मित्रांनो, हा लेख प्रसिद्ध होईल त्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतील. नवे गडी, नवे राज्य उदयास येण्याची मुहूर्तमेढ ठरेल. एकाच पक्षाचा धम्मक बुंदीचा लाडू असेल की अठरापगड कडबोळे असेल याचा अंदाज लावणे यावेळी विधात्यालाही कठीण जावे. पण नवे सरकार अस्तित्वात येईल, हे नक्की. काय गंमत आहे, आपण सरकारला ‘मायबाप’ म्हणतो. वास्तविक पाहता सरकार हे जनताजनार्दनाचे ‘लेकरू’ असते. त्याला अंगाखांद्यावर वाढविताना एक दिवस ते शेफारून आपल्या डोक्यावर बसते, हे जनतेला कळत नाही. जे सुरुवातीला करंजीतल्या गोड सारणासारखे भासते त्याचे नंतर चकलीच्या काटय़ात रूपांतर होते. खंत एकाच गोष्टीची वाटते, की एवढा सुजलाम्, सुफलाम् प्रदेश असतानाही आपण करंटय़ासारखे हातात वाडगा घेऊन उभे राहतो.. कधी विजेसाठी, कधी पाण्यासाठी, कधी दाण्यासाठी, तर कधी धानासाठी. सहा दशकांत काहीतरी करायचे राहून गेलंय. जे इतक्या वर्षांत पूर्ण झालं नाही, ते पुढच्या पाच वर्षांत होईल, ही अपेक्षा अवाजवी ठरेल . आपण तरी सगळा भार सरकारवर का टाकावा? समाजाची आद्य कर्तव्ये कोणती, याचा विचार मला आज करावासा वाटतो. चार उपदेशांच्या गोष्टी सांगण्याचा मला अधिकार नाही. पण आतडं तुटतं, म्हणून लिहावंसं वाटतं, हे मात्र खरं.
सामाजिक स्वच्छता ही शासनापेक्षा आपली जबाबदारी आहे. प्लॅस्टिक इमल्शन लावून घराच्या िभती ओल्या फडक्याने पुसणारे आम्ही एअरकंडिशन्ड गाडीच्या काचा खाली करून शेंगदाण्याचा शेवटचा दाणा अडकलेली पुरचुंडी, फ्रुटीचा शोषून हवा गेलेला पोचा आलेला पुठ्ठय़ाचा खोका, बिस्लेरीची रिकामी बाटली रस्त्यावर फेकतो. रंगलेल्या पानाच्या तोबऱ्याने महापालिकेने सकाळी स्वच्छ केलेले रस्ते रंगवतो आणि वर सिंगापूर, दुबईच्या स्वच्छतेचे गोडवे गातो. तेव्हा आपले सामाजिक भान पूर्णपणे सुटलेले असते, हेच खरे. सफाई करणे हे जर शासनाचे काम असेल तर स्वच्छता राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे, हे आपण जाणलेच पाहिजे. झाडू घेऊन सफाई करणे हे एक दिवस ठीक आहे. ते प्रतीकात्मक आहे. के.ई.एम. रुग्णालयाचा अधिष्ठाता असताना एक दिवस चिडून मीही ते केले आहे, पण ‘जेणो काम तेणो सांझे’. जितकी चकचक माझ्या सफाई कामगाराचा हात फिरवल्यावर दिसते, तितकी माझ्या हाताने होत नाही, हेही खरेच. मग मी काय करायचे? तर त्याचे श्रम हलके करण्यासाठी घाण कमी करायची, हे अंगी बाणवायला हवे. विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर आणि शक्य असेल तिथे कंत्राटी पद्धतीचा अवलंब हे दोन्हीही उपाय राबविल्यावाचून पर्याय नाही. कंत्राटी पद्धतीचा उल्लेख माझ्या युनियन्समधल्या जुन्याजाणत्या सहकाऱ्यांना रुचणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण काही सार्वजनिक ठिकाणांच्या बाबतीत आपण सर्वानीच आपले परिमाण बदलण्याची वेळ आली आहे. आम्ही मुंबईत राहायचे आणि ‘टर्मिनल २’चा अभिमान बाळगायचा; पण ते काही साऱ्यांच्या नशिबात नाही. तेव्हा आमचे बस स्टॉप, एस. टी. स्थानके, टॅक्सी-रिक्षा तळ यांच्या बाबतीत स्वच्छतेसाठी वेगळे निकष आणि खासगी संस्थांचा सहभाग करण्याची वेळ आली आहे, हे आपण प्रामाणिकपणे मान्य करायला हवे. आपल्या सामाजिक सवयींवर नव्याने र्सवकष विचार करायला हवा. सकाळी पाखरांना दाणे विखुरणाऱ्यांनी, कुत्र्यांना अख्खा पाल्रेचा पुडा ओतणाऱ्या प्राणिस्नेह्य़ांनी रस्त्यांचा, चौकांचाही विचार करावा असे मला वाटते. लंडनच्या ट्रॅफलगार स्क्वेअरसारखा आमचा हुतात्मा चौक आम्हाला प्रिय आहे. पश्चिम, पूर्व प्रत्येक उपनगरात, राज्यातल्या प्रत्येक शहरात आम्ही असे चौक निर्माण करायला हवेत. इथे माणसं एकत्र येतील, विचार व्यक्त करतील, आपल्या कोशातून बाहेर पडतील आणि नव्याने जगायला शिकतील.
मुंबई-पुण्याच्या पलीकडेही राज्य आहे. तिथे नळाला पाणी येत नाही. पाच ते दहा हजार टँकरच्या फेऱ्या लागतात आणि एखाद्-दुसऱ्या बादलीसाठी आमची श्रावणबाळे कावडफेऱ्या करतात. इकडे मात्र आम्ही बिस्लेरीची अर्धी बाटली रस्त्यात ओतून देतो. ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना ते देणे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचविणे, हे ज्यांना मुबलक मिळते आहे त्यांचे कर्तव्य आहे. त्याचा विचार केल्याशिवाय घोट आपल्या घशाखाली उतरू नये. पुढच्या पाच वर्षांत राज्यात कालव्यांचे जाळे रस्त्यांच्या जाळ्याशी स्पर्धा करेल असे व्हायला हवे. त्यासाठी वेगळे धनरोखे उभारण्याची वेळ आली तर आपल्यापकी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा. घोटाळ्यांची चर्चा खूप झाली. आता त्यापलीकडे जाऊन पाणी पोहोचविण्याची प्रत्यक्ष कृती व्हायला हवी. कारण या चर्चानी क्षणभर मनोरंजन होईल, पण तहान भागवायची असेल तर पाणी अडवायला, वळवायला आणि पोहोचवायला हवे, हेच खरे. इथे अपेक्षा आहे जनमताच्या रेटय़ाची.
आरोग्य हा माझा जीवाभावाचा विषय. गेली दोन वष्रे राज्याच्या अंतर्भागात सेवा केल्यावर मला त्रुटी जाणवल्या आहेत अन् उत्तरेही सापडली आहेत. शहरी वैद्यकीय विश्वाने आपल्या जाळ्यातून बाहेर पडायलाच हवे. संपूर्ण राज्यातील विवक्षित जिल्हे खासगी व्यावसायिकांनीही दत्तक घ्यायला हवेत. इथे दानशूर व्यक्तींची कमतरता नाही. प्रश्न सत्पात्री दान होणे, संस्था निर्माण होणे आणि त्या टिकण्यासाठी सर्वानी शिवधनुष्य उचलणे गरजेचे आहे. टेलिमेडिसीन आपल्याला जोडणार आहे, फक्त त्यासाठी वेळ काढायला हवा. तंत्रज्ञान आपल्याला जवळ आणण्याची क्षमता बाळगते, पण जवळ यायचे की नाही, हे माणसांच्या हातात उरते हे लक्षात ठेवायला हवे. हे केवळ पाश्चात्त्य आणि पूर्वेतल्या वैश्विक नागरिकांसाठी नाही, तर आपल्याच राज्यातल्या गडचिरोलीकरांसाठीही अस्तित्वात असायला हवे.
.. लिहिण्यासारखं, करण्यासारखं खूप काही आहे. संकल्प करायचा आणि तो सफल, संपूर्ण करावयाचा याची गरज आहे. सरकार ही काठी आहे, पण हात मात्र जनतेचे आहेत. तेव्हा गाऱ्हाणं घालू या अन् म्हणू या..
‘होय म्हाराजा, सगळ्यांका बुद्धी दे रे महाराजा..’      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा