधार घेऊन अनुभवांचे नव्याने अर्थ लावतो, स्वत:च्या धारणा बरोबरच आहेत असं सांगतो. यातून ताण आणि चिंता कमी होतात. अशी कथानकं, अफवा पुरवणारे चमत्कारी बाबा, गुरू यांना खतपाणी घालणारे राजकारणीच असतात हा योगायोग नसतो. या कथानकांमध्ये ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास, जात आणि धर्माच्या अस्मिता पेटवणाऱ्या घटना यांचा सुकाळ असेल याची खबरदारी राजकारणी घेतात. आपली प्रगती रोखणारे ‘अमुक’ धर्माचे, जातीचे लोक आहेत हे मत बौद्धिक ऱ्हास झालेल्या विचारहीन समूहांच्या गळी उतरवणं सोपं असतं आणि त्यांच्या आक्रमकतेला वाट मिळते.

ज्यूस्ट मिरलू हे डच सायकोअनॅलिस्ट म्हणतात, आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांचा अर्थ तर्काने लावण्याची माणसात क्षमता आहे. तर्काला तर्काने प्रत्युत्तर देता येते. पण अफवा, निरर्थक, पण भावनिक बडबड, कथानक यात लोक गुंग होतात. अशा अतार्किक वक्तव्य किंवा प्रसंगाचा युक्तिवाद करताना सजग माणसं गोंधळात पडतात. त्याचा प्रतिवाद कसा करावा यात गुंतलेले असताना राजकारणी नव्याने काही वाद उपस्थित करतात. असे नवनवीन हल्ले चढवत राहणं आणि भावनांना सतत उत्तेजित ठेवणं हाच त्यांचा उद्देश असतो.

भारतासारख्या देशात लोकांची भक्ती परंपरा आणि धार्मिक हळवेपणा याचाही फायदा सत्ताधारी प्रचारासाठी करताना दिसतात. ‘जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा’ असं ज्याचं वर्णन केलं गेलं तो महाकुंभमेळा संपून आता दीड महिना लोटला. हिमालयातून खळाळत येणाऱ्या भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम प्रयागराज इथं होतो आणि तिथून गंगेचे पात्र विशाल होत जातं. चार राज्यांतून वाहणाऱ्या या नद्यांच्या कुशीत अनेक पिढ्यांपासून लाखो लोकांचे भरणपोषण होत आहे. इथेच भारतीयत्वाच्या अनेक पैलूंना मोठा बहर आला, म्हणूनच या नद्यांसोबत अनेकांच्या श्रद्धा, आस्था जोडल्या गेल्या, पुराणकथाही रचल्या गेल्या. मोठ्या श्रद्धेने भाविक दर सहा किंवा बारा वर्षांनी गंगेला आपली आस्था अर्पण करायला येतात. गेल्या साठ-सत्तर वर्षांत कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची सोय, नियोजन त्या-त्या वेळची सरकारे करतच होती. मात्र यावर्षी ज्याप्रकारे या भाविक सोहळ्याचा ‘इव्हेंट’ बनवून जाहिराती केल्या गेल्या, यावरून त्याचा राजकीय प्रचारासाठी वापर केला गेला असा आरोप होतो आहे. ‘अभी नही, तो कभी नही’, ‘जो महाकुंभ नही आयेगा, देशद्रोही कहलायेगा’ हे नारे उतावीळ करणारे, भीती जागवणारे आहेत.

सामान्य भाविकांच्या सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली गेली नाही, असाही आरोप होतो आहे, कारण ज्या पाण्यात डुबकी मारायची, आचमन करायचं ते पाणी आरोग्याला धोकादायक होतं असं ‘एनजीटी’ सारख्या वैज्ञानिक संस्था सांगत होत्या. मौनी अमावस्येला व्हीआयपी लोकांसाठी काही रस्ते बंद केल्याने गरीब भाविकांना अरुंद रस्त्यांवर रेटत नेलं गेलं. गर्दीच्या रेट्यात लहान मुलं हरवली, जखमी झाली. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत शंभरच्या वर लोक मृत्युमुखी पडले, गंभीर जखमी झाले. याची जबाबदारी त्यांना मोक्ष मिळून देवानेच घेतली असं म्हणणं योग्य आहे का? भारतातल्या अत्यंत गरीब राज्याने शाळा, हॉस्पिटल, शिक्षण संस्था उभी करण्यासाठी सरकारी निधी वापरण्याऐवजी ७५०० कोटी इतके रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च केले, यात त्यांचे प्राधान्यक्रम उठून दिसतात. होय, लोकांनी विज्ञानापेक्षा धार्मिक परंपरांच्या अधिक आहारी जावे, असेच हा प्राधान्यक्रम सांगतो. मुलांची बौद्धिक प्रगती नीट व्हावी यासाठी या पैशांचा किती उपयोग झाला असता! यावेळच्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात एलिट, उच्चशिक्षित आणि अति-श्रीमंत लोकांची उपस्थिती ही आधीच्या मेळ्यांच्या तुलनेत जास्त होती. यातले बहुतांश लोक माध्यमांमुळे तयार झालेल्या FOMO कल्चरच्या दबावाखाली तिथे गेले होते. काही जण ‘आपली संख्या दिसली पाहिजे’ या दबावाखाली गेले होते. यात श्रद्धेच्या तुलनेत उन्माद अधिक दिसतो. या उन्मादाचा उगम कुठून झाला? सततच आपला धर्म इतर अल्पसंख्याक धर्मामुळे धोक्यात असल्याची भीती सामान्य माणसांच्या मनात बिंबवणे, तोच विषय चर्चेत राहील असं बघणे यामुळे व्यक्तीचा आणि समाजाचा बौद्धिक आणि नैतिक ऱ्हास होत असतो.

इथं हॅना आरंट या तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंताचे ‘आईकमन इन जेरुसलेम’ या पुस्तकाची आठवण येते. या पुस्तकात तिने निर्माण केलेली ‘बेनालिटी ऑफ इव्हिल’ ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. अडॉल्फ आईकमन या माणसाने नाझी राजवटीत एका अधिकाऱ्याची भूमिका बजावली. लाखो ज्यूंची छळछावण्यांमध्ये रवानगी करण्यासाठी लागणारी व्यवस्था करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं- जे त्याने निष्ठेने पार पाडलं. त्याच्याशी बोलताना हॅनाला त्याचा सामान्यपणा लक्षात आला. तो अतिशय साधा होता, त्याच्यात द्वेष आणि क्रूरवृत्ती अजिबात नव्हती. सरकारच्या आज्ञेचं पालन करण्यामध्ये त्याची समर्पणाची भावना होती. मात्र अशा साधेपणाने बजावत असलेल्या कर्तव्याच्या परिणामांकडे दुर्लक्ष करत विचारहीनपणे ते पार पाडणं हे क्रूरपणाचं आहे अशी मांडणी हॅनाने केली, जी अतिशय महत्त्वाची आहे. कारण आईकमनसारख्या साध्या आणि विचारहीन माणसांमुळे हुकूमशहांची वाट सुकर होते.

anjalichip2020@gmail.com

Story img Loader