अक्षय इंडीकर
भालचंद्र नेमाडे यांना वाचून त्यांच्या कादंबऱ्यांच्या लांब पल्ल्यांइतके भारावलेपण सगळ्यांनाच येते. पण ते भारावलेपण अंगात भिनवून, मिरवून आणि नंतर मुरवून त्यांच्यावर ‘डॉक्युफिक्शन’ बनविण्याची किमया करणाऱ्या दिग्दर्शकाची गोष्ट…
सिनेमा करणारा माणूस म्हणून काहीतरी आपल्याकडून घडावं, असं प्रत्येक कलावंताचं स्वप्न. स्वत:चा सिनेमा करण्याची इच्छा बाळगावी तर पिढ्यान्पिढ्या कसलाच वारसा नसलेल्या लोककलावंत घरातल्या २३ वर्षांच्या पोरानं पिढीजात घराणेशाहीच्या सिनेमाच्या जादूई जगण्यात असं स्वप्न पाहणं खरं तर हसण्यासारखाच प्रकार. पण स्वप्न बघण्याचं ते वय असावं. तोवर ‘माणूस न परवडणारी स्वप्नं बघत नाही’ ते काही माहिती नसण्याचं वय. त्यात मी फिल्म इन्स्टिट्यूट सोडून बसलेलो. एकतर गावाकडून आलेला प्रत्येक पोरगा निराशेच्या दिवसांत मराठीतल्या कवितांशी जोडला जातो, नाहीतर डाव्या चळवळींशी. डाव्यांशी माझा संबंध ‘नाही’ म्हणण्याशी आला, पण कवितेबाबत तसे झाले नाही.
‘या अफाट विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात निरर्थक ना ठरो’ किंवा ‘डोळ्याआड, डोळ्यातल्या पाण्याआड’ अशा जीवघेण्या ओळी लिहिणारे भालचंद्र नेमाडे त्या सगळ्या घनगर्द जगण्याच्या वर्षात भेटणं, हा कसल्यातरी संचिताचाच भाग असावा. कारण नेमाडे लोकांना भेटण्यापेक्षा न भेटण्यासाठीच अधिक प्रसिद्ध होते. लिखाणातूनसुद्धा त्यांची भेट दुर्मीळच, कोसला पंधरा दिवसांत उसळून आलेली, तर पुढे तेरा-चौदा वर्षांनी पाठीवर बिऱ्हाड घेऊन चांगदेव महाराष्ट्रभर फिरलेला. संबंध हिंदुस्तानचा हजारो वर्षांचा पट खंडेराच्या सोबत ‘हिंदू’तून उलगडला- तोही कित्येक वर्षांनी. नेमाडेंच्या कविता माझ्या ‘त्रिज्या’ नावाच्या सिनेमाच्या बांधणीत येत होत्या. एका अर्थाने माझा नायक नेमाडपंथीच होता. नायकाच्या कवितांचा पोत, जगण्याची तगमग, स्थलांतराचे सगळे रस्ते ‘मेलडी’ होऊन नेमाडेंच्या वाटेनेच पुन्हा पुन्हा जाणारे होते. कविता हा सगळी भाषा पणाला लावणारा साहित्य प्रकार. ‘त्रिज्या’मध्ये नेमाडेंच्या कविता वापराव्यात हे संहिता लिहितानापासून पक्कं होतं. पण त्यांना भेटणार कसं? त्यांची परवानगी मागणार कशी?
हेही वाचा : आबा अत्यवस्थ आहेत!
एप्रिल २०१४. ठिकाण होतं फिल्म इन्स्टिट्यूटची माझी खोली. मी आरशासमोर उभा राहून मला सांगायच्या मुद्द्यांची उजळणी करत होतो. मनामध्ये धास्ती होती, कारण मला एका महान लेखकाकडे माझ्या चित्रपटासाठी त्यांच्या कवितांच्या वापराची परवानगी मागायची होती- उणंपुरं साडेपंधरा वर्षांचं वय असताना. सोलापूर जिल्ह्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलो होतो. पुणं म्हणजे वेगळं जग होतं, इथं विविध प्रकारच्या कला, साहित्य, विचारधारा एकत्र नांदत होत्या. त्यात फिल्म इन्स्टिट्यूटचं वातावरण म्हणजे पूर्ण वेगळं, स्वप्नवत जग होतं. त्यात आदल्या दहा वर्षांपासून ज्यांच्या साहित्यानं माझ्या मनावर जोरदार छाप सोडली होती असे भालचंद्र नेमाडे. त्यांच्या पुस्तकांनी आणि साहित्यानं माझं व्यक्तिमत्त्व घडवलं होतं, मला विचार करायला लावलं होतं आणि मला त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटायचं होतं.
