मंगलाबाई थम्पुरत्ति, सुनयनी देवी, अँजेला त्रिन्दाद आणि अंबिका धुरंधर या चौघीजणी ‘कुणाच्यातरी कोणीतरी’ होत्या म्हणूनच त्यांची नोंद कलेच्या इतिहासानं घेतली का, असा प्रश्न जरूर पडला पाहिजे. ‘अगं आमची आत्या ना, नागपंचमीला सुंदर चित्रं काढायची, दिवाळीत ठिपके न घालता रांगोळ्या काढायची… धाकट्या काकाचंही ड्रॉइंग चांगलं होतं, पुढे चित्रकार झाला तो… पण हीच बहीण त्याची लाडकी’ असा संवाद घरातील बुजूर्गांच्या तोंडी ऐकलेल्या कित्येकांना तो पडावाच…
कुणा नातेवाईकामुळेच बाईचं नशीब खुलावं किंवा मग तिच्या नशिबातले भाग्ययोग नातेवाईकांपैकीच कुणाच्यातरी उत्कर्षाला कारणीभूत व्हावेत, ही धारणा जुनी आहे. यातून, स्त्रियांना कर्तेपण (इंग्रजीतला शब्द – एजन्सी) नाकारण्याची त्याहूनही जुनाट धारणा दिसते. याचं प्रतिबिंब चित्रकलेच्या इतिहासातही उमटलंय. एकतर, काही चित्रकार महिलांकडे लक्ष गेलं तेच मुळी ती कुणाचीतरी कोणीतरी आहे म्हणून! या स्त्रिया चित्रकार म्हणून कशा होत्या, याची चर्चा नंतर झाली. पण आधुनिक भारतीय चित्रकलेच्या इतिहासात सुरुवातीला ज्यांची नोंद आहे, अशा स्त्रिया जरी स्वतंत्रपणे कर्तबगार असल्या तरीही त्या कुणा प्रसिद्ध पुरुषाच्या नातेवाईकच होत्या. इथं हा लेखसुद्धा या नातेवाईक स्त्रियांचीच चित्रं दाखवतो आहे. म्हणजे त्या काळातल्या बाकीच्या स्त्रियांना चित्रकार होता आलंही असतं कदाचित, पण तशी कोणतीही संधी नाकारण्याची तजवीज आधीच झालेली होती- घराण्यातला एकही पुरुष चित्रकार नसणं, एवढंसुद्धा पुरेसं होतं- पुढल्या सर्व संधी नाकारल्या जाण्यासाठी. हे किमान दोन पिढ्यांतल्या स्त्रियांच्या वाट्याला आलं. त्यापैकी चौघी म्हणजे १८६६ साली जन्मलेल्या मंगलाबाई थम्पुरत्ति आणि १८७५ सालचा जन्म (म्हणजे यंदा दीडशेवी जयंती) असलेल्या सुनयनी देवी; पुढे १९०९ साली जन्मलेल्या अँजेला त्रिन्दाद आणि १९१२ सालच्या अंबिका धुरंधर.
‘राजा रविवर्मा यांची बहीण’ किंवा ‘अबनींद्रनाथ टागोरांची बहीण’/ ‘राजा राममोहन रॉय यांची नातसून’ , ‘रावबहादुर धुरंधर यांची कन्या’, किंवा ‘चित्रकार (ए. एक्स. त्रिन्दाद यांची कन्या) म्हणूनच त्यांचा उल्लेख झाला. अर्थात, यापैकी पहिल्या दोघींना तर कलाशिक्षणही घेता आलं नव्हतं. धुरंधर आणि त्रिन्दाद यांच्या काळात मात्र परिस्थिती बदलली होती. अंबिका धुरंधर या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या महिला- त्यांचं शिक्षण १९३१ मध्ये पूर्ण झालं, तर अँजेला त्रिन्दाद यांचं १९३२ साली. याखेरीज एक नोंद सापडते ‘मनोरमा देवी’ अशी. या रामानंद चटर्जी यांच्या पत्नी. रामानंदबाबू बंगालीत ‘प्रबाशी’ आणि इंग्रजीत ‘मॉडर्न रिव्ह्यू’ ही नियतकालिकं चालवायचे. गंमत म्हणजे, पुढे याच ‘प्रबाशी’ आणि ‘मॉडर्न रिव्ह्यू’मधली चित्रं पाहून मीही चित्रं काढू लागले, अशी आठवण सुनयनी देवींनी सांगितल्याचं आढळतं. पण रामानंदबाबू पक्के भद्रलोकी. एका लेखात ते पत्नीच्या गृहिणीपणाचं भरपूर कौतुक करतात… मनोरमा चटर्जी चित्रंसुद्धा काढायच्या, याची नोंदच या ‘पतिराजां’च्या लिखाणात नाही.
काळानुसार पाहायचं तर आधी येतात मंगलाबाई थम्पुरत्ति. त्रावणकोरच्या राजघराण्याशी संबंध असलेले चित्रकार राजा रविवर्मा यांची ही एकुलती बहीण, पण ‘मी माझ्या काकांकडून (राजा राजवर्मा) शिकले… नंतर भावाला (रविवर्मा) चित्रं दाखवू लागले, तो सूचना करायचा. पण माझ्या लग्नानंतर तेही बंद झालं’ अशी मंगलाबाईंच्या आठवणींची नोंद पुढल्या कला-इतिहासकारांनी (रुपिका चावला, शुक्ला सावंत आदी) केलेली आहे. रविवर्मा यांच्याप्रमाणेच पाश्चात्त्य यथातथ्यवादी शैलीत मंगलाबाईंची चित्रं आहेत. रविवर्मा यांचं जे व्यक्तिचित्र सर्रास चलनात आहे तेही या मंगलाबाईंनी केलं आहे आणि आजही त्रावणकोरच्या संग्रहात ते आहे. प्रसंगांची रचना करून चित्रं काढण्याची त्यांची रीत मात्र रविवर्मा यांच्यापेक्षा निराळी दिसते. मंगलाबाईंची ही रचनाचित्रं अनाग्रही आहेत. विक्रीचं बंधन त्यांच्यावर जणू नाहीच. त्यांच्या ‘आल्म्स गिव्हिंग’ या गाजलेल्या – आणि म्हणून इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या- चित्रात भिक्षा मागणारी अगदी कृश वृद्ध स्त्री आणि तिला भिक्षा देणारी पोरसवदा तरुणी असा विरोधाभास त्या दोघींसाठी निवडलेल्या रंगांतूनही दिसतो. मंगलाबाई १९५३ साली वारल्या. चित्रकर्ती म्हणून फार मानसन्मान त्यांना मिळाले नाहीत. त्यांच्या अखेरच्या चित्रांपैकी एक – महात्मा गांधींचं पूर्णाकृती चित्र थिरुवनंतपुरमच्या कन्या महाविद्यालयात विराजमान झालं तेवढंच.
यापेक्षा सुनयनी देवींच्या चित्रांची प्रदर्शनं तरी बऱ्या प्रमाणात झाली. हे टागोर आणि पर्यायानं शांतिनिकेतनशी असलेल्या जवळिकीमुळे घडलं म्हणा… पण एवढं तरी होऊ शकलं. या सुनयनी देवींबद्दलच्या आठवणी वाचल्यास त्यांच्या अल्प यशाचंसुद्धा कौतुक वाटू लागतं. तेराव्या वर्षी विवाह झाला सुनयनी यांचा. राजा राममोहन राय हे त्यांचे आजेसासरे. भाऊ चित्रकार, मग त्याच्या गाजलेल्या शैलीतच बहिणीनं काम करणं हे मंगलाबाईंप्रमाणेच सुनयनी देवींच्याही बाबतीत घडलं. अबनींद्रनाथ टागोर हे पौर्वात्य शैलीत शोभणारं ‘वॉश टेक्निक’ वापरून चित्रं करत. टेम्परा रंग कागदावर लावायचे, ते हलकेच पाण्यात बुडवून अगदी कागदासरसे आणि काहीसे धुवट, फिक्या छटेचे करायचे आणि मग पुढला रंग लावायचा. घरच्याघरीच हे असं करण्याची सुरुवात सुनयनी देवींनी वयाच्या पस्तिशीनंतर केली. तोवर त्यांना सुना आल्या होत्या. घरी (म्हणजे बंगालीतल्या ‘बाडी’त) नोकरचाकर होतेच. दिवसातनं पाच-सहा तास तरी सुनयनी देवींचं चित्रकाम चालायचं. तंत्र जरी भावासारखंच असलं तरी आकार मात्र भावाच्या चित्रातल्याइतके सफाईदार नसत; मग ‘नाइव्ह आर्ट’ या प्रकारात सुनयनी देवी काम करत, असं म्हणावं लागतं. शांतिनिकेतनात त्या वेळी असलेल्या गाढ्या कला-अभ्यासक स्टेला क्रॅमरिश यांनी भगिनीभावानं सुनयनी देवींच्या कलेची पाठराखण केलीय. त्यामुळेच पुढल्या अभ्यासकांना एक महत्त्वाचा (पण काहीसा प्रशंसावजाच) निष्कर्ष काढता आला… तो असा की, ‘सुनयनी देवींची चित्रं ही ‘फीमेल गेझ’ची भारतीय कलेतली आद्या अभिव्यक्ती आहे’!
पण मग विश्वास ठेवून किंवा मनोभावे शोधायला गेलं तर अंबिका (अंबूताई) धुरंधरांच्याही चित्रांमध्ये दिसते की फीमेल गेझ! चित्रांमधल्या स्त्री-आकृतीला व्यक्ती मानणं, तिला पुरुषी नजरेच्या मनोरंजनाचं साधन न बनवता तिला तिचं असू देणं… हेच जर ‘फीमेल गेझ’चं महत्त्वाचं लक्षण असेल तर ते अंबूताईंच्या चित्रांमध्येही होतं, याची साक्ष १९२९ मधलं- म्हणजे त्या विद्यार्थीदशेत असताना केलेलं- एक व्यक्तिचित्रही देतंय. ती स्त्री कदाचित जेजेतली मॉडेल असेल आणि अशा मॉडेलच्या भोवताली बसून चित्रण करायचं असल्यानं अशा व्यक्तिचित्रातली नजर दुसरीकडेच असू शकते, स्वत:त हरवल्यासारखी वाटू शकते, हे सारं खरं; पण अंबूताईंच्या या चित्रात त्याला ‘फीमेल गेझ’ म्हणायचं का? कदाचित नाही. त्यासाठी विकिमीडिया कॉमन्सवर King Daksha Dakshayani शोधल्यास सर्वांना पाहाता येणाऱ्या चित्राकडे बोट दाखवावं लागेल. वडील- राजे दक्ष- यांनी आपल्या पतीचा अपमान केला म्हणून यज्ञासमोरच अग्नी उत्पन्न करून दाक्षायनी सती जाते, असं ते दृश्य इतरांच्या प्रतिक्रियांमुळे लक्षात राहील. किंवा ‘माझी स्मरणचित्रे’ या त्यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरलं, रहाट ओढणाऱ्या बायकांचं अपूर्ण राहिलेलं रंगयुक्त रेखाचित्रही ‘फीमेल गेझ’चा नमुना ठरू शकेल.
अँजेला त्रिन्दादही अंबूताईंप्रमाणेच दीर्घायुषी ठरल्या, पण तरुणपणीच त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. अँजेला यांचे वडील उत्तम व्यक्तिचित्रकार होते (त्या वेळी जेजेच्या रंगकला शिक्षणाचा भर यथातथ्यवादी व्यक्तिचित्रणावरच होता) विशेषत: छायाप्रकाशाचा खेळ त्यांच्या व्यक्तिचित्रांत असल्यानं ‘भारताचे रेम्ब्राँ’ असं ए. एक्स. त्रिन्दादांना म्हटलं जाई. अँजेला वडिलांना मदत करत असल्यानं त्यांचंही व्यक्तिचित्रणावर प्रभुत्व होतंच, पण जेजेतच शिकवणाऱ्या वडिलांच्या वेळी ‘इंडियन स्टाइल’चे वर्ग नव्हते- ते अँजेला शिकत असताना सुरू झाले होते आणि या वर्गासाठी, तसंच पुढे भित्तिचित्रण वर्गासाठी अँजेला यांची निवडही झाली होती. त्याहीमुळे असेल, पण वडिलांच्या छायेत त्या कधी राहिल्या नाहीत. उलट, येशू-चित्रांमध्ये भारतीय शैली आणणाऱ्या चित्रकार म्हणून अँजेलांनी आधी नाव कमावलं. मग साधारण लायोनेल फेनिंजर किंवा आपले जहांगीर साबावाला यांच्यासारखं आकृतीविभाजन करून त्यांनी चित्रं काढली आणि त्या पद्धतीला त्यांनी ‘त्रिन्दादिझम’ असं नावही दिलं. इथं मुद्दाम त्यांनी केलेलं एक मानवाकृतीप्रधान चित्र आहे- त्यातले रंग आणि प्रकाश हे साक्ष देतात की, वडिलांचा योग्य तो अभिमान बाळणाऱ्या या विचारी मुलीनं तंतोतंत वडिलांचीच शैली उचलण्याचा मार्ग साफ नाकारला होता.
या चौघीजणी ‘कुणाच्यातरी कोणीतरी’ होत्या म्हणूनच त्यांची नोंद कलेच्या इतिहासानं घेतली का, असा प्रश्न जरूर पडला पाहिजे. त्याचं उत्तर कदाचित आपल्याच घरोघरी सापडेल. कुणी वृद्ध मावशी सांगत असेल… ‘अगं आमची आत्या ना, नागपंचमीला सुंदर चित्रं काढायची, दिवाळीत ठिपके न घालता रांगोळ्या काढायची… धाकट्या काकाचंही ड्रॉइंग चांगलं होतं, पुढे चित्रकार झाला तो… पण हीच बहीण त्याची लाडकी’ – असं काहीतरी… नीट ऐकलंत, तर ऐकू येईल.
abhijit.tamhane@expressindia.com