स्मार्टफोन हे तंत्रज्ञान भारतीयांनीही आपलंसं केलं आहे. गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण, जात, भाषा, धर्म अशा सगळया भेदभावांपलीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट/ डेटापॅक संपूर्ण देशात पसरले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व्यवसायांमध्ये स्मार्टफोनशिवाय कामं चालणार नाहीत; आणि रस्त्यावरचे फेरीवालेही स्मार्टफोनचा वापर व्यवसायासाठी करतात. दुसऱ्या टोकाला जाऊन बघायचं तर लोकांना स्वस्तातला डेटा नावाची अफू द्यायची म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, बेरोजगारी अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लोक दुर्लक्ष करतील, असं काही तथाकथित षडयंत्र डेटा स्वस्त करण्यात असेल का?
मला हे पटत नाही. हे तंत्रज्ञान उभं करायला आणि चालवायला पैसा लागतो; पैशांचं सोंग कुणालाही आणता येत नाही हा माझा तर्क. काश्मीर आणि मणिपूरमधलं इंटरनेट आता तरी सुरू झालं का? तिथल्या बातम्या येतात का? जर लोकांना गुंगवून ठेवायला डेटापॅक स्वस्त केला का नाही, हे तपासण्यासाठी काही पुरावा शोधायचा तर लोकांचं स्वस्त डेटाआधीचं आणि नंतरचं वर्तन काय आहे याचा थोडा विचार करू.
मी विदावैज्ञानिक (डेटा सायंटिस्ट) आहे. या प्रश्नाकडे वैज्ञानिक पद्धतीनं बघायचं तर लोक आधी किती पुस्तकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं वाचत होते आणि आता किती वाचतात याचे आकडे काढावे लागतील. लोकसंख्येच्या प्रमाणात किती पुस्तकं, मासिकं विकली गेली, ग्रंथालयांमधून किती पुस्तकं- मासिकं आणली गेली याचे आकडे मिळवणं एक वेळ शक्य असेल. स्मार्टफोनच्या आधीचे आकडे, स्मार्टफोन तळागाळापर्यंत पसरले त्या काळातले आकडे आणि डेटापॅक स्वस्त झाल्यानंतरचे आकडे.. आणि मग त्याची तुलना करून बघायची. हे जरा कठीण आहे. म्हणून मी समाजशास्त्रात वापरतात तशी पद्धत या लेखापुरती सुरू ठेवणार आहे. मला आजूबाजूला काय दिसतं याच्या या नोंदी.
हेही वाचा : आठवणींचा सराफा : बरंच काही आणि कॉफी..
मी भारताबाहेर पहिल्यांदा गेले २००५ साली, ते शिकायला- इंग्लंडमध्ये. मी मँचेस्टरजवळच्या एका खेडयात राहायचे. आठवडयातून एकदा मी मँचेस्टरला जायचे. तो प्रवास साधारण ३५ मिनिटांचा होता. त्याच्या आदल्या वर्षी मी आठवडयातून दोनदा ट्रेननं प्रवास करायचे- कुलाब्याच्या दोन वेगवेगळया संस्थांमध्ये शिकायला जायचे तेव्हा. ट्रेनमध्ये जाताना झोप काढायची आणि परत येताना काहीबाही वाचायचं असा माझा शिरस्ता होता. मँचेस्टरमध्ये गेल्यावर तो सुरू राहिला. त्यानंतर काही वर्षांनी मी अमेरिकेत आले. तिथेही काही काळ ट्रेन/ बसप्रवास करत असे. नियमित ट्रेनप्रवासाच्या काळात माझं वाचनही नियमित राहिलं. बस/ ट्रेनचा नियमित प्रवास सुटला की वाचनासाठी वेगळा वेळ काढायला लागतो.
भारतात मी शिकत होते तेव्हा स्मार्टफोन आलेले नव्हते. अमेरिकेत आले तोवर भारतातही स्मार्टफोनचं जाळं पसरायला लागलेलं होतं. या प्रवासांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की भारतात प्रवासात फार कुणी पुस्तकं, मासिकं वाचताना दिसत नाहीत. इंग्लंड आणि अमेरिकेत प्रवासात दिसलं की बरेच लोक तेवढया वेळात काही तरी वाचत असतात. हल्ली अनेक लोक लॅपटॉप काढून त्यावर काम करताना दिसतात, प्रोग्रॅमिंग छापाचं काम किंवा इमेलं वाचून उत्तरं देणं वगैरे.. अमेरिकेत अशी ट्रेनमध्ये एकदा एका प्रोग्रॅमरशी ओळख झाली. तेव्हा मी प्रोग्रॅमिंगमध्ये नवखीच होते. त्यानं मला काही संदर्भ दाखवले, त्याचा मला उपयोगही झाला.
या तुलनेत किंचित गफलत आहे, विशेषत: अमेरिकेच्या बाबतीत. अमेरिकेत बहुतेक सुखवस्तू, मध्यमवर्गीय लोक आपापल्या गाडयांमधून फिरतात. ते लोक कितपत वाचत असतील हे फक्त ट्रेन/ बसनं प्रवास करून समजणार नाही. मात्र ओपरा विन्फ्री, रीज विदरस्पून यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचे ‘बुक क्लब’ आहेत. त्यांनी त्यात वाचलेली पुस्तकं अशी पुस्तकांची जाहिरात चालते. भारतात, महाराष्ट्रात अशा प्रकारची जाहिरात माझ्या बघण्यात नाही. मुंबईच्या लोकलमध्ये भजनं करणारे, वहीत जप लिहिणारे, दुपारच्या वेळेस गर्दी कमी असताना भाजी निवडणारे, कोळंबी सोलणारे लोक दिसायचे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रेमानं खायला घालणारे लोकही भेटले. स्मार्टफोन येण्याआधी ट्रेनची वाट बघताना कंटाळलेले लोक दिसायचे. स्मार्टफोन आल्यानंतर स्टेशनवर क्वचितच कुणी कंटाळलेले दिसतात- भारतात आणि भारताबाहेरही.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांच्या अमर्यादित शक्यता..
भारतात लोक फोन आहे म्हणून चारचौघांत जोरजोरात त्यावर गाणी वाजवतात. कुठलेसे व्हिडिओही जोरजोरात आवाजात लावतात. आपल्या आजूबाजूला लोक आहेत, त्यांना हे ऐकायचं नसेल, त्यांना दुसरं काही ऐकायचं असेल किंवा झोपायचं असेल, वाचायचं असेल.. इतरांना आवाज नको असेल असा विचार लोक करत नाहीत. जो प्रकार स्मार्टफोनच्या डेटापॅकमुळे, तोच प्रकार २००० सालच्या पहिल्या दशकात डॉल्बीच्या भिंतीमुळे सुरू झाला असेल का? डॉल्बीच्या भिंती लावून नाचल्यामुळे लोकांना मजा यायला सुरुवात झाली तेव्हा फोनवर मिळणारं इंटरनेट अजिबात स्वस्त नव्हतं आणि फेसबुक-ट्विटर भारतात लोकप्रिय झालेलं नव्हतं. व्हॉट्सअॅ्प तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं.
शेजाऱ्यांनी जोरजोरात रेडिओ लावला तर तो आपल्यासाठीच आहे अशी आपली समजूत करून घ्यायची हा विनोद पुलंनी केला आहे, त्याला अनेक दशकं झाली! डॉल्बीच्या भिंती लावून नाचणारा वर्ग मोठया प्रमाणात नाही-रे वर्गातला आहे किंवा त्या वर्गातून बाहेर येऊन फार काळ लोटलेला नाही. हे वर्तन एकाएकी बदलण्याची शक्यता कमीच. अचानक लोक तर्कशुद्ध आणि/ किंवा समाजाचा विचार करायला सुरुवात करणार नाहीत. मध्यमवर्गातले लोक शिक्षणाची परंपरा असूनही कितपत तर्कशुद्ध विचार करतात?
स्मार्टफोन हे तंत्रज्ञान आहे. ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपल्याला काही विशेष शिक्षण घ्यावं लागलं नाही. स्मार्टफोनचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विज्ञानाची गरज असते. त्यासाठी महत्त्वाचा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्मार्टफोनच्या जोडीला आपल्याकडे येतो का? माझा संपर्क आहे-रे वर्गाशीच आहे, त्यांचं वर्तन कितपत बदललेलं दिसतं?
हेही वाचा : भाषागौरव कशाचा?
व्हॉट्सअॅलपचा उल्लेख ‘विद्यापीठ’ असा केला जातो. त्या व्हॉट्सअॅचप विद्यापीठातून विज्ञानाच्या नावाखाली आलेल्या हास्यास्पद गोष्टींमध्ये मला सगळयांत विनोदी वाटलेलं फॉरवर्ड म्हणजे ‘उभं राहून पाणी प्यायलं तर ते थेट गुडघ्यात जातं.’ (कधी ठसका लागल्यावर हे खरं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटतं.) कुठल्या आडनावाच्या लोकांचं कुलदैवत कुठलं आणि पावसाळयात येणाऱ्या पालेभाज्या हिवाळयात खाणं कसं आरोग्यवर्धक अशा प्रकाराची बरीच अवैज्ञानिक आणि कधीकधी विज्ञानाच्या कक्षेबाहेरचीही फॉरवर्डस मी व्हॉट्सअॅ पवर वाचली आहेत. भारतात व्हॉट्सअॅ्प लोकप्रिय झाल्याला काही वर्ष उलटली आहेत. अशी फॉरवर्डस् करण्याचा लोकांचा उत्साह काही कमी होत नाही. डेटापॅक अत्यंत स्वस्त झाल्यामुळे लोकांनी विचार करणं सोडून दिलं आहे का?
