मोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत. त्याचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वी रशियातून ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाले. तिथल्या ज्यू वस्तीत स्क्लियार लहानाचा मोठा झाला. स्वत:च्या ज्यू असण्याची जाणीव त्याच्या मनात कायम प्रखर राहिली. ज्यू असलेल्या काफ्काच्या साहित्याचे कळत्या वयापासून त्याच्यावर खोल संस्कार झाले. अल्पसंख्याक असणं, ‘बाहेरचा’ असणं या जाणिवांचा प्रत्यय त्याला काफ्काच्या साहित्यातून आला आणि काफ्काशी आपोआप सहानुभव जुळला.
काही लेखक असे असतात की, त्यांच्यानंतर लिहिणाऱ्या कोणत्याही लेखकाला त्यांचा प्रभाव टाळता येत नाही. त्यांची गडद सावली पुढच्या सर्व पिढय़ांवर पसरते. त्यांची घराणी निर्माण होतात. त्यांना उपघराण्याच्या फांद्या फुटतात. त्यातून जमिनीत रुजू पाहणाऱ्या पारंब्या सरसरत बाहेर येतात आणि त्यांचं डेरेदार साम्राज्य तयार होतं. फ्रान्त्झ काफ्का हा लेखक असाच विशाल आणि सतत विस्तारशील घराण्याचा मूळ पुरुष. त्यानं आपला कल्पित साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. काफ्कानं आपले लेखक-वंशजच घडवले नाहीत, तर लेखक-पूर्वजही निर्माण केले, अशा आशयाचं होर्खे लुई बोर्खेसचं विधान शंभर टक्के खरं आहे. काफ्का वाचल्यानंतर त्याच्याआधीच्या पिढीतल्या हर्मन मेलविल, निकोलाई गोगोल, दस्तयेवस्की अशा अनेक लेखकांचं साहित्य आपल्याला ‘काफ्काएस्क’ वाटायला लागतं. जागतिक साहित्यातल्या समकालीन महत्त्वाच्या लेखकांपैकी प्रत्येक जण काफ्काचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वारसदार आहे.
मोआसिर स्क्लियार (Moacyr Scliar) या ब्राझिलियन लेखकानं काफ्काचं ऋण व्यक्त करणारी ‘काफ्का अँड लेपर्ड्स’ (Kafka and Leopards) ही कादंबरी लिहून आपल्या लेखक-वंशाच्या मूळ पुरुषाला सलाम केलेला आहे. स्क्लियार हा गोष्ट सांगण्यात मजा घेणाऱ्या लेखकांपैकी असल्यानं या जेमतेम शंभर पानांच्या कादंबरीची महती कळण्यासाठी तिचं कथासूत्र ठाऊक असणं आवश्यक आहे.
या कादंबरीच्या (खरं तर दीर्घकथेच्या) कथानकाची सुरुवात १९६५ साली ब्राझीलमध्ये होते. कथानक पोलिसांच्या ताब्यात असतो. त्याच्याकडे एक जर्मन हस्तलिखित सापडतं. त्याच्याखाली फ्रान्त्झ काफ्का अशी सही असते. तो मजकूर पोर्तुगीजभाषी पोलिसांना कळत नाही. मात्र तो सांकेतिक भाषेत लिहिलेला उठावाचा संदेश असावा, अशी शंका त्यांना येते.
त्यानंतर कादंबरीचं कथानक सुमारे पन्नास र्वष मागे जातं. नायकाचे काका युक्रेनमधल्या एका गावात राहात असतात. त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारसरणीनं गारूड केलेलं आहे. पहिल्या महायुद्धात ट्रॉटस्कीला मदत करून क्रांतिकारक होण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र छोटय़ा गावात अशी संधी कुठून मिळणार? तेवढय़ात त्यांचा एक मित्र थेट ट्रॉटस्कीला भेटून परत येतो. त्याच्यावर एक कामगिरी सोपवण्यात आलेली असते. प्राग शहरात जाऊन ट्रॉटस्कीच्या एका हस्तकाला भेटायचं. त्याच्याकडून सांकेतिक भाषेतला संदेश असलेला कागद घ्यायचा. त्यातल्या संदेशाची उकल करायची. त्यात ज्याला ठार करायचं त्या व्यक्तीचं नाव सापडेल. त्या व्यक्तीला शोधून तिचा काटा काढायचा. ही थरारक कामगिरी आपल्याला करायला मिळावी, ही काकांची इच्छा मित्र आजारी पडल्यामुळे पूर्ण होते. मित्र त्यांच्यावर कामगिरी पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवतो. त्याच्याकडून आवश्यक ती सगळी माहिती हरवते. ज्याच्याकडून सांकेतिक मजकूर मिळायचा त्या माणसाला शोधायचं कसं ही मोठी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकते. तिथे ज्यूंच्या प्रार्थनास्थळातल्या धर्मप्रमुखाकडून ‘फ्रान्त्झ काफ्का’ हे नाव त्यांच्या कानावर पडतं. ते ऐकल्यावर आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस हाच असावा असं त्यांना वाटायला लागतं. ते काफ्काला शोधून काढतात. काफ्का त्यांना प्रकाशकाचा माणूस समजतो. नुकतीच लिहिलेली एक छोटी कथा तो छापण्यासाठी त्यांच्या हातात देतो. ती कथा जर्मनमध्ये असल्यानं नायकाच्या काकांना ते सांकेतिक हस्तलिखित वाटतं. आपण ज्याच्या शोधात आहोत तो माणूस आणि संदेश सापडल्याचा त्यांना अतोनात आनंद होतो. प्रत्यक्षात तो माणूस आणि संदेश सापडल्याचा त्यांना अतोनात आनंद होतो. प्रत्यक्षात तो मजकूर म्हणजे काफ्काची ‘लेपर्ड्स इन द टेंपल’ ही तीन ओळींची कथा असते :
बिबटे देवळात घुसले आणि त्यांनी देवापुढे ठेवलेलं पाणी प्यायलं. असं पुन: पुन्हा घडायला लागलं. अखेर देवळात आल्यावर त्यांच्या हालचाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतील याबद्दल आधीच अंदाज वर्तवणं शक्य झालं आणि त्यांच्या क्रिया हा धर्मविधीचाच एक भाग बनला.
नायकाचे काका एका जर्मन माणसाच्या मदतीनं या संहितेचं भाषांतर करून त्यातला ‘गुप्त संदेश’ उलगडण्याचा प्रयत्न करतात. प्रागमध्ये प्राणीसंग्रहालय कुठे आहे? बिबटे म्हणजे नेमकं कोण असेल? काफ्काच्या कथेचा अर्थ लावण्याच्या या प्रक्रियेत नायकाचे काका अधिकाधिक चुकीचे अर्थ लावत जातात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या घोटाळ्यांची संख्या वाढायला लागते.
‘चुकीचा अर्थ लावणं’ हे या कादंबरीचं एक प्रमुख अर्थसूत्र. आपल्या परिस्थितीचा आणि आयुष्याचा चुकीचा अर्थ लावणं, आपल्या सामाजिक स्थितीबद्दल चुकीची कल्पना असणं, माणसं आणि घटना यांना जोडणारे चुकीचे रेखांश तयार करणं- अशा अन्वयार्थाच्या घोळात यातली पात्रं सापडलेली आहेत.
स्वत:च्या भौगोलिक प्रदेशाविषयी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या लेखकांनी ब्राझिलियन साहित्याची परंपरा घडवली. मचादो द असिस, योर्हे आमादो, जोआओ रोझा, मार्सिओ सूझा- अशा समर्थ लेखकांनी ते ज्या प्रदेशात जगले त्याचे कोपरे आपल्या साहित्यात आत्मीयतेनं व्यक्त केले. मोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत. त्याचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वी रशियातून ब्राझीलमध्ये स्थलांतरित झाले. तिथल्या ज्यू वस्तीत स्क्लियार लहानाचा मोठा झाला. स्वत:च्या ज्यू असण्याची जाणीव त्याच्या मनात कायम प्रखर राहिली. ज्यू असलेल्या काफ्काच्या साहित्याचे कळत्या वयापासून त्याच्यावर खोल संस्कार झाले. अल्पसंख्याक असणं, ‘बाहेरचा’ असणं या जाणिवांचा प्रत्यय त्याला काफ्काच्या साहित्यातून आला आणि काफ्काशी आपोआप सहानुभव जुळला. जगण्याचा अजबपणा, व्यवस्थेची अतक्र्यता आणि कोणत्याही प्रकारचा अन्वयार्थ अंतिम न मानणं- या काफ्काच्या साहित्यातल्या केंद्रीय कल्पना स्क्लियारच्याही साहित्यात केंद्रस्थानी आहेत. ‘काफ्का अँड लेपर्ड्स’सुद्धा त्याला अपवाद नाही. ही कादंबरी सध्या मोठय़ा संख्येने लिहिल्या जात असलेल्या आधुनिकोत्तर मेटाफिक्शनच्या लाटेत विरघळून जात नाही, त्यामागे सबळ कारणं आहेत. अशा कादंबऱ्यांमध्ये संरचनेला अवास्तव महत्त्व प्राप्त होऊन आशय गौण ठरतो. पात्र केवळ लेखकाच्या संकल्पनांचं वहन करण्यापुरती, स्वत:चं अस्तित्व नसलेली असतात. त्यांना मिती नसतात. ती निष्प्राण यंत्रमानवांप्रमाणे वावरतात. वास्तववादाचा रटाळपणा टाळून कादंबरीत जिवंतपणा आणायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकवेळी एकरेषीय निवेदन, प्रसंगांची शिस्तबद्ध रचना, पात्रनिर्मिती यांचा बळी द्यायची गरज नसते, हे ज्यांना उमजलेलं आहे अशा मोजक्या लेखकांपैकी स्क्लियार आहे. तो मोजक्या शब्दांत पात्रं आणि प्रसंग उभे करतो. ते वाचकाच्या मनावर ठसवून त्याला निवेदनप्रवाहात गुंतवत नेतो. त्याच्यासाठी वाचक म्हणजे जणू त्याचा कादंबरीलेखनातला भागीदारच. म्हणून स्क्लियारला ‘दाखवण्या’पेक्षा ‘सांगणं’ अधिक भावतं. वेळ आलीच तर तो तपशीलवार वर्णनही करतो. अशावेळी हे वर्णन थेट आणि परिणामकारक असतं. कादंबरीत नायकाचे काका काफ्काला पहिल्यांदा भेटतात तेव्हा त्यांच्या नजरेतून आपल्याला काफ्का असा दिसतो :
काफ्कानं त्यांच्याकडे स्थिर नजरेनं पाहिलं आणि तो अचानक खोकायला लागला. तो खोकला कोरडा, सौम्य, दाबलेला तरीही सतत येणारा आणि काळजी निर्माण करणारा होता. ते शहारले. त्यांना हा खोकला चांगलाच ठाऊक होता. त्यांची खात्री पटली की हा टीबी आहे. त्यात टीबीची सगळी लक्षणं स्पष्ट उमटलेली दिसली; बारीकपणा, अशक्तपणा, गालाच्या हाडांजवळ असलेली लालसर छटा, त्यात भर म्हणून टीबी पेशंटसाठी अत्यंत घातक अशी थंडीही त्या छोटय़ाशा घरात होती. एका तीव्र दु:खाने त्यांचा अकस्मात ताबा घेतला. काफ्काच्या आईला जाणवलं असतं असं दु:ख. तू आजारी आहेस काफ्का, खूप आजारी. हा खोकलाही काही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. हा टीबी आहे, कल्पित साहित्य नव्हे!
या परिच्छेदातून जाणवणारा मानवतेचा स्पर्श आज विश्वसाहित्यात दुर्मिळ आहे.
काफ्का पात्र म्हणून जरी स्क्लियारच्या कादंबरीत प्रथमच आला असला, तरी त्याच्या साहित्यात यापूर्वीही काफ्काशी संवाद साधण्याचा प्रयत्न त्यानं विविध प्रकारे केला आहे. ‘वॉर इन बॉम फिम’ (War in Bom-Fim) या कादंबरीचा नायक आत्महत्या करण्यासाठी उंदराचं वीष पितो. मात्र मरण्याऐवजी त्याचं एका प्रचंड झुरळात रुपांतर होतं. हे सहजच काफ्काच्या ‘मेटामॉर्फसिस’ची आठवण करून देणारं. त्याच्या ‘सेंटॉर इन द गार्डन’ (Centaur in The Garden) या गाजलेल्या कादंबरीचा नायक अर्धा माणूस आणि अर्धा घोडा आहे. काफ्काच्या अनेक प्राणी-कथांना केलेला हा कुर्निसात!
स्क्लियारचं आयुष्याविषयीचं निरीक्षण एका ज्यूच्या नजरेतून केलेलं आहे, मात्र ते केवळ सांप्रदायिक कोनांमध्ये बंदिस्त होत नाही. त्याचं साहित्य तुमच्या-आमच्या जगण्यापेक्षा फार वेगळं नाही. त्याचं लेखक म्हणून मोठेपण यातच असावं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा