गौरी पटवर्धन
आयुष्यात कधीही संबंध न आलेल्या समाजाशी आणि जीवनाशी संशोधनाच्या निमित्ताने परिचय करून घेणारी ही चित्रकर्ती. यानिमित्ताने राज्यातील आणि पुण्यातील ब्राह्मणेतर चळवळीचा आवाका तिने तपासला. पुण्याचा नागरी इतिहासही धुंडाळला. महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर सांस्कृतिक तणाव लक्षात घेऊन आकाराला आलेल्या माहितीपटांबद्दल…

फिल्ममेकर म्हणून स्वत:चा शोध घेत असताना ९०च्या दशकात ‘जात’ हे वास्तव अचानक माझ्या समोर उभं राहिलं. मजेशीर गोष्ट अशी की ब्राह्मण किंवा इतर द्विज जातीय व्यक्तीला जातीचा ‘अनुभव’ हा दलित आत्मकथनाच्या वाचनातून येत असतो. आणि संवेदनशील व्यक्तीला तो थोडासा टोचतो. तो पचवून ती व्यक्ती पुढे चालू लागते. भौतिक पातळीवर ‘जात’ सहसा टोचत नाही. किंबहुना तिचे फायदे होत राहतात आणि आपण स्वत: जातविरहित झाल्याचा भास देतात. आजूबाजूच्या समाजात (जो पण सहसा द्विज जातीतला असतो) ‘जात’ बहुधा अदृश्य स्वरूपात कार्यरत असते. त्या अदृश्य अवकाशात एक बुद्धिजीवी वर्तुळ तिच्या संवेदनशीलतेला जपत जपत व्यक्तीला सुरक्षित ठेवते. माझ्या वर्तुळाची संवेदनशीलता स्त्री, पर्यावरण, शिक्षण, धर्मनिरपेक्षता याभोवती विणली होती. कलात्मक संवेदनशीलता या विषयांशी पूरक किंवा वैश्विक मानवतावाद यांच्याशी जोडलेली होती. या सगळ्या धूसर व्यवहारात जात दिसलीच तर ती दलितांवरच्या अत्याचाराच्या स्वरूपात दिसू शके, जेव्हा ती व्यक्ती विरोधी भूमिकेतून आपली संवेदनशीलता व्यक्त करू शके. आरक्षणाच्या रूपातून जात नुकतीच आपले अस्तित्व दाखवू लागली होती. माझ्या सुदैवाने माझा दलित समाजाशी संबंध अत्याचाराच्या घटनेद्वारे, त्यांच्यावरील अन्यायाला विरोधी भूमिकेतून नाही तर सकारात्मक रूपातून आला.

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

हेही वाचा : बोलके पुतळे

१९९७ साली भारताच्या ५० व्या स्वातंत्र्य उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक, वैचारिक कार्यक्रम झाले. त्यात एका जर्मन टीव्ही वाहिनीसाठी बाबासाहेब आंबेडकरांवरील फिल्मकरिता संशोधन करण्याकरिता मी प्रथम पुणे कॅम्पमधील मोदीखान्यात गेले. समृद्ध, पुरोगामी वैचारिक, पण खणखणीत अशा दलित जाणिवेशी माझा परिचय वाघमारे परिवाराद्वारे झाला. माझ्या वर्तुळाचा संकुचितपणा मला प्रथम जाणवला. त्याचा धक्का बसला. माझ्या आणि माझ्या जगाच्या पुरोगामीपणाला तडा गेला. पण हे वास्तव समजून घ्यायला मला खूप वेळ लागला. सहजपणे शूट करण्यासारखे, डोळ्यांना दिसणारे हे वास्तव नव्हते. यासाठी ‘अनलर्निंग’ ज्याला म्हणतात, ते करावे लागले. जातीचे आधुनिक अदृश्य अवतार समजून घ्यावे लागले, आंबेडकरी समाज आणि चळवळ कळून घ्यावी लागली. या प्रक्रियेत डॉक्युमेण्ट्री फिल्म उपयोगी ठरली असे वाटते. पण हे काही मी सुरुवातीला जाणीवपूर्वक केले नाही.

यात पहिली गोष्ट मला काहीशी सहजपणे उमगली ती म्हणजे समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत दलित शिक्षकाची भूमिका. व्यक्तीचे सामाजिक स्थान या विषयावर मी काही वाचले किंवा ऐकले नव्हते, पण वाघमारे परिवारासोबतच्या चर्चांमधून ते कुठेतरी माझ्या मनावर ठसले. १९९८-९९ मध्ये Consortium For Educational Communication या यूजीसीच्या संस्थेकडे मी महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांवर एक मालिका करायचा प्रस्ताव दिला आणि त्यांच्याकरिता त्यातील दोन फिल्म्स केल्या. त्यातली एक पुण्याच्या पुष्पा वाघमारेंच्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील शैक्षणिक कार्य आणि अनुभवांवर केली. फिल्म व्हॉइसओव्हरचे तंत्र वापरून सरळ कथानक असलेली अशी होती, पण त्यानिमित्ताने पुणे शहरावरील जातीयतेचा ठसा आणि काही पैलू कळायला मदत झाली. वाघमारे दाम्पत्याकडून महाराष्ट्रातील, विशेष करून पुण्यातील दलित समाज, आंबेडकरी चळवळ यांची माहिती आणि व्यक्तीच्या सामाजिक स्थानाचे महत्त्व कळू लागले. अदृश्य पडदे थोडे दूर होऊ लागले. शहराच्या पूर्व भागाची पुष्पा आणि सुधीर वाघमाऱ्यांबरोबर ओळख झाल्यावर जातीत दुभंगलेला शहराचा नकाशा खणून काढावा असे वाटू लागले. पण त्याच्या राजकीय आणि सामाजिक पैलूंना आकार कसा द्यावा, नरेटिव्ह/ कथानक कसे मांडावे हे कळत नव्हते.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले :‘कान’ महोत्सवापर्यंत नेणारा प्रवास…!

कलाकाराच्या नजरेतून, जाणिवेतून शहरी जीवनाचे दर्शन ही एक भूमिका मला जवळजवळ ८ वर्षांनी गवसली. ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ ही डॉक्युमेण्ट्री मी सुधीर आणि क्रांती वाघमारे या बाप-लेक कला/ चित्रकारांवर केली. यात ब्राह्मणेतर आणि विशेषत: दलित समाजाचे शहरी, आधुनिक जीवन हा केंद्रबिंदू होता. दोन्ही कलाकारांची प्रेरणा त्यांच्या परिसरातील लोक आणि जीवन हे होते. या फिल्मकरिता मला निर्माता मिळाला नाही आणि ती स्वतंत्रपणे निर्माण करण्याचा निर्णय मी घेतला.

९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, जेव्हा डिजिटल तंत्रज्ञान वापरून चित्रपट निर्माण करणे शक्य झाले, फिल्ममेकर्सना स्वतंत्र निर्मिती करणे शक्य होऊ लागले. पुढील काही वर्षांत ते अधिकाधिक सोपे होऊ लागले. डॉक्युमेण्ट्रीची निर्माण प्रक्रिया सुरुवातीपासूनच काही प्रमाणात फिक्शन फिल्म्सच्या तुलनेत सुटसुटीत होती, पण ती अधिक स्वस्त, कमी भांडवलात करता येऊ लागली. याचा भारतातील डॉक्युमेण्ट्री क्षेत्रावर लक्षणीय प्रभाव पडला. एफटीआयआयच्या माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावर मी स्वत:च फिल्म निर्माण करण्याचे ठरवले. निर्माता न मिळाल्यामुळे विषयावर, पटकथेवर विचार करायला मला खूप वेळ मिळाला. बरेच डॉक्युमेण्ट्री फिल्ममेकर्स हे फिल्म करता संशोधन करता करता शूटिंग सुरू करतात. फिक्शन आणि डॉक्युमेण्ट्रीमधील मोठा फरक म्हणजे फील्ड किंवा लोकेशनवरच्या घटनांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत शूटिंग हे डॉक्युमेण्ट्रीचे वैशिष्ट्य. वास्तव जग- जे नकळत व्यक्त होते! या सगळ्या फूटेजमधून मग संकलनाच्या ‘टेबलावर’ (म्हणजे आता कॉम्प्युटरवर) फिल्मला आकार दिला जातो, कथानक बनवले जाते. ही माझी प्रक्रिया नव्हती.

संशोधन सुरू केल्यानंतर शूटिंग सुरू करायला मला एक वर्ष लागले. त्या काळात अधूनमधून पुण्याला येऊन मी मोदीखान्याला भेट देत राहिले. तेव्हा दिसणाऱ्या घटना, प्रसंग शूट करण्याचा मोह होत नव्हता असे नाही, पण माझ्याकडे कॅमेरा नव्हता. माझ्या विषयाचा रोख वेगळा होता आणि तशा प्रकारची उत्स्फूर्त फिल्म करण्याचा माझा उद्देशही नव्हता.

हेही वाचा : बौद्धिक चर्चेच्या पलीकडे…

फिल्मचा केंद्रबिंदू नक्की काय आहे, तो पटकथेतून व्यक्त होत आहे का, या दृष्टिकोनातून मी बरीच उलटतपासणी केली. फिल्ममध्ये फक्त दोन कलाकारांचे विचार, अनुभव आणि वक्तव्य मांडावे की परिसरातील, चळवळीतील आणखी लोकांना आणावे, दोन कलाकारांची दोन विश्वे एकमेकांत गुंफावी की एकमेकांसमोर ठेवावी, या प्रश्नांची उत्तरे शोधत पटकथा लिहिली. दोन्ही कलाकारांचे स्वभाव, त्यांचे भौतिक आणि कलात्मक विश्व आणि त्यातील दृश्यसंगती, यातून ते आणि त्यांचे जग फ्रेम करायची एक शैली ठरवली.

पुणे शहरावर ब्राह्मणांचे वर्चस्व सुमारे १५० वर्षे असल्यामुळे आणि इंग्रजांच्या काळात ते क्षीण न होता दृढ झाल्यामुळे आधुनिक काळात जातीयतेला विरोधही पुण्यातच प्रथम सुरू झाला. सुमारे ७० वर्षे तो प्रखर राहिला, संपूर्ण मराठी समाज त्याने ढवळून निघाला.

साधारण २००० सालानंतर ‘हेरिटेज वॉक’ हा ऐतिहासिक अनुभव देण्याघेण्याचा एक महत्त्वाचा प्रकार भारतात रूढ होऊ लागला. लहानमोठ्या ऐतिहासिक वास्तूंचे जीर्णोद्धार प्रकल्प मोठ्या प्रमाणात अनेक शहरांत राबवले जाऊ लागले. वस्तू, वास्तू, जागा, परिसर यांचा मौखिक (oral) इतिहास याविषयी जागरूकता वाढल्यामुळे हेरिटेज वॉकना प्रतिसादही मिळू लागला. या पार्श्वभूमीवर पेशवाई संस्कृतीचे वेगवेगळे आविष्कार, अवशेष, त्यांचा प्रतीकात्मक वापर आणि ब्राह्मणेतर जाणीवविश्व यातील विरोधाभास उघड दिसू लागला आणि तो पुण्यातच अधोरेखित करता येऊ शकतो हे मला जाणवले. आणि यातून जात-जातीयता ही गोष्ट दृश्य स्वरूपात आणता येऊ शकते हे लक्षात आले. प्रस्थापित उच्चवर्णीय, ब्राह्मणेतर बहुजन, भटके विमुक्त या वेगवेगळ्या सामाजिक गटांची ऐतिहासिक जाणीव एक असू शकते का, ती कशी जोपासली जाते, कशी विस्मरणात जाते किंवा ढकलली जाते याचा मी विचार करू लागले, पण यावर फिल्म झाली ती काहीशी योगायोगाने असे म्हणता येईल.

हेही वाचा : कामगारांच्या व्यथेची मांडणी

२०१५ साली PSBT दूरदर्शनकरिता सुरू होत असलेला एक डॉक्युमेण्ट्री प्रकल्प काही कारणाने होऊ शकत नव्हता आणि मला तातडीने दुसरा प्रस्ताव देणे गरजेचे होते. त्यामुळे ज्या विषयावर विचारमंथन चालू होते त्याचा प्रस्ताव देणे मला अवघड नव्हते आणि तो लगेच मंजूरही झाला. हेरिटेज वॉक हे प्रतीक घेऊन ब्राह्मणेतर चळवळीच्या खुणा शहरात फिल्मच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न करावा असे मी ठरवले. डॉ. बाबा आढावांचे ‘आम्ही पाहिलेले फुले’ तसेच ‘सत्यशोधनाची वाटचाल’ या पुस्तकातून प्रेरणा मिळाली. ‘बिनसावल्यांच्या गावात’ या फिल्मचा प्रवास हा जास्त कठीण आणि धावतपळत झाला. या फिल्मचा कॅनवास खूप मोठा होता, स्कोप ठरवणे सोपे नव्हते आणि commissioned प्रोजेक्ट असल्याने वेळेवर मर्यादा होती. पटकथेकरिता संशोधनाला सुरुवात करतानाच प्रा. विजय कुंजीरांनी माझ्या काही संकल्पनांना धक्का दिला. ब्राह्मणेतर आणि दलित ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वास्तू अजून टिकून असतील/ आहेत अशा कल्पना करणे कसे ‘अब्सर्ड’ आहे हे त्यांनी उलगडून सांगितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, जे जातीअंताच्या लढ्याचे उद्गाते होते, ज्यांच्या कार्याने संपूर्ण महाराष्ट्र जागृत झाला, त्यांचाच वारसा- लिखाण, वस्तू, वास्तू जिथे प्रचंड कष्ट आणि अथक प्रयत्नाने शोधून काढावा लागला, तिथे त्यांच्या सहकाऱ्यांची, अनुयायांची आणि चळवळीतील लहानसहान कार्यकर्त्यांची काय कथा. त्यामुळे काय आहे यापेक्षा काय नाही व त्याची कारणे, पोकळी हा फिल्मचा विषय असू शकतो हे लक्षात आले.

