कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या महिला असोत की काही लहानसहान शिवणकाम करणाऱ्या महिला असोत, अगदी कमी मोबदल्याची अशी लहानसहान कामं करणाऱ्या महिला एकूण अर्थव्यवस्थेत कुणाच्या खिजगणतीतही नसतात. पण अशाच महिलांना बरोबर घेऊन उभं राहिलेलं, व्यवस्थेला हलवू शकलेलं मोठं काम म्हणजे ‘सेवा’ ही संस्था. सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन हे ‘सेवा’चं पूर्ण नाव. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘सेवा’ माहीत असतेच असते. कारण दुधाच्या क्षेत्रात जसं आणंद तसं सामाजिक क्षेत्रात ‘सेवा’चं योगदान आहे. जातीची उतरंड असलेल्या आपल्या समाजात तळच्या जाती अगदीच दुर्बल, वंचित राहिल्या आणि अशा जातीतल्या स्त्रिया या त्याहूनही पिचलेल्या. अशा तळस्तरातल्या कष्टकरी, गरीब, असंघटित स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन ‘सेवा’ने त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केला. या स्त्रिया कोण होत्या; तर दिवसभर कष्ट करून कागद-काच-पत्रा गोळा करणाऱ्या, चिंध्यांपासून रजयांच्या खोळी शिवणाऱ्या, भरतकाम करणाऱ्या, जंगलात जाऊन डिंक गोळा करणाऱ्या, मिठागरांमध्ये मीठ बनवणाऱ्या स्त्रिया. दिवसभर राबराबून त्यांना जेमतेम दहा रुपयेही मिळत नसत, आणि त्यांच्या कष्टांवर वरचे व्यापारी गब्बर होत. कारण या स्त्रियांना लिहिता-वाचता येत नसे, त्यांना वेगवेगळे सरकारी परवाने मिळवणं जमत नसे आणि मुख्य म्हणजे त्या पूर्णपणे असंघटित असत. ‘सेवा’ने जगाला त्यांच्या कष्टांची दखल घ्यायला लावली. त्या कष्टांचा या स्त्रियांना योग्य दर मिळावा यासाठी वेळोवेळी त्यांना संघर्ष करायला लावला. या सगळ्या प्रक्रियेत वेळोवेळी आलेल्या मोठय़ा अडचणींतही ‘सेवा’ त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. या सगळ्या प्रक्रियेत कष्टांशिवाय दुसरं काहीही माहीत नसलेल्या या स्त्रियांचं आयुष्य कसं बदललं, याचा आलेखच हे पुस्तक मांडतं. तेही वेगवेगळे व्यवसाय, त्यात काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्यापुढचे प्रश्न, ‘सेवा’शी संपर्क आल्यानंतर प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा बदललेला दृष्टिकोन आणि या सगळ्या प्रक्रियेत झालेलं त्यांचं सक्षमीकरण हे मुळातून वाचण्यासारखं आहे. पुस्तकात येणाऱ्या अनेक जणींच्या उदाहरणांतून ग्रामीण, असंघटित स्त्रियांना योग्य दिशा मिळाली तर त्या काय करू शकतात, त्यांच्यामधली ऊर्जा जागवणं हे किती महत्त्वाचं काम ‘सेवा’ने केलं आहे याचं प्रत्यंतर येतं. ‘सेवा’ची ही सगळी यशोगाथा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना माहीत असते. पण त्यापलीकडे इतर क्षेत्रांत ती माहीत असेलच असं नाही. ती माहीत मात्र करून घ्यायला हवी, कारण संघर्षांत्मक आणि रचनात्मक काम अशा पद्धतीने सातत्याने करत राहणं आणि त्यात यशस्वी होणं ही एक खरोखरच अवघड गोष्ट आहे. गेल्या काही वर्षांत अशा कामांसाठी बचत गटाचा बांगलादेशी पॅटर्न आपल्याकडेही विकसित होत गेला आहे. पण असं काही नव्हतं तेव्हा ‘सेवा’ने आपल्या कामाला सुरुवात केली आणि ‘नाही रे’ वर्गातल्या स्त्रियांच्या बरोबरीने वाटचाल करत झळाळतं यश मिळवलं आहे. खरं तर यापेक्षाही असं म्हणायला पाहिजे की या स्त्रिया ‘सेवा’बरोबर आल्या. त्यांनी वेळोवेळी संघर्ष केले आणि त्यांच्यामुळे ‘सेवा’ घडत गेली. या स्त्रिया म्हणजेच ‘सेवा’ आणि सेवा म्हणजेच या स्त्रिया असं हे समीकरण आहे. या सगळ्या कामासाठी ‘सेवा’ला आणि इला भट्ट यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. ‘वुई आर पुअर बट सो मेनी’ हे इला भट्ट यांनी लिहिलेलं पुस्तक आलं २००६ मध्ये आणि आता त्याचा मराठी अनुवाद आला आहे. आज सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या कामांचं एनजीओकरण झालं आहे. त्याआधीच्या काळातली संघर्षांत्मक आणि रचनात्मक सामाजिक कामं कशी चालत, याचं हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाचा हा अलौकिक प्रयोग मराठीतून वाचायलाच हवा असा आहे. सुनीती काणे यांनी या पुस्तकाचा अनुवाद उत्तम केला आहे.
‘वुई आर पुअर बट सो मेनी’ – इला भट्ट,
अनुवाद- सुनीती काणे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – २३६, मूल्य – २९५ रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा