देवदत्त राजाध्यक्ष
अडीच दशकांहून अधिक काळ रशियन पुस्तके मराठीत अनुवादित होऊन येत होती. सचित्र गोष्टींची पुठ्ठा बांधणीची दृश्यश्रीमंत पुस्तके. गोष्टींची, माहितीपर आणि मनोरंजक. अचानक त्यांचा ओघ थांबला. पण पुढे ती वाचत वाढलेल्या समवाचक मित्रांना त्यावर ‘डॉक्युमेण्ट्री’ बनवावीशी वाटली. हा ध्यास घेऊन तयार झालेला माहितीपट इथल्या वाचनाच्या संस्कृतीचाही शोध घेणारा ठरला.
‘सोविएत लिटरेचर इन मराठी’ या फेसबुक पेजमुळे माझी निखिल राणेशी झालेली ओळख. त्याची प्रसाद देशपांडेशी कॉलेजपासूनची मैत्री. ‘आय. सी. कॉलनी’तल्या प्रसिद्ध बर्गरच्या निमित्ताने झालेली आम्हा तिघांची भेट आणि गप्पा यात ‘धुक्यात हरवलेले लाल तारे’ची बीजं रोवली गेली. आम्ही तिघांनीही मराठीत अनुवादित झालेली सोविएत- रशियन पुस्तकं लहानपणापासून वाचली होती. त्या पुस्तकांत जाणवलेला रशिया आताही तसाच अनुभवता येईल का, याबद्दल आम्ही चर्चा (खरं तर फँटसाईझ) करत होतो. या भेटीच्या काही महिने आधीच प्रसाद ‘द ग्रेट इंडियन वर्ल्ड ट्रिप’ नावाच्या, सहा खंडांतील मोहिमेचं व्हिडीओचित्रण करून परतला होता. आपसूकच, रशियात जाऊ, ट्रान्स-सैबेरियन रेल्वेने प्रवास करू आणि तिथल्या अनुभवांवर माहितीपट करू अशी एक कल्पना सुचली. पण यासाठी लागणारा वेळ आणि संसाधनं आमच्याकडे नव्हती. काहीसे निराश होऊन ‘फ्रेंच फ्राईज’ चघळत होतो तेवढ्यात प्रसाद म्हणाला, ‘‘रशियाशी आपली तोंडओळख झाली ती बालसाहित्यामुळे. मग त्याबद्दलच डॉक्युमेण्ट्री का करू नये?’’ हे निखिलला आणि मला पटलं. बालपणी वाचलेल्या पुस्तकांचा प्रभाव आपल्या भावविश्वावर अधिक काळ, अधिक प्रमाणात राहतो. मग मराठी वाचकांच्या किमान एकदोन पिढ्यांवर असा प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांचा मागोवा घ्यायला मजा येईल! माहितीपटाचा विषय तिथेच नक्की झाला.
आता हे ‘सोविएत रशियन पुस्तकां’चं प्रकरण काय आहे, याची माहिती कदाचित ‘जेन झी’ वाचकांना नसेल. तर साधारण १९५०च्या दशकापासून सोविएत संघाच्या सरकारनं आपलं पारंपरिक आणि आधुनिक वाङ्मय जगाच्या निरनिराळ्या भाषांमध्ये अनुवादित करून निर्यात करायला सुरुवात केली. यात कथा-कादंबऱ्या-कविता, विज्ञानविषयी वाङ्मय, राजकीय आणि सामाजिक विषयांवरची पुस्तकं आणि पुस्तिका, निरनिराळ्या विषयांवरची नियतकालिकं (उदा. स्पुतनिक, सोविएत देश, सोविएत नारी, मीषा इ.) हे सर्व होतंच, पण बाल-कुमार साहित्यदेखील मोठ्या प्रमाणात होतं.