संशोधनादरम्यान वारसा-हेरिटेज आणि जीर्णोद्धार-क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच जातीअंताच्या कामात सजग आणि सक्रिय अशा अनेक लोकांना भेटले व मुलाखती घेतल्या. याकरिता मला अनेकांचे मार्गदर्शन आणि पूर्ण सहकार्य मिळाले. महानगरपालिकेचे जीर्णोद्धाराचे प्रकल्प, प्रस्थापित हेरिटेज वॉकमधील जतन केलेल्या प्रसिद्ध प्राचीन-अर्वाचीन वास्तू, नेत्यांची घरे, पुण्याच्या पूर्व भागातील तालमी, पहेलवान, अनेक समाजांच्या वस्त्या आणि त्यांचे इतिहास, तो न विसरलेली माणसे, फुले वाडा परिसर आणि अहिल्याश्रम, आंबेडकरी चळवळ तसेच धर्मांतर, पानशेत पुरानंतरच्या पुनर्वसनामागचे जातीय राजकारण त्याचबरोबर शहराचा बदललेला भूगोल या सगळ्यातले विरोधाभास आणि विसंगती एका फिल्ममध्ये मांडणे अवघड आहे हे माझ्या लक्षात येत होते, तरीही शक्य होईल ते शूट करावे असे मी ठरवले.

हेही वाचा : मराठी भावसंगीताच्या वाटचालीचा आलेख

पटकथेचे स्वरूप विस्तारित आणि ढोबळ, बऱ्याच डॉक्युमेण्ट्रीचे असते, तसे होते. त्यामुळे या फिल्मला आकार एडिटिंग टेबलवरच द्यावा लागला. इतिहासाच्या प्रस्थापित नरेटिव्हला आव्हान देणारी दलित आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाची प्रतीके, महत्त्वाचे पण विस्मृतीत ढकललेले नेते (शिवराम जानबा कांबळे आणि पर्वतीचा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह) या घटना आणि त्यांची चिकित्सक मांडणी अशी चौकट खूप मेहनतीनंतर कोरता आली. डॉ. बाबा आढावांचे महात्मा फुल्यांचा वाडा, वाङ्मय आणि वस्तू शोधनाचे कार्य हा फिल्मचा केंद्रबिंदू झाला. प्रेक्षणीय असे बरेचसे मटेरिअल (शॉट-सिक्वेन्सेस) हे प्रस्थापित वास्तूंचे होते, ते मोह सोडून कापून टाकल्यावरच दलित-बहुजन कथानक ताकदीने मांडता आले. त्यातही निवड करावी लागली कारण मला फिल्म खूप लांबलचक बनवण्यात रस नव्हता. स्वत: आणि समाज यातल्या नात्याची राजकीय परिमाणे गंभीरपणे पाहता आली, तसेच एका वादग्रस्त, जटिल संकल्पनेला फिल्मच्या फॉर्ममध्ये आकार देता आला याचे समाधान वाटले. स्वतंत्र भारतातही दलित इतिहासाची सावली स्वत:वर न पडू देण्याची काळजी घेणारे असे बिनसावल्यांचे गाव मला दिसले आणि दाखवता आले.

सध्या बेंगळूरु येथे सिनेनिर्मिती आणि सिनेमा शिकविण्यात कार्यरत. कला आणि पर्यावरण या विषयांवर बाल आणि कुमारवयीन मुलांसाठी शैक्षणिक फिल्म्सची निर्मिती. नागरी मानववंशशास्त्र आणि मानवी हक्कांसंबंधी अनेक माहितीपटांचे संकलन. ‘मोदीखान्याच्या दोन गोष्टी’ या माहितीपटाला २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
gourip@gmail.com