वीरेंद्र वळसंगकर
डॉक्युमेण्ट्री तयार करताना त्या विषयाची माहिती गोळा करणं, रिसर्च करणं या गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या आहेत; परंतु त्याचबरोबर त्या विषयाचं मर्म जाणणं महत्त्वाचं ठरतं. संशोधनामध्ये जी बरीच माहिती समोर येते तिचा वापर करून विषयाचं मर्म परिणामकारक पद्धतीनं समोर कसं आणता येईल. त्या विषयावर फिल्म मेकर किंवा कथावस्तू मांडणारा म्हणून कोणता दृष्टिकोन समोर ठेवणार आहोत हे महत्त्वाचं ठरतं..
डॉक्युमेण्ट्रीबद्दल प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक याने काढलेले उद्गार आठवतात . In feature films the director is a god. But in documentaries god is the director.फिचर फिल्म्समध्ये (इथे फिक्शन फिचर फिल्म असा अर्थ घेऊया कारण नॉन फिक्शन ही फिचर लेंग्थ फिल्म्स असतातच) दिग्दर्शक पडद्यावर संपूर्ण सृष्टी निर्माण करत असतो त्याअर्थाने तो सृष्टी निर्माता किंवा ईश्वर बनतो. परंतु डॉक्युमेण्ट्रीमध्ये विश्व निर्मात्याने बनवलेली गोष्टच दिग्दर्शक मांडत असतो. म्हणूनच की काय डॉक्युमेण्ट्रीचे दिग्दर्शक कसलीही प्रसिद्धी किंवा इतर कसल्याही वलयाशिवाय आपलं काम शांतपणे करत असतात. कधी त्यांच्या कामाची दखल घेतली जाते तर कधी नाही. पैसे आणि प्रसिद्धी दोन्ही तुटपुंजे असून, एखादा विषय मांडण्यासाठी योग्य माध्यम म्हणून ते त्यातून काम करू पाहत असतात.
हेही वाचा : मागील पानावरून पुढे?
इथे मला एक महत्त्वाचा संदर्भ दिसतो आणि तो आजतागायत सुसंगत आहे असं वाटतं. ल्युमिए ब्रदर्सनी पहिली चलचित्र १८९५ साली जी पडद्यावर दाखवली ते डॉक्युमेण्ट्रीचे उगमस्थान मानले जाते. कारण त्यातली दृश्ये मुख्यत: नाटय़मय (फिक्शन ) नव्हती तर ती वास्तविक होती. त्यानंतर सिनेमाच्या मांडणीमध्ये बरेच प्रयोग होत गेले. त्यात मेलीए, पोर्टर, ग्रिफिथ (१८९६ – १९२०) ही मंडळी येतात. हे सर्व प्रयोग काल्पनिक किंवा नाटय़मय पद्धतीने गोष्टी सांगणारे होते. म्हणजे त्यात अभिनेत्यांना घेऊन त्यांच्या साहाय्याने दिग्दर्शकाने प्रसंग रचलेला असायचा. परंतु आश्चर्य म्हणजे डॉक्युमेण्ट्री पद्धतीने सिनेमा मांडण्याचा पहिला प्रयत्न जो झाला त्यासाठी १९२२ साल उजाडावे लागले. म्हणजे सिनेमा तंत्र सुरू झाल्यानंतर तब्बल जवळपास २७ वर्षे. या सिनेमामध्ये अभिनेते नसलेले प्रसंग होते आणि हे प्रसंग वास्तविक प्रसंग होते. वास्तवदर्शी नाही. हा सिनेमा होता ‘नानूक ऑफ द नॉर्थ.’ म्हणजेच नॉन फिक्शन पद्धतीने गोष्ट सांगणे हे तंत्र गवसण्यासाठी सुरुवातीच्या चित्रपटकर्त्यांना मोठा काळ लागला. यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे त्यावेळचे चित्रपट बोलके नव्हते. मूक होते. त्यामुळे अर्थातच त्यामध्ये निवेदन वगैरे नव्हते. हा ऐतिहासिक संदर्भ आजच्या स्थितीलासुद्धा लागू आहे. नॉन फिक्शन पद्धतीने सिनेमाची मांडणी करणे ही अवघड गोष्ट आहे. तिथे पात्रं आणि प्रसंग हे दिग्दर्शकाच्या पूर्णपणे नियंत्रणात नसतात आणि म्हणून आल्फ्रेड हिचकॉकचं वर दिलेलं वाक्य महत्त्वाचं वाटतं. परंतु ती गोष्ट कशी मांडायची हे मात्र नक्कीच डॉक्युमेण्ट्री मेकरच्या हातात आहे. डॉक्युमेण्ट्री फिल्मना आपल्याकडे माहितीपट म्हटले जाते. माहितीपटामधून काही माहिती सांगितली जाईल इतकाच मर्यादित अर्थ प्रतीत होतो. परंतु डॉक्युमेण्ट्रीचा विस्तार त्याहून खूप मोठा आहे. त्यातून अनेकदा माहिती सांगितली तर जातेच, पण भावना तयार होते. प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडते. तसंच माणसांबद्दल आणि आयुष्याबद्दलच्या आपल्या जाणिवा वृद्धिंगत करते, जसं कोणतीही दुसरी कला करते.
हेही वाचा : उस्ताद, तिहाई बडी जल्दी ले ली..
सिनेमा १९३० पासून बोलायला लागल्यावर डॉक्युमेण्ट्रीमध्ये निवेदनाचा वापर सुरू झाला, तो इतका महत्त्वाचा बनला की डॉक्युमेण्ट्री म्हणजे लेक्चर आहे की काय असा भ्रम तयार व्हायला लागला. नेमकं हे जाणवणारा अमेरिकन डॉक्युमेण्ट्री मेकर होता बॉब ड्रय़ू. त्याने आपल्या बरोबरीच्या इतर फिल्म मेकर्सच्या मदतीने एक चळवळ सुरू केली. ज्याला ‘डायरेक्ट सिनेमा’ म्हटलं जातं. हा डॉक्युमेण्ट्रीच्या विश्वातला महत्त्वाचा टप्पा आहे . बॉब ड्रय़ुच्या म्हणण्यानुसार, बहुधा डॉक्युमेण्ट्री (त्या वेळी अस्तित्वात असलेल्या) ‘डल’ आणि ‘बोअिरग’ असतात, कारण ते फक्त ‘लेक्चर्स’ असतात. त्यामुळे शब्दबंबाळ न होऊ देता त्यात नाटय़मयता आणता आली पाहिजे असं त्याचं म्हणणं. हे फारच महत्त्वाचं मांडणं होतं. हे करत असताना बोजड कॅमेरा न वापरता सहज हालचाल करू शकू असे कॅमेरे, पात्रांना जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने चित्रित करणं वगैरे. त्याकाळात दोन चळवळींनी डॉक्युमेण्ट्रीला नवा रस्ता दाखवण्याचं काम केलं. एक ‘डायरेक्ट सिनेमा’ आणि दुसरं ‘सिनेमा व्हेरितें.’ सिनेमा व्हेरितें ही युरोपमध्ये मुख्यत: आकाराला आली. दोन्ही चळवळीत काही गोष्टी समान होत्या, तर काही वेगळय़ा. जसं की सिनेमा व्हेरितें सिनेमा बनविण्याच्या प्रक्रियेलाही पडद्यावर स्थान देण्याचा प्रयत्न करून बघत होती. म्हणजे फिल्म मेकरसुद्धा फिल्ममधील पात्र बनत होता. ही फारच मजेशीर प्रक्रिया वाटते. यामध्ये सिनेमा व्हेरितेंचा प्रयोग हा फक्त डॉक्युमेण्ट्री मेकसर्वंर न पडता फिक्शन चित्रकर्त्यांवरसुद्धा मोठय़ा प्रमाणात झाला.
आजच्या डॉक्युमेण्ट्री मेकरसमोर असे तऱ्हेतऱ्हेचे मार्ग उपलब्ध आहेत. जे गेल्या जवळ पास १०० वर्षांमध्ये झालेल्या प्रयोगांमुळे, चळवळींमुळे तयार झाले आहेत. जगभरच्या महत्त्वाच्या डॉक्युमेण्ट्रीज्ची नोंद घेताना मला भावलेल्या काहींबद्दल सांगू इच्छितो. यामध्ये विम वेंडर्स या जर्मन फिल्म मेकरने बनवलेली ‘ब्युना विस्टा सोशल क्लब’ मला फार मनापासून आवडते. क्युबामधील छोटासा म्युझिक बँड – ब्युना विस्टा सोशल क्लब. या बँडबद्दल राय कुडर या संगीतकाराला समजते. तो त्यांना भेटून बँडची गाणी रेकॉर्ड करू इच्छितो. राय कुडरचा हा संपूर्ण प्रवास या डॉक्युमेण्ट्रीमध्ये विम वेंडर्सने चित्रित केला आहे. या प्रवासात बँडचा प्रत्येक सदस्य काही ना काही अडचणी घेऊन येतो. कारण हे सर्व सदस्य आता वयाने थकलेले आहेत. त्यातल्या काही लोकांनी संगीत सोडलं आहे. क्युबासारख्या गरीब देशात आणि प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या या कलाकारांना परत रेकॉर्डिगसाठी तयार करणाऱ्या राय कुडरची ही कथा बघण्यासारखी आहे.
हेही वाचा : सुखाचे हॅशटॅग: सुखाचा मंत्र
भारतातील डॉक्युमेण्ट्री मेकर्सही मोठय़ा स्थित्यंतरातून गेले आहेत. सुरुवातीला सरकारी संस्था म्हणून सरकारी प्रचार करणारी ‘फिल्म्स डिव्हिजन’ ही संस्था सुखदेव, एसएनएस शास्त्री यांच्या काळात कात टाकत होती. यामध्ये मोठा हातभार होता तो म्हणजे श्रीयुत भावनगरी या सरकारी अधिकाऱ्याचा. त्यांनी नवीन विचाराने डॉक्युमेण्ट्रीकडे पाहणाऱ्या लोकांना प्रोत्साहित केलं. या काळात बनलेल्या ‘इंडिया ६७’ किंवा ‘उस्ताद आमिर खान’ या डॉक्युमेण्ट्रीज् कमालीच्या प्रतिभाशाली आहेत. सत्यजीत रे यांनी बनवलेल्या फिल्म्स बऱ्याच लोकांनी पहिल्या आहेत, पण त्यांनी बनवलेल्या डॉक्युमेण्ट्रीज् कमी लोकांनी पाहिलेल्या असतात. त्यात मुख्यत: रवींद्रनाथ टागोरांवर बनवलेली डॉक्युमेण्ट्री फार परिणामकारक आहे. या डॉक्युमेण्ट्रीला सत्यजीत रे यांचं निवेदन आहे. ती पाहिल्यानंतर टागोर जास्त चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. त्यात रे डॉक्यू फिक्शनचा वापर करतात. लहानपणचे आणि तरुण टागोर फिक्शन स्वरूपात आपल्याला दिसतात. तसेच टागोरांच्या अनेक दुर्मीळ क्लिप्स आणि फोटोग्राफ्सचा यात वापर केला आहे. अलीकडच्या काळात बनलेली ‘आखिरी सलाम’ ही शबनम सुखदेव यांची डॉक्युमेण्ट्री माझी अतिशय आवडती आहे. सुखदेव गेले तेव्हा त्यांची मुलगी शबनम केवळ १३ वर्षांची होती. ती अंत्यदर्शनासही गेली नाही. वडिलांबद्दल एक अढी मनात होती. पुढे वडिलांबद्दल तिचे मत कसे बदलले. सुखदेवना ती खऱ्या अर्थाने कशी समजावून घेऊ शकली याबद्दलची ही डॉक्युमेण्ट्री. यामध्ये शबनम स्वत:च एक पात्र आहे .
डॉक्युमेण्ट्री तयार करताना त्या विषयाची माहिती गोळा करणं, रिसर्च करणं या गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या आहेत; परंतु त्याच बरोबर त्या विषयाचं मर्म जाणणे महत्त्वाचं ठरतं. संशोधनामध्ये जी बरीच माहिती समोर आली आहे त्याचा वापर करून विषयाचं मर्म समोर कसं परिणामकारक पद्धतीनं आणता येईल. त्या विषयावर फिल्म मेकर किंवा कथावस्तू मांडणारा म्हणून कोणता दृष्टिकोन समोर ठेवणार आहोत हे महत्त्वाचं ठरतं; आणि त्यासाठी आवश्यक ती शैली डॉक्युमेण्ट्रीसाठी निवडावी लागते. मग त्यात फिक्शन वापरायचं का, किती? निवेदन आणायचं का नाही. मला आठवतंय आम्ही ‘विष्णुपंत दामले’ ही डॉक्युमेण्ट्री बनवायला घेतली. यामध्ये त्यांना पाहिलेली प्रत्यक्षदर्शी खूपच मोजकी मंडळी जीवित होती. त्यामुळे दामले यांचं कार्य समोर आणण्यासाठी केवळ मुलाखती आणि निवेदन उपयोगी ठरणार नव्हते. कोणती शैली वापरावी याचा विचार चालू होता. त्यावेळी सुमित्रा भावेंनी अनेकदा केलेले डोक्युड्रामाचे प्रयोग माझ्यासमोर होतेच. डॉक्युड्रामा इथे परिणामकारक होईल असे दिसतही होते. त्यानुसार डॉक्युड्रामा करण्याचा निर्णय घेतला. परंतु यात अनेक अडचणी होत्या. ड्रामाचे दृश्य दिसल्यावर पुढच्याच दृश्यात खरे फोटोग्राफही दिसणार होते आणि ते विसंगत वाटणार नाहीत याची काळजी घ्यायची होती. तसंच जी माहिती गोळा केली होती त्यामधून दामले यांचे जे विविध पैलू समोर येत होते निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कला दिग्दर्शक, वगैरे ते सर्व फिल्ममधून यावे असं वाटत होतं. त्यामुळेच त्याची मांडणीही जन्म, कार्य, मृत्यू अशी सरळ सरधोपट करून चालणार नव्हती. अशा सर्व गोष्टींचा विचार करून त्याची आखणी केली.
हेही वाचा : पडसाद: उल्लेखनीय इंदौर
आर्किटेक्ट शिरीष बेरी यांच्या कामाबद्दल आणि त्यामागच्या विचारांबद्दल डॉक्युमेण्ट्री बनविण्यासाठी आम्ही जेव्हा चर्चा करत होतो. ‘The Unfolding White’ या डॉक्युमेण्ट्रीचा उद्देश माहिती सांगणं हा नव्हता. बेरींची माहिती द्यायची नव्हती तर त्यांच्या कामापाठीमागचा विचार पोहोचवणे हा उद्देश होता आणि म्हणून ते पोहोचवताना कवितांचा आधार घ्यावा असं ठरवलं. अशी काव्यमय मांडणी करण्याचे ठरवून त्याप्रमाणे त्याची रचना करण्यात आली. ब्रातिस्लाव्हा इकोटोप फिल्म फेस्टिवलमध्ये त्या डॉक्युमेण्ट्रीला ‘आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कारानं’ गौरवण्यात आलं.
२०२३ मध्ये ‘दिशा स्वराज्याची’ या डॉक्युमेण्ट्रीचं काम चालू होतं. नुकतीच ती डॉक्युमेण्ट्री पूर्ण झाली आहे आणि प्रेक्षकांसमोर दाखविण्यास तयार आहे. या डॉक्युमेण्ट्रीमध्ये निवेदन वापरावे किंवा नाही यावर मी बराच काळ द्विधा मन:स्थितीत होतो. मेंढा लेखा या आदिवासी गावाच्या लढय़ाची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण कार्यपद्धतीबद्दल ती आहे. हा विषय मांडताना मुख्यत: ती कथा त्या लढय़ातील लोकांकडूनच पोहोचावी असा प्रयत्न होता.
डॉक्युमेण्ट्रीचा प्रेक्षक निराळा आहे हे निश्चित. सर्वसामान्यपणे ज्यांना चित्रपट पाहायला आवडतात ते सर्वच डॉक्युमेण्ट्री बघायला उत्सुक असतील असं नाही. कारण त्यात करमणुकीची शक्यता कमी. काही टेलिव्हिजन चॅनेल्सने आपली एक धाटणी तयार केली आहे. उदा. डिस्कव्हरी वगैरे आणि त्याचा एक प्रेक्षक वर्गही आहे. परंतु त्याला खूप मर्यादा आहेत. त्या बाहेर खूप मोठं डॉक्युमेण्ट्रीचं विश्व आहे. डॉक्युमेण्ट्रीकर्ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान कायमच आहे. ओटीटी हे इंडिपेंडंट फिल्म मेकरने बनवलेल्या डॉक्युमेण्ट्री दाखवण्यास खूप उत्सुक नसतात. अपवाद फक्त काही पुरस्कार प्राप्त आणि प्रसिद्धी मिळालेल्या डॉक्युमेण्ट्रीज्. अद्याप अनेक पुरस्कार प्राप्त डॉक्युमेण्ट्री कोणत्याही ओटीटीवर उपलब्ध नाहीत. PSBT सारख्या भारतात डॉक्युमेण्ट्री निर्माण करणाऱ्या संस्थेने आपल्या स्वत:च्या वेबसाइटवर डॉक्युमेण्ट्रीज् पाहण्याची सोय करून दिली आहे. अशाच पद्धतीने इतरही काही आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वेबसाइटवर डॉक्युमेण्ट्रीज् उपलब्ध करून देतात. तरीही याला मर्यादा आहेत. म्हणून भविष्य काळात स्वतंत्र डॉक्युमेण्ट्री मेकर्सच्या फायद्यासाठी काही लोकांनी एकत्र येऊन डॉक्युमेण्ट्रीसाठी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध केल्यास त्याचा प्रेक्षकांना आणि डॉक्युमेण्ट्री मेकर्सना फायदा होईल; परंतु तुटपुंज्या प्रसिद्धी आणि पैशांमध्ये काम करणाऱ्या डॉक्युमेण्ट्री मेकर्सची जिद्द मात्र कायम राहो अशी इच्छा.
शिक्षणाने सिव्हिल इंजिनीयर. आवड म्हणून डॉक्युमेण्ट्री निर्मिती. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्यासाठी साहाय्यक म्हणून काम. विविध विषयांवरील माहितीपटांचे दिग्दर्शन. शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांसाठी फिल्म्स. ‘ विष्णुपंत दामले – बोलपटाचा मूकनायक’ या माहितीपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित. चित्रपट संकलक हीदेखील ओळख.
virendravalsangkar@gmail.com