जगातल्या बदलांकडे सजगपणे बघणारं, ते न्याहाळणारं आणि आपली स्वत:ची सांगीतिक परंपरा अभ्यासून ती त्या जगाशी जोडणारं ‘मराठी गाणं’ भविष्यात तरी निर्माण होईल का? तसं होणं खरोखरच अगत्याचं आहे.
मराठी संगीत म्हणजे तरी नक्की काय? मराठी भाषेमधले शब्द उपयोजलेलं संगीत? नाही. गाणं इतकं सरळसोटपणे प्रादेशिक गाणं बनत नाही. केवळ मराठी शब्दच नव्हेत, तर मराठमोळी संस्कृती ज्या गाण्यात उतरलेली असते ते मराठी गाणं बनतं. कधी ते नाटय़गीताचं रूपडं घेतं, कधी तमाशाच्या फडावर ढोलकीसोबत नाचतं. कधी भावकवितांना शरण जातं आणि भावगीत बनतं. कधी ते थेट विठ्ठलाचा हात धरतं आणि अभंग बनून समोर येतं. मराठी गाणं अनेक तऱ्हांनी, अनेक रूपांनी मराठी बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या माणसांच्या कानापर्यंत येतं आणि त्यांना घट्ट धरून ठेवतं. ज्यानं बालपणी मराठी गाणी ऐकली असतील, तो रॉक- पॉप- हिपहॉप ऐकून झाल्यावर कुठल्याशा आतल्या उबळीनिशी ‘मागे उभा मंगेश..’, नाहीतर ‘जग हे बंदिशाळा..’ ऐकायला सरसावतो. गाणं हे रक्तात असतं की संस्कारांत? की दोन्हीत? अमेरिकेत वाढलेल्या मराठी मुलाला ‘अप्सरा आली..’ भुरळ घालेल की ‘हिप्स् डोंट लाय’? किती अवघड असतात या आणि अशासारख्या प्रश्नांची उत्तरं! आपण सहजतेनं ‘मराठी गाणं’, ‘मराठी संगीत’ अशी शीर्षकं वापरत असतो.
आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही!
टांग मारून गेलेली वाचनाभिरुची!
गणिती विश्वातील तेजस्वी तारा
द्रष्टेपणा.. सैद्धांतिक गणितज्ञांचा!
माझ्या मते, मराठी शब्दसंगीताची फार मोठी ताकद आहे ती त्याच्या अर्थाभिदानात! पुष्कळ भाषांमधली गाणी मी ऐकली आहेत. स्पॅनिशच्या रफारांनी मला नेहमीच मोहवलं आहे. तमिळ भाषेच्या नादनिर्मितीपुढे मी नतमस्तकच होतो. इंग्रजी गाणी ही भाषेपेक्षा त्या- त्या संगीतप्रकाराशी जास्त जवळीक साधून आहेत. पण मराठी गाण्यांत शब्दांचा केवळ नादच नव्हे, तर अर्थही दशांगुळे उचलला जातो; तसं साऱ्याच भाषांतून होताना दिसत नाही. आणि त्यासाठी लगोलग गदिमा-बाबूजी जोडगोळीकडे जायला नको. पुष्कळ आधी नाटय़संगीताच्या मिषानं शब्द आणि सूर एकवटले. नाटय़संगीतामधली सारीच गाणी काही उत्तम कविता नसतात. पुष्कळदा गायकांना अर्थापेक्षा सुरांच्या करामती दाखवायच्या असतात. पण जेव्हा राम गणेश गडकरींसारखा मुळात कवी असलेला माणूस लिहितो की, ‘पदर पदर परी शेवटी तुटत तुटत जाई’, तेव्हा एखादी अभिजात कविताच तिथे अवतरते. तो ‘पदर’ शब्द किंवा तो ‘तुटत’ शब्द चालीच्या सोयीसाठी, गेयता उंचावण्यासाठी, यमकांचा खेळ करण्यासाठी दोन-दोनदा येत नाही. स्त्रीजातीचा सारा टाहो जणू तिथे गडकरी समूर्त करतात! आता प्रश्न असा की, गायिका तो टाहो जिवंत करतात का? की त्यांचं लक्ष लगेच पुढे येणाऱ्या ‘कठीण कठीण’वरच्या तानेवर असतं? म्हणजे आशाबाईंची गोष्ट सोडा. त्या साऱ्या मंगेशकर भावंडांना सुरांइतकेच शब्दही पुरते ठाऊक होते.. आहेत. पण तेच गीत आज दहा स्पर्धामध्ये मुली गातात तेव्हा ते खरंच ‘मराठी गाणं’ असतं? की तो असतो एखाद्या बंदिशीचा द्रुतलयीमधला टप्पा? आणि महत्त्वाचं म्हणजे आज २०१४ मध्येही महाराष्ट्र तेच गाणं ऐकत असतो का? जागतिकीकरणाचे आणि उत्तर-आधुनिक काळाचे पडसाद महाराष्ट्राच्या सांगीतिक अभिरुचीवर पडले आहेत का? अजूनही महाराष्ट्रभर वेगवेगळे गायक-गायिका ‘गीतरामायणा’चे कार्यक्रम करतात आणि ते ‘हाऊसफुल्ल’ही असतात. नाटय़संगीताचं (तथाकथित) पुनरुज्जीवन झाल्यानं महाराष्ट्रभर संगीत नाटकांचे दौरे ठरतात आणि तेही हाऊसफुल्ल होतात. मराठी भावसंगीताचे (म्हणजे श्रीनिवास खळे- सुधीर फडके- हृदयनाथ मंगेशकर) कार्यक्रम अनेक हौशी कलाकार करतात. ते इतके गाजतात, की शेवटी बिचाऱ्यांना पाटय़ा टाकण्याखेरीज पर्याय नसतो. आता या सगळ्यात ‘वाईट’ असं काहीच नाही. आणि ती सारी गाणी तर माझीही लाडकीच आहेत. काळाच्या ओघात ५०-५० वर्षे ती टिकलेली आहेत. (‘शुक्रतारा मंद वारा..’च्या पन्नाशीसाठी मी ‘लोकसत्ता’मध्येच लिहिलेला लेख आठवावा.) माझा आक्षेप आहे तो- कलाकारांनी आणि रसिकांनी तिथेच अडकायला! का नाही वाटत नाटय़संगीत गाणाऱ्यांना- की एखाद्या तरी प्रयोगात आपण सोबत इलेक्ट्रिक गिटार वाजवून बघावी? किंवा रॉकबिक जाऊ द्या, परंतु का नाही वाटत एखाद्याला- की आपण ‘गीतरामायण’ ग्रामीण ढंगात सादर करून बघावं?
फसेल ते कदाचित! पण ती ‘रिस्क’ घेणं कुठल्याही कलेच्या लेखी महत्त्वाचं असतं. उत्तम धंदा करणाऱ्या बॉलीवूड- हिंदीच्या संगीतसृष्टीकडे बघा! ती स्वत:ला सतत पालटत गेलेली आहे. जनाभिरुचीसाठी फारशी न थांबता! म्हणूनच एकीकडे ‘फेव्हिकॉल’ची गाणी येत असली तरी दुसरीकडे ‘कबीरा, मान जा’सारखं भावगर्भ गाणंही त्या उद्योगात तयार होतं, ते गाजतं आणि पैसाही मिळवतं. मला वाटतं, खरं तर महाराष्ट्रामधले रसिक नव्याला उत्सुक आहेत; पण कलाकारच जास्त सावध आहेत!
अर्थात, सारंच चित्र नकारात्मक आहे असं मुळीच नाही. अजय-अतुलनं मराठी लोकगीताला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन पुरेसं आधुनिक बनवलं आणि ते प्रचंड गाजलं. ‘अगंबाई अरेच्चा’मधली देवीची आरती ‘अष्टविनायक’ चित्रपटाच्या आरतीसमोर आणा, म्हणजे माझं म्हणणं लगेच पटेल. कित्येक लोकसंगीतामधली वाद्यं अजय-अतुल यांनी घासूनपुसून पुन्हा एकदा मराठी संगीतात आणली.. नवा मराठी नाद ‘र४ल्ल’ि या अर्थानं उत्पन्न केला. त्यांनी मिक्सिंग- मास्टरिंगच्या पातळीलाही पुष्कळ प्रयोग केले आहेत; (त्यामध्ये ए. आर. रेहमानचं अनुकरण दिसलं, तरी!) ते मोलाचे आहेत. अवधूत गुप्तेनं पाश्चात्त्य संगीताची फोडणी तर मराठी गाण्याला दिलीच; पण महत्त्वाचं म्हणजे त्यानं मराठी गाण्यावरच्या जड जड शब्दांचं ओझंही हटवलं.
‘तुझे देखके मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला..’ म्हणताना कसली गंमत त्यानं साधलीय! आता या ओळींत आपण अरुण कोलटकरांच्या कवितांइतका गंभीर आशय शोधणार असू, तर बोलणंच खुंटलं. पण इंग्रजी पॉपच्या हलकेफुलकेपणाला जवळ जाणारी ही ओळ आणि त्याची चाल आहे. त्यामधली हिंदी ही मराठीच बनून गेली आहे. तसाही ‘आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला’सारख्या मराठी गाण्यांवर ‘मेरी मधुबाला’सारखा उतारा हवाच होता. म्हणजे मला दोन्ही गाणी आवडतात. त्या दोन्हींची गरज आहे असं वाटतं. खेरीज, ‘अश्विनी, तू ये ना..’मधल्या निर्थकतेपेक्षा ‘मन ये पागल झाला’ उजवं नाही का? ..आणि ही सकारात्मक प्रयोगांची यादी इथेच आटत जाते. बाकी संगीतकार उत्तम काम करत नाहीत असं मला म्हणायचं नाही; पण खूपदा त्यांच्या संगीताचं आणि त्यांचंही परिप्रेक्ष्यच लहान असतं. ‘बालगंधर्व’चा, ‘रवींद्र’चा किंवा ‘कालिदास’चा प्रयोग खच्चाखच गर्दीत पार पडला, की मग सगळंच सोपं होऊन जातं! कौशल इनामदार हा या छोटय़ा वर्तुळाच्या कायमच बाहेर होता. त्याच्या संगीतात खूप प्रयोगशीलता आहे की नाही, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्या गाण्यांमध्ये ‘ग्रँजर’ असतं.. एका तऱ्हेची संपूर्णता असते. ‘बालगंधर्व’ चित्रपटामधलं संगीत हे काही प्रायोगिक करता येणार नव्हतंच (कारण तो पीरियड मूव्ही आहे!); पण त्या मर्यादेतही त्यानं नांदीच्या आधी इस्माईल दरबारच्या भव्य नादाची आठवण करून देणारं संगीत निर्मिलं.
जी गोष्ट संगीतकारांची; तीच गायक-गायिकांची आहे का? माझे पुष्कळ गायक-गायिका मित्र रोज कार्यक्रमांत तेच तेच गाणं गातात. तो व्यवसायाचा अटळ भाग मानूया आपण. पण मग गायकाची जी मूळची उपज अंगाची तल्लफ असते, तिचं काय? शास्त्रीय संगीतामधले तरुण गायक-गायिका सुगम संगीतापेक्षाही जास्त प्रयोगशील.. बदलाला उत्सुक आहेत असं चित्र मला दिसतं. बघा- आत्ताच सावनी शेंडेच्या फेसबुकवर मी टीना टर्नर, रेग्मुला कर्टी आणि डेचेन श्ॉक यांच्यासोबतच्या अल्बमचा फोटो बघतोय. ती साडीत आहे; बाकीच्या पाश्चात्त्य परिवेशात आहेत. पण महत्त्वाचं आहे- त्यांचे बहुसांस्कृतिक सूर एकवटणं! मराठी चित्रपटांमध्ये, शीर्षकगीतांमध्ये गाणारे गायक-गायिका स्वत: आधुनिक राहतात खरे; पण त्यांची गायकी ही उत्तर-आधुनिक सोडाच; पण पुष्कळदा आधुनिकही वाटत नाही. त्यापेक्षा विशाल रावजियानीसारखा हिंदी चित्रपटसृष्टीमधला नामवंत संगीतकार (शेखर-विशाल जोडीमधला) मराठी गाणं ‘साजणी’ गातो तेव्हा ते ‘खूप जास्त मराठी’ वाटतं. (‘खूप जास्त’ ही नवी मिंग्लिश पिढीची लाडकी ‘फ्रेझ’ आहे. आणि ती ‘खूप जास्त’ चांगली आहे!)
संगीतसमीक्षेचंही बघा- मराठी गाण्यांची समीक्षा किती अंगांनी व्हायला हवी! पण पुष्कळदा आपण वाचतो तो असतो ‘रिव्ह्य़ू’- तो काही अभ्यास नसतो. आणि समीक्षा ही अभ्यासाची गोष्ट आहे. याबाबत मला आवर्जून सांगावं लागेल, की अभिजात समीक्षाशैलीला अव्हेरणारी तीन ‘स्र्स्र्४’ं१ े४२्रू ्िर२ू४१२ी’वरची सदरे ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये या वर्षी अंतर्भूत आहेत. संगीतकार अशोक पत्की हे मराठी भावगीतांवर न बोलता जिंगल्सवर बोलले. डॉ. मृदुला दाढे-जोशी या शास्त्रीय मैफलींवर न लिहिता हिंदी चित्रपटसृष्टीच्या मधल्या वळणाच्या प्रभावी संगीतनिर्मितीविषयी सांगत आहेत. आणि ‘लयपश्चिमा’मधून मी नुसत्या पाश्चात्त्य संगीताविषयी नव्हे, तर त्याच्या सामाजिक अंगांविषयी लिहितो आहे. पण असं हे चित्र दुर्दैवानं बाकी ‘मीडिया’मध्ये अद्याप ठाशीवपणे आलेलं नाही.
पण सगळ्यात आश्वासक आहे तो मराठी गाण्याचा बदलता, तरुण रक्ताचा श्रोतृवर्ग! तो मला ‘लयपश्चिमा’च्या निमित्तानं आठवडय़ाआड ई-मेलवर भेटतो आहे. आणि हा नवा श्रोतृवर्ग मात्र आश्चर्यजनकरीत्या खूप ‘प्रयोगां’ना ऐकायला तयार आहे.. नव्हे, अधीर आहे. अर्थात् त्याला हवंय ते ं४३ँील्ल३्रू गाणं- रॉक.. सरळसरळ रॉक- पण मराठी भाषेतलं (फ्युजन नव्हे!), किंवा मग स्पॅनिश स्थलांतराच्या गाण्यासारखं एखादं अस्सल गाणं! गावंच्या गावं उठून पुण्या-मुंबईत स्थलांतरित होताहेत आणि त्याचा पायरवही आपल्या मराठी गाण्यांमध्ये आढळत नाही! भवतालातील बदलांचा वेध कलेनं आधी- अगोदर घ्यायचा असतो. मराठी गाण्यानं तो उशिरा तरी घ्यावा असं या नव्या दमाच्या रसिकांना वाटतं आहे.
मला वाटतं, ‘मराठी संगीत’ हे ‘ग्लोकल’ (ॠ’ूं’) झालेलं बरं. ते टिकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे! जगातल्या बदलांना सजगपणे बघणारं, न्याहाळणारं आणि आपली स्वत:ची सांगीतिक परंपरा अभ्यासून ती त्या जगाला जोडणारं मराठी गाणं निर्माण होईल का? तसं होणं अगत्याचं आहे. मराठी गाण्याच्या भावी अस्तित्वासाठीच ते अपरिहार्य आहे. नाहीतर या नव्या तरुण रसिकांना इंटरनेटच्या एका क्लिक्निशी जगभरचं गाणं सहजपणे ऐकण्याचा पर्याय आहेच. नाही का? अशा टोकावर आपलं मराठी गाणं आत्ता उभं आहे, की तिथून तेच तेच आळवत पुढे गेलं तर दरीच आहे! तसंच पुढे जायचं, की मागे वळून पठारावरचा निराळा, नवाकोरा, अभ्यासू रस्ता पकडायचा- हे मुख्यत्वे संगीत निर्मिणाऱ्यांनी आणि अंशत: आपण रसिकांनीच ठरवायचं आहे!
टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!
जगातल्या बदलांकडे सजगपणे बघणारं, ते न्याहाळणारं आणि आपली स्वत:ची सांगीतिक परंपरा अभ्यासून ती त्या जगाशी जोडणारं ‘मराठी गाणं’ भविष्यात तरी निर्माण होईल का?
आणखी वाचा
First published on: 24-08-2014 at 01:19 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will marathi song rise again