आधी अमेरिकेतली गंमत. ऑक्टोबर २०२३मध्ये आमच्या घरापासून तासाभराच्या अंतरावरून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होतं. आम्ही गाडी काढून ग्रहण बघायला गेलो. रस्त्यात खूप ट्रॅफिक, गर्दी होती. कारण लोक ग्रहण बघण्यासाठी घराबाहेर पडले होते. हायवेवर मोठेमोठे बोर्ड लावले होते, ‘ग्रहण बघण्यासाठी रस्त्यावर थांबू नका.’ मला तेव्हा एक फॉरवर्ड आलं की दुपारी १२च्या सुमारास ग्रहण आहे म्हणून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेस्तोवर खाण्यापिण्याची काय पथ्यं पाळायची म्हणजे ग्रहण बाधणार नाही. त्या फॉरवर्डचा उगम कुठे झाला हेही त्यातच लिहिलं होतं. अमेरिकेच्या व्हर्जिनिया नावाच्या राज्यातून ते लिहिलं होतं- तिथून खंडग्रास ग्रहणही दिसणार नव्हतं. हे लिहिणारे लोक तिथल्या कुठल्याशा देवळातले होते म्हणे!
लहानपणी उन्हातून घरी आल्यावर लगेच घटाघटा पाणी पिण्याविरोधात तंबी दिली जात असे. त्यामुळे अंधत्व येतं असंही मला सांगितलं होतं. झोपून वाचणं, खूप टीव्ही बघणं अशी डोळे खराब होण्याची कारणं मला लहानपणी सांगितली जात असत. माझे आईवडील दोघंही शिक्षक. त्यांच्याकडूनच अशा काही अवैज्ञानिक गोष्टी मी ऐकल्या होत्या आणि लहानपणी डोळे झाकून मान्यही केल्या होत्या.
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..
धरणातून पाणी खाली येतं, त्यावर वीज तयार होते. एके काळी शेतकऱ्यांचा ते पाणी शेतीसाठी वापरण्याला विरोध होता. म्हणे त्या पाण्यातला जीव काढून घेतला जातो. ही गोष्ट मला एका विज्ञानाच्या शिक्षिकेनं जलविद्युत कशी तयार होते, यामागचं वैज्ञानिक तत्त्व शिकवताना सांगितली होती. पाण्यातला जीव काढून घेता येत नाही कारण पाण्यात जीव नसतो, हे स्पष्टपणे समजण्यासाठी मला आणखी दोन-चार वर्ष भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागला. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? पोहऱ्यात नसलेली गोष्टी काढून कशी घेणार? जलविद्युत कशी तयार होते याची माहिती निराळी आणि पाण्यात जीव नसतो, हे आकलन निराळं. स्मार्टफोन आणि डेटापॅकमुळे लोकांमध्ये अवैज्ञानिकता वाढायला लागली आहे का, हे शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध करण्यासाठीही आकडे गोळा करणं कठीण आहे म्हणून या माझ्या आठवणी.
दर पिढीला असं वाटत असेल का, की आपल्या वेळी गोष्टी बऱ्या होत्या आणि आता त्या बिघडत चालल्या आहेत. समजा असं कुणाला वाटत असेल आणि सिद्धच करायचं असेल तर ते काय प्रकारच्या गोष्टी सांगतील?
एक उदाहरण म्हणून आपली एक रूढी बघू. नवा लॅपटॉप किंवा फोन आणल्यावर अनेक घरी त्या उपकरणाची पूजा होते आणि मग ते उपकरण वापरलं जातं. आधी वाहनं होती आता फोन आहेत. वस्तू बदलली, वर्तन तेच राहिलं आहे. स्मार्टफोन आला म्हणून परंपरा बदलली नाही. पूर्वी घरी नवी सायकल आणली, तिची पूजा केली तर २० वर्षांपूर्वी ते फक्त शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळत होतं. आता कुठल्या नव्या उपकरणाची पूजा केली तर ते फेसबुक, व्हॉट्सअॅरपवरून हजारेक लोकांना कळवणं अगदी सोपं आहे. आपण १००० लोकांना कळवलं याची दुसरी बाजू अशी की, या १००० लोकांच्या घरी जेव्हा काही नवीन वस्तूची पूजा होते, त्याचे फोटो आपल्याला येतात. आधी २० लोकांच्या घरच्या पूजेबद्दल समजत असेल तर आता १००० लोकांचं समजतं. त्यामुळे स्मार्टफोन, डेटापॅक आल्यानंतर लोक अधिक सश्रद्ध झाले असं म्हणणं सोपं आहे.
हेही वाचा : अस्वस्थ करणारी कादंबरी
जुन्या पिढीतल्या लोकांना छापलेला शब्द खरा मानायची सवय होती; कारण छपाईचं तंत्रज्ञान स्वस्त-सोपं नव्हतं. आता बसल्या जागी हात झटकले तर व्हॉट्सअॅ्पवर शे-दोनशे शब्द पडतात, तरीही छापलेला शब्द खरा मानायचा हा विचार फार कमी झालेला नाही. जोवर या संदर्भातली आकडेवारी तपासली जात नाही, रीतसर संशोधन होत नाही तोवर काहीच सिद्धासिद्ध करता येणार नाही. म्हणून उरतात ती आपापली मतं. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया वापरून आपण ती मतं सगळीकडे ठासून लिहीत असतोच की!
sanhitoide@googlemail.com