अरुणा सबाने
काही महिन्यांपूर्वी ‘खुलूस’ या वारांगनांच्या कथा आणि व्यथा मांडणारे पुस्तक आले. समाजानं धुत्कारलेल्या, परिस्थितीनं गांजलेल्या, पण कणखर मुली, स्त्रिया यातल्या नायिका आहेत. त्या प्रश्नांच्या काळोखात किती घेरल्या गेलेल्या आहेत त्याचा राज्यातीलच नव्हे तर देशातील गावोगावच्या वेश्यागृहांमध्ये फिरून लेखकाने शोध घेतला आहे..
समीर गायकवाड हे नाव समाजमाध्यमावर अचानक तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या डोळय़ासमोर यायला लागलं. त्यांच्या काही ‘पोस्ट’ मी त्यावर वाचत होते. पण एक दिवस कामाठीपुऱ्यातल्या एका मुलीवरची पोस्ट वाचली आणि खूप वेळ मी तिथेच थांबले. अगदी स्तब्ध. जणू काय मला कुणी ‘स्टॅच्यू’ म्हटलंय. जरा वेळानं तोंडातून शब्द बाहेर पडले ‘अरे, ही तर आमच्या जम्मोची कथा आहे.’ मग त्यांच्या वॉलवर माझा वावर वाढला. समीरनं लिहिलेलं वाचलं की दरवेळी असाच काहीसा उद्गार तोंडातून बाहेर यायचा. मनानं टिपलं, हे रत्न आहे. यांना या वारांगनांची नाडी सापडलीय. मग ती स्त्री कामाठीपुऱ्यातील असो की गंगा-जमुनातील. एकदा सोलापूरला गेले तेव्हा समीरची भेट झालीच. त्यांना थेट प्रश्नच विचारला, ‘‘तुम्ही या स्त्रियांचा शोध का घेताय? काय हरवलंय तुमचं? मला सारखं जाणवतंय, तुम्ही कुणाचा तरी शोध घेताय.’’ त्यांच्या डोळय़ांत अश्रू तरळले आणि त्यांनी जे सांगितलं त्यानं मी अवाक् झाले. त्यांचा शोध संपला होता- पण कधीही भरून न येणारी भली मोठी जखम त्यांना देऊन. त्यानंतर काहीच दिवसात ‘खुलूस’ आलं. त्यापाठोपाठ ‘झांबळ’ हा कथासंग्रह आला. आज समीर गायकवाड हे ‘बेस्ट सेलर’ आणि सर्वाचे आवडते लेखक झाले आहेत. ‘खुलूस’नं त्यांना गल्लोगल्ली पोचवलं. अलक्षितच नव्हे तर एका दाहक विषयाला वाचा फोडून त्याला सार्वत्रिक केलं आहे. कालपर्यंत पांढरपेशांना हे वाचायला अवघडल्यासारखं व्हायचं, तेच मात्र ‘खुलूस’ उघडपणे वाचताना दिसतात आणि त्यावर प्रतिक्रियाही देतात, हे लेखकाचं यश आहे.
समाजानं एखाद्या महारोग्याला झिडकारावं अशा अव्हेरलेल्या वेश्यावस्तीतील, रक्तामांसाच्याच माणसांनी फशी पाडलेल्या अनेक मुलींच्या कथा लेखक ‘खुलूस’मधून सांगतात. या वेगळय़ा जगातील जगावेगळी पात्रे पाहून आपण थक्क होतो. अंतर्मुख होतो. या वारांगनांच्या जीवनानुभवाचा शोध आणि वेध लेखक सतत घेताना जाणवतात. निसर्गानं स्त्रीदेहाला मातृत्वाचे दैवत्व दिलं. परंतु निसर्गाचीच निर्मिती असणाऱ्या नरदेहानं या दैवत्व प्राप्त केलेल्या स्त्रीदेहाची पदोपदी कसकशी विटंबना केली, हे विविध अंगांनी समीर यांनी वाचकांना दाखवून दिलं आहे. बाप, भाऊ, काका, मामा, पती, पुत्र अशा अनेक नात्यांनी स्त्रीच्या जीवनात दु:खांची पेरणीच केलेली आहे.
खरं तर मी स्वत: या मैत्रिणींमध्ये काम करते. अनेकदा त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मी रस्त्यावर उतरले आहे. त्यांच्याशी संवाद आहे. त्यांच्या आयुष्याच्या चित्तरकथा मला माहिती आहेत, तरीही ‘खुलूस’ वाचून अनेकदा मी थबकले, रडले. पुढे वाचून होतच नव्हतं. आवडलेली कलाकृती रात्रभर वाचून संपवणारी मी, पण सलग नव्हतंच वाचवत मला- इतकी जबरदस्त भाषा कमावली आहे लेखकानं. त्या स्त्रियांच्या आयुष्याची परवड, त्यांचं दु:ख, त्यांची कमजोरी, जे असेल ते गायकवाड यांनी हळुवार, तेवढय़ाच तीव्र शब्दात मांडलं की त्यांच्यासाठी आपल्याला आलेले कढ पचवून आपण नाहीच जाऊ शकत पुढे. ही लेखकाच्या भाषाशैलीची ताकद आहे. मानवी संवेदनांचा विचार न करता साहित्य जन्मालाच येऊ शकत नाही. लेखक तर त्यांच्या दु:खालाच भिडला आहे. ते दु:खं त्यानं जोजवलं आहे. प्यायला आहे तो ते दु:खही. आपल्या डोळय़ांच्या पापणीवर ते दु:ख त्यानं जागवलं आहे.
‘खुलूस’मध्ये एकंदर २८ स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या गायकवाड यांनी चित्रित केल्या आहेत. समीर समाजभान जपणारे, आपल्या लेखनशैलीनं ओळखले जाणारे संवेदनशील लेखक आहेत. प्रत्येक स्त्रीची कहाणी आपल्याला सोलून काढते. मात्र कुणाचं दु:खं कमी आणि कुणाचं जास्त हे आपण नाही ठरवू शकत. लेखकानं जे वास्तव बघितलं, तेच सांगितलं. लेखकानं गावंच्या गावं, तेही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जवळजवळ अख्ख्या देशातील गावं पालथी घातली. त्यांना त्यांच्या एका जिवलगाचा शोध होता असं स्वत: लेखकच खुलूसच्या मनोगतात म्हणतात. त्यामुळे अनेक वर्ष त्यांनी पायपीट केलीय आणि जे विश्व त्यांनी अनुभवलं, तेच त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलं. वेश्या म्हणजे ‘वाईट’च असं आपलं पहिलं मत-समीकरण असतं. जणू ती वेश्या म्हणूनच जन्माला येते. पण माझ्या मते, कोणतीच स्त्री वेश्या म्हणून जन्माला येत नाही तर हा समाज तिला वेश्या बनवतो. त्यांच्या मनोवस्थेला, त्यांची व्यसनं, शिवीगाळ, त्यांचा आक्रमकपणा अशा गोष्टींना त्या स्वत: जबाबदार नसतात. अनेकदा तिचे सख्खे नातेवाईक, नवरे, परके, दलाल यांनी तिला या वाटेवर आणून सोडलेलं असतं. स्वमर्जीनं हा व्यवसाय कवटाळणाऱ्या स्त्रिया फार कमी असतात. आणि एकदा त्या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला की परतीच्या प्रवासाचे सर्व दोर कसे कापले जातात याची अनेक उदाहरणं लेखकानं येथे दिलेली आहेत.
‘हिराबाई’ची कथा आपल्याला विदीर्ण करते, तशीच नसीमची कथा काळीज कुरतडून टाकते. अमिना, सुरेखा या साऱ्या पोरी आपलं हृदय फोडून काढतात. दाणदाण कुटतात आपल्याला. अनेकदा तर वाचवतच नाही. मग काही दिवस ते पुस्तक बाजूला पडून राहतं. आणखी पुढे काय? काय वाचावं लागेल अजून. नाही होत िहमत. प्रत्येक पात्राच्या वाटय़ाला मानवी मनाची जी गुंतागुंत आलेली आहे, त्या गुंतागुंतीचा एक एक पदर मोकळा करून वाचकांना अंतर्मुख करण्यात समीर यशस्वी झाले आहेत. समाजानं धुत्कारलेल्या, परिस्थितीनं गांजलेल्या, पण कणखर मुली, स्त्रिया यातल्या नायिका आहेत.
खरं तर कोणतीच स्त्री स्वदु:ख सहज कुणाजवळ बोलत नाहीत. या तर नाहीच नाही. पण समीर गायकवाड यांनी त्यांना बोलतं केलं, ही लेखकाची किमया आहे. खुलूस ही ना कथा आहे, ना कादंबरी, ना ललित. ही यातल्या प्रत्येक स्त्रीची- मग ती हिराबाई असेल, अमिना असेल, नसीम, जयवंती, शांतव्वा, नलिनी, मूमताज अशा प्रत्येक स्त्रीचं दर्दभऱ्या दास्तानयुक्त चरित्र आहे. लेखक प्रत्यक्ष या स्त्रियांना भेटले आहेत. त्यांची व्यथा-दु:खं समजून घेतली आहेत. म्हणूनच लेखकाच्या शब्दात या स्त्रियांच्या मनाचं प्रतििबब स्वच्छ दिसतंय. पुरुषप्रधान व्यवस्थेने उभ्या केलेल्या, परंतु न सुटलेल्या प्रश्नांचा वेध घेत चिंतनशीलतेवर मात करण्यापेक्षा प्रश्नात्मकतेच्या खोल गुहेतच या नायिका वाचकांना चिंतन करावयास भाग पाडतात. आपण ते वाचताना व्याकूळ होतो. तो कल्लोळ आपल्याला खूप दिवस वेढून असतो. त्यांचं जगणं तर त्यांना छळतंच, पण मरणही छळतं. भारतीचा मृत्यू आपण नाही विसरू शकत. भारती ही तमिळनाडूतून कामाठीपुऱ्यात आलेली तरुणी. तिच्या सख्ख्या आईवडिलांनी तिला या व्यवसायात ढकललं. आई बाहेरख्याली, वडील व्यभिचारी. या व्यवसायाला तयार होत नव्हती म्हणून वर्ष-दोन वर्ष सतत अनेकांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करवले. त्यातच ती गर्भवती झाली. नंतर बाळ जन्मत:च गेलं असं सांगून बळजबरीनं तिला एका दलालाला विकलं. तमिळनाडूतील इरोडे- मुंबई- दिल्ली -मुंबई असा वाकडातिकडा प्रवास तिचा सुरू राहिला. नाइलाजाने का होईना, पण हळूहळू त्यात ती रमली. मात्र पुढे व्हायचं तेच झालं. अनेक व्याधींनी ती ग्रस्त झाली. दोन्ही मूत्रिपडे निकामी झाले. ‘एनजीओ’च्या मदतीनं कुठे ‘किडनी डोनर’ मिळतो का, याचा शोध सुरू झाला. पण या जगातल्या स्त्रियांसाठी असे मदतनीस का येतील. हालहाल झाले तिचे. शेवटी तिच्याच कामाठीपुऱ्यातल्या मैत्रिणींनी तिच्याकडे तमिळनाडूतून वारंवार येणाऱ्या गिऱ्हाईकाला शोधून काढलं. त्यानं आढेवेढे न घेता तिला मदत करायचं आश्वासन दिलं. आधी त्यानं तिच्या सख्ख्या नातेवाईकांना सांगितलं. ज्यांनी तिला या चिखलात ढकललं होतं, त्यांनी सांगितलं, ‘ती मेली तरी चालेल. आमचा तिचा काही संबंध नाही.’ सगळे निराश झाले. मात्र एके सकाळी एक सुंदर तरुण मुलगी आपली ‘किडनी डोनेट’ करायला आली. स्वत:चं नाव गुप्त ठेवावं या अटीवर तिनं- मालतीनं मूत्रिपड भारतीला दिले. भारतीची तब्येत हळूहळू सुधारली. तिनं आपल्याला हे जीवनदान कुणी दिलं हे सांगा, यासाठी डॉक्टरांकडे हट्ट केला. पण तिचं नावगाव डॉक्टर सांगायला तयार नव्हते. कारण मालतीचीच तशी इच्छा होती. शेवटी फॉर्मला लावलेला तिचा फोटो तरी दाखवा. म्हणून तिनं हट्ट धरला. नाइलाजानं डॉक्टरांनी फोटो दाखवला आणि भारती स्तब्ध झाली. तारुण्यात हुबेहूब भारती अशीच दिसत होती. भारतीनं ओळखलं, ही आपलीच मुलगी. ती जन्मत:च गेली हे आईवडिलांनी आपल्याला खोटं सांगितलं होतं. पण मालती आईला का भेटली नाही? तर आजीआजोबांनी ऐन कोवळय़ा वयात तिलाही धंद्यावर बसवलं होतं. आपल्या आईला हा धक्का सहन होणार नाही, हे न पाहिल्या देखल्या पोरीनं आपल्या आईचं काळीज ओळखलं होतं. नियतीनं मुलीच्याही आयुष्याचा नरकच केला होता. म्हणूनच ती आईला न भेटता निघून गेली होती. बालपणीच भारतीला मालती भेटती तर आपल्या आयुष्याचा कोट करून तिनं मुलीचं रक्षण केलं असतं. पण हे होणं नव्हतं. लेखक म्हणतो, भारतीच्या नाळेचे कर्ज मुलीने फेडले. सुसंस्कृत पांढरपेशा समाजातही हा त्याग, हे धैर्य, हा समंजसपणा सापडणार नाही. भारतीचा तर शेवट ठरलेलाच होता. मालती अजूनही जगते आहे. त्याच चिखलात. कारण प्रत्येकाचं आपल्या आयुष्यावर, मग ते कसंही असलं तरीही प्रेम असतं. त्यांचंही त्यांच्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे. बुधवारपेठेतली चाळिशीतली लच्छो मला म्हणाली होती, ‘‘एक हजार तीन पुरुष आतापर्यंत माझ्या वाटय़ाला आलेत, पण मॅडम अद्यापही मी कोरडीच आहे.’’ मी थिजून जागेवर उभीच राहिले. कितीतरी वेळ. पण ती तर जगतेच आहे ना!
‘खुलूस’मध्ये लेखकानं चमडीबाजार हा शब्द वारंवार वापरला आहे. हा शब्द मला सारखा खुपत होता. हृदयाला टोचत होता. कारण तो बाजार जरी चमडीचा असला तरी तिथे निर्मळ मनाच्या, माणुसकी असलेल्या स्वत:चंच नव्हे तर एकमेकींचं मातृत्व जपणाऱ्या, प्रेम करणाऱ्या मुली आहेत. त्यांच्या या सगळय़ा भावना, त्यांचा राग, त्यांना येणारी चीड, अस्वस्थता, मजबुरी समीर यांनी तंतोतंत रेखाटली आहे. एक- एक जिवंत आयुष्य साकार केलं आहे. त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे. त्यांच्या शब्दात नजाकत आहे. फार अर्थपूर्ण शब्द ते वापरतात. वानगीदाखल पुढील काही वाक्यं, शब्द बघा. ‘वारा सुन्न होऊन जागीच थबकला’, ‘तर्राट आयुष्य जगायची’, ‘तिच्या उफाडलेल्या देहातच एक कमालीचं आसक्त आवतण होतं’ , ‘बेचव चेहरा’, ‘काजुकतलीसारखी मुलायम’,‘तिच्या जिंदगानीनं वेश्येतल्या बाईपणाची दास्तान हिमालयाहून उत्तुंग झाली होती’, ‘तिच्या पहाडी कुशीत रक्तमाखला हिमालय शांत झाला होता’, ‘नलिनीचं कातर दु:खं खऱ्या अर्थाने वेदगंगेनंच ऐकलं’, अशी वाक्यं तो त्या स्त्रियांची व्यथा सांगता सांगता बेमालूमपणे पेरतो.
वारांगनांच्या वेदनेएवढी मोठी ‘ठणक’ जगात दुसरी कोणतीच नाही. त्या प्रश्नांच्या काळोखात किती घेरल्या गेलेल्या आहेत, याचं वास्तव चित्रण करण्यात समीर गायकवाड नक्कीच यशस्वी झाले आहेत.
विदर्भात स्त्रियांच्या प्रश्नांवर गेल्या पंचवीसहून अधिक वर्षांपासून कार्यरत. लेखकांचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि असहिष्णुता यांसारख्या अनेक मुद्दय़ांवर सक्रिय.‘आकांक्षा’ या मासिकाचे संपादन. ‘विमुक्ता’, ‘मुन्नी’, ‘ते आठ दिवस’, ‘आईचा बॉयफ्रेंड’ ही पुस्तके ,तसेच ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन लोकप्रिय.
arunasabane123@gmail.com