प्रसाद नामजोशी
जिथे प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे आणि कुणीही स्वत:ला इंस्टाग्रामवर डीओपी, डिरेक्टर, फिल्ममेकर असं कुणालाही न विचारता म्हणू शकतो तिथे आधी एखाद्या विषयाचा अभ्यास करा, चित्रपट माध्यमाचाही अभ्यास करा आणि मग डॉक्युमेण्ट्री करा. वर ती लोकांनी बघावी यासाठी आणखीन वेगळे प्रयत्न करा हे सांगायचं तरी कुणी आणि कुणाला? या परिस्थितीत स्वत:ला घडविणाऱ्या दिग्दर्शकाविषयी…
In feature films the director is God; in documentary films God is the director!
प्रसिद्ध दिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक याचं हे वाक्य तसं चमकदार आहे. मात्र दुसऱ्याच्या तोंडावर फेकायला अत्यंत उपयुक्त असलेलं हे वाक्य जोवर तुम्ही प्रत्यक्ष चित्रपट आणि माहितीपट दोन्हीही करत नाही तोवर तुम्हाला नेमकं कळत नाही. हे फक्त फेकण्याचं वाक्य नसून प्रत्यक्ष जगण्याचं आहे याची प्रचीती आली की हिचकॉकचा थोरपणा अधिक जास्त कळतो.
हेही वाचा : प्रत्येकाचा जलसण वेगळा…
चित्रपटापेक्षा डॉक्युमेण्ट्री ही जरा नॉन-ग्लॅमरस भानगड आहे. तुम्ही काय बुवा फिल्मवाले, आम्ही आपले डॉक्युमेण्ट्रीवाले अशा प्रकारचं बेअरिंग खुद्द अनेक डॉक्युमेण्ट्रीवाली मंडळी घेत असतात. कारण कागदाऐवजी कॅमेरा घेऊन डॉक्युमेंटेशन केलं की झाली डॉक्युमेण्ट्री, असा समज अनेक डॉक्युमेण्ट्री करणाऱ्यांचाच आहे. एक विषय निवडायचा, त्यासंबंधित लोकांच्या मुलाखती घ्यायच्या, त्याला कवेत घेणारं स्क्रिप्ट लिहायचं. (आपल्या भारतात… सुरुवात!) व्हॉईस ओव्हर करायचा आणि सगळं एकमेकांना जोडून त्याला एक तरल असं नाव द्यायचं की झाली डॉक्युमेण्ट्री. शीर्षक जीए कुलकर्णी किंवा ग्रेस यांच्याकडून उधारीवर आणलेलं असेल तर उत्तमच. गंमत म्हणजे अनेक डॉक्युमेण्ट्री करणाऱ्यांना, ती बघणाऱ्यांना आणि स्वयंघोषित समीक्षकांनाही हेच वाटत असतं. मात्र डॉक्युमेण्ट्री करण्यासाठी दोन प्रकारची बुद्धिमत्ता लागते. एक तर एखाद्या विषयात खोलवर शिरून त्याचा अभ्यास करण्याची एक वृत्ती असावी लागते आणि त्याचबरोबर दृकश्राव्य माध्यमाचं व्याकरणही ठाऊक असावं लागतं. जो खऱ्या अर्थाने चित्रपट दिग्दर्शक आहे आणि एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची ज्याची तयारी आहे अशाच व्यक्तीनं स्वत:ला डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर म्हटलेलं बरं. अर्थात हे कोणाला सांगायची सोय आजच्या काळात नाही.
माझ्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन माध्यमात झाली. पुणे विद्यापीठातून कम्युनिकेशन स्टडीजमध्ये मास्टर्स आणि रानडेमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम केल्यानंतर मी ई टीव्ही मराठीवर कार्यकारी निर्माता म्हणून काम केलं. त्यानंतर मुंबईला येऊन टीव्ही मालिकांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. टीव्हीवरचे साप्ताहिक कार्यक्रम हळूहळू बंद होऊन प्रत्येक गोष्ट डेली सोपच्या दिशेने जाण्याचा तो काळ होता. डेली सोप नावाच्या दैनंदिन करमणुकीचा आपण आयुष्यभर भाग होऊ शकत नाही, रोज उठून एकाच विषयावरचं चित्रीकरण नोकरी केल्यासारखं महिन्याचे पंचवीस दिवस प्रामाणिकपणे आणि श्रद्धापूर्वक करायला एक वेगळ्या प्रकारचं टेम्परॅमेंट लागतं ते आपल्यात नाही, हे वेळीच ओळखून एन्टरटेन्मेंटऐवजी इन्फोटेन्मेंटकडे जाण्याचा निर्णय योग्य वेळी घ्यावा लागतो आणि त्याचे परिणामही भोगायची तयारी दाखवावी लागते. हे परिणाम मुख्यत: आर्थिक आणि ग्लॅमर या दोन्ही विभागांत नकारार्थी असतात. माझ्या सुदैवाने मला या दोन्ही गोष्टींच्या मागे धावायचं नव्हतं. त्यामुळे शॉर्टफिल्म, डॉक्युमेण्ट्री आणि एज्युकेशनल फिल्म्स ही माझी दिशा ठरवली. त्यासाठी ‘अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही निर्मिती संस्था सुरू केली आणि ‘चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही’ या कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे चालत राहिलो. रस्त्याला वळणं आली, खाचखळगे आले पण डेड एंड आला नाही. या गेल्या वीस वर्षांच्या काळामध्ये काही चांगल्या, वेगळ्या वाटेच्या डॉक्युमेण्ट्री लिहिण्याची, करण्याची आणि त्यातून शिकण्याचीही संधी मिळाली. त्याचा फायदा पुढच्या प्रकल्पांमध्ये होत गेला. विवेक सावंत, अभय आणि राणी बंग, विकास आणि कौस्तुभ आमटे, अशोक बंग आणि निरंजना मारू, अरुण देशपांडे यांसारख्या जाणीवपूर्वक समाजाभिमुख काम करणाऱ्या मंडळींसाठी आणि सर्च, एमकेसीएल, आनंदवन, मन:शक्ती प्रयोगकेंद्र, चेतना विकास, भारतीय भाषा संस्था, साम टीव्ही, प्रसन्न ऑटिझम सेंटर, प्रयोग परिवार, ग्राममंगल, बळीराजा, साथी, सेव्ह द चिल्ड्रन, अशा वेगळ्या वाटांवरच्या संस्थांसाठी काम करता आलं.
हेही वाचा : कहाण्या तर ओल्याचिंबच राहतात…
अनेकदा असं झालेलं आहे की एखाद्या छोट्या गोष्टीमुळे माहितीपटाचा बाज बदलला किंवा एखाद्या दृश्यामध्ये वेगळे परिणाम साधता आले. पैठणीवरची एक डॉक्युमेण्ट्री करत असताना अचानक आमचा कॅमेरामन मुंबईला निघून गेला. वेळेवर कॅमेरामन पैदा करणं शक्य नव्हतं त्यामुळे शेवटचा एक दिवस मीच कॅमेरामन झालो. फ्रेमिंग समजणं, कॅमेरा ऑपरेट करता येणं हे वेगळं आणि कॅमेरामन म्हणून काम करणं हे वेगळं. त्यामुळे चित्रीकरण करताना आपल्या चुका होणार आहेत हे गृहीत धरून एकच शॉट अनेकदा घेऊन ठेवला. संकलन सुरू झालं. पेशवाईनंतर पैठणी विणण्याची कला हळूहळू उतरणीला लागली अशा अर्थाचं काही तरी वाक्य त्या माहितीपटामध्ये होतं. या वाक्याला योग्य असा शॉट मला सापडेना. पण मी चित्रित केलेल्या पैठणीच्या पदराचा एक शॉट लेन्स अॅडजेस्टमेंटची हाताला सवय नसल्यामुळे आऊटफोकस झाला होता. पैठणीचं एक दुर्मीळ डिझाईन दिसतंय आणि हळूहळू ते आऊटफोकस होतंय हा मूळ चुकलेला शॉट मी पैठणी विणण्याची कला उतरणीला लागली अशा अर्थाच्या वाक्यावर वापरला. यामुळे वेगळा परिणाम साधला गेला. एवढंच नाही तर या वाक्यासाठी हा शॉट मुद्दाम प्लॅन करून मी घेतला असंही बघणाऱ्यांचं मत झालं. मी अर्थातच ते दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडलो नाही!
एका प्रकल्पासाठी कोल्हापूरजवळच्या ज्योतिबाच्या डोंगरावर चित्रीकरण करत होतो. तिथे जत्रेच्या काळी येणारे भाविक शिधा किंवा पैसे स्थानिकांना देतात आणि भरपेट जेवून परत जातात. घरोघरी पुरणपोळीच्या शेकड्यांनी पंक्ती उठत असतात. दिवसाला अक्षरश: हजारो पुरणाच्या पोळ्या तयार केल्या जातात. वर्षानुवर्षे ही प्रथा सुरू आहे. मी याचं चित्रीकरण करायला एका घरामध्ये गेलो. चूल दणदणत होती. घरातल्या महिला सकाळपासून पुरणाच्या पोळ्या करत होत्या. मला त्यांच्या मुलाखतीही घ्यायच्या होत्या. पण आत पुरेसा उजेड नव्हता. वीज नव्हतीच. फक्त चुलीतल्या निखाऱ्यांचा प्रकाश. तेवढ्यात एक कल्पना सुचली. घर कौलारू होतं. मालकांची परवानगी घेऊन दोन-तीन कौलं मी काढायला सांगितली. सूर्यप्रकाशाचे झोत त्या घरात पडले. चुलीचा धूर होताच, त्यामुळे प्रकाशाचे तीन-चार कॉलम्स घरामध्ये निर्माण झाले आणि वेगळाच दृश्यपरिणाम साधला गेला.
हेही वाचा : किती याड काढशील?
लोणावळ्याजवळ मन:शक्ती केंद्रासाठी त्यांचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्यावर डॉक्युमेण्ट्री करायची होती. विज्ञानानंदांचं वैशिष्ट्य असे की त्यांनी आपली कुठलीही दृश्य गोष्ट मागे ठेवलेली नाही. त्यांचा फोटो नाही, पुतळा नाही. फक्त नाव. तेही मूळ नाव नाही. त्यांचा चेहरा, नाव, फोटो न दाखवता त्यांच्यावर माहितीपट करता येईल का, असा प्रश्न मला संस्थेच्या विश्वस्थांनी विचारला आणि ते आव्हान म्हणून मी स्वीकारलं. ज्या व्यक्तीवर डॉक्युमेण्ट्री करायची आहे त्याचा एकही शॉट न वापरता फक्त प्रकाश आणि सावलीचा खेळ करून मी हा माहितीपट तयार केला.
आजच्या काळात दृकश्राव्य माध्यम अतिशय सहज हाती आलेलं असताना आपल्या घरच्या, महत्त्वाचं कार्य करण्याऱ्या व्यक्तींचं अत्यंत जबाबदारीने व्हिडीओ डॉक्युमेंटेशन करणं शक्य आहे. तेव्हा वेळ निघून जाण्याच्या आत हे केलं पाहिजे हे माझं म्हणणं माझा मित्र श्रीराम गोखले याला पटलं आणि संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ गायक-नट पंडित शरद गोखले यांच्यावरचा माहितीपट तयार झाला. पुढच्या पिढीला संगीत रंगभूमी, गायक-नट म्हणजे काय हे कळावं एवढा छोटा उद्देश होता. अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी संसाधनांमध्ये हा माहितीपट तयार झाला. त्याला पुरस्कारही मिळाला. काही वर्षांनी शरद गोखलेंचं निधन झालं. त्यांच्याबरोबर काम करणारे एक दुसरे ज्येष्ठ मित्र त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला आले तेव्हा त्यांच्या हातात या माहितीपटाची सीडी ठेवली. ती हातात घेऊन ते म्हणाले, आता खऱ्या अर्थाने शरद अमर झाला.
हेही वाचा : आमचे येथे आरोग्य दुप्पट करून मिळेल
एकदा एक गृहस्थ मला भेटायला आले तेव्हा ते दोनच वाक्यं बोलले. मला माझ्या वडिलांवर डॉक्युमेण्ट्री करायची आहे आणि माझ्याकडे एवढेच रुपये आहेत, तर तुम्ही कराल का? मला त्यांचा प्रश्न आवडला. आणि नेमकेपणासुद्धा. मी म्हटलं एवढ्या रुपयांमध्ये मी डॉक्युमेण्ट्री करून देईन पण तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे. ते म्हणाले आम्हाला यातलं काही कळत नाही, तुम्हाला हवी तशी डॉक्युमेण्ट्री करा. या त्यांच्या वाक्यामुळे माझे डोळे चमकले आणि व्हॉइस ओव्हर न वापरता आपण ही डॉक्युमेण्ट्री करायची असं मी ठरवलं. मग मी त्यांच्या वडिलांचे वेगवेगळे पैलू समोर येतील अशा खूप मुलाखती घेतल्या. मग एडिटरबरोबर आठ-पंधरा दिवस बसून एकेक वाक्य सुटं करून पंधरावीस रंगांचे धागे एकमेकांत गुंफून अर्थपूर्ण कोलाज करावा तशी एक डॉक्युमेण्ट्री तयार केली. एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य कुठल्याही प्रकारच्या निवेदनाशिवाय फक्त जवळच्या मंडळींच्या आठवणींमधून प्रगट होणं हा एक प्रयोग होता. डॉक्युमेण्ट्री बघायला माझ्या स्टुडिओत सगळी मंडळी आली. मी प्रोजेक्टर, सराऊंड साऊंड वगैरे लावून वातावरणनिर्मिती केली. डॉक्युमेण्ट्री बघता बघता सगळ्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. मला वाटलं मी जिंकलो. डॉक्युमेण्ट्री संपली. डोळे पुसत काका म्हणाले, अहो हे सगळं ठीक आहे पण हे सगळे आमचेच आवाज आहेत, याच्यात तुमचा आवाज कुठे आहे? मी म्हटलं माझा आवाज कशाला हवाय? तर ते म्हणाले, तसं नाही डॉक्युमेण्ट्री म्हटलं की कोणी तरी दुसऱ्या माणसाने बोललं पाहिजे. मागून आवाज आला पाहिजे की यांचा जन्म इतके वाजता इतक्या तारखेला झाला वगैरे. त्याशिवाय डॉक्युमेण्ट्री कशी? मी त्यांना माझा हा फॉरमॅट समजवून सांगू लागलो. त्यांना पटेना. मग मी त्यांना याची आठवण करून दिली की तुम्ही मला तुम्हाला हवी तशी डॉक्युमेण्ट्री करा अशी मोकळीक दिली होती. पण त्यावर त्यांचं म्हणणं असं की याच्यामध्ये निवेदनाचा आवाज नाही, त्यामुळे ही डॉक्युमेण्ट्री असूच शकत नाही. शेवटी मी माघार घेतली. कारण मला अर्धेच पैसे मिळाले होते. उरलेले अर्धे डॉक्युमेण्ट्री संपल्यावर मिळणार होते. गणेश जाधव माझा एडिटर. त्याला म्हटलं आपण गाढव आहोत. मी नेहमीप्रमाणे व्हॉइस ओव्हर लिहितो, रेकॉर्ड करून तुला पाठवतो, त्यावर तू शॉट्स लाव आणि विषय संपव. तो म्हणाला हे आधीच केलं असतं तर आपले दहा दिवस एडिटिंग करण्यात फुकट गेले नसते. मग पुढच्या चार दिवसांत आम्ही ‘खरी डॉक्युमेण्ट्री’ तयार केली. मग ती काकांना आवडली.
एक आणखीन वेगळा अनुभव. मुंबईचे एक उद्योगपती वसंत महाजन यांच्या केमिकल फॅक्टरीसाठी कॉर्पोरेट फिल्म करत होतो. तेव्हा जपानचे क्लायंट त्यांना भेटायला आले होते. जपानी लोकांना नुसतं प्रॉडक्ट किती चांगलंय आणि केवढ्याला देतात यापेक्षाही कंपनीची पार्श्वभूमी, मालकाची जडणघडण वगैरे जाणून घेऊन त्यांच्यासोबत सहकार्य करार करायला आवडतं आणि म्हणून ही मंडळी मुंबईला आलेली होती असं त्यांचा मुलगा पराग म्हणाला. काकांचं आयुष्य एखाद्या चित्रपटातल्या हिरोला शोभेल असं आहे. आणि हे असे क्लायंट असतील तर मग त्यांच्या आयुष्याचा प्रवास विस्तारानं सांगणारा माहितीपट आपण करायला हवा असा मी आग्रह धरला. यासाठी माहितीपटाचा माहितीपट असा एक फॉर्म वापरला. एक पत्रकारितेची विद्यार्थिनी शून्यातून विश्व उभं करणाऱ्या एका उद्याोगपतीवर माहितीपट करते आहे, अशी थीम घेऊन त्या माहितीपटाचा माहितीपट आम्ही केला.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : नामशेष पैलूंच्या जतनासाठी…
यातले सर्वच माहितीपट काही जागतिक दर्जाच्या चित्रपट महोत्सवात गेले अशातला भाग नाही. खूप जास्त आर्थिक उलाढाल त्यातून झाली अशातलाही भाग नाही. खूप काही रिसोर्सेस वापरले आणि तांत्रिक गमतीजमती गेल्या असंही नाही. पण आपल्या क्षेत्रात हिरो असणाऱ्या मंडळींचं एक डॉक्युमेंटेशन यानिमित्ताने करता आलं. चार सभ्य घरातली मंडळी यानिमित्ताने जोडली गेली. एका मठ्ठ करमणुकीचा भाग होणं नाकारल्यावरही आपल्या क्षेत्रात हळूहळू काम करत राहता येतं असा विश्वास निर्माण झाला. हिचकॉक म्हणतो त्याप्रमाणे माहितीपटाचा दिग्दर्शक देव असेलही, पण त्याचा निर्माता मात्र मानवच असतो याची जाणीव ठळक होत गेली.
जनसंपर्क या विषयात पीएचडी. अनेक वर्षे जागतिक सिनेमावर रसग्रहण. ‘रंगा पतंगा’ आणि ‘व्हिडीओ पार्लर’ या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन. दख्खनचा राजा ज्योतीबा, मकरसंक्रांत, किल्ले शिवनेरी आदी माहितीपट.
(Shortcut या यूट्यूब वाहिनीवर माहितीपट पाहता येतील. )
prasadnamjoshi@gmail. com