हेही वाचा : कॉर्पोरेट राजकारणाचे ताणेबाणे
पारंपरिक परीकथा आणि लोककथा (उदा. रशियन लोककथा, सुंदर वासिलीसा), विज्ञानाबद्दल सोप्या भाषेत माहिती देणारी पुस्तकं (उदा. ‘माणूस महाबलाढ्य कसा बनला’, ‘सूर्यावरचे वारे’), साहसकथा (उदा. ‘दोन भाऊ’), विनोदी कथा (उदा. ‘देनिसच्या गोष्टी’), युद्धकथा (उदा. ‘इवान’) असा विस्तीर्ण परीघ असलेलं सोविएत बाल-कुमार साहित्य आपल्याकडे लोकप्रिय होण्याची बरीच कारणं होती- विषयांचं वैविध्य, सुंदर रंगीबेरंगी चित्रं, उत्तम कागद आणि बांधणी, माफक किंमत आणि सहज उपलब्धता. १९६० ते १९८० च्या दशकांमध्ये मराठीत अनुवादित सोविएत रशियन पुस्तकं मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती आणि लोकप्रियही होती.
पण १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सोविएत संघाच्या अस्ताच्या आसपास सोविएत पुस्तकांचा अनुवाद आणि निर्यात ठप्प झाली. प्रसाद, निखिल आणि मी बर्गर आणि ‘फ्रेंच फ्राईज’ रिचवत होतो तेव्हा सोवियत संघाचा अस्त होऊन दोन दशकं होऊन गेली होती. सोविएत बाल-कुमार साहित्याचा मागोवा आता कसा घ्यायचा? आणि या साहित्याची गोष्ट माहितीपटात कशी सांगायची?
आमची संकल्पना काहीशी अशी होती- कोणतीही वस्तू ही मानववंशशास्त्राचा सांस्कृतिक ठेवा असू शकते. मराठीत अनुवादित, सोविएत संघात प्रकाशित असं मुलांचं एखादं पुस्तक पाहिल्यावर कोणकोणते प्रश्न पडतील- रशियन पुस्तकांचा मराठीत अनुवाद का झाला, कोणी केला? ही पुस्तकं भारतात कशी यायची, लोकांपर्यंत कशी पोचायची? ही पुस्तकं कोण वाचायचं? ही पुस्तकं येणं कधी आणि का थांबलं? आता ही पुस्तकं कुठे आहेत? वाचकांना या पुस्तकांबद्दल काय आठवणी आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एकच मार्ग होता- लोकांना भेटणं, बोलतं करणं आणि त्यांच्या आठवणींमधून सोविएत रशियन बाल-कुमार साहित्याच्या गोष्टीची वीण उलगडणं.
प्रश्नांची उत्तरं काय असतील हे समजेपर्यंत डॉक्युमेण्ट्रीची दिशा नक्की करणं कठीण होतं. अनेक जणांनी दिलेल्या माहितीतून आणि डॉक्युमेण्ट्री करताना केलेल्या संशोधनातून हळूहळू आमच्या कथेचे आयाम उलगडत गेले. जणू रशियन ‘मात्र्योष्का’ बाहुलीसारखे.
प्रसादला दृक्-श्राव्य माध्यमाचा उत्तम अनुभव होता. कोणत्याही चांगल्या माहितीपटाच्या अखेरीस प्रेक्षकांना कोणत्यातरी भावनेची जाणीव व्हायला हवी हे त्यानं आम्हाला सांगितलं – ती भावना आनंद, दु:ख, चीड, काहीही असू शकेल. ‘धुक्यात हरवलेले लाल तारे’च्या प्रेक्षकांना बालपणीच्या आठवणींबद्दलचा आनंद, सोविएत बाल-कुमार साहित्याच्या प्रवासाबद्दल आणि प्रभावाबद्दल आश्चर्य आणि कुतूहल वाटलं तर आमचं ध्येय पूर्ण होणार होतं.
हेही वाचा :वैद्याकीय क्षेत्रातली अस्वस्थ करणारी कहाणी
सोविएत पुस्तकांच्या आठवणींच्या शोधासाठी आमचं पहिलं गंतव्यस्थान सोपं होतं- लोकवाङ्मय प्रकाशन गृह. लोकवाङ्मय हे काही सोविएत पुस्तकांचे सहप्रकाशक होते हे आम्हाला ठाऊक होतं. निखिलच्या ओळखीने तिथं सहज अपॉइंटमेंट मिळाली आणि मग तिथे अनेकदा चर्चासत्रं झडली. चारुल जोशी, सुकुमार दामले, राजन बावडेकर, डॉ. भालचंद्र कानगो या सर्व कॉम्रेड्सनी सोविएत पुस्तकांचा इतिहास, अनुवादाची प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली. सोविएत बालसाहित्याचं पुनर्प्रकाशन करण्यातही लोकवाङ्मयला रस होता, मग ते कामदेखील सुरू झालं.
लोकवाङ्मयमधूनच मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद पाटकरांशी आणि शिवाजी विद्यापीठातील डॉ. मेघा पानसरेंशी ओळख झाली आणि ‘टीम धुहलाता’ मुंबईबाहेरील पहिल्या दौऱ्यावर निघाली. पुण्यात पाटकरांनी सोविएत पुस्तकांच्या विक्रीबद्दलच्या रोचक आठवणी सांगितल्या आणि एकूणच बालवाङ्मयाचा प्रसार होण्यासाठी काय करता येईल याबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले. नंतर कोल्हापूरमध्ये पानसरेंनी अनुवादाच्या प्रक्रियेतील कंगोरे समजावून सांगितले.
वाचकांच्या आठवणी कशा जमवायच्या? फेसबुकसारख्या माध्यमातून सोविएत बाल-कुमार साहित्याच्या चाहत्यांशी ओळखी झाल्या होत्या. त्यातीलच अनेक जण आमच्याशी गप्पा मारायला तयार झाले. यशोदा वाकणकर, ऋग्वेदिता परख, विनील भुरके, सायली राजाध्यक्ष आणि निरंजन राजाध्यक्ष यांच्या मुलाखती घेताना कळलं की, आवडती पुस्तकं, त्यात नेमकं काय भावलं, पुस्तकं कुठे आणि कशी घेतली होती, त्याची पारायणं कशी झाली अशा वैयक्तिक आठवणींमध्येदेखील अनेक समान दुवे आहेत.
सुलभा सुब्रमण्यम् यांनी मुलांच्या मानसशास्त्रीय जडणघडणीत पुस्तकांचा वाटा आणि मुलांच्या बुद्धीला किंवा व्यक्तिमत्त्वाला कमी न लेखणं हा सोविएत पुस्तकांचा महत्त्वाचा पैलू यांबद्दल सांगितलं. रुची म्हसणे आणि ऋजुता घाटे यांनी पुस्तकातील आशय बालवाचकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सविस्तर मतं मांडली. या गप्पांमधून, चर्चांमधून पुढच्या संशोधनाची दिशा दिसू लागली.
बाल-कुमारांसाठी उत्तम कथा लिहिणाऱ्या काही दिग्गज लेखकांच्या मुलाखती घेण्याची संधी आम्हाला मिळाली. अनिल अवचट आणि माधुरी पुरंदरेंनी कसदार बालवाङ्मय कसं असावं याबद्दल मार्गदर्शन केलं. दिलीप प्रभावळकरांनी कथेची रचना कशी होते याची रोचक माहिती सांगितली, गणेश विसपुतेंनी सोविएत पुस्तकांमधील विषयांच्या वैविध्याबद्दल आणि दृक्कलांबद्दल विचार व्यक्त केले आणि अरविंद गुप्तांनी सोविएत बाल-कुमार साहित्याच्या इतिहासाबद्दल सांगून, हा अमूल्य ठेवा जपणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केलं.
हेही वाचा : गुंतवणारी गूढरम्य आदिकथा…
हे सगळं संशोधन, मुलाखती चालू असताना एक प्रश्न मात्र पडला होता – सोविएत संघातून पुस्तकांचा अनुवाद आणि वितरण होत असताना यांत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व्यक्तींशी संपर्क कसा साधायचा? आणि याची उत्तरं अचानकच मिळाली. मॉस्कोमध्ये राहून अनेक सोविएत पुस्तकांचा अनुवाद करणारे डॉ. रविंद्र रसाळ यांनी अनुवादासाठी पुस्तकांची निवड कशी होत असे, अनुवादाची प्रक्रिया कशी होती, याबद्दल स्वत:चे अनुभव विशद केले. मेझ्दुनारोद्नाया क्निगा या सोविएत वितरण संस्थेच्या मुंबईतील कार्यवाह रोहिणी परळकर यांनी मॉस्कोतून भारतात होणारी पुस्तकांची आयात, त्यांची प्रसिद्धी व्यवस्था, वितरण प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. १९९०-९१ च्या सुमारास सोविएत संघाचा अस्त होण्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा अनुवाद आणि निर्यात प्रक्रिया कशी थांबली याची दु:खद कहाणीही रसाळ आणि परळकर यांनी सांगितली.
मुलाखतींव्यतिरिक्त इतर संशोधनही चालू होतंच. शेकडो सोविएत पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या अनिल हवालदारांच्या ‘मुलखावेगळा’ या आत्मचरित्रात अनुवाद प्रक्रियेबद्दल फारशी माहिती मिळाली नाही, पण सोविएत संघातील वातावरणाबद्दल माहिती मिळाली. डॉ. संजय देशपांडेंनीही सोविएत संघातील समाजाबद्दलचे अनेक सांस्कृतिक संदर्भ सांगितले. २०१७ मध्ये धुहलाताचं काम जवळजवळ संपत आलं होतं तेव्हाच मला इतर कामासाठी मॉस्कोत जाण्याची संधी मिळाली. सोविएत पुस्तकांमध्ये नमूद केलेल्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या आणि लाल चौकात एक ऑन-लोकेशन शूटदेखील करता आलं.
जवळपास दोन वर्षं घेतलेल्या मुलाखतींमधून नेमके वेचे निवडणं, त्यांचं संकलन करून सुसंगत मांडणी करणं आणि सोविएत रशियन बालसाहित्याची गोष्ट रंजक आणि रोचक पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करणं हे कठीण आव्हान प्रसादनं लीलया पेललं. विविध पैलूंबद्दलच्या मुलाखतींमधले विचार मांडताना डॉक्युमेण्ट्रीत सुसूत्रता येण्यासाठी माझं आणि निखिलचं सूत्रधार स्वरूपाचं काही शॉट्स घेणं हीदेखील त्याचीच कल्पना. काही निवडक गोष्टींमधील रोचक परिच्छेदांचं अभिवाचन आणि त्या वेळी पुस्तकांतल्या चित्रांचं हलकंसं अॅनिमेशन यांमुळे ती पुस्तकं जणू जिवंत होऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली. माहितीपटात जागोजागी सुयोग्य रशियन गाण्यांचं पार्श्वसंगीत वातावरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरलं. इरावती कर्णिक (निवेदन), शंतनू बोन्द्रे (ध्वनिसंकलन) वैदेही पगडी फणसाळकर (इंग्रजी सबटायटल्स), मंगेश सिंदकर (रशियन सबटायटल्स) यांची महत्त्वाची मदत या प्रकल्पाला लाभली.
सैन्य पोटावर चालतं. ‘धुक्यात हरवलेले लाल तारे’ बनवताना त्यातून उत्पन्न मिळवायचा आमचा बिलकुल मानस नव्हता. पण प्रवास, तांत्रिक बाबी, सेन्सर सर्टिफिकेट, इत्यादी गोष्टीसाठी तरतूद करावी लागणार होती. अनेक व्यक्तींनी आणि संस्थांनी आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं. विविध प्रकारची माहिती दिली, प्रोत्साहन दिलं. त्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण झालाच नसता.
‘धुक्यात हरवलेले लाल तारे’ करताना सोविएत बाल-कुमार साहित्याचा नॉस्ताल्जिया मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे याची प्रकर्षानं जाणीव झाली. लोकवाङ्मयशिवाय पायोनियर, ऊर्जा अशा इतर काही प्रकाशनांनीदेखील रशियन बालसाहित्याचं पुनर्प्रकाशन केलं आहे ही माहिती मिळाली. सोविएत बाल-कुमार साहित्य हे काळाच्या उदरात गडप झालेलं नसून आजही बालवाचकांना भावेल असा विश्वास वाटल्यानं, ‘पेसेन्का युनीख चितातेलेई’ (बालवाचकांचे गीत) या सोविएतकालीन गीताच्या पार्श्वसंगीतावर सोविएत पुस्तकं वाचणाऱ्या मुलांचं चित्रण असा आम्ही माहितीपटाचा शेवट केला.
हा आमचा माहितीपट मुंबई, कोल्हापूर, व्हॅन्कूव्हर, सिएटल, सेंट पीटर्सबर्ग येथे ‘मीडिया काँग्रेस डायलॉग ऑफ कल्चर्स’ या आंतरराष्ट्रीय कलामंचावर. मॉस्कोमध्ये भारतीय दूतावासात आणि अनेक ठिकाणी प्रदर्शित झाला. आमचे या पुस्तकांबाबतचे वेड माहितीपटातून ठिकठिकाणी दाखवताना, ते इतरत्रही आमच्याचसारखे किती प्रमाणात होतं हे कळालं.
हेही वाचा : द कम्प्लीट मॅन…
आमच्या माहितीपटाचा विषय पुस्तकं हा असल्याने, आजच्या दृक्-श्राव्य माध्यमांच्या काळात पुस्तकांचं स्थान आहे का, हा मुद्दा विचारात आला होताच. माहिती, रंजन, कल्पनाविलासाला चालना या सर्व बाबी लक्षात घेता पुस्तकांचं स्थान अढळ आहे असं आम्हाला वाटतं. पण कालानुरूप पुस्तकांच्या मांडणीत आणि वितरणात बदल झाले पाहिजेत हेदेखील आम्हाला मान्य आहे.
माहितीपटांचंही काहीसं तसंच आहे. रील्स वगैरेत अडकलेल्या मनोरंजनाच्या काळातही लोकांना सकस, बुद्धीला चालना देणारं काही तरी हवंच असतं. ही गरज माहितीपट निश्चितच भागवू शकतात. निव्वळ डॉक्युमेण्ट्री का डॉक्यु-ड्रामा हा निर्णय विषयावर आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर घेता येईल. यूट्यूबसारख्या माध्यमातून कलेचे लोकशाहीकरण झाले आहे हादेखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. मोठी वितरण व्यवस्था हाती नसतानाही यूट्यूबद्वारे डॉक्युमेण्ट्रीचे प्रसारण करणे शक्य आहे. प्रेक्षकांपर्यंत पोचणं सोपं नाही, पण आम्ही ‘धुहलाता’मध्ये नमूद केलेला विश्वास या बाबतीतही वाटतो – ‘सोविएत बाल-कुमार वाङ्मयाच्या पुनर्जीवनासाठी विविध प्रयत्नांची सुरुवात झाली आहे. आम्हाला अशा आहे की पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांद्वारे हे वाङ्मय मोठ्या प्रमाणात मुलांपर्यंत पोहोचेल आणि धुक्यात हरवलेले लाल तारे पुन्हा चमकू लागतील.’
devadatta_ r@yahoo. com