‘देखणी’ कवितासंग्रहातील काही कवितांचा वापर माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये करायचा होता. (त्याचे आधीचे नाव ‘यात्रा’, पुढे ‘त्रिज्या’ झाले.) ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या त्यांच्यावरच्या चित्रपटाची कल्पनादेखील त्यांना ऐकवायची होती. या सगळ्यासाठी मी पुणे-मुंबई रेल्वेच्या जनरल बोगीमध्ये बसून, लोकांच्या वेगवेगळ्या चेहऱ्यांनी भरलेली गर्दी पाहत, विचारांच्या गोंधळात गुरफटून निघालो.
रेल्वेचे कधी अचानक उगवणारे तर कधी लुप्त होणारे रस्ते, ढगांचे थवे आणि उन्हं पाहात मी निघालो होतो एका सर्जनशील यात्रेसाठी! मुंबई नगरी काही वेगळीच आहे. नेमाडेंनी एकदा कुठेतरी लिहिलं होतं की, ‘जगात तुम्ही कुठेही राहात असलात तरी मुंबईत तुमचा किमान एक मित्र असला पाहिजे.’ हे मला आठवलं, जेव्हा मी मुंबईच्या स्टेशनवर पाऊल ठेवलं.
शब्दांची तयारी करत होतो, पण तरीही मनात धाकधूक होती. एक तर थोर साहित्यिकासमोर जाण्याची भीती आणि दुसरं म्हणजे आपल्या आयुष्याच्या स्वप्नांशी जोडलेलं ते साहित्यिक दर्शन! मुंबईच्या महानगराच्या गोंगाटात आपलं अस्तित्व गिळून टाकणाऱ्या त्या अफाट गर्दीचा अनुभव घेत मी अखेर साहित्य अकादमीच्या ऑफिसात पोहोचलो. मला मुंबईच्या असह्य वेगानं, न थांबणाऱ्या गर्दीनं आणि राक्षसी इमारतींनी निराश केलं होतं. पण मनाच्या कोपऱ्यात एकच आशा होती- नेमाडेंना भेटायची. त्यांच्या थोर साहित्यकृतींनी- ‘कोसला’पासून ‘हिंदू’पर्यंत माझ्या मनावर खोलवर परिणाम केला होता. त्यांच्या लेखणीनं माझ्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून टाकली होती.
हेही वाचा : डॉक्युमेण्ट्रीवाले : धुक्यात हरवलेल्या वाचनाचा शोध…
परंतु या सगळ्या विचारांच्या कोलाहलात एकच प्रश्न डोक्यात सतत फिरत होता- नेमाडेच का? त्यांनी माझ्या आयुष्याला काय दिलं? त्यांच्या निर्भीड लिखाणामुळे ते अनेक वादांत अडकले होते, तरीही त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्य मला खूप भावलं होतं. त्यांच्या लेखनातून समाजातील कटुता, माणसाचं नैतिक अवसान आणि त्यांचा आक्रमक दृष्टिकोन मी अनुभवला होता. त्यांच्या लिखाणातील ती धडाडी, निर्भयता आणि सत्य सांगण्याचं धाडस मला आकर्षित करत होतं. आणि आता मी त्यांच्या पुढे उभा राहून माझ्या चित्रपटासाठी त्यांची परवानगी मागणार होतो.
सकाळचे दहा वाजले होते. साहित्य अकादमीच्या ऑफिसचं वातावरण शांत होतं, पण तरीही एक अदृश्य भार जाणवत होता. अचानक नेमाडे तिथं आले. हस्तांदोलन केलं आणि प्रेमानं म्हणाले, ‘‘या अक्षय, बसा.’’ त्यांच्या बोलण्यातली सहजता आणि आस्थेचा स्वर माझ्या मनावरचं दडपण कमी करत होता. त्यांनी माझी चौकशी केली- मुंबईत कसा आलास, प्रवासात काही अडचण झाली का, न्याहारी केली का, तू मूळचा कुठला?… त्यांच्या त्या मायेच्या बोलण्यानं मी क्षणभर विसरून गेलो की मी एका थोर साहित्यिकाच्या समोर बसलो आहे. त्या क्षणाला आम्ही दोघंही एकाच वयाचे होतो. दोन समान विचारांच्या व्यक्ती जणू संवाद करत होत्या.
