डॉ. राधिका विंझे
शाळेचा शेवटचा दिवस संपवून ईशा बाबाबरोबर गाडीतून घरी येत होती. मधेच एका स्पीडब्रेकरवरून बाबानं गाडी हळू नेली. पुढच्या सीटवर बसलेल्या ईशाचं गाडीच्या स्पीडमीटरकडे लक्ष होतं. ३०-४० वर असलेला काटा एकदम १० वर आलेला पाहून ईशा बाबाला म्हणाली, ‘‘बाबा, बघ ब्रेक दाबला की गाडीचा वेग मंदावतो.’’
बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! ब्रेकनं विरुद्ध दिशेनं बल लावून गाडीचा वेग कमी केला.’’
ईशानं विचारलं, ‘‘गाडीचा वेग पुन्हा वाढवायचा असेल तर तू काय करतोस?’’
बाबा म्हणाला, ‘‘अॅक्सेलेटर वाढवतो. जेवढा वेग वाढवायचा त्यानुसार गिअर बदलतो म्हणजे जास्त बल लावतो.’’ ईशा विचार करू लागली.
बाबानं सांगितलं, ‘‘तू बॅडमिंटन खेळताना कॉक उंच किंवा लांब जावं म्हणून जास्त जोरात मारतेस म्हणजे काय?’’
ईशा म्हणाली, ‘‘जास्त बल लावते.’’
बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! आपल्याकडे इलेक्ट्रीक कार आहे. ती जर आपल्याला सुरू करायची असेल तर आपण काय करतो?’’
ईशा म्हणाली, ‘‘रिमोटनं त्यावर हव्या त्या दिशेनं इलेक्ट्रिक बल लावतो.’’
बाबा म्हणाला, ‘‘बरोबर! म्हणजेच कोणत्याही वस्तूला गती देण्यासाठी किंवा असलेली गती वाढवण्यासाठी बल लावावं लागतं. तसंच गतिमान वस्तूची गती कमी करायची असेल तरी विरुद्ध दिशेनं बल लावावं लागतं. याला न्यूटनचा गतीचा पहिला नियम म्हणतात.’’
घरी आल्यावर हा नियम आणखी आजमावता येईल हा विचार करत ईशा सायकल चालवायला गेली.