कॅमेऱ्यातून बघितलेल्या, दाखवलेल्या गोष्टी मनात कल्लोळ उठवून जातात आणि हा कल्लोळ पाठ सोडत नाही. अशा जिवंत लोकांची आणि त्यांच्या अचंबित करणाऱ्या गोष्टींची ओढ लागून राहते. या काळात आलेले अनुभव आमचं आयुष्य समृद्ध करतं. असंख्य नवे धडे, नव्या गोष्टी शिकवून आणि नव्या सवयी लावून देतात…

साल २०१६ होतं, मराठवाड्यातल्या एका दुर्गम गावातल्या छोट्या गल्ल्यांतून आम्ही गाडीतून एक घर शोधत निघालेलो, सोबत त्या भागातील एक कार्यकर्ता होता. बरीच वणवण केल्यानंतर आम्ही एका झोपडीवजा घराच्या दारात पोहोचलो. आत ‘दुपारचा अंधार’ होता. एक लहान मूल शाळेच्या गणवेशातच खेळत होतं. आम्ही त्याच्या आईला भेटायला आलेलो. ती कुणाच्या शेतावर रोजंदारी करायला गेल्याचं कळलं. तिला निरोप पाठवला गेला. आम्ही वाट पाहात थांबलो. थोड्याच वेळात एक २३-२४ वर्षांची मुलगी लगबगीनं आली- केशरी-पिवळ्या रंगाची साडी नेसलेली. एकदम ४-५ जण गाडीतून घराकडे आलेले बघून जरा बावचळलेली. तिच्या पाठीशी लपणाऱ्या लहान मुलीला जवळ ओढून धरणारी ती त्या दोघा मुलांची आई होती. पटकन तिनं आम्हाला पाणी दिलं आणि बुजतच समोरच्या खाटेवर बसली. सोबतच्या कार्यकर्त्याने तिला आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. तिला साडीच्या पदराला ‘लेपल माइक’ लावायला दिला आणि आम्ही समोर कॅमेरे सेट करायला लागलो. घरात वीज नव्हतीच. बॅटरीवाल्या एलईडी लाइट्स आजूबाजूला सेट केल्या, तिच्या साडीचा केशरी रंग त्या खोलीतल्या अंधारात उठून दिसायला लागला. ती बोलू लागली… काही वर्षांपूर्वी एका धडपड्या तरुण शेतकऱ्याशी तिचं लग्न झालं. त्याचे आई-बाबा, बहीण आणि हे दोघे नवरा-बायको असा चित्ररूपी सुखाचा संसार सुरू झाला. छोट्याशा शेतात नवनवीन प्रयोग करणारा, शेतकी-प्रदर्शनांमध्ये हजेरी लावणारा आणि वर्तमानपत्रांच्या शेतीविषयक पुरवण्या न चुकता वाचणारा तिचा पदवीधर नवरा जोशात शेतात राबत होता. त्याच्या पाठीवरच्या बहिणीच्या लग्नाचं ठरत होतं. गाठीशी असलेले पैसे आणि पुढे येणाऱ्या पिकांचा नफा याचा हिशेब सतत त्याच्या डोक्यात घोळत होता. शेतातल्या सोयाबीनची हा भाऊ प्राणपणानं काळजी घेत होता. एके रात्री अवकाळी पावसानं तालुक्याला झोडपून काढलं, उभं पीक हातचं गेलं. नव्या पिकाचा नफा सोडाच, हातचे बचतीचे पैसे खर्चाला वापरावे लागले. कर्ज काढून परत शेतात गुंतवावे लागणार होते, गुंतवले. पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं. तो पार खचला. पुन्हा एकदा हाच डाव खेळायला कर्ज काढलं, पुन्हा बी पेरलं. बहिणीचं वय दोन वर्षांनी वाढलेलं. तिच्या लग्नाचं सोडाच, जगण्याची लढाई सुरू झालेली आणि त्यात २०१२ सालच्या दुष्काळानं महाराष्ट्रावर करडी नजर टाकली. नवा संसार, दोन मुलं, लग्नाला ताटकळलेली बहीण, आस लावून बसलेले आई-बाप हे सगळं पाठीवर घेऊन एक दिवस ‘फवारणी करायला जातो’ म्हणून शेतावर गेला, फवारणीचं औषध स्वत:च प्यायला!

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Bull attack on woman
‘त्याने थेट महिलेला उडवलं…’ धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून अंगावर येईल काटा
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
thane fake baba marathi news
काळ्या जादूचा नाश करण्यासाठी बाबा आणणार होता मृतदेह, मृतदेह आणण्यासाठी बाबाने घेतले ८ लाख ८७ हजार रुपये
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा

हेही वाचा : विद्यार्थ्यांचा ओढा का?

मागे उरलेल्या अंधारात त्याची बायको आम्हाला ही गोष्ट सांगत होती. खरीखुरी आत्महत्या केलेल्या तिच्या नवऱ्याची आणि मागे उरलेल्या या तिघांची. आई-बाप धक्क्यानंच गेले. मोलमजुरी करून आता ती या मुलांना शिकवतेय. मोठ्या मुलाचं नाव ‘पवन’ होतं, त्याला पोलीस इन्स्पेक्टर बनायचं होतं. ‘बनवणारच!’ म्हणाली. आमचं शूट पूर्ण झालं आणि आम्ही सामानाची आवराआवर करू लागलो. इतक्यात माझं लक्ष गेलं, ती कावरीबावरी होऊन दाराबाहेर उभ्या असलेल्या चुलत दिराला काहीतरी खुणावत होती. ती त्याला दूध घेऊन यायची विनवणी करत होती-आमच्याकरता चहा करायला. दोन लहान मुलं असलेल्या घरात दूध नव्हतं. मी पटकन म्हणालो, ‘मला कोरा चहाच आवडतो.’ तिला ओशाळ्यागत झालं. माझ्या सोबतचे सगळेच म्हणाले, ‘आम्हालासुद्ध!’ तिनं मग आमच्यासाठी ‘डिकाशन’ बनवलं. काळा चहा. त्या दिवसापासून दुधाच्या चहाची चवच तोंडाला जमत नाही.

महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घ्यायला आणि सोबतच एका सेवाभावी संस्थेचं कार्य ‘डॉक्युमेण्ट’ करायला म्हणून २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो किलोमीटर्सचा प्रवास झाला. त्यातून पुढे एक ‘डॉक्यु-सिरीज’ बनली जी एका मराठी वाहिनीवरून प्रदर्शितही झाली. त्या काळात आलेले अनुभव आम्हा सर्वांचं आयुष्य समृद्ध करून गेले. असंख्य नवे धडे, नव्या गोष्टी शिकवून आणि नव्या सवयी लावून गेले.

२०१६ सालच्याच ऑक्टोबर महिन्यातली ही गोष्ट. त्या दिवशी माझ्या बायकोचा वाढदिवस होता, संध्याकाळी घरातले सगळे इकडे ठाण्यात जेवायला बाहेर जाण्याचा बेत ठरवत होते आणि मी आणि आमची टीम तिकडे निलंग्याजवळच्या एका गावात अंधारात एक पत्ता शोधत होतो. एका शेतातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गाडी टाकली. एक म्हातारी बाई ‘टॉर्च’ घेऊन अंधारात उभी होती, तिथून पुढे पायवाटेनं जायचं होतं. तिच्या हातातल्या आणि आपापल्या मोबाइलच्या टॉर्चच्या उजेडात तिच्या मागे-मागे चालू लागलो. एका पत्र्याच्या खोपटाचं दार मोठा दगड लावून बंद केलं होतं. तो दगड सरकवून आम्हाला आत नेलं आणि आजींनी तीन दगडांची चूल पेटवली. काटक्या जाळून केलेल्या उजेडात त्या पत्र्याच्या झोपडीतलं दारिद्र्य लख्ख उजळलं. चुलीच्या आणि अगदी थोडी बॅटरी उरलेल्या एका लाइटच्या उजेडात त्यांची गोष्ट सुरू झाली.

हेही वाचा :  आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

हे एकेकाळचे घरंदाज शेतकरी. नियतीचा फेरा आणि आभाळाची दृष्ट लागून पार उद्ध्वस्त झाले. नवरा-बायको गावातला वाडा विकून इथे शेतातच एका खोपटात राहू लागले. परिस्थितीशी लढत, जमेल ते पिकवत विकत आणि खात होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला. तशातच एका अवकाळी पावसात शेताला लागून असलेला मातीचा बांध फुटला आणि कडेच्या ओढ्याचं पाणी आत शिरून उभ्या पिकाचं तळं झालं.

एके रात्री झोपण्यापूर्वी म्हातारा-म्हातारी बोलत बसले होते. नवरा उठत म्हणाला, ‘तू झोप, मी आलो शिवारातून फेरी मारून.’ त्यानं जाताना त्या खोपटाचं दार दोरीनं करकचून बांधून टाकलं. थोड्या वेळानं परत येऊन दाराशी बसला आणि बाहेरूनच म्हातारीला सांगितलं की ‘मी रोगर प्यायलोय… मला आता हे जिणं सहन होत नाही…’ बाई घाबरली आणि दार बडवायला लागली. त्याला सांगू लागली, ‘तुम्ही दार उघडा, आपण करू सारं पुन्हा नीट, तुम्ही आधी ती गाठ खोला.’ ती दाराच्या आत आणि हा विष पिऊन दाराच्या बाहेर असा त्यांचा झालेला संवाद ती आम्हाला सांगू लागली. आपला नवरा बाहेर हळूहळू मरतोय आणि आपण आत कोंडलो आहोत या भयंकर स्थितीत… काही केल्या तो ऐकत नाहीये हे लक्षात आल्यावर तिनं जोरजोरात भिंतीचे पत्रे बडवायला नि आरडाओरडा करायला सुरुवात केली. आवाज ऐकून जवळच्या शेतातले एक-दोघे आले. तिच्या नवऱ्याला गाडीत घालून तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन गेले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले, पण तो काही वाचला नाही. वर त्याच्या उपचारांच्या ९० हजार रुपये खर्चाचं नवं कर्ज तिच्या डोक्यावर आलं. ती एकदम बोलायची थांबली. सभोवार फक्त तिच्या हुंदक्यांचा आणि रातकिड्यांचा आवाज होता.

तिला एक मुलगा होता. शिकून सरकारी नोकरी मिळवण्याच्या आशेवर बाहेर एका गावात राहात होता. त्याचं काय होईल ही चिंता तिच्या डोक्यावर होतीच. तिच्या खोपटात मोजून (हो, मी मोजली) ७ भांडी होती आणि तशात ‘आता रात्रीची वेळ झाली आहे, काही खायला करू का?’ असं ती आम्हाला वारंवार विचारत होती. अर्थात आम्ही नकार दिला. परतीच्या वाटेवर गाडीत कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता. एखाद-दोन किलोमीटर गेलो असू आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. डोळ्यांसमोर त्या तुफान पावसातलं तिचं खोपटं दिसू लागलं. ही भयाण पावसाळी रात्र ती त्या खोपटात कशी काढेल, याच विचारात सगळे जण होते. गाडीतल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. इतक्यातच माझा फोन वाजला. ठाण्याच्या एका हॉटेलमधून मला व्हिडीओ कॉल येत होता… माझी तो कॉल घ्यायची हिंमतच झाली नाही. आजही दरवर्षी न चुकता बायकोच्या वाढदिवसाला त्या म्हातारीचं खोपटं आठवतं, कारण मी ‘डॉक्युमेण्ट्रीवाला’ आहे!

हेही वाचा : पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

…पण म्हणून काही सततच दु:खी करणाऱ्या, रडवणाऱ्या गोष्टीच आठवतात असं नाही. नुकताचा गुढीपाडवा झाला आणि प्रत्येक पाडव्याला हमखास आठवणारी ही गोष्ट… बीड जिल्ह्यातल्या ‘आर्वी’ गावात ‘शांतिवन’ नावाची संस्था आहे. समोर कॅमेरे लावलेले, कावेरीताई नागरगोजे त्यांची गोष्ट सांगायला बसल्या होत्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि इतरही एकल महिलांच्या मुलांचं वसतिगृह आणि शाळा त्या चालवतात. आता या शांतिवनाचा पसारा फारच वाढलाय, पण त्यांच्या प्रवासातले अनेक टप्पे त्यांची परीक्षा घेणारे होते. हे सगळे अनुभव त्या कॅमेऱ्याला सांगत होत्या. अगदी काहीच वर्षांपूर्वी साधारण ४०-५० मुलं या शांतिवनात शिकत होती. आता सुसज्ज इमारती असल्या तरी तेव्हा मात्र कावेरीताई आणि त्यांचे पती दीपकभाऊ नागरगोजे यांचा एकांडी लढा सुरू होता. बाबा आमटेंचे शिष्य असलेले हे दोघे पत्र्यांच्या शेडमध्ये या मुलांचा पोटच्या मुलांसारखा सांभाळ करत होते. एवढ्या साऱ्या मुलांचा खर्च भागवताना दमत, थकत आणि कधीतरी रडतसुद्धा होते. अशातच ‘पाडवा’ आला. रोजच खिचडी आणि डाळ खाणाऱ्या मुलांचा सण तर व्हायला हवा या विचाराने दोघे अस्वस्थ होते. बरं, जवळ एक पैसा शिल्लक नाही, कसाबसा शिधा पुरवून वापरत होते. पाडव्याच्या आदल्या दिवशी कावेरीताईंनी न राहवून गळ्यातलं मंगळसूत्र काढून नवऱ्याकडे दिलं, ‘हे विका आणि शिधा आणा, माझ्या मुलांचा सण साजरा व्हायलाच हवा.’ दुसऱ्या दिवशी पाडव्याला शिरा बनला! मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

हा प्रसंग सांगताना कावेरीताई हमसून-हमसून रडू लागल्या. आम्ही सगळेच डबडबलेल्या डोळ्यांनी उभे होतो. ‘कट’ म्हणायचंसुद्धा भान उरलं नाही, म्हणालोही नाही. त्यांचं ते रडणं, कडेला उभं असलेल्या दीपकभाऊंच्या डोळ्यात आलेलं पाणी हे सगळंच कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं… ते तसं होऊ देऊ शकलो, कारण आम्ही ‘डॉक्युमेण्ट्रीवाले’ आहोत.

मी आजवरच्या या प्रवासात शेकडो अशा आयांना-बायांना आणि मुलींना भेटलो. अगदी आत्ताच केलेल्या फिल्मच्या निमित्तानंसुद्धा अशा अनेक बायका भेटल्या. ट्रॅक्टर चालवणाऱ्या, वर्तमानपत्र काढणाऱ्या, घोषणा देणाऱ्या त्या उत्तरेतल्या बायका आणि डोळ्यांदेखत स्वत:च्या मुलानं जाळून घेताना पाहिलेली म्हातारी. फास लावलेल्या बापाला बघून ‘ते झोका घेतायत’ असं सोबतच्या मैत्रिणीनं सांगितल्याचं आठवून मला सांगणारी सातवीतली मुलगी. नवऱ्याच्या मागं छोटं दुकान काढून आता सन्मानाचं आयुष्य जगणारी गावच्या लेखी आता प्रतिष्ठित ‘दुकानदारीण’ झालेली बाई. तीन मुलांना एकटी शिकवताना नातेवाईकांच्या थट्टेचा विषय झालेली पण एक दिवस तिघांनाही शिकवून त्या सर्वांचे दात घशात घालीन, म्हणणारी मानी आई… नशिबानं काळाकुट्ट अंधार समोर ठेवला असतानाही ‘विष न पिणाऱ्या’ अशा महाराष्ट्रातल्या अनेक-अनेक बायका. आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या कुरबुरींच्या, लहानसहान संकटांच्या काळात या सगळ्या जणी कितीतरी बळ देतात. आजूबाजूच्या अनेकांना ‘सतत काहीतरी साजरं करण्याची’ सवय जडलेल्या काळात आम्हाला आत्ममग्न होण्यापासून वाचवतात. मला फार आनंद होतो की आपल्याच विखारी कल्पनेतल्या ‘स्त्री’च्या प्रतिमेत न अडकता या सर्व अग्रेसर महिलांना भेटू शकलो कारण आम्ही ‘डॉक्युमेण्ट्री’वाले आहोत. त्यांच्या पावलांना हात लावायचीसुद्धा आपली पात्रता नाही हे केव्हाच कळून चुकलंय!