मी माझ्या चित्रपटाची- ‘त्रिज्या’ची संकल्पना आणि त्यांच्या ‘देखणी’तील कवितांच्या वापराची परवानगी मागत होतो, तेव्हा त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांचा चेहरा गंभीर होता, पण त्यांचं एक हलकं हसू, त्यांची तल्लख बुद्धी आणि अनुभवांचा पसारा मांडणारा तो क्षण मला नवा आत्मविश्वास देत होता.
संवादाच्या शेवटी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. मला त्या क्षणाला जाणवलं की, मी फक्त एका लेखकाला भेटलेलो नव्हतो, तर एका गुरूला भेटलो होतो. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या आयुष्याच्या सर्जनशील प्रवासाला एक नवी दिशा दिली- ज्याचा प्रभाव माझ्या पुढच्या निर्मितीवर दीर्घकाळ टिकून राहिला. डोळे होतेच, पण दृष्टी नेमाडेंनी दिली.
हेही वाचा : निसर्गपूरक वास्तुरचनाकार
मला असं वाटू लागलं की, मी फक्त नेमाडेंशी नाही तर २५ वर्षांच्या ‘पांडुरंग सांगवीकर’शीच संवाद साधत आहे. त्यांनी अगदी थेट विचारलं, ‘काय काम आहे बोला.’ त्यांच्यासमोर उभं राहून मी माझं स्वप्न त्यांच्यासमोर मांडायला सुरुवात केली- ‘तुमच्यावर एक फिल्म बनवायची आहे- ‘उदाहरणार्थ नेमाडे’, पण थोडी वेगळी. जसे तुम्ही आहात, तसंच चित्रपटात तुम्हाला दाखवायचंय. तुमच्या कादंबऱ्यांमधील नायक, तुमच्या कवितांमधील मर्म, लोकसंगीताची धुंदी आणि तुमचं अनुभवसंपन्न जगणं- यांचा मिलाफ करून चित्रपट तयार करायचा आहे.’’
मी बोलत असतानाच त्यांनी एक क्षणही न दवडता तात्काळ होकार दिला. ‘‘कर, तुला जशी करायची तशी फिल्म कर.’’ पुढे ते म्हणाले, ‘‘सिनेमातला प्रत्येक शॉट संपूर्ण ताकदीने घे, जसा मी माझ्या कवितेतला प्रत्येक शब्द ताकदीने वापरतो तसा.’’ नंतर प्रेमानं म्हणाले, ‘‘अक्षय, तुझ्याएवढा असतानाच मी ‘कोसला’ लिहिलीय. तू त्या भावनेला व्यवस्थित समजू शकतोस.’’ त्यांच्या या शब्दांनी मला उभारी दिली होती. या विलक्षण माणसासह माझ्या ‘यात्रा’ची खरी सुरुवात झाली होती. पण गंमत अशी झाली की ‘यात्रा’ या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास बाजूला सारत मी पूर्णपणे ‘उदाहरणार्थ नेमाडे’च्या जगात ओढला गेलो.
२०१५ हे संपूर्ण वर्ष माझं पूर्णपणे ‘नेमाडेमय’ होऊन गेलं. त्यांच्याबरोबर (त्यांनी सुरुवातीला दिलेल्या) तीन दिवसांत मला एक लेखक, एक विचारवंत आणि एक व्यक्ती म्हणून खूप काही शिकवलं.
‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटाचा प्रवास म्हणजे फक्त चित्रपट बनवण्याचा अनुभव नव्हता, तर तो जीवनानुभव होता. ज्ञानोबा, तुकाराम, बालकवी, मर्ढेकर, बहिणाबाई या सगळ्या मराठीच्या जागतिक परंपरेत बसणारं नाव भालचंद्र नेमाडे. दीड तासाच्या डॉक्युफिल्ममध्ये ते कसं मांडणार? फॉर्मची जुळवाजुळव हा सगळ्यात मोठा पेच समोर होता. जितका विलक्षण प्रभाव एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावर तितकं त्या सिनेमाकडे, त्यातल्या पात्रांकडे तटस्थपणाने बघणं दिग्दर्शकाला कठीण जातं. इथं तर त्या माणसाला कॅमेऱ्यात कैद करायची तगमग सुरू होती. नेमाडे म्हणजे चक्रधरांच्या शब्दांतले हत्ती आहेत. हत्ती कसा होता? शेपूट पाहिलेले लोक सांगतात असा, कान पाहिलेले म्हणतात असा, कोण कसा कोण कसा. मी ती गोष्ट त्यांच्याचकडून ऐकली होती त्यामुळे फारसा विचार न करता आपण ज्या वयाचे आहोत त्या समजेनुसार फिल्म करायची इच्छा होती. फॉर्म, रचनासूत्र सापडणं कुठल्याही कलाकृतीच्या निर्मितीतील सगळ्यात मोठं आव्हान. फिक्शन करायचं? नॉन फिक्शन स्वरूपाचं, मुलाखतीवजा काही की व्हॉइसओव्हरसोबत दृश्यांची संगती? इथंही पुन्हा नेमाडेंचीच जीवनदृष्टी कामाला आली. अनेकवचनी भूतकाळ. आपल्या परंपरेत मूळ कथा कुठली ही विसरण्याइतपत कथांतर्गत कथा सांगण्याची देशी पद्धत वापरू आणि नेमाडेंच्या सोबत केलेल्या प्रवासाला सिनेमॅटिक रूप देऊ; तसंच तर्काच्या आधारावर काही बांधत बसण्यापेक्षा अंत:प्रेरणेला प्रमाण मानून कवितेसारखी काहीशी सैलसर रचना करायचं ठरलं. जगभरचे सिनेमे बघण्याचा नाद होताच, जगातल्या वेगवगेळ्या भाषांत लेखकाच्या जगण्याला किती आस्थेनं बघण्याची पद्धत होती हे समजतं. अगदी चेकॉव्ह, दोस्तोव्हस्की, पेसोआपासून ते जुझे सारामगोपर्यंत डॉक्युमेण्टेशनची प्रोसेस खूप आस्थेनं जगभर केली जाते. त्या त्या भाषेतला लेखक लिहितो कसा, बोलतो कसा, लिहिण्याची खोली, बालपणीचे फोटो, अनुभवविश्व तयार होताना निर्मितीची जीवघेणी प्रक्रिया गुंगतागुंतीची म्हणजे नेमकी कशी?, स्वप्नं पडतात का?, पडली तर ती आठवतात का? हे लेखकांना विचारून ठेवावं असं वाटायचं. शेकडो गोष्टींची प्रक्रिया होत होत एखादी कादंबरी आकाराला येते. जे पेशीत तेच सबंध शरीरात अशी समजूत घेऊन नेमाडेंच्याबरोबर काही दिवसांची भटकंती दाखवत काळाचा तुकडा पुढे-मागे करत त्यांच्या कादंबरीमधली पात्रं दृश्य रूपात आणत मराठीत दुर्मीळ असा डॉक्युफिक्शन फॉर्म आम्ही उभारायचा ठरवला. कल्पनेतला सगळा डोलारा प्रत्यक्षात आणायचा म्हणजे सिनेमाच्या उभारणीत मोठा खर्चीक कारभार. अनेकांशी बोलणी सुरू झाली. कित्येक पत्रं लिहिली, अनेक संस्थांना आर्जवे केली. पण सुरुवातीला कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. कुणी ‘हो हो’ म्हणालं, कुणी म्हणालं, ‘या संस्थेकडे नको त्या संस्थेकडे जा.’ मग लक्षात आलं नेमाडेंवर जितके निस्सीम प्रेम करणारे लोक आहेत तितकेच नेमाडेंच्या कामावर सातत्याने टीका करणारेही लोक आहेत. मग शेवटी माझी पत्नी तेजश्री आणि मी ठरवलं, काही रक्कम कर्ज स्वरूपात घ्यायची आणि शूटिंग सुरू करायचं. शूटिंगच्या प्रक्रियेत कुणाचा कलात्मक हस्तक्षेप नसावा, ही एक इच्छाही आपोआपच पूर्ण झाली. आपल्याला हवी तशी फिल्म करता येण्यासाठी लागणारी टीम जुळत गेली. तेजश्री, स्वप्निल, संजय, केतकी, क्षमा हा सगळा चमू आत्मीयतेनं जोडला गेला. शूटिंगच्या आधी आणि नंतर माझा पत्ता ‘डोंगर सांगवी’ असा झाला. खान्देश, मुंबई, पुणे, औरंगाबाद परिसर अशा अनेक ठिकाणी जवळपास ७० दिवसांचं चित्रीकरण झालं. काही भाग पुन्हा पुन्हा चित्रित झाला. नेमाडेंच्या कार्यक्रमांचे दौरे सुरू होते. त्यांची काही व्याख्यानं सुरू होती. त्यांच्यासोबत गेलो. नेमाडेंच्या मूळ गावी त्यांच्याच घरी राहून लिहिलेली संहिता प्रत्यक्षात येताना बघत होतो. याच काळात डोंगर सांगवीतील मौखिक परंपरा जवळून अनुभवता आली. महानुभवपंथी मठ, लीळाचरित्र समजून घेता आले. त्यांच्या ‘कोसला’च्या हस्तलिखितापर्यंतची प्रक्रिया ऐकता आली. या कामात शूटिंगच्या दरम्यान एका सद्गृहस्थांची खूप मोलाची मदत झाली- राजन गानू त्यांचं नाव. अतिशय मोक्याच्या क्षणी त्यांनी मदतीचा हात दिला. शूटिंग झाल्यावर अजून काही भागांचं चित्रीकरण करावं, काही केलेल्या दृश्यांना पुन्हा चित्रित करावं, नेमाडेंची अनेक विषयांवरची मतं, अनेक प्रश्न सविस्तर पद्धतीनं यावेत अशी आमची इच्छा होती. या कामात आमच्या फिल्मची निर्मिती करणारी, व्यवस्था सांभाळणारी, मराठी साहित्यावर प्रेम करणारी निर्मिती संस्था जोडली जावी अशी इच्छा होती. अरविंद पाखले यांच्यारूपाने सगळ्या पोस्टप्रोडक्शनच्या प्रक्रियेला गती आली तेव्हा कुठे वाटू लागलं की, ही फिल्म अंतिम स्वरूपात पडद्यावर येईल. सिनेमाची निर्मिती काही एकट्याच्या खांद्यावर टाकता येणारी गोष्ट नाही. आम्ही शूटिंग नंतर छोटासा चार मिनिटांचा ‘ट्रेलर’ काही संस्थांना दाखवला. मग त्यांना खरंच यात नेमाडे आहेत हा विश्वास बसला. त्यांचा प्रवास पडद्यावर बघायला मिळावा म्हणून मराठी साहित्यावर प्रेम करणारी, भाषेवर प्रेम करणाऱ्या काही संस्था जोडल्या गेल्या. ठिकठिकाणी त्याचे प्रयोग करण्याचं ठरलं. ‘कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन’, ‘जैन फाउंडेशन’ या संस्थांचा कृतज्ञतेने मी उल्लेख करेन.
हेही वाचा : दहा दिशांनी, दहा मुखांनी…
आज आठ-नऊ वर्षांनी शूटिंगचा पहिला दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो. फिल्म पूर्ण झाल्यावर जगभरातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी ती पाहिली. या फिल्ममुळे मला उमजले ते नेमाडे – भाषा अनेक अंगांनी खेळवणारे, विश्वसाकल्याचा चिरंतन ठेवा मराठी मातीत रुजवू पाहणारे भाषाप्रभू म्हणून. वयाच्या २३, २४ व्या वर्षी केलेली फिल्म आपल्या हातून झालीच कशी याचं आता नवल वाटतं.
अनुराग कश्यप, करण जोहर या दिग्दर्शकांसह अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डबरोबर जाहिराती करणारा, ही ओळख सांगण्यापेक्षा मला भालचंद्र नेमाडेंच्यावर ‘उदाहरणार्थ नेमाडे’ डॉक्युफिक्शन करून सिनेकारकीर्दीला सुरुवात करणारा… हा परिचय अधिक भावतो.
पूर्णवेळ चित्रपट आणि जाहिरातनिर्मिती क्षेत्रात कार्यरत. ‘त्रिज्या’ आणि ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या फिल्म्सचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक. लव्ह स्टोरीया, स्थलपुराण, केनेडी आदी हिंदी चित्रपटासाठी दिग्दर्शन आणि ध्वनिकल्पन.
akshayindikar1@gmail.com