अदिती देवधर
यश आणि यतीन हे गणेशच्या गावी आले होते. एका शिबिरात दोघांची त्याच्याशी ओळख झाली होती. तो त्यांच्याच वयाचा होता. पुण्याजवळ त्याचं गाव होतं. शेती होती, देशी गाई होत्या. गणेशनं त्याच वेळी गावी येण्याचं त्यांना आमंत्रण दिलं होतं.
‘कचरा कमी कसा निर्माण होईल’ या ध्यासानं यशला सध्या पछाडलेलं असल्यानं सगळय़ांशी तो त्याबद्दलच बोलत होता. शहरातला कचऱ्याचा विषय निघाल्यावर गणेशनं कचरा ही समस्या गावातही आहे हे सांगितलं. त्यानं आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींच्या गटानं अशा गोष्टींची यादीही केली होती- ज्या परत वापरता येतील आणि कचरा कमी होईल.
‘‘आमचं गाव थर्मोकोलमुक्त झालं नाही तरी आता थर्मोकोलचा कचरा कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.’’ गणेश म्हणाला.
‘‘ते कसं?’’ या प्रश्नाचं उत्तर द्यायला संध्याकाळी देवळात सगळी गॅंग म्हणजे गणेश, त्याचा भाऊ शैलेश, संगीता, राजू आणि मीना भेटले. बऱ्याच जणांचे नातेवाईक नोकरीसाठी शहरात आहेत. गणपतीसाठी गावात येतात. सोबत थर्मोकोलचं मखर आणतात. गणपतीसोबत मखराचंही विसर्जन होतं. त्यामुळे दरवर्षी मोठय़ा प्रमाणात थर्मोकोल गावातल्या ओढय़ात आणि तेथून नदीत जातो.
‘‘थर्मोकोल खराब होत नाही रे. वापरलेलं मखरही नव्यासारखंच दिसतं. तेच पुढच्या वर्षी वापरू असं आम्ही सुचवलं.’’ गणेश म्हणाला.
थर्मोकोलचं विघटन होत नाही, पर्यावरणासाठी घातक आहे हे त्यांनी मोठय़ांना समजावलं. पण पुढच्या वर्षी हेच मखर वापरू या कल्पनेला जोरदारच विरोध झाला. ‘‘दरवर्षी वेगळी सजावट नको का?’’ असा मोठय़ांचा प्रश्न.
‘‘ओढा पूर्वीसारखा स्वच्छ राहिला नाही. मुलांचं म्हणणं बरोबर आहे,’’ म्हणत गणेशच्या आजोबांनी मुलांची बाजू उचलून धरली. मोठय़ांचा नाइलाज झाला. काही सुवर्णमध्य निघतो का अशी मुलांनी चर्चा केली.
‘‘तुम्ही तुमच्या सोसायटीत स्टीलच्या भांडय़ांचं भांडार सुरू करणार आहात ना, तसंच थर्मोकोलच्या मखरांबाबत आम्ही करत आहोत.’’ शैलेश म्हणाला.
‘‘गणपती विसर्जन झाल्यावर सगळय़ांकडचे मखर खोक्यांमध्ये व्यवस्थित ठेवले आहेत. पुढच्या वर्षी नवीन मखर आणायचं नाही. आहेत त्याच मखरांची लोकांनी एकमेकांत अदलाबदल करायची, म्हणजे प्रत्येकाला वेगळय़ा रंगाचं, वेगळय़ा डिझाइनचं मखर वापरायला मिळेल. गणपतीची सजावटही लोकांच्या मनासारखी होईल, पण पर्यावरणाचं नुकसान होणार नाही.’’
‘‘भारी युक्ती आहे.’’ यतीन म्हणाला.
‘‘ही आत्ताची मखरं १०-१२ वर्षे नीट राहतील. खराब होतील तेव्हा त्या थर्मोकोलचं काय करायचं हा प्रश्न आहे.’’ संगीता म्हणाली.
‘‘कदाचित तोपर्यंत काही उपाय सापडेलही.’’ गणेश म्हणाला.
‘‘हो ना. पण निदान आमच्यासाठी नवीन थर्मोकोलचा वापर निदान अजून काही वर्षे होणार नाही हे नक्की. या कल्पनेला आपण ‘फिरतं मखर’ असं नाव देऊ.’’ राजू म्हणाला. त्याची कल्पना सर्वाना आवडली.
‘‘पुठ्ठा, कागद अशा विघटन होणाऱ्या गोष्टी वापरून तितकंच सुंदर मखर कसं बनवायचं हेही तोपर्यंत शिकून घेऊ.’’ मीना म्हणाली.
‘‘तुमची गॅंग मला जाम आवडली. आम्ही चौघे आणि तुम्ही सहाजण, मस्त जमेल आपलं.’’ यश म्हणाला.
सगळय़ांनी एकमेकांना हाय फाइव्ह देऊन यशच्या म्हणण्याला दुजोरा दिला.