बाबा आमटे म्हणजे एक वटवृक्षच! या वटवृक्षानं अनेकांचं जगणं सुसह्य केलं. अनेक जिवांना मार्गस्थ केलं. आपल्या सामाजिक कामाच्या वारशातून समाजातील असंख्य तरुणांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. अशा व्रतस्थ वटवृक्षाच्या छायेत वावरण्याचं भाग्य ‘नेगल’कार विलास मनोहर यांना लाभलं. बाबांचा आणि त्यांचा सहवास चोवीस तास असे. भारत जोडो यात्रा, कसरावदचे दोन-तीन महिन्यांचे मुक्काम, दिल्ली-बेळगाव-कलकत्त्याचा प्रवास, बाबांची शस्त्रक्रिया व कर्करोगाचं आजारपण.. या दिवसांत विलास मनोहर यांनी बाबा अगदी जवळून पाहिले.. अनुभवले. या सहवासातील आठवणी, त्यांचे आचार-विचार, त्यांचं माणूसपण.. बाबांच्या अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा पट म्हणजे ‘मला (न) कळलेले बाबा’ हे पुस्तक. यातून बाबांची विचार करण्याची पद्धत, माणुसकीनं भरलेलं मन, माणसांवरील प्रेम, समाजसेवेचा ध्यास, येशूप्रेम.. अशा अनेक गोष्टींची माहिती विविध प्रसंगांतून लेखकानं करून दिली आहे.
बाबांच्या अचाट स्मरणशक्तीविषयीचे अनेक किस्से लेखकानं सांगितले आहेत. एकदा झाँसीवरून एक तरुण आपल्या कुटुंबासमवेत बाबांना इस्पितळात भेटायला आला होता. त्याला बाबांची परीक्षा पाहायची होती की, ते आपल्याला ओळखतात की नाही. भेट झाल्यावर बाबांनी त्याला ‘मैं बाबा आमटे, आपका शुभ नाम?’ असा प्रश्न करताच त्याने आपली ओळख न करून देता ‘मुझे पहचाना नही क्या, बाबा?’ असा प्रतिप्रश्न केला. असं दोन-तीनदा झालं. शेवटी बाबांनी त्या माणसाच्या सासऱ्याच्या नावासकट त्याच्या व्यवसायाची ओळख सांगितल्यावर तो ओशाळून त्यांच्या पाया पडला. अगदी दहा वर्षांच्या भेटीनंतरही आपल्याला बाबांनी ओळखलं, हे पाहून तो थक्क झाला.
बाबांची स्मरणशक्ती इतकी दांडगी होती, की माणूस एकदा जरी भेटला तरी त्याचं नाव त्यांच्या लक्षात राही. समोरच्याला आधी स्वत:चं नाव सांगून त्याचं नाव विचारण्याची त्यांची पद्धत तर विलक्षणच. वास्तविक देशभरच काय, जगभर त्यांच्या कार्याची महती पसरली होती. पण आपण कोणी मोठी व्यक्ती नाही आहोत, समाजकार्य हे आपलं व्रत आहे, अशीच खूणगाठ मनाशी बांधलेल्या बाबांनी आपल्या कार्याला, कर्तृत्वाला कधीही ‘ग’ची बाधा होऊ दिली नाही. ‘भारत जोडो’ यात्रेसाठी ते देशभर फिरले आणि सगळीकडे त्यांनी माणसं जोडली. त्यावेळची माणसं जोडण्याची त्यांची खुबी अनेक प्रसंगांतून जाणवते.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानचा केरळमधला एक प्रसंग. ‘करुणेचा कलाम’ या पुस्तकावरील चित्रावरून (होली क्रॉसवर आरामात पहुडलेला माणूस) काही ख्रिश्चन मंडळींच्या मनात नाराजीची भावना होती. ती व्यक्त करण्यासाठी ते बाबांना भेटायला आले. त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या मंडळींनी ‘तो आमचा होली क्रॉस आहे, रेल्वे स्टेशन वा बगीचा नाही,’ असं सांगितल्यावर बाबा म्हणाले, ‘माणसासाठी इतकी सुरक्षित जागा आणखी कोणती आहे का?’ बाबांच्या या उत्तरावर त्यांचा राग मावळला.
लेखकानं बाबांचं येशूप्रेम ठळकपणे नमूद केलं आहे. येशूची सेवाभावी वृत्ती, सेवेची ओढ याचं त्यांना आकर्षण होतं. तो त्यांना अधिक जवळचा वाटे. याची साक्ष पटवून देणारे अनेक प्रसंग लेखकानं नमूद केले आहेत.
लेखकाने लिहिलेला आरशाचा प्रसंग तर खूप काही शिकवणारा आहे. आजारी असताना एक दिवस बाबांना दाढी करण्याची इच्छा झाली. लेखकाने विचारलं, ‘बाबा, कुठं जायचं नाही, मग दाढीची घाई का?’ त्यावर बाबांचं उत्तर होतं, ‘मी आरशात माझ्या प्रतिबिंबाला प्रश्न करतो- काय बाबा आमटे, काय ठरवलं होतंस? कुणाला शब्द दिला होतास? तसा वागलास का? स्वत:ला फसवत तर नाहीस ना?’ त्यांच्या या उत्तरानं लेखक थक्क झाले.
बाबा स्वत: समाजकार्य करीत असताना दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशीही ते जोडलेले राहत. त्यांच्याशी चर्चा करीत. त्यांना मार्गदर्शन करीत. तरुण मंडळींशी चर्चा हा तर त्यांचा आवडता छंद होता. तरुणांना समाजसेवा, देशसेवा यासाठी उद्युक्त करण्याचे काम ते करीत. तरुणांना मार्गदर्शन करताना कोणी अडथळा आणलेला त्यांना चालत नसे.
‘भारत जोडो यात्रे’दरम्यानचा सुवर्णमंदिरातील किस्सा, त्यांचा निर्भीडपणा, तरुणांना प्रेरणा देणारं भाषण, त्यांना अहिंसेच्या मार्गावर चालायला प्रवृत्त करणारे विचार.. अशी अनेक वैशिष्टय़े त्या प्रसंगातून दिसून येतात. त्यात कट्टर अतिरेकी गुरुबच्चन सिंगने बाबांशी नम्रपणे केलेल्या संवादावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर पडणारी छाप किती जबरदस्त असे, हे लक्षात येते.
खरं तर हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या बाबांसंबंधींच्या आठवणींचा पटच.. परंतु ‘बाबा आमटे’ या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या केवळ आठवणी म्हणून त्या उरत नाहीत, तर या आठवणी तत्त्व, विचार, सामाजिक भान, समाजसुधारणेची प्रेरणा, समाजहित.. अशा अनेक गोष्टींना स्पर्श करून जातात. त्यामुळे नकळत आपणही या आठवणींमधून खूप काही शिकतो. आणि ‘बाबा आमटे’ यांच्याबद्दलची आपल्या मनातील प्रतिमा अधिकच उंच होते आणि वाचकाचं मनही कळत-नकळत संस्कारित होत जातं. बाबा आमटे ही व्यक्ती का मोठी होती, याचं उत्तर या आठवणींमधून मिळतं.
माणसं मोठी होतात, समाजात पूजनीय ठरतात.. पण ती का मोठी होतात? समाज त्यांना का पुजतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतात. हे पुस्तक केवळ एका मोठय़ा व्यक्तीच्या आठवणी नाहीत, तर त्याच्या आभाळाएवढय़ा कार्यातून समाजसेवेची वृत्ती ठसवणारं.. ‘लोकसेवा हीच ईश्वरसेवा’ ही उक्ती अधिक ठळकपणे नमूद करणारं हे महत्त्वाचं पुस्तक आहे.
‘मला (न) कळलेले बाबा’ – विलास मनोहर, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १७२,
मूल्य – १६० रुपये.