मुकुंद टाकसाळे
‘काव्यशास्त्रविनोदा’ची परंपरा सध्या व्हॉट्सअॅप विद्यापीठामधून जोरकस चालू असताना, मध्येच कुणाल कामरा या स्टॅण्डअप कॉमेडियनचा शाब्दिक ‘प्रमाद’ राज्याला काही दिवस ढवळून काढण्यास पुरेसा ठरला. ‘हॅबिटाट’ हॉटेलच्या थेट्रात सव्वाशे-दीडशे लोकांपुरता झालेला मर्यादित विनोदउद्याोग पुढे राजकारण्यांनी आपल्या वाक्कृत्यांतून आणखी लोकप्रिय केला. स्वातंत्र्यानंतरच्या दरएक दशकात विनोदसहिष्णुतेची कित्येक उदाहरणं नेत्यांनी, कलाकारांनी आपल्यासमोर ठेवली. मग हल्लीच ती परंपरा गमवण्याच्या वाटेवर आपण पोहोचलो आहोत काय? प्रसिद्ध विनोदकार आणि व्यंगचित्रकार या एकूण घटनेकडे कसं पाहतात? कुणाल कामराचे एका बाबतीत तरी महाराष्ट्रानं आभार मानायलाच हवेत. गेले काही महिने अख्खा महाराष्ट्र इतिहासात हरवून गेलेला होता. महाराष्ट्र औरंगजेबाच्या कबरीभोवती झिम्मा घालत होता. कुणाल कामरानं त्याची ‘नया भारत’ ही स्टॅण्डअप कॉमेडी लॉन्च केली आणि अख्ख्या महाराष्ट्र शासनाला गदागदा हलवून खाडकन् वर्तमानात आणलं. कुणाल कामराचं हे मोठंच ‘ऐतिहासिक’ कार्य म्हणायला हवं.
अर्थात कुणाल कामरानं महाराष्ट्र सरकारला गदागदा हलवलं की महाराष्ट्र सरकारनं स्वत:ला कारण नसताना गदागदा हलवून घेतलं, हे ठरवणं कठीण आहे. मला तरी यात कामरापेक्षा माजी मुख्यमंत्री आणि आजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्तबगारी अधिक उजवी वाटते. या व्हिडीओ कार्यक्रमात कुणाल कामरानं काही विडंबन गीतं सादर केली होती. आचार्य अत्रे यांची विडंबन काव्याची व्याख्या आपण पुढे ठेवायची म्हटलं तर त्या व्याख्येनुसार कामराची ही गाणी विडंबनात्मक गाण्याचंचं विडंबन ठरली असती. किंबहुना, ‘विडंबन कसं नसावं’ याचंच उदाहरण ठरली असती. सिनेमातल्या गाण्याच्या चालीवर त्यानं गाणी रचली होती. कामरा हा पट्टीचा सोडा, पण साधाही गायक नसल्यानं गाताना तो पट्टीची फारच गडबड करत होता. गाण्यात शब्द कोंबून कोंबून कसे तरी बसवलेले होते. त्यामुळे वृत्ताची बोंबच होती. स्वत: कुणाल कामरा गाण्यात कोंबलेले शब्द नरड्यात कोंबून ठार बेसुरा गात होता.
त्या गाण्यांच्या जोडीला त्याचे विनोदही चालूच होते. त्यात त्याच्या पद्धतीप्रमाणे शिव्या, अपशब्द यांची रेलचेल होती. पण आता आजच्या काळातील ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ म्हटल्यानंतर हे सारं आलंच. अलीकडे स्टॅण्डअप कॉमेडी सादर करणारी मुलगी असली तरी दोन-चार लिंगवाचक रांगडे शब्द, दोन-चार शिव्या वापरल्याशिवाय तिची कॉमेडी सुफल संपूर्ण होत नाही. कुणाल कामरा म्हणतो, ‘माझी कॉमेडी ही साठी-सत्तरीतल्या म्हाताऱ्यांसाठी नाहीच आहे. त्या म्हाताऱ्यांनी कपिल शर्माची सोज्वळ कॉमेडी साऱ्या कुटुंबासहीत पाहावी. (‘पुलं आणि वपु यांच्या कॉमेड्यांवर वाढलेल्या सुसंस्कृत मराठी मनांना कपिल शर्मासुद्धा ‘अब्रह्मण्यम्’ वाटू शकतो.) पण आजच्या तरुणांची तीच भाषा आहे. खरं तर शिंदे काय किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी काय? त्यांना ही भाषा नवीन आहे का? कोकणचे दोन सुपुत्र राणेबंधू शिवराळ बोलण्यात कुणा(ल)लाही हार जाणार नाहीत. अगदी संसदेतही ‘कटमुल्ला’, ‘तडीपार’ असे असंसदीय शब्द नव्याने रुळायला लागले आहेत. ‘पार्लमेन्टरी डिक्शनरी’नं ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’प्रमाणे दर वर्षी नव्याने आगमन झालेल्या असंसदीय शब्दांची घोषणा करायला हरकत नाही. पार्लमेन्टपासून सर्वत्र असभ्य भाषा जर रोजची, नित्याची भाषा झाली असेल तर फक्त तरुणांनी त्यांच्या ‘स्टॅण्डअप कॉमेड्या’ सभ्य भाषेत कराव्यात, या मागणीला तसा फारसा अर्थ नाही.
एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या दंगलखोर साथीदारांनी कुणाल कामराच्या या कॉमेडीच्या निमित्ताने उगाचच डोक्यात राख घालून घेतली. ती एवढी मनावर घ्यावी अशी मुळीच नव्हती. काल-परवापर्यंत कुणाल कामरा हे नाव महाराष्ट्रात फारसं कुणाला ठाऊकही नव्हतं. तो ‘हॅबिटाट’ हॉटेलच्या छोट्या थेट्रात सव्वाशे-दीडशे लोकांना हसवायचा. तिकीट महाग असल्यानं त्याच्याकडे आम जनता फिरकायचीसुद्धा नाही. एकनाथरावांच्या कृपेने त्याचे चाहते अचानक काही कोटींच्या पुढे गेले. त्याच्याकडे या चाहत्यांनी न मागता पैशांचा ओघ सुरू केला. आता शिंदे आणि देवाभाऊ हे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमितभाईंपाशी ‘कुणाल कामराच्या मागे ईडी लावा’ असा राजहट्ट करतील, अशी एक कुशंका मनात येते आहे.
खरं तर शिंदेजींना त्या गाण्यात असलेले गद्दार, गुवाहाटी हे शब्द का खटकले तेच समजत नाही. त्यांच्याबाबत महाराष्ट्रात हे कुणी पहिल्यांदा म्हणत नव्हतं. कामरा तर म्हणालासुद्धा की, ‘‘जे अजित पवार म्हणाले, तेच मी म्हणालो.’’ पक्षांतर केल्यावर शिंदे आणि त्यांच्या चाळीस साथीदारांचं महाराष्ट्रात याच शब्दानं स्वागत झालेलं होतं. (तरी कामरानं खोक्यातला ‘ख’सुद्धा उच्चारला नव्हता.) पण स्वत:वरचा विनोद घ्यायची सवय नसल्यानं शिंदे चिडले. शिंदे चिडले म्हणून त्यांचे भक्त चिडले.
जिथं अशा कॉमेड्या सादर केल्या जायच्या, त्या हॅबिटाट हॉटेलची आणि तिथल्या फर्निचरची शिंद्यांच्या साथीदारांच्या झुंडीनी येऊन मोडतोड केली. मुद्दाम कुणालचा मोबाइल नंबर सार्वत्रिक केला. त्याच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना उगाचच यात ओढलं. आता तर विधानसभेत त्याच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचं चाललं आहे. सोप्या इंग्रजीत याला ‘मॅनहन्टिंग’ असं म्हणतात. ‘शिंद्यांचे साथीदार’ म्हणण्याचं एक कारण म्हणजे शिंद्यांचे एक आमदार प्रताप सरनाईक या साथीदारांच्या बचावार्थ लगेचच पोलीस चौकीत धावत गेले. खरं तर इतकं सारं करण्याची काहीही जरूर नव्हती. आजच्या राजकारण्यांना स्वत:वरचा विनोद खिलाडूपणाने घेता येत नाही, हे देवेंद्र फडणवीसांसकट सर्वांनी सिद्ध करून दाखवलं. गृह खात्याचे राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी तर कुणालला टायरमध्ये घालून मारण्याचं स्वप्न पाहिलं. कुणाल कामराने त्याच्या कार्यक्रमाच्या शेवटी ‘राज्यघटने’चं पुस्तक दाखवलं, हे शंभूराज यांच्या लक्षात आलं नाही का? शिवाय अलीकडेच काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुद्धचा एफआरआय रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं स्टॅण्डअप कॉमेडीचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य दडपल्याचा तीव्र शब्दांत निषेध केलेला आहे, हेही निकालपत्र महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही. देवाभाऊंनी राज्याचा गृहमंत्री या नात्यानं तर त्या ‘हॅबिटाट’ हॉटेलात बुलडोझर पाठवून शिंदेभक्तांचं अपूर्ण कार्य स्वत: पूर्ण करून टाकलं. त्यापूर्वीही नागपूरला त्यांनी दंगलीत सहभाग असल्याचा आरोप ज्याच्यावर आहे त्याच्या आईचं घर बुलडोझरनं पाडलं. मुस्लीम मुलावर चांगले संस्कार केले नाही, म्हणून बहुधा मुस्लीम आईला शिक्षा. इन्स्टंट न्याय.
हा बुलडोझर न्याय करण्यामागे ‘आले देवाजीच्या मना’ असा उत्स्फूर्तपणाचा भाग आहे का? तर नाही. नसावा. मग महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग नसणारा हा बुलडोझर आला कुठून? तर तो आला य़ूपीमधून. आपण पाहतो आहोत गेले कित्येक महिने उत्तर प्रदेश सरकारच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या मराठी वृत्तपत्रांत झळकत आहेत. उत्तर प्रदेशातल्या कथित प्रगतीच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात पाहून आपण काय करावं अशी यूपी सरकारची अपेक्षा आहे? आनंदानं नाचत सुटावं? एक वेळ गुजरातच्या जाहिराती दाखवल्या असत्या तरी चाललं असतं. गुजरातच्या प्रगतीत आपल्या महाराष्ट्राचा मोठा वाटा आहेच. त्यामुळे आपली छाती अभिमानानं फुलून आली असती. पण उत्तर प्रदेशच्या जाहिराती इथं का? त्या सततच्या जाहिरातींमुळे उत्तेजना मिळून देवाभाऊंना आपण ‘योगी आदित्यनाथ’ होण्याची स्वप्नं तर पडत नाहीत ना? इकडे महाराष्ट्राचा यूपी करण्याचं स्वप्नं, तिकडे बीड भागात महाराष्ट्राचा बिहार करण्याचं स्वप्न… या साऱ्या धांदलीत महाराष्ट्राची स्वत:ची अशी काही ओळख उरणार आहे की नाही? देवाभाऊ, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश-बिहार या राज्यांमध्ये काही तरी फरक ठेवा बुवा!
कुणाल कामराचा विनोद कसा असतो? त्याच्या एका स्टॅण्डअप कॉमेडीमधील विनोद पाहू. तो म्हणतो, ‘… मोदीजी बहुत अच्छे है. उन्होंने बोला हैं कि ‘क्रिटिसिजम इज बॅक बोन ऑफ डेमोक्रेसी.’ …मोदीजी से मेरा कोई प्रॉब्लेम नहीं, मगर उन के ‘एनआरआय भक्तों से है’ उनके एनआरआय भक्त हमेशा चिल्लाते रहते हैं -मोऽऽऽदी मोऽऽऽदी मोऽऽऽदी मोऽऽऽ दी… मोदीजी कभी किधर इंटरनॅशनल मॅच देखने चले गये ना… पता नहीं क्या होगा…, इंडिया कभी ट्रीकी पोझिशन में आ गया ना तो भक्त उन्हें ना भेज दे बॅटिंग पे… भाई, तीन बॉल मे १७ चाहिये… कोहली का विकेट चला गया। सब एनाराय भक्त चालू ‘मोऽऽऽदी मोऽऽऽदी मोऽऽऽदी मोऽऽऽदी…अरुण जेटली आके पॅड पहना रहा है. अमित शहा बोलर का हाथ काट रहा है. बोलर मुंह मे बॉल ले के आ रहा है जीभ भी कटी हुई है. कही स्पिन विन न हो जाए. मोदीजी के पैर पे बोल लगता है… फिल्डर खुद उठा के बाउंडरी लाईन ले जाता है. अंपायर छक्का देता है कॉमेंटेटर सेंचुरी बताता है. रात को एक जर्नलिस्ट पुछता है – व्हाय इज जेएनयू सायलेंट टुनाइट?’
कुणाल कामरानं एका दगडात किती पक्षी मारलेले आहेत ते लक्षात येतं. यात मोदीभक्त आले,
एनआरआयभक्त आले, मोदींना येनकेनप्रकारेण विजयी घोषित करण्याचा खटाटोप दिसून येतो, अमित शहाच्या नेमक्या वृत्तीवर बोट ठेवलेले आहे, गोदी मीडियाचा प्रतिनिधी अर्णव याचा आरडाओरडा आहे आणि जेएनयूला ऊठसूट बदनाम करण्याचं भाजप सरकारचं धोरण आहे… ही आहे कुणाल कामराची स्टॅण्डअप कॉमेडी. पॉलिटिकल सटायर. हे झोंबणारंच आहे. यात अतिशयोक्ती आहे का? तर आहेच. पण खरे मोदीभक्त कामराच्या या कॉमेडीलाही लाज वाटावी अशी मुक्ताफळं रोजच उधळत असतात.
ओ. पी. धनखड हे हरियाणा भाजपचे पक्षप्रमुख. त्यांनी नुकतंच जाहीर केलं, ‘‘मोदी सरकारच्या काळात भारतातील महिलांची उंची वाढली. माझ्या स्वत:च्या बहिणीची उंची दोन इंचांनी वाढली.’’ (२०१४ साली बहीण ३-४ वर्षांची असेल तर हा आत्तापर्यंत ‘चमत्कार’ घडू शकतो.)
महाराष्ट्रात यापूर्वी जे राज्यकर्ते होऊन गेले, ते राजकीय विनोदाबाबत बरेच सहिष्णू होते. मग अचानक महाराष्ट्रात ही एवढी असहिष्णुता आली कुठून? महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर यशवंतराव मुख्यमंत्री झाले. त्यांच्या हातात प्रचंड सत्ता होती. सारा बहुजन समाज त्यांच्या पाठीशी होता. पण त्या सत्तेचा वापर करून दहशत माजवावी, असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवलासुद्धा नाही.
अलीकडेच ‘फेसबुक’वर यशवंतरावांच्या जीवनातील एक प्रसंग वाचनात आला. पत्रकार आचार्य अत्रे एकदा का एखाद्यावर तुटून पडले की मागचा-पुढचा विचार करायचे नाहीत. एकदा अत्रे यांनी यशवंतराव यांना ‘निपुत्रिक’ म्हणून हिणवलं. ही टीका निश्चितच असभ्य आणि हीन अभिरुचीची होती. पण यशवंतरावांनी अत्र्यांविरुद्ध एक चकार शब्दही काढला नाही. त्यांनी फक्त अत्रेंना एक फोन केला आणि शांतपणे ते म्हणाले, ‘‘माझी पत्नी वेणू १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठीहल्ला केला, त्यामुळे तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचं निकामी झालं…’’ यशवंतरावांनी एकही अपशब्द वापरला नाही. आचार्य अत्र्यांना आपली चूक उमगली ते त्यानंतर थेट यशवंतरावांच्या घरी आले. अत्यंत पश्चात्तापदग्ध होत त्यांनी यशवंतरावांची आणि वेणूताई यांची माफी मागितली, यावर वेणूताई आचार्यांना म्हणाल्या, ‘‘भाऊ, त्यानिमित्ताने तरी तुम्ही आमच्या घरी आलात.’’ तेव्हा आचार्यांना अश्रू अनावर झाले होते. (ही पोस्ट लिहिणाऱ्याचं खाली नाव नाही.) तर तो लिहिणारा शेवटी म्हणतो, ‘‘ही महाराष्ट्रातील नेत्यांची त्या वेळेची (आजची नव्हे) संस्कृती होती. ती माणसं कुठल्या मातीनं बनलेली असावीत?’’ हा यशवंतराव साहेबांचा महाराष्ट्र… आजची संस्कृती म्हणजे ‘तुला चपलेने मारतो’, ‘कानशिलात ठेवून देतो’, ‘कोथळा बाहेर काढतो’ ही! अहो, साधे विनोद सहन होत नाहीत यांना…
आचार्य अत्रे यांनी एकदा दै. ‘मराठा’त ‘एस. एम. जोशींना जोड्याने मारा’ असा आठ कॉलमी मथळा दिला होता. त्यावर एसएम आपल्या अनुयायांना घेऊन दै.‘मराठा’ची कचेरी जाळायला गेले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आणि नंतरच्या काळात कॉंग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांवर – त्यात पंडित नेहरू, सदोबा पाटील, काकासाहेब गाडगीळ, मोरारजी देसाई यांच्यावर भरपूर टीका असे. त्यांच्यावर खास अत्रे शैलीत गमतीशीर विडंबन गीतं केलेली असत. पण कुणी हिंसक मार्गाचा अवलंब करून निषेध नोंदवल्याचा इतिहास नाही.
त्या काळात काँग्रेस पक्षावर गांधीजींचा प्रभाव होता. स्वत: पं. नेहरू हे ‘शंकर्स वीकली’च्या शंकर पिल्ले यांना बोलावून म्हणाले होते, ‘‘माझी व्यंगचित्रं काढताना अजिबात हात आखडता घेऊ नकोस. तुला वाट्टेल ती टीका माझ्यावर कर.’’ ही कॉंग्रेस संस्कृती नाही म्हटलं तरी महाराष्ट्रातल्याही काँग्रेसमध्ये झिरपली होती. अभिजन वर्गांतल्या मराठी नाटकांमध्ये ‘पुढारी’ म्हटलं की कोचदार पांढरी टोपी घातलेला पुढारी दाखवला जायचा. हे यशवंतरावांचंच अर्कचित्र असायचं. पण साखर कारखान्यावर अशी नाटकं आली तर त्यांची मौज लुटताना कधी बहुजनांच्या मनात विकल्प यायचा नाही. आमच्या लहानपणी हे निरोगी वातावरण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
त्यानंतरही महाराष्ट्राने मधल्या काळात जसपाल भट्टीची अफलातून कॉमेडी पाहिलेली आहे. शेखर सुमन हाताने झाकणं फिरवल्याचा अभिनय करत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची तुफान नक्कल करायचा. लालू यादव यांच्यासमोर राजू श्रीवास्तव याने त्यांची केलेली नक्कल यूट्यूबवर उपलब्ध आहे. स्वत:वर खिलाडूपणे हसण्याची लालू यादव यांची मानसिकता होती. दिवसेंदिवस जातीचा, धर्माचा, पक्षाचा, एखाद्या नेत्याच्या व्यक्तिपूजेचा अहंकार एवढा वाढत चालला आहे, की महाराष्ट्रातले राजकीय पुढारी काही दिवसांनी हसूच विसरून जातील आणि सतत फक्त चिडचिडे बनून कुणाच्या ना कुणाच्या नावानं सतत शिमगा करत राहतील, अशी भीती वाटते.
एवढी सत्ता येऊनही भाजपचे पुढारी कधी फारसे हसताना दिसत नाहीत, आनंदी दिसत नाहीत. आपले देवाभाऊसुद्धा कायम सभागृहात घशाच्या शिरा ताणून ओरडत असतात. यापूर्वीच्या महाराष्ट्रात एवढ्या कर्कश आवाजात बोलणारा दुसरा कुठला मुख्यमंत्री आठवतोय का? महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि त्यांचे अत्युत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी ‘विनोदाला कसं हसावं? विनोदाला खिलाडूपणे कसं तोंड द्यावं?’ याचा एखादा उद्बोधन वर्ग तातडीने घेण्याची आवश्यकता आहे.
खरं तर कॉमेडीला कॉमेडीने उत्तर देण्यात मजा आहे. माननीय एकनाथरावांजवळ देवदयेनं बक्कळ पैसा आहे. त्यांनी या कुणाल कामराच्या मागे हात धुऊन लागण्यापेक्षा आणि हॉटेलांना बुलडोझर लावत बसण्यापेक्षा त्याच्या स्टॅण्डअप कॉमेडीला उत्तर देण्यासाठी सरळ ‘धर्मवीर- ३’ हा सिनेमा काढावा. पाहिजे तर त्यात ‘कुणाल कामरा’ नावाचा खलनायक घ्यायचा आणि त्याला धर्मवीराचा वारसदार आणि त्याचा शंभूराज हा साथीदार चाबकानं बेदम बडवतो, असं दाखवायचं. कॉमेडीला कॉमेडीने उत्तर! फिट्टमफाट!
© The Indian Express (P) Ltd