कादंबरीकार किरण नगरकर मराठीत का रुजू शकले नाहीत याचा तटस्थपणे घेतलेला शोध..
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून महत्त्वाचे लेखन करणारे किरण नगरकर या इंग्रजीच्या माध्यमातून जगभर पोचलेल्या लेखकान मायमराठीने मात्र आपल्याला काहीसा दुजाभाव केल्याची खंत अनेकदा व्यक्त केली आहे. खरे तर अनेक द्विभाषिक लेखकांबाबत हे घडताना दिसते. हे असे का होत असावे, या प्रश्नाच्या अनुषंगाने नगरकरांच्या लेखनाबरोबरच मराठी वाचकांच्या अभिरुचीचा वेधही यानिमित्ताने घेता येईल.
मराठी साहित्यव्यवहार, वाचनसंस्कृती आणि मराठी अभिरुची याविषयी काही ठोस विधान करणे अवघड गोष्ट आहे. आपल्याकडे एकाच वेळी अनेक परस्परविरोधी, विसंगत वाटणाऱ्या गोष्टी घडत असलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ, एकीकडे आपल्याकडे गावपातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत भरणाऱ्या वेगवेगळ्या भूमिका व विचारांच्या संमेलनांना लोक हजेरी लावतात, तर दुसरीकडे महत्त्वाच्या लेखकाच्या पुस्तकाची हजाराची आवृत्ती संपायलाही काही वर्षे लागतात. आपल्या वाचकांना ‘कोसला’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या पूर्णत: भिन्न प्रकृतीच्या कलाकृती एकाच वेळी सारख्याच प्रमाणात आवडू शकतात. तसंच अरुण कोलटकर किंवा विलास सारंग यांच्यासारखे कवी-लेखक मराठीतही लिहीत आहेत, हे आपल्याला त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावरच लक्षात येतं.
किरण नगरकर या मुळात मराठीतून लिखाणाला प्रारंभ करून इथल्या साहित्यव्यवहाराच्या उदासीनतेला कंटाळून इंग्रजीकडे वळलेल्या लेखकाबाबतही काहीसं असंच म्हणावं लागेल. ‘आपल्याला लेखक म्हणून मानमान्यता मराठीपेक्षाही इंग्रजीमुळे मिळाली, यामागे मराठी वाचनसंस्कृतीमधील अपरिपक्वताच दिसून येते,’ असं ते म्हणतात. ‘ककल्ड’ या नगरकरांच्या इंग्रजीत लिहिलेल्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावर दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी वाचक-समीक्षकांनी आपल्याला समजून घेतलं नाही, न्याय दिला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली होती. यात तथ्य आहे किंवा नाही, यावर वाद होऊ शकतात.
नगरकरांची पहिली कादंबरी ‘सात सक्कं त्रेचाळीस’ मुळात १९६७-६८ च्या सुमारास पु. आ. चित्रेंच्या ‘अभिरुची’मधून प्रकाशित झाली होती. त्यावेळीच जाणकार वाचकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. रा. भा. पाटणकर, मे. पुं. रेगे यांच्यासारख्या मान्यवरांनी तिचे कौतुक केले होते. ‘मौज’सारख्या प्रकाशन संस्थेला किंवा खरं तर श्री. पु. भागवतांसारख्या साक्षेपी संपादक- प्रकाशकाला ही कादंबरी विशेष काही बदलांविना प्रकाशित करायला लावण्यामागे या कादंबरीची पाठराखण करणाऱ्या याच ज्येष्ठांचा हात होता. या कादंबरीची मोकळीढाकळी नैसर्गिक शैली, तिच्यात सतत जाणवणारा एक प्रकारचा तिरसटपणा वा मॅडनेस, काळ आणि अवकाशाची वारंवार उलटापालट करून केलेल्या आशयसूत्रांच्या मांडणीतील नावीन्य किंवा कादंबरीचे पारंपरिक संकेतव्यूह नाकारणारा प्रयोगशील रचनाबंध, भारतीय समाजव्यवस्थेत तोवर तरी फारसे स्थान नसलेले व्यक्तिस्वातंत्र्य जपू पाहणारा नायक यांसारख्या गोष्टींमुळे नेमाडे यांची ‘कोसला’, भाऊ पाध्येंच्या मुंबईचं जनजीवन चित्रित करणाऱ्या कादंबऱ्या इत्यादींप्रमाणे नगरकरांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’चाही बोलबाला मराठीत होऊ लागला होता. भालचंद्र नेमाडेंसारख्या समीक्षकानेही या कादंबरीच्या अनुषंगाने बोलताना, संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्यातून व्यक्तिमत्त्वहनन करणारी एक भयानक पोकळी निर्माण होते ही जाणीव ज्या कादंबरीकारांना झाली आहे, त्यामध्ये भाऊ पाध्येंप्रमाणे किरण नगरकरांचाही समावेश होतो, असे म्हटले होते. नेमाडे यांच्याप्रमाणेच अनेक समीक्षकांनी साठोत्तर दशकातील महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये ‘सात सक्कं त्रेचाळीस’चा अंतर्भाव केलेला दिसतो. तरीसुद्धा या कादंबरीची पहिली आवृत्ती संपायला २७ वर्षे लागावीत, हेही नक्कीच गंभीरपणे विचार करण्याजोगं आहे. एका विशिष्ट अभिरुचीच्या वा बव्हंशी विद्यापीठ स्तरावरील बुद्धिजीवी मराठी वर्गापुरतीच नगरकरांची कादंबरी सीमित का राहिली असावी, याचा शोध घेताना मराठी अभिरुची आणि वाचनसंस्कृतीमध्येच त्याची काही कारणे सापडू शकतात. या कादंबरीच्या मुखपृष्ठावरील कादंबरीच्या आशयसूत्रांचे सूचन करणाऱ्या मजकुरापासून ते त्यातील जाहिरात क्षेत्राप्रमाणे केलेल्या दृश्यात्मकतेचा वापर, भाषेतील मोकळेपणा अशा मराठी अभिरुचीला अपरिचित वाटणाऱ्या अनेक गोष्टींवर टीका झालेली दिसते.
किरण नगरकर मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीशी लहानपणापासून परिचित आहेत. ‘सात सक्कं त्रेचाळीस’प्रमाणे ‘रावण आणि एडी’ या कादंबरीमध्येही या चाळीतल्या जीवनवास्तवाचे संदर्भ येतात. मात्र, तरीही मराठी वाचकांचा विशेष ओढा असलेल्या पारंपरिक स्वरूपाच्या मध्यमवर्गीय संवेदनाविश्वाला नगरकरांच्या लेखनात फारसं स्थान मिळालेलं आहे असं म्हणता येत नाही. मध्यमवर्गीय जाणिवा-संवेदनांवर पोसलेल्या मराठी अभिरुचीच्या असे लेखन पचनी पडणे त्यामुळे काहीसे कठीणच गेले असावे. मुंबईतील चाळसंस्कृतीशी संबंधित सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसे उभी करतानाही या माणसांचे मानसिक गोंधळलेपण, भावनिक गुंते, लैंगिक वर्तनव्यवहारातील मोकळेपणा ज्या पद्धतीने नगरकर चित्रित करतात, ती पद्धत मराठी वाचकांसाठी पूर्णत: अनोळखी अशीच होती.
याचदरम्यान साहित्याचे नवे मानदंड रुजवू पाहणाऱ्या साठोत्तर पिढीने प्रचलित साहित्यव्यवहाराला नकार, बंडखोर मूल्यांची पाठराखण, कलाकृतीच्या सांकेतिक वा पारंपरिक रूपांची मोडतोड, विविध प्रस्थापित व्यवस्थांमधील विसंगतींवर टीकाटिप्पणी अशा अनेक गोष्टींची जोरदार वाच्यता करणे सुरू केले होते. यामध्ये लघु-अनियतकालिकांशी जोडला गेलेला लेखक-कवींचा गट, विद्रोही जाणिवांनी लिहिणारा आंबेडकरवादी दलित लेखकांचा गट, त्याचप्रमाणे ‘सत्यकथा-मौज’ यांसारख्या प्रस्थापितांच्या व्यासपीठाशी संबंधित असलेला; तरीही प्रयोगशील जाणिवांनी लिहिणाऱ्या सारंग- नगरकर- डहाके यांच्यासारख्या लेखकांचाही एक वर्ग होता. मात्र, लघु-अनियतकालिक व विद्रोही गटातील साहित्यिक ज्या आक्रमक पद्धतीने वाचकांसमोर आले, त्या प्रमाणात सारंग-नगरकरांसारखे या सर्व साहित्यिक-सांस्कृतिक- सामाजिक व्यवहारांपासून बरेचसे अलिप्त राहणारे, ‘मितभाषी’ साहित्यिक येऊ शकले नाहीत. नेमाडे, शहाणे, राजा ढाले इत्यादींच्या अनेक वादग्रस्त विधानांमधून आपापल्या गटातील लेखक-कवींचे साहित्य चर्चेत ठेवणे किंवा ‘मौज-सत्यकथे’शी संबंधित लेखकांना अनुल्लेखाने मारणे, या गोष्टीही वाचकांच्या अभिरुचीवर प्रभाव टाकणाऱ्या होत्या, हेही नाकारता येत नाही. विशेषत: तत्कालीन बहुजन वर्गातील नवसाक्षर मराठी वाचकांच्या अभिरुचीला विशिष्ट दिशा देण्याचे काम काही प्रमाणात का होईना, या संशयाचे साहित्यशास्त्र निर्माण करणाऱ्या वर्गाने केले हे मान्य करावे लागते.
नगरकरांसारखा लेखक मराठी वाचकांशी फार जवळीक साधण्यात अपयशी ठरण्यामागे यासारखी आणखीनही कारणे असू शकतात. मराठी साहित्य व समाजव्यवहाराशी संबंधित प्रसारमाध्यमे, संमेलने, चर्चासत्रे, वाङ्मयीन नियतकालिके, विशिष्ट वाङ्मयीन गट, पंथ, वाद वा भूमिका, लेखनाची विशिष्ट वाचकगटाला आवडेल अशी चाकोरी वा पठडी, खळबळजनक विधाने अशा अनेक गोष्टींपासूनही नगरकर बऱ्यापैकी दूर असल्याने त्यांच्या लेखनाविषयी बहुसंख्य मराठी वाचक अनभिज्ञ राहिला असणे शक्य आहे. व्यक्तिनिष्ठा, खाजगीपण वा एकांतवास जपणाऱ्या गंभीर प्रवृत्तीच्या लेखकांपेक्षाही विविध माध्यमांमधून समाजाभिमुख असणारा लेखक मराठीत विशेष लोकप्रिय असतो, हे सातत्याने दिसत आले आहे. मौजेसारख्या गंभीर व दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेच्या विक्रीतंत्रामधील उदासीनतेचाही ‘सात सक्कं त्रेचाळीस’च्या खपावर विपरीत परिणाम झाला असणे शक्य आहे. याउलट, इंग्रजीतून प्रकाशित झालेल्या ‘रावण अ‍ॅण्ड एडी’, ‘ककल्ड’, ‘गॉड्स लिट्ल सोल्जर’, ‘द एक्स्ट्राज’ अशा कादंबऱ्या स्वत: लेखकाकडून वा आमिर खानसारख्या एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याकडून त्यांचे जाहीर वाचन करणे, या कादंबऱ्यांवरची देश-विदेशातील वृत्तपत्रे-मासिकांतली परीक्षणे, लेखक वा प्रकाशकाच्या मुलाखती, प्रकाशन समारंभ, पुस्तकांच्या जाहिराती आणि जगभरातला इंग्रजीचा वाचकवर्ग