मध्यमवर्गी मराठी वाचननिर्देशांक तपासला तर स्वातंत्र्योत्तर काळानंतरची दोन दशके गाडगीळ,भावे, माडगुळकर,गोखले, शांताराम, मोकाशी यांची नवकथा मौज-सत्यकथेच्या कारखान्यातून जोमाने बहरत होती. आचार्य अत्रे, पुलं, जयवंत दळवी यांच्याकडून भाषासौष्ठवाचे मासले तयार होत होते. साठोत्तरीच्या दशकात जी. ए. कुलकर्णी, खानोलकर, पानवलकर ही गंभीर कथालेखकांची नामावळ साहित्यक्षेत्रावर राज्य करीत असताना, दुसऱ्या फळीतील मंत्री, वर्टी यांच्या खुसखुशीत लेखनाची भरभराट होत होती. या काळात नारायण धारपांनी जाणीवपूर्वक कालौघात टिकून राहणारा भयकथा हा प्रकार निवडला. गेल्या शतकात दुर्लक्षिल्या गेलेल्या आणि नंतर अभ्यासाचा विषय बनलेल्या एच. पी. लव्हक्राफ्ट या लेखकाची अवघड कथुलूसृष्टी आणि भयसंकल्पना मराठीत आणली. आर्थर कॉनन डॉयल, पीटर स्ट्रॉब, वॉल्टर डे ल मे, स्टीव्हन किंग, टी.ई.डी. क्लाईन, मायकेल मॅक्डॉवेल, फ्रँक डी फेलिटा, जेम्स हर्बर्ट, डब्ल्यू. डब्ल्यू जेकब्स, जॉन विण्डम, जोसेफ पायेन ब्रेनन आणि कित्येक लोकप्रिय नसलेल्या लेखकांच्या भयकल्पनांनी धारपांच्या लेखनप्रेरणा तयार झाल्या. आरंभीच्या काळात कथांचे अनुवाद केल्यानंतर तो आपला पिंड नाही हे ठरवून धारपांनी स्वतंत्र कथा लिहिण्यास सुरुवात केली.

धारपांनी केवळ भयकथाच नव्हे, तर सू़डकथा, गूढकथा, विज्ञानकथा, सामाजिक कादंबऱ्या आणि महत्त्वाचे म्हणजे रहस्यकथाही लिहिल्या. ‘चक्रवर्ती चेतन’, ‘कर्दनकाळ चेतन’ या दोन रहस्य कादंबऱ्यांनंतर महिन्याचा रतीब देणे अवघड असल्याची जाणीव त्यांना झाली असावी. हा ‘चेतन’प्रवास त्यांनी थांबवला तरी ‘धागे उभे आडवे’, ‘बहुरूपी’, ‘काळोखी पौर्णिमा’ आदी पाच-सहा रहस्यकथांची पुस्तके लिहिली. इतर रहस्यकथाकारांसारखे महिन्याच्या महिन्याला नायकांची मालिका त्यांनी दिली नाही. पण त्यांच्या भय-रहस्यकथांमधूनही आपोआप नायक तयार झाले. अशोक समर्थ २८ कथा आणि तीन कादंबऱ्यांतून अवतरले. जयदेव, भगत, पंत, कृष्णंचंद्र, दादा जहागीरदार आणि आनंद गोसावी यांच्या कथांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे समर्थांइतके गाजण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही. यांतील प्रत्येकाची साधना आणि दैवते गूढ आणि वेगळी होती. कुठल्या तरी निराळ्याच शक्तींचे ते उपासक होते. ‘भूतमारी’ची त्यांची पद्धती किंवा अमानवी शक्तीशी लढण्याची तंत्रे वेगळी होती. विशिष्ट प्रकारची ‘अगरबत्ती’ पेटवून संरक्षित वातावरण तयार करणारे किंवा कठीण प्रसंगात अज्ञात प्रकारच्या गोळ्या खाणारे समर्थ आणि याच गोष्टीसाठी भिन्न आयुधे हाताळणारे, जुन्या ग्रंथांमध्ये तोडग्यांची जुळणी करणारे पंत, जयदेव आणि इतर नायक यांची धारपांनी भेट घडवून दिली. काहींना सहकारी (वॉटसन) आहेत, तर काही ‘वन मॅन आर्मी’सारखे सिद्धहस्त रंगविण्यात आले आहेत.

Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?

हेही वाचा : डॉक्टरांना कोण वाचवणार?

१९५२ ते ७२ इतका २० वर्षांचा कालावधी कथा आणि कादंबरी लिहिण्यात हातखंडा असलेल्या धारपांना गुरुनाथ नाईक-दिवाकर नेमाडे यांची रहस्यकथा ऐन भरात असताना १९७३ साली ‘चेतन’ नायक लिहावासा वाटला. ‘मराठी कथा : गूढ-भय व रहस्य’ या स्पर्श प्रकाशनाच्या ग्रंथात आनंद साने म्हणतात- ‘ हा चेतन म्हणजे समर्थ कथांची भ्रष्ट आवृत्ती होता. त्याला एंद्रजालिक विद्या अवगत होती.’ पण पुढे या चेतनचा विकास धारपांनी केला नाही.

‘शापित फ्रँकेन्स्टाईन’ हे अवघे ११८ पानांचे पुस्तक मुंबईच्या सुनंदा प्रकाशनाने १९६९ साली छापले. त्यात ‘फ्रँकेन्स्टाईनचा सूड’ समाविष्ट करून १९९७ साली अमोल प्रकाशनाने नवी आवृत्ती बाजारात आणली. या कादंबरीवर ‘फ्रँकेन्स्टाईन’ या १८१८ सालातील पुस्तकाच्या लेखिका मेरी शेली यांचा उल्लेख का नाही, याचे कोडे धारपांच्या पुस्तकांचे पुण्यातील संग्राहक अजिंक्य विश्वास यांनी उलगडून दाखविले.

‘धारपांचे पुस्तक मेरी शेलीच्या कादंबरीवरून नाही, तर इतर दोन सिनेकथांचे भावानुवाद आहेत. ‘द कर्स ऑफ फ्रँकेन्स्टाईन’ आणि ‘द रिव्हेन्ज ऑफ फ्रँकेन्स्टाईन’ या नावाचे दोन चित्रपट ‘हॅमर फिल्म प्रोडक्शन’ या ब्रिटिश कंपनीने १९५७ आणि ५८ साली बनविले होते. (पुढे याच नावाच्या दोन कादंबऱ्याही वेगवेगळ्या लेखकांनी लिहिल्या.) हे चित्रपट मेरी शेली यांच्या मूळ कादंबरीवर बेतलेले होते. धारपांच्या कादंबऱ्या तुलनेसाठी तपासल्या तर मेरी शेलीचा ‘फ्रँकेन्स्टाईन’ हा यंत्रराक्षस वेगळा होता आणि कथानकही वेगळे होते, हे कळेल. पात्र तेच ठेवून कथानक बदलण्याचा हा प्रकार होता,’ असे अजिंक्य विश्वास यांनी सांगितले.

नारायण धारपांची पुस्तके राज्यभरातील जुन्या पुस्तकांच्या दुकानातून, बंद पडणाऱ्या वाचनालयांतून अर्थातच अंमळ अधिक किंमतीला विकली जातात. धारप वाचणारा त्यांची जुनी पुस्तके सांगेल त्या किंमतीला विकत घेईल, ही खात्री रद्दीवाल्यांनादेखील आहे. कारण अनेक वर्षांच्या पाहणीतून या लेखकाची मागणी घटली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

हेही वाचा : पडसाद…

मरणोत्तर लोकप्रियता

धारपांनी केवळ भयरंजन केले नाही. त्यांनी मराठी मध्यमवर्गाच्या भीती संकल्पनांना संपृक्त केले. त्यांच्या लेखनात असलेल्या पारलौकिक कल्पनांना तर्कावर तपासण्याची विचारसरणी दिली. धारपांच्या भयकथांना मराठीत रसिकमान्यता मिळाली. पण त्यावर व्यासपीठांवरून किंवा समीक्षेतून बोलले-लिहिले गेले नाही. भूत-रहस्यकथा प्रकार हा साहित्याच्या उच्चाभिरुची कक्षेत बसत नसल्याचे मानले गेले. तरी धारपांचे संग्रह आणि कादंबऱ्या पुढल्या सर्व दशकांमध्ये नव्या अवतारात येतच राहिले. या भयसाहित्याला मुख्य धारेतील मान्यता अद्यापतरी मिळालेली नाही. पण साठोत्तरीतील नवकथाकार, विनोद महापुरुष आणि रंजक लेखकवीर यांना वाचणारा वर्ग विरळ झाला असताना, धारपांच्या भय-रहस्य कथेचा वाचक मात्र दरेक पिढीमध्ये कायम राहिला. समाजमाध्यमांच्या युगातही धारप हरवले नाहीत. उलट ‘फेसबुक’वर ‘नारायण धारप’ ही वाचकचावडी तयार झाली. ती प्रकाशकांना आग्रह करून धारपांच्या नव्या आवृत्त्या बाजारात आणण्यास कारणीभूत ठरू लागली.

२०२० साल हे करोनामुळे टाळेबंदीचे असले तरी या वर्षाच्या आरंभीच नारायण धारपांचे (मरणोत्तर) ‘बलिदान’ हे बहुतांश अप्रकाशित कथांचे पुस्तक मनोरमा प्रकाशनाने काढले. २००८ सालात दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ‘रावतेंचा पछाडलेला वाडा’ ही लघुकादंबरी आणि ‘तळलेला माणूस’, ‘चेटकीण’, (वेगळ्या नावाने प्रसिद्ध झालेली जयदेव या नायकाची) ‘बलिदान’ या त्यांच्या मुलाला सापडलेल्या हस्तलिखित कथा, असा सगळा नव्या कथांचा ऐवज यात आहे. १९६३ साली स्वत: प्रकाशित केलेला ‘अनोळखी दिशा’ हा कथासंग्रह आणि २०२० मध्ये आलेले नव्या कथांचे शेवटचे पुस्तक, असे सात दशकांच्या कालावधीत वाचकप्रियता घटू न देता शेकडो पुस्तकांच्या आधारे प्रकाशित होण्याचे भाग्य मराठीतील कोणत्याच लेखकाला लाभलेले नाही. धारप आजही नवे वाचक घडवत आहेत, त्यांच्या पुस्तकांच्या कक्षेत येणारा त्यांच्या भयगारुडाने झपाटून जात आहे.

हेही वाचा : निमित्त : पुरुष नामशेष होणार आहेत!

मराठी भयकथेचा अल्प इतिहास…

धारपांनी १९५२-५३ सालापासून भयकथा लिहिण्यास सुरुवात केली. नागपूरमध्ये वास्तव्य असताना तिथल्या ‘सुषमा’ मासिकामधून त्यांच्या ‘दार उघड ना गं आई’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘सदूचे मित्र’,‘हिरवे फाटक’ या कथा प्रसिद्ध झाल्या. त्याआधीही द. पां. खांबेटे आणि द. चिं. सोमण यांनी ‘सुषमा’ व अन्य मासिकांसाठी भयकथा लिहिल्या होत्या. मात्र नवकथेच्या वळणाने आटोपशीर असा भयकल्पनाविलास धारपांनी मराठीत घडविला. ‘सुषमा’त प्रसिद्ध झालेल्या कथा १९६३ साली ‘अनोळखी दिशा’ नावाच्या संग्रहात प्रकाशित झाल्या. हे नारायण धारपांचे कथांचे पहिले पुस्तक. तेव्हा मुख्य प्रवाहात जी. ए. कुलकर्णी, पानवलकर आणि खानोलकरांच्या कथांना प्रचंड वलय होते. मौज, पॉप्युलर, कॉण्टिनेण्टल आणि कुलकर्णी ग्रंथागार यांची कथनसाहित्याच्या पुस्तकांवर पकड होती. पण धारपांच्या वाट्याला पहिल्या पुस्तकासाठी यातले कोणतेही प्रकाशक पुढे आले नव्हते. स्वत:च्याच खर्चाने हे पुस्तक काढल्याची नोंद धारपांनी आपल्या लेखामध्ये केली आहे.

शंकर सारडा यांनी वृत्तपत्रात त्यावर लिहिलेल्या विस्तृत परीक्षणानंतर त्यांच्या कथांकडे