हेही वाचा : आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…

वरील प्रसंगातल्या दोेन महिलांची नावं-गावं मी मुद्दाम लिहिली नाहीयेत. त्यांच्या आयुष्यातलं त्या वेळचं ते वास्तव होतं, तेव्हा एक फिल्ममेकर म्हणून मी ते बघितलं, दाखवलं. ते आता बदललेलं असेल, त्यांच्या आयुष्यात या करड्या भूतकाळाला आता थारा नसेल, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कावेरीताईंनी, दीपकभाऊंनी आणि त्यांच्या शांतिवनने कामाचा मोठ्ठा डोंगर उभा केलाय, सुसज्ज इमारती बांधाल्यायत, ‘ही असली मुलं आमच्या गावात नकोत.’ असं म्हणून त्रास देणाऱ्या गावगुंडांना पुरून उरलेत आणि आता त्या गावाचा अभिमान झालेत, या लेखाच्या निमित्ताने हे सर्व आपण पाहावं आणि लक्षात ठेवावं हीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे.

डॉक्युमेण्ट्री हे खरं तर आद्या फिल्ममेकिंग, पण काळाच्या ओघात डॉक्युमेण्ट्रीजचं महत्त्व दुय्यम ठरवलं गेलं. सुदैवाने आता पुन्हा या प्रकाराला चांगले दिवस आलेत. जगभरात उत्तमोत्तम फिल्म्स बनतायत, त्या बनवण्यासाठी ओटीटी फलाट आणि इतर माध्यमं चांगले पैसेसुद्धा देतायत. डॉक्यु-मेकिंगचं तंत्र, मांडणीची पद्धत यात मोठे बदल होतायत. आम्हाला ‘आमच्या’ लोकांच्या, गावच्या, शेताच्या, रानाच्या गोष्टी जगासमोर मांडायच्यात, आम्हीच त्या मांडायला हव्यात. गावा-गावांतून बनणाऱ्या या गोष्टींचे व्हिडीओज करोडोंच्या संख्येनं बघितले जातील. आपल्या मातीतल्या या गोष्टीचं आपलं भान जागं ठेवतील. नव्या माध्यम युगाच्या, ब्रेकिंग न्यूज आणि कल्पित कथा यांच्या मधल्या, प्रतिमेहून सुंदर अशा प्रत्यक्षातल्या गोष्टी. त्या गोष्टी जगणारे, सांगणारे, बघणारे आणि सबटायटल्समधून वाचणारे उत्तरोत्तर वाढतच जातील, असा विश्वास वाटतो.

लेखक, दिग्दर्शक ही प्रामुख्याने ओळख. जाहिरात क्षेत्रातही काही वर्षे कार्यरत. ‘टू मच डेमोक्रसी’ हा शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनावर तयार करण्यात आलेला माहितीपट देशविदेशामध्ये प्रचंड लक्षवेधी ठरला.

office.varrun@gmail.com

Story img Loader