अशा अनेक गोष्टींमुळे नि:संशयपणे मराठीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटींत खपलेल्या दिसतात. अर्थातच या साहित्यबाह्य़ कारणांइतकेच इंग्रजी वा अन्य युरोपियन भाषांतील प्रगल्भ वाचनसंस्कृती हेही एक महत्त्वाचे कारण यामागे आहेच. किरण नगरकरांच्या कादंबऱ्यांतील प्रयोगशीलता, लेखनशैलीचे नावीन्य, भारतीय मिथकांमधील काही पात्रांच्या अनुषंगाने नव्या विचार व जाणिवांचा घेतलेला वेध अशा काही मराठी अभिरुचीला न रुचलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाचकाच्या पसंतीला उतरलेल्या दिसतात. विशेषत: नगरकरांच्या कादंबऱ्यांचा ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या मूळ मराठीपासून सुरू होत पुढे ‘रावण अ‍ॅण्ड एडी’, ‘ककल्ड’, ‘गॉड्स लिट्ल सोल्जर’ हा आंतरराष्ट्रीय वाचक काबीज करण्याचा हेतू मनात बाळगून केलेला प्रवास पाहिला तर अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात. मराठी मध्यमवर्गीय संवेदनाविश्व ते आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष मूल्य असलेल्या भारतीय मिथकांतील गोष्टी, त्यांचा कालसापेक्ष लावलेला नवा अन्वयार्थ, बोल्ड लैंगिक तपशील, सर्वसामान्य भारतीय मनाला सिनेमाविश्वाचे असलेले आकर्षण या सगळ्यातून मराठी अभिरुचीपेक्षा युरोपियन वाचकांच्या अभिरुचीकडे नगरकरांनी थोडे जास्तच लक्ष पुरवलेले दिसून येते.
नगरकरांच्या इंग्रजी लेखनाबाबत घेतला जाणारा हा आक्षेप अर्थातच त्यांना मान्य नाही. मराठी वाचक-समीक्षकांविषयी नगरकरांची तक्रार हीच आहे की, या वाचनसंस्कृतीत काही गोष्टी पूर्वग्रह मनात बाळगावेत तशा गृहीत धरल्या जातात, त्याच पारंपरिक दृष्टिकोनातून मूल्यमापन केले जाते. यापैकीच एक गृहितक म्हणजे भारतीय प्रादेशिक भाषांत लिहिले गेलेले साहित्य हे भारतीयांनी लिहिलेल्या इंग्रजी साहित्यापेक्षा अधिक मौलिक, वस्तुनिष्ठ आणि दर्जेदार आहे. नगरकर ही समीकरणे नाकारताना म्हणतात- ‘कोलटकरही द्विभाषिक कवी आहेत. पण म्हणून कोलटकरांच्या इंग्रजीतून लिहिलेल्या कविता मराठी कवितेपेक्षा कमी कसदार आहेत, असे म्हणता येते का? माझ्यासारखा लेखक मराठीत लिहितो तेव्हा प्रामाणिक असतो आणि इंग्रजीत लिहिलं की खोटारडा, असं कशाच्या आधारे तुम्ही म्हणू शकता? दुसरं असं की, आम्ही इंग्रजीइतकेच मराठीतही महत्त्वाचे लेखन करतोय असे वाटत असेल तर आम्हाला इंग्रजीप्रमाणेच मराठीतही मान्यता का मिळू नये?’
नगरकरांनी उपस्थितीत केलेल्या या प्रश्नांवर मराठी वाचकांनी, समीक्षकांनी विचार करणे गरजेचे आहे. विशेषत: भाऊ पाध्येंच्या नंतर मायानगरी मुंबईच्या नसानसांतून वाहणाऱ्या ठसठसत्या दुखऱ्या जाणिवा-संवेदना, तिच्या वास्तव जगण्याच्या तपशिलांना शब्दबद्ध करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्या गेलेल्या या मराठी लेखकाला मराठी वाचनसंस्कृतीच्या भलेपणासाठी तरी आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा