क्षमा पाडळकर
तुलनेने इतरांपेक्षा फार उशिराने सिनेनिर्मितीच्या विद्यापीठात प्रवेश घेऊनही योग्य वाटेने घडत जाणाऱ्या दिग्दर्शिका आणि संकलकाची ही गोष्ट. निराश विचारांच्या गर्तेतून व्यक्तीला माहितीपट, सिनेमा बाहेर कसा काढू शकतो आणि कला तसेच व्यवसायासाठी दिशादर्शक कसा बनतो, त्याचीही कहाणी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या तिसाव्या वर्षी मी फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिकण्यासाठी प्रवेश घेतला नसता तर मी कदाचित डॉक्युमेण्ट्रीकडे वळले नसते. असा समज आहे की, डॉक्युमेण्ट्री कंटाळवाण्या असतात. कारण समाजप्रबोधन करणे हे उद्दिष्ट असणाऱ्या, सिनेमाची भाषा कामापुरती कळली तरी चालते असे वाटणाऱ्या अतिशय गंभीर व्यक्ती अशा फिल्म्स करतात. खरेतर भारतात समाज- प्रबोधनही कधीच कंटाळवाणे नव्हते. त्या त्या माध्यमाची चांगली जाण असणारी माणसे ते खूप रंजकपणे करायची. आपले संतकवी घ्या किंवा लोकगीते, लोकनाट्य घ्या! असो. आता बघताना वाटतं की काही योगायोग आणि काही अनपेक्षित धक्के मला पहिली डॉक्युमेण्ट्री करण्यापर्यंत घेऊन गेले.

हेही वाचा : अद्भुतरस गेला कुठे?

तर २००८-९ च्या सुमारास, एम. फील केल्यानंतर मी पुण्यात वेगवेगळ्या महाविद्यालयांत कंत्राटी शिक्षक म्हणून इंग्रजी आणि प्राथमिक फ्रेंच शिकवत होते. हे आपले क्षेत्र नाही असे सतत जाणवत होते. पुढे जाऊन हेच शिकवायचे आहे का, या प्रश्नाला उत्तर ठामपणे ‘हो’ असे येत नव्हते. त्यावेळी दोनतीन गोष्टी एकानंतर एक होत गेल्या. बाबांनी पुण्यात फिल्म अॅप्रिसिएशनचा कोर्स केला आणि घरात जागतिक सिनेमाबद्दल भरभरून बोललं जाऊ लागलं. त्यात मी प्रभात रोडवर फिल्म अर्काइव्हच्या शेजारीच ‘पेइंगगेस्ट’ म्हणून राहायला आले. तिथे इंगमार बर्गमनच्या फिल्म्सचा ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ होणार आहे असे कळले आणि त्याचे फक्त नाव ऐकलेले असल्यामुळे मी तो बघायला गेले. तिकडे नमनालाच ‘सेवन्थ सील’ ही बर्गमनची एक अ़फलातून फिल्म, जी.एंच्या भाषेत बोलायचे झाले तर, पिंजारकेस फिल्म (जी बघून बाहेर आल्यानंतर आइन्स्टाइनसारखे केस आपोआप पिंजारले जातात) होती. फिल्म केवळ मनोरंजन करत नाही तर एक खूप व्यापक आणि गुंतागुंतीचा जागतिक अर्थ मांडू शकते हे अचानक, धाडकन समोर आले. ‘एक्स्प्रेशन’चे एखादे सशक्त माध्यम मीदेखील शोधत होतेच. दोनतीन कथा आणि काही कविता लिहिल्यानंतर भाषा आपले माध्यम नाही हे समजले होते. सिनेमा समजून घेतला पाहिजे असं वाटलं.

तेव्हाच बाबांचा एक तरुण फॅन एक पुस्तक बाबांना द्यायच्या निमित्ताने मला भेटला आणि पहिल्याच भेटीत त्याने मला ‘एफटीआयआय’ला जायचे माझे ध्येय आहे हे सांगितले. अर्थात अशी काही ध्येयं असंख्य मुलं बाळगून असतात आणि त्यासाठी ते अनेक वर्षे प्रयत्न करतात, हे तोपर्यंत मला ठाऊक नव्हते. तो एक शॉर्ट फिल्म करू इच्छित होता आणि त्याने मला त्या फिल्मची स्क्रिप्ट लिहायला मदत करशील का, असे विचारले. मी हो म्हणाले. थोडक्यात ही शॉर्ट ़फल्मि बनण्याच्या प्रवासात ‘एफटीआयआय’ काय आहे, किती महत्त्वाचे आहे, प्रवेश परीक्षा कशी असते हे सगळं कळत गेल आणि आपल्याला हे जमू शकतं असं वाटत गेलं.

हेही वाचा : बालरहस्यकथांचा प्रयोग

पण लग्न न झालेल्या तीस वर्षाच्या मुलीला अजून तीन वर्षाचा कोर्स करते, असं घरी सांगणं प्रचंड अवघड होतं. कोणतीही कला माणसाला कमीतकमी ७ ते १० वर्षाचा कालावधी मागते. त्यात ‘एफटीआयआय’ची प्रवेश परीक्षा दोनतीनदा देऊनही मुले पास होत नाहीत. मग ठरवलं एकदाच ती द्यायची. झाले पास तर ठीक, नाहीतर त्या वाटेला जायचे नाही. २०१० च्या मार्चमध्ये परीक्षा झाली. परीक्षेच्या एक रात्र आधी मी तापाने फणफणले होते. पहाटे चारला पाण्यात बुडतेय असं स्वप्न पडून मी उठले तर पांघरूण घामाने चिम्ब भिजलं होतं. ताप गायब होता. मग ऑक्टोबरमध्ये समजलं पास झाले आणि डिसेंबरमध्ये अॅडमिशन झालंदेखील. मात्र काहीही करून हिला पुढची सात वर्षे ‘एफटीआयआय’ मधून बाहेर पडू द्यायचे नाही असं जणू नियतीच्या मनातच होतं. तिथल्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण आल्यामुळे तीन बॅचेस आधीच रखडल्या होत्या. त्यात आमची नवीन बॅच घेणे त्यांना शक्य नव्हते म्हणून अॅडमिशन नंतर ९ महिने आमचा कोर्सच सुरू झाला नाही. असे करता करता २०१५ च्या जूनमध्ये ‘एफटीआयआय’ च्या विध्यार्थ्यानी जेव्हा संप पुकारला तेव्हा आमची अभ्यासक्रमातील फक्त दोनच वर्षे पूर्ण झाली होती.

मी ३५ वर्षांची विद्यार्थिनी होते. नोकरीत जमवलेले पैसे संपले होते. भविष्य काय आहे हे अजिबात दिसत नव्हतं. जे काही एडिटिंग शिकले होते त्यानंतर सिनेमा कळलाय असं वाटत नव्हतं. त्यात कामानिमित्त मिळालेले मित्र पुढे निघून गेले होते. ‘एफटीआयआय’ मधील इतर विद्यार्थी आणि माझ्यात १० वर्षांचा गॅप होता. सिनेमा करायचाय पण सांगायचं काय आहे? आणि जे सांगायचं आहे त्याला प्रोड्यूसर पैसे देईल? का देईल? मग कशासाठी केला हा अट्टहास? नुसता गुंता. ‘आयडेंटिटी क्रायसिस’ ज्याला म्हणतात त्याच्याशी दोन हात करणे चालले होते. स्वत:ला जिवंत ठेवणे हाच एक मोठा कार्यक्रम झाला होता.

त्यातच कधीतरी डॉक्युमेंटरीशी ओळख झाली. समर नखाते एक दिवस बोलता बोलता म्हणाले, डॉक्युमेण्ट्रीचा कोर्स चालू आहे ना? रमणी नक्की बघ. तो खूप वेगळा आहे. रमणी म्हणजे आर व्ही रमणी. ८० च्या दशकात ‘एफटीआयआय’ मधून पास झालेले, चेन्नईला राहणारे, इंडिपेंडंट डॉक्युमेंटरी फिल्ममेकर. स्वत:ची एक भाषा निमार्ण करू शकलेले, सातत्याने फिल्म्स करणारे, तीस-बत्तीस फिल्म्सचा अनुभव असलेले दिग्दर्शक.

मजा अशी की रमणी त्याच वर्षी आमच्याकडे ‘वर्कशॉप’ घ्यायला आले आणि मी त्यांच्या तीन फिल्म्स बघितल्या. तिथे त्यांनी त्यांची ‘माय कॅमेरा अॅण्ड सुनामी’ नावाची डॉक्युफिचर दाखवली. मी परत उडाले. मी आधी बघितलेल्या कुठल्याच डॉक्युमेण्ट्रीसारखी ती नव्हती. माहितीपर नव्हती, कंटाळवाणी तर बिलकूलच नव्हती, मुलाखतींच्या माळींसारखी नव्हती, सतत हलणारे, कव्हरेज करणारे, झूम इन- झूम आउट करणारे कॅमेरे नव्हते. शॉट्सला कंपोझिशन होतं आणि एडिटिंगला लय होती, विचार होता आणि वरून त्यांनी त्यात वेळोवेळी स्वत:ला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालादेखील पेरले होते.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…

मराठी वाङ्मयात ज्याला ललित म्हणतात अशी केलेली रचना. सामान्य वाचकाला वाचायला तर आवडेलच पण रसिकालादेखील खिळवून ठेवेल अशी. स्वत:च्या आयुष्यातील एखाद्या व्यक्ती, जागा, घटना किंवा आठवणीला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभवती केलेला लालित्यपूर्ण नाच. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून सहज एका आठवणीच्या, जाणिवेच्या, विचाराच्या दालनातून दुसऱ्या, त्याच्याशी ‘लुजली कनेक्टेड’ आठवणींच्या, जाणिवेच्या, विचारांच्या दालनात शिरायचे आणि मुक्त विहार करायचा. हे करता करताच कधी अचानक एखाद्या वाक्यातून एखादा गंभीर विचार/प्रश्न किंवा अनुभवाचा बोल सोडून द्यायचा.

माय कॅमेरा आणि सुनामी ही अशीच कलाकृती होती. विषय काय तर कॅमेरा आणि आठवणी. आठवणी सुनामीसारख्या येतात आणि ते टिपणाऱ्या कॅमेरालापण वाहवून नेतात. खरोखरच रमणी यांचा कॅमेरा चेन्नई समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या सुनामीत वाहून गेला होता. आणि तेथेच वाहून गेली होती त्यांच्या मित्राची छोटी मुलगी. त्या आठवणीने फिल्मची सुरुवात होते. नंतर फिल्म पुढे आठवणी या विषयाला घेऊन मुक्त प्रवास करते. ८३ मिनिटे खिळवून ठेवणारा, हसवणारा, रडायला लावणारा प्रवास. कदाचित फक्त डॉक्युमेण्ट्री सिनेमाच असं रूप घेऊ शकतो ही जाणीव मला त्यावेळी झाली. वाटलं हे अवघडदेखील नाहीये. (अर्थात नंतर कळालं किती अवघड असतं ंते.) नरेटिव्ह फिल्म्सला फार पैसे लागतात आणि ते सगळे परत मिळवायची टांगती तलवार सारखी डोक्यावर असते. गोष्ट सांगा, गाणी भरा, प्रसिद्ध कलाकार घ्या, भावना दुखावू नका. त्रास.

त्यांच्याकडे एक कॅमेरा आणि रेकॉर्डर आहे, ते वाट्टेल तेव्हा वाटेल ते शूट करून ठेवतात. घरी लॅपटॉपवर वाट्टेल तेव्हा वाट्टेल तेवढं एडिट करत बसतात…साध्या घटना, छोटे -मोठे प्रवास, प्रवासात भेटलेली माणसे, पार्ट्या, पाऊस, समुद्र, चित्राची प्रदर्शने, नाचगाण्याचे प्रोग्रॅम…काहीही शूट करून यांची जबरदस्त फिल्म बनते! कमाल आहे! खरी ‘इंडिपेंडंट फिल्ममेकिंग’ जी सगळ्या फंड्सआणि फंड्स देणाऱ्या गव्हर्नमेंट अॅण्ड कॉर्पोरेट बॉडीजच्या तोंडात मारून वर्षानुवर्षे आपल्याला जो करायचंय तो सिनेमा करत राहण्याची ताकद देते! हा माणूस मला मुक्त वाटला. निराश विचारांच्या गर्तेत गेलेली मी परत सिनेमाकडे कुतूहलाने बघू लागले. देशविदेशातील डॉक्युमेण्ट्री बघू लागले.

हेही वाचा : निमित्त:  नॉर्थ ब्लॉक संस्कृती

त्यावर्षी म्हणजे २०१५ जून मध्ये ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी नव्या चेअरमनच्या निवडी विरोधात संप पुकारला. पहिला आठवडा मी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या संपात मला सहभागी व्हायचे आहे की नाही, हेच मला कळत नव्हते. प्रश्न होते. पारंपरिक आंदोलन करणे ही फिल्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची विरोधाची भाषा असावी काय? एक प्रभावी माध्यम हातात असताना आपण पारंपरिक संप का करतोय? संप हा वर्षानुवर्षे वापरला जाणारा मार्ग आहे त्यामुळेच त्याला नेस्तनाबूत करण्यासाठीची यंत्रणादेखील आधीच तयार आहे. मग का आपण आपली ऊर्जा घालवतोय? संप नसेल तर मग दुसरा मार्ग काय?

आठव्या दिवशी संपाला सपोर्ट करण्यासाठी ‘एफटीआयआय’ चे खूप माजी विद्यार्थीही आले. त्यात रमणीदेखील होते. सकाळीच ते मला मेन गेटमधून आत येताना दिसले. त्यांनी त्यांचा कॅमेरा सॅकमधून बाहेर काढला आणि सॅक मला माझ्या रूममध्ये ठेवून द्यायला सांगितली. वाटलं त्यांच्याशी बोलावं, आपले प्रश्न मांडावेत. पण रात्री उशिरापर्यंत ते शांतपणे काहीबाही शूट करत होते. रात्री माझ्याकडून त्यांनी सॅक घेतली आणि ते चेन्नईला परत गेले.

त्या रात्री मी झोपलेच नाही म्हटले तरी चालेल. प्रचंड अस्वस्थता. अनेक निर्णय होते. जगत राहणे मार्ग सापडेपर्यंत हा पहिला महत्त्वाचा, दुसरा तात्कालिक निर्णय म्हणजे संपाचे काय करायचे? ‘पीअर प्रेशर’ पण होतेच. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्या उठल्याच मी माझाच सहाध्यायी रणजीतच्या रूमवर गेले, त्याला उठवून त्याचा कॅमेरा घेतला आणि रूमकडे परत येता येताच शूट करायला सुरुवात केली. माझे चालणारे पाय हा माझा पहिला शॉट होता. सगळं एखाद्या रंजक सिनेमासारखं नाट्यमय!

विद्यार्थ्यांचा संप १३९ दिवस चालला आणि मी त्यातील ४० ते ५० दिवस शूट केलं. एडिटिंगची विद्यार्थिनी होते, कॅमेरा फार कळत नव्हता. सुरुवातीला खूप हलला, सेटिंग्ज नीट कळल्या नाहीत, कधी बर्न झालं तर कधी अंधारात चेहेरे नीट टिपता आले नाहीत. साउंडची वेगळी व्यवस्था नसल्याने कॅमेरात व्यवस्थित साउंड टिपता यावा यासाठी भरपूर क्लोजअप टिपले गेले. एक भाषा आपोआप निर्माण होत गेली. हळूहळू कॅमेरा हातात घेऊन स्थिर उभं राहता येऊ लागलं. मग हळू हळू प्रसंगानुरूप शॉटमध्ये हालचाल आणि लय यायला लागली. अनेक लोक भेटले, मित्र मिळाले. संपाविषयी मनात असणारे प्रश्न दूर होत गेले. मजा येऊ लागली.

हेही वाचा : घिसाडी जीवनाचं वास्तव

विद्यार्थ्यांच्या संपाचे स्पिरिटच जणू त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजूंसहित माझ्या कॅमेऱ्याने टिपले. नंतर पुढे मी संपात प्रत्यक्षपणे खेचले गेले आणि शूटिंग थांबले. पुढे दोनतीन वर्षे हा सगळा प्रवास मांडण्यासाठी मी ६०-७० तासांचे फुटेज एकटी एडिट करत होते. अनेक व्हर्शन्सनंतर १०४ मिनिटांची ‘द स्ट्राइक अॅण्ड आय’ नावाची फिल्म तयार झाली. नाव देताना रित्विक घटक यांचे पुस्तक ‘सिनेमा अॅण्ड आय’ हे आणि ‘माय कॅमेरा अॅण्ड सुनामी’ या दोन्हींचा संदर्भ डोळ्यांसमोर होता. काम केलं की आपण आपोआप चार पायऱ्या वर चढतो, तिथून थोडा मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो आणि जे फार अवघड वाटत होतं ते फार मोठं नाही हे कळतं. ‘एफटीआयआय’मधून तीन वर्षांचा कोर्स सात वर्षाने पूर्ण करून बाहेर पडताना माझ्या हातात फक्त ही फिल्मच नव्हती तर एक नवी वाटदेखील होती.

त्यानंतर करोनाच्या पहिल्या टाळेबंदीच्या काळात आईबाबांच्या घरी अडकले असताना मी असंच पुन्हा एकदा अंत:प्रेरणेने कॅमेरा हातात घेतला. २१ दिवसांच्या टाळेबंदीचे राखाडी उदास रंग घरात, घरातील खिडक्या आणि बाल्कनीतून किंवा टीव्हीच्या माध्यमातून जे दिसले ते शूट केले. ‘वेटिंग फॉर गोदो’ आणि ‘सोसायटी ऑफ स्पेक्टेकल’ या ग्रंथांचा प्रभाव एडिट करताना होता. ती २०२१ मध्ये केलेली दुसरी डॉक्युमेंटरी. तिचे नाव ‘आईवडील, कबुतरं आणि इतर देखावे’

नवीन काय हे अजून माहीत नाही. एखाद्या क्षणी मनातून जाणवलं कॅमेरा उचलावा आणि शूट करावं तर तिसरी फिल्मदेखील होईलच. तूर्तास एवढेच.

kshama. padalkar@gmail.com