|| माधव गाडगीळ, सुबोध कुलकर्णी
स्वातंत्र्यानंतर शासन, न्याय आणि ज्ञानव्यवस्था सामान्यांपर्यंत सुलभतेने पोहोचेल ही आशा फोल ठरली. तथापि संगणक व भ्रमणध्वनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाने उच्च वर्ग आणि सामान्यजन यांच्यातील बौद्धिक व सांस्कृतिक विषमतेची दरी आता कमी करत आणली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे किमान हा वर्गसंघर्ष तरी मिटण्याची सुचिन्हे आज दिसत आहेत.
१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक निवर्तले आणि त्याच दिवशी लोककवी अण्णाभाऊ साठे जन्मले. दोघांनीही मराठी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती करत भारताच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. स्वातंत्र्य आले आणि आम मराठी जनतेला एकत्र आणून ज्यात सर्व लोक सहभागी होऊ शकतील अशा मराठी भाषेत सारे शासनव्यवहार, न्यायव्यवहार आणि ज्ञानव्यवहार व्हावेत, या आकांक्षेने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारली गेली. लोकशाहीर अमरशेख ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी झटले; आणि अण्णाभाऊ साठे यांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला. या प्रयत्नांना यश येऊन १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि अधिकृतरीत्या मराठीला मानाचे स्थान मिळाले. परंतु दुर्दैवाने शासन, न्याय आणि ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने फारशी प्रगती मात्र होऊ शकली नाही.
भाषा हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणून वापरता येते, तसेच लोकांना ज्ञानापासून दूर ठेवण्याचे हत्यार म्हणूनही वापरता येते. समाजावर पकड असलेल्यांना शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि ज्ञानव्यवस्थेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्याची इच्छा नसते. म्हणूनच की काय, गेली एकोणसाठ वर्षे महाराष्ट्र राज्याची भाषानीती, मराठी अधिकाधिक दुबरेध करण्यासाठी झटत आहे. वानगीदाखल सरकारची वनाधिकार कायद्याबद्दलची पुस्तिका वाचा. ही पुस्तिका साध्यासुध्या गावकऱ्यांना तर सोडाच; मलासुद्धा समजणे महाकर्मकठीण आहे. गंमत म्हणजे याच पुस्तिकेच्या जोडीने मी याच विषयावरची शोषित जनआंदोलनाची पुस्तिका वाचली. ती सुबोध भाषेतील पुस्तिका कोणालाही सहज समजते. उदाहरणार्थ, या कायद्याच्या चौथ्या कलमाचा विषय आहे- वन-निवाशांचे हक्क व जरूर भासल्यास पुनर्वसन काय अटींवर केले जाईल! यातल्या दोन उपकलमांचे सरकारी भाषांतर आहे : ‘बाधित व्यक्ती व समूह यांच्याकरिता सुरक्षित उपजीविका पुरवण्यासाठी आणि प्रस्तुत विधि व केंद्र सरकारच्या धोरणात दिलेल्या, अशा बाधित व्यक्ती व समूह यांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी पुन:स्थापना करणे किंवा पर्यायी योजना तयार करणे व संसूचित करणे. प्रस्तावित पुन:स्थापनेसाठी व योजना लेखी स्वरूपात मिळवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील ग्रामसभेची संमती मोफत कळविणे.’ याचेच जनआंदोलनाचे भाषांतर आहे : ‘केंद्र शासनाच्या सुसंगत कायदे व धोरणांनुसार अशा बाधित व्यक्तींच्या व समुदायांच्या आवश्यकतांची पूर्तता करणारे आणि बाधितांना सुरक्षित उपजीविका पुरविणारे, पुनस्र्थापन करणारे किंवा पर्यायी पॅकेज तयार केले गेले आहे व त्याची माहिती संबंधितांना दिली आहे. प्रस्तावित पुनस्र्थापना व पॅकेजबद्दल संबंधित क्षेत्रातील ग्रामसभेला संपूर्ण माहिती देऊन ग्रामसभेची मुक्त लेखी संमती घेतली आहे.’
किंवा ज्ञानव्यवहाराचे एक उदाहरण घ्या. भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत वाघांची शिरगणती करण्यासाठी प्रत्यक्षात पाहणी करणाऱ्या वनरक्षक व त्यांच्या हाताखालच्या मजुरांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका बनवण्यात आली आहे. पुस्तिकेतला एक मथळा आहे : ‘खुरे असलेल्या धावणाऱ्या प्राण्यांचे ओळखचिन्हे दिसण्याच्या सातत्यावरून प्रगणना प्रारूप.’ साध्या मराठीत म्हणू : ‘हरीण-गव्यांसारख्या पशूंच्या खाणाखुणांची पाहणी.’
जर मराठीचे हे दुबरेधीकरण जाणूनबुजून केले जात असेल तर आपण काय करू शकू? लोकमान्यांनी नेमस्तांना ठणकावले की, शासनाला अर्ज-विनंत्या करत राहू नका. स्वातंत्र्य आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी बाह्य सरसावून पुढे जाऊ या. स्वराज्य आले, लोकशाही आली; परंतु अजून सुराज्य दूरच आहे. लोकशाही अर्थपूर्ण बनण्यासाठी सगळ्या व्यवहारांत लोकांना सहभागी करून घेणे अत्यावश्यक आहे. सत्ताधीश खुशाल दूर लोटू देत, लोकांनी हताश होण्याचे काहीही कारण नाही. कारण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या घोडदौडीतून जरी भौतिक संपत्तीतील विषमता वाढते आहे, तरी तितक्याच झपाटय़ाने बौद्धिक व सांस्कृतिक संपत्तीतील विषमता घटते आहे. संत ज्ञानेश्वरांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥’ असे बजावत अध्यात्मव्यवहार साध्या, सोप्या व सुबोध मराठीत आणण्याची मुहूर्तमेढ रोवली. आज शतकांनंतर परिस्थिती खूपच जास्त अनुकूल झाली आहे आणि आपण निश्चितच ज्ञानेश्वर, एकनाथ आणि तुकोबांचा वारसा पुढे चालवीत सर्व शासनव्यवहार, न्यायव्यवहार आणि ज्ञानव्यवहारासाठी प्रयत्नपूर्वक एक साधी, सुबोध मराठी प्रस्थापित करू शकू.
हे साधण्यासाठी आपल्याला एका बाजूने संगणकाच्या आणि दुसऱ्या बाजूने दूरध्वनीच्या घोडदौडीतून नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. १९६० पासून संगणकांची क्षमता दर दीड वर्षांत दुपटीने वाढत आहे आणि त्याच वेगाने त्यांचा आकार लहान लहान होत आहे. आता फोन तारेला जखडून जमिनीवर राहिलेले नाहीत. ते स्वस्त होत आहेत आणि उपग्रहांच्या मदतीने आज ते खिशात आले आहेत. संगणक आणि दूरध्वनी यांच्या युतीतून उपजलेले स्मार्टफोन हे अचाट शक्तिवान साधन सर्वसामान्य लोकांच्याही हाती पोहोचू लागले आहे. आज भारतात ३७ कोटी स्मार्टफोन वापरात आहेत. त्यातला ९०% टक्के वापर हा भारतीय भाषांच्या माध्यमातूनच होतो.
तीन महत्त्वाच्या घडामोडींतून स्मार्टफोनचा वापर अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. पहिली म्हणजे मोफत व स्रोत अथवा कोड ज्या कुणाला सुधारायचे, बदलायचे आहे त्यांना खुलेपणे उपलब्ध असलेले मोफत आणि मुक्त स्रोत (फ्री व ओपन सोर्स) सॉफ्टवेअर. हार्डवेअर संगणकाचे शरीर आहे, तर सॉफ्टवेअर हे त्याचे चतन्य आहे. सगळे सॉफ्टवेअर आरंभी मोफत, खुलेपणाने उपलब्ध होते. पण १९७० ते ९० च्या दरम्यान त्यास व्यापारी कंपन्यांनी तिजोरीत बंदिस्त करून टाकले होते. त्यानंतर अनेक लोकाभिमुख तंत्रज्ञांनी कसोशीने प्रयत्न करून ते पुन्हा सर्वाना खुलेपणाने व मोफत उपलब्ध करून दिले. या मोफत, खुल्या सॉफ्टवेअरमुळेच आजचे शक्तिमान, विश्वव्यापी इंटरनेट अस्तित्वात आले आहे. १९९० पर्यंत जगातल्या वेगवेगळ्या लिप्या आपापले वेगवेगळे संकेत वापरत होत्या आणि अशा संकेतांवर श्रीलिपीसारख्या व्यापारी कंपन्यांची पकड होती. त्या टंक पैसे मोजून विकत घेणे भाग होते आणि त्यांचे एकमेकांत रूपांतर करणे जिकिरीचे होते. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे १९९० मध्ये मोफत व खुल्या सॉफ्टवेअरच्या चळवळीतून जगातील सर्व लिप्यांसाठी वेगवेगळे संकेत बाजूला ठेवून सर्वसहमतीने निश्चित केलेले एकात्मिक विश्वसंकेत अथवा युनिकोड! युनिकोड प्रणालीतून मराठी व इतर भाषांच्या टंकनाच्या अडचणी चुटकीसरशी सुटल्या आहेत. तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे आंतरजालावर सक्रिय असू शकणाऱ्या कोणाही व्यक्तीला हातमिळवणी करून नवी संहिता निर्माण करण्याची शक्यता उपलब्ध करून देणारे विकी सॉफ्टवेअर. वॉर्ड किनगहॅमने हे विकसित केले आणि नि:स्वार्थीपणे सगळ्या जगाला विनामूल्य उपलब्ध करून दिले.
दोन हजार साली विकी तंत्रज्ञान वापरत सामाजिक बांधिलकी असणाऱ्या काही विद्वानांनी आंतरजालावर एक मुक्त ज्ञानकोश रचण्याचा प्रयत्न सुरू केला. एका वर्षांत कळले, की हे काही होणे नाही. विद्वज्जन केवळ समाजसेवेसाठी कष्ट उपसण्यास तयार नाहीत. तेव्हा मुक्त ज्ञानकोशाच्या प्रवर्तकांनी ठरवले की, समस्त आम आदमींना आपण या सत्कर्माला हातभार लावण्याचे आवाहन करू या. चुका होतील, पण सर्वानाच इतरांच्या चुका दाखवायला आवडते. तेव्हा विद्वज्जन सामान्यजनांच्या लेखनातल्या चुका दाखवून देतील, दुरूस्त करतील. विकी प्रणालीत हे पटपट करता येते. तेव्हा या सर्वसमावेशक ‘विकिपीडिया’ उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळून हे ज्ञानभांडार दिवसेंदिवस इतके समृद्ध झाले आहे की आज त्याची मजल अनेक भारतीय भाषांसहित २८८ भाषांमध्ये पाच कोटी लोकांच्या योगदानातून लिहिलेले अनेक विषयांवरचे साडेतीन कोटी लेख इथपर्यंत पोहोचली आहे. आजमितीस विकिपीडियात ५९ लाख इंग्रजी, एक लाखावर हिंदी व तमिळ, तर मराठीत ५३ हजार लेख आहेत.
विकिपीडियाच्या यशातून नवनवे प्रकल्प निर्माण होत जाऊन आज विकिमीडिया समूहात विकिमीडिया, विकिस्रोत, विक्शनरी, विकीडेटा, विकिबुक्स, विकिव्हसिटी प्रकल्पांची भर पडली आहे. विक्शनरी शब्दकोशात ६.१५ लाख इंग्रजी, ३.५ लाख तमिळ, १.८ लाख हिंदी, तर आपल्या मराठीत केवळ १६०० नोंदी आहेत. शासनसंमत व शिष्टसंमत पारिभाषिक शब्द अनेकदा दुबरेध आणि कधी कधी चुकीच्या अर्थाचे असतात. अशा शब्दांना सुबोध, समर्पक अर्थाचे आणि लोकांना भावतील असे शब्द सुचवण्यासाठी मराठी विक्शनरी हे उत्तम माध्यम आहे. सर्व शब्द शोधनीय असलेले साहित्य मुक्तपणे उपलब्ध करून देण्याचे काम विकीस्रोत हा प्रकल्प करतो. या प्रकल्पात इंग्रजीत १९ लाख, बंगालीत सहा लाख, तमिळमध्ये चार लाख, तर मराठीत २५ हजार पाने आहेत. एकूण विकिमीडिया परिवारात मराठीची प्रगती मंदगतीने चालू आहे आणि मराठीचे अतिशय मर्यादित शब्दभांडार, साहित्यभांडार वेबवर उपलब्ध आहे. जे थोडेबहुत आहे ते युनिकोडमध्ये नसल्याने शोधनीय नाही. उदाहरणार्थ, सावरकरांचे व विनोबांचे सर्व साहित्य वेबवर पीडीएफ रूपात चढवले गेले आहे, पण त्यातले काहीही गुगल सर्च देऊन सापडत नाही. याउलट, जोतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक विकिस्रोत या प्रकल्पाअंतर्गत युनिकोड संहितेच्या रूपात वेबवर चढवलेले आहे. या पुस्तकात एके जागी जोतिबांनी पाणलोट क्षेत्राचा कसा विकास करावा याबद्दल उत्तम विवेचन केले आहे. त्यातील ‘तालीवजा’ एवढा एकच शब्द गुगल सर्चवर टाकला तर ताबडतोब आपण मूळ पुस्तकापर्यंत व त्यातील पाणलोट क्षेत्रासंबंधीच्या ‘जागोजाग तालीवजा बंधारे अशा रितीनें बांधावे कीं, वळवाचें पाणी एकंदर शेतांतून मुरून नंतर नदीनाल्यास मिळावें..’ या विवेचनापर्यंत पोहोचतो.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही स्मार्टफोन व त्याच्या सर्व सुविधा पूर्णपणे मराठीतून लीलया हाताळणारी एक नवीन पिढी डोळ्यासमोर येते आहे. या सर्वाना ज्ञानाची, माहितीची जबरदस्त भूक आहे. अण्णाभाऊ साठे यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईत वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. त्या मोर्चातील घोषणा होती : ‘ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!’ आपला कुपोषणाचा प्रश्न मिटला आहे असे नाही, परंतु ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने माहितीची, ज्ञानाची भूक जबरदस्त वाढली आहे. लक्षावधी मुले-मुली गुगल सर्च मारत माहिती शोधत आहेत. त्यांना फारच तुटपुंजी माहिती उपलब्ध असते. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आंतरजालावर मराठी भाषेतील अधिकाधिक साहित्य शोधनीय स्वरूपात उपलब्ध करून देणे. हे झाले की निरनिराळे फायदे होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांत्रिक भाषांतर अधिक प्रभावी होऊन कोणत्याही मराठीभाषकाला जगातील कोणत्याही इतर भाषेतील ज्ञान सहज उपलब्ध होईल. तसेच स्कॅन केलेला छापील मजकूर, हाताने केलेले लेखन व बोललेले शब्द यंत्राद्वारे ओळखून त्याची सॉफ्ट कॉपी बनविताना होणाऱ्या चुकांचे प्रमाण घटेल. आजमितीस मराठी साहित्य युनिकोड वापरत वेबवर चढवणे अगदी सहज व अगदी कमी खर्चात (पानागणिक साडेतीन ते पाच रुपयांत) शक्य झालेले आहे. आम्हाला वाटते की महाराष्ट्राच्या षष्टय़ब्दिपूर्तीच्या वर्षांत लोकमान्य टिळक, लोककवी अण्णाभाऊ साठे आणि लोकशाहीर अमर शेख या तीन मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या दिग्गजांचे सर्व साहित्य वेबवर चढवणे ही विशेष समयोचित मानवंदना ठरेल. त्यासाठी जास्तीत जास्त लाखभर रुपये खर्चावे लागतील. भारतीय भाषांतील साहित्य वेबवर उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी ‘सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी’ ही संस्था कार्यरत आहे. तेव्हा आम्ही दोघांनी ठरवले आहे की येत्या २७ फेब्रुवारी २०२० या मराठी दिनापर्यंत या संस्थेच्या मदतीने आम्ही स्वत: हे काम यशस्वी करून दाखवू. आम्हाला आशा आहे की, अनेक मराठीप्रेमी हे छोटेसे उदाहरण पाहून उत्साहाने आपापल्या आवडीच्या साहित्यिकांचे समग्र साहित्य वेबवर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतील. अशी सज्ज झालेली मराठी जनता मग बाह्य सरसावून आपल्या राज्यातील शासनव्यवहार, न्यायव्यवहार आणि ज्ञानव्यवहार सोप्या, सुबोध मराठीत होतील याची दक्षता घेईल.