‘तीन पैशाचा तमाशा’चं संगीत, विशेषत: त्यातील गद्य संवादांवर पॉप शैलीचा स्वरसाज रचून निर्मिलेली गाणी तेव्हाच्या तरुण पिढीला फार भावून गेली. ‘तीन पैशा’चे प्रयोग जोरात सुरू असताना मुंबई दूरदर्शन केंद्राकरिता आणि आकाशवाणी पुणे केंद्राकरिता माझी नवी संगीतनिर्मिती सुरू होती. अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर-धुमाळे यांसारखे संगीत, साहित्य, नाटक यांची उत्तम जाण असणारे निर्माते मुंबई दूरदर्शन केंद्राकरिता अप्रतिम कार्यक्रमांची निर्मिती करीत होते. ऑफिसच्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून कार्यक्रमांच्या पाटय़ा टाकण्याऐवजी महाराष्ट्रभर फिरून नव्या कलाकारांचा/ कलाकृतींचा शोध घेऊन दर्शकांना सतत नवनवे उन्मेष सादर करणाऱ्यांपैकी ही मंडळी.
‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या एक तासाच्या विशेष कार्यक्रमाकरिता अरुण काकतकरांना खरं तर संगीतकार भास्कर चंदावरकरांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ची एक तासाची संपादित आवृत्ती सादर करायची होती, पण चंदावरकरांनी त्याला नकार दिल्यानं मग अरुणजींनी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या निवडक साहित्यावर आधारीत ‘गेले द्यायचे राहून..’ या नव्या कार्यक्रमाचं संकल्पन प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. खानोलकरांच्या नाटकांतले काही प्रवेश, काही कविता आणि गद्याचं नामवंत कलाकारांनी केलेलं अभिवाचन, त्याचबरोबर त्यांच्या काही कवितांना स्वरबद्ध करून केलेलं सादरीकरण असा दृक्श्राव्य आविष्कार रचला होता अरुणजींनी. श्रीकांत मोघे, मोहन गोखले, मंगेश कुळकर्णी, चंद्रकांत काळे, वीणा देव, विनय आपटे असे एकाहून एक उत्तम वाचा लाभलेले कलाकार तर त्यात होतेच; पण चिं. त्र्यं. खानोलकरांचे चिरंजीव त्र्यंबक यांनी चिं. त्र्यं.च्या आत्मकथनपर लिखाणाचं साक्षात् कोकणातल्या कणकवली- कुडाळ रस्त्यावरल्या बागलांच्या राईत आणि वेंगुल्र्याच्या समुद्रातल्या खडकावर बसून केलेलं अभिवाचन ही खास प्रस्तुतीही! आरती प्रभूंच्या सहा कवितांना संगीतबद्ध करायला माझी निवड झाली. अरुण काकतकरांची एक सूचना- नव्हे आग्रह होता की, त्यातलं कवितापण हरवता कामा नये. त्याकरिता एरवी वापरला जाणारा तबला, पखवाज, ढोलकी अशांचा प्रयोग करायचा नाही. आणि मर्यादांमध्ये राहत काहीतरी नवं करायला मला नेहमीच आवडत आलंय. स्पॅनिश गिटार, चायनीज ब्लॉक्स, डफ, मंजिरी यांसारख्या वाद्यांच्या साहाय्यानं तालांची अंधुकशी चौकट रेखत त्यात मी त्या कवितांना स्वरांकित केलं. एरवी कवितेच्या ओळी एकापाठोपाठ येणाऱ्या तालांच्या मात्रायुक्त ठाशीव आवर्तनांत स्वरबद्ध केल्या गेल्यानं रसिक तालाच्या एकापाठोपाठ येणाऱ्या आवर्तनांबरोबर ओढला जाताना अनेकदा त्याला कवितेतल्या शब्दांचा आणि त्यांच्या स्वरांकित रूपाचा नीटपणे आस्वाद घेता येत नाही म्हणून तालावर्तनात तो गुरफटलाच गेला नाही तर त्याला नक्कीच शब्द-सुरांचा अधिक चांगला आस्वाद घेता येईल, असा विचार.
बासरी (अजित सोमण), संतूर (सतीश गदगकर), व्हायोलिन (उस्ताद फैयाज हुसेनसाहेब), सारंगी/ स्वरमंडळ (मुंबई दूरदर्शन केंद्राचे सारंगीवादक पैगंबरवासी इक्बालसाहेब), स्पॅनिश गिटार (मुकेश देढिया) आणि डफ, चायनीज ब्लॉक्स, मंजिरी अशी विविध तालवाद्ये (श्याम पोरे) अशा मर्यादित वाद्यवृंदासह
एका दिवसात पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटच्या टेलिव्हिजन विंगमधल्या स्टुडिओमध्ये सहा गाण्यांचं ध्वनिमुद्रण झालं.
‘काळय़ा गं मातीचं, कापूसबोंडाचं किती गं मोल’ या रंजना पेठे व माधुरी पुरंदरे या दोघींच्या स्वरातल्या लोकसंगीताच्या बाजाच्या गाण्यात बासरी आणि किंगरी (व्हायोलिन)बरोबर डफावरल्या थापेची साथ होती. तर माधुरी पुरंदरेनं अप्रतिम गायलेल्या-
‘विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणात बुडून पूर्ण..’
या भिन्न षड्ज या रागात बांधलेल्या गाण्याला केवळ स्पॅनिश गिटारच्या सुरेल आघात आणि सुटय़ा स्वरावलींनी युक्त अशा दादऱ्यातल्या मात्रांची धूसर झुलती चौकट शब्दसुरांना अधोरेखित करत होती आणि साथीला फक्त सारंगीतून उमटणारं स्वरांचं इंद्रधनू..
तुडुंब मनाचे सावळेपण, एखादी प्राणाची मल्हारधून (भिन्न षड्जाच्या आधारानं बांधलेल्या चालीत ‘मल्हारधून’ या शब्दाला स्वरबद्ध करताना मी दोन्ही निषादांची डूब देत मल्हाराची हलकीशी छाया आणली.), एखाद्या प्राणाचे सनईसूर, एखाद्या मनाचे कोवळे ऊन, निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा, एखाद्या सरणा अहेवपण.. काय विलक्षण प्रतिमा होत्या आरती प्रभूंच्या कवितेत! संगीतात बद्ध करायला फारच अवघड. अशीच कविता दुसरे प्रतिभावंत कवी ग्रेस यांचीही. संगीतकाराची परीक्षा घेणारी. पहिल्या ओळीतून गवसलेला अर्थ सुरात पकडताना तुम्हाला लाभलेले समाधान दुसऱ्या ओळीला भिडताना हरवून जाते.
‘..सुकतात कुणाचे ओठ दुधाचे
दुखतात कुणाच्या काठ मनाचे..’
या रवींद्र साठेनं सुंदर गायलेल्या (यमन रागात बांधलेल्या) कवितेच्या छंदाला स्पॅनिश गिटारच्या आघातांनी अधोरेखित केलं आणि फैय्याजसाहेबांच्या सुरेल व्हायोलिनची संयत संगत..
‘तूच नव्हे का.. रात्री एका.. अंगचोरटी
अंगणातल्या झाडाखाली उभी एकटी..’
या कवितेला बंगाली लोकगीताच्या अंगानं जाणाऱ्या चालीत बांधताना बासरी आणि संतूरच्या सुरावलींची सुमधुर जोड श्रीकांत पारगावकरच्या कंपयुक्त मधाळ गायनातून कवितेतल्या तरल अनुभूतीच स्वरांकित करत गेली. या कार्यक्रमाकरता निवडलेली आरती प्रभूंची ‘केवळ वास’ अशा शीर्षकाची कविता मात्र मला काहीतरी वेगळंच सुचवून गेली.
‘एकाच एकाच वेळे.. दोघांचे डोळे
दाटून दाटून आले.. वाहू न गेले’
या पहिल्या दोन ओळींचं धृपद करताना दुसऱ्या ओळीतल्या ‘वाहू’ आणि ‘न’ या दोन शब्दांचं अस्तित्व- हे शब्द स्वरांत बांधताना स्वतंत्र कसं राखायचं याचा मी विचार करू लागलो. ‘वाहू’ आणि ‘न’ हे शब्द एकाच स्वरस्थानावर म्हटले गेले तर नेमका उलटा- म्हणजे ‘वाहून’ (गेले) असा अर्थभेद होण्याची भीती. आम्ही संगीतकार साधारणपणे अशावेळी या पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर यांत लक्षणीय स्वरांतर ठेवतो. त्यानुसार ‘वाहू’ या शब्दाकरिता सामऽ- तर ‘न’करिता नि आणि ‘गेऽलेऽ’करिता धध् धऽ अशी स्वररचना केली. पण एवढय़ानं माझं समाधान होईना. गाणं पुरुष-स्वर (अरुण आपटे) आणि स्त्री-स्वर (रंजना पेठे) अशा युगुल स्वरात योजलं होतं. सर्वसाधारणपणे युगुलगीतात एक पूर्ण अगर अर्धी ओळ पुरुष, तर दुसरी पूर्ण अगर अर्धी ओळ स्त्री किंवा कधी दोघं एकत्र मिळूनही गायले जाते. मला सुचलेला वेगळा विचार म्हणजे ‘एकाच एकाच वेळे दोघांचे डोळे.. दाटून दाटून आले वाहू’पर्यंतचा भाग प्रथम पुरुषानं गायचा आणि ‘न गेले.. एकाच एकाच वेळे.. दोघांचे डोळे, दाटून दाटून आले.. वाहू’ हा भाग स्त्रीनं गायचा. अशा तऱ्हेनं एरवीच्या युगुलगीतातल्या रुळलेल्या विभाजनापेक्षा अतिशय अनपेक्षित अशी वाटणी गायक-गायिकांमध्ये केली गेली. अर्थात ‘वाहू’नंतर आवाजाची जात बदलल्यामुळे वेगळय़ा जातीच्या आवाजातून गायला गेलेला ‘न’ हा शब्द ‘वाहू’पासून ठळकपणे विलग झाला, विभक्त झाला आणि कवीला अभिप्रेत अर्थ सार्थपणे पुढे आला.
कवितेच्या शेवटी पुन्हा कवीला-
‘एकाच एकाच वेळे.. दोघांचे डोळे
दाटून दाटून आले.. वाहून गेले’
अर्थात ‘दाटून आलेले डोळे अश्रूंत वाहून गेले’ असं म्हणायचं असल्यानं गाण्याच्या शेवटी दोन्ही ओळी पुरुष व स्त्रीस्वरात एकत्र मिळून गायल्या जाताना ‘वाहूऽन’ या शब्दातली सारी अक्षरे निनिऽनि या एकाच सुरात गायली गेल्यामुळे अश्रूंचं वाहून जाणंही सूचित झालं. आजपर्यंत अशा पद्धतीनं गाण्याच्या ओळीचं असमान, पण अर्थवाही विभाजन माझ्या तरी पाहण्यात नाही. त्यामुळे मला हे सर्व करताना खूप आनंद मिळाला. (आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी शिकलो. ती म्हणजे- जेव्हा कवितेचं कवितापण आणि ते जाणून बांधलेली चाल रसिकांसमोर प्रभावीपणे मांडायची असेल तेव्हा तालवाद्यांचा मोह टाळायचा आणि तालावर्तनाच्या अंधुक, तरल चौकटीवर शब्दस्वरांचं शिल्प उभारायचा प्रयत्न करायचा. (आणि तेव्हापासून अगदी आजपर्यंत मी या तत्त्वाचा प्रयोग करत अनेकानेक गाण्यांची निर्मिती करत आलोय.)
‘गेले द्यायचे राहून..’ या कार्यक्रमाचा शेवट आरती प्रभूंच्या ‘राहिलेली ही फुले घे..’ या निरोपाच्या कवितेनं करताना रवींद्र साठे, माधुरी पुरंदरे आणि रंजना पेठे यांच्या भाववाही स्वरांतून भैरवीच्या सुरावटीत विणलेला तिपेडी गोफ स्वरमंडळ, स्पॅनिश गिटार आणि इक्बालसाहेबांची जीवघेणी सारंगी यांच्या साथीनं त्या कवितेतला आशय गडद करत गेला.
‘राहिलेली ही फुले घे.. काय म्या द्यावे दुजे?
जन्मजन्मी मी दिलेले.. सर्व रे होते तुझे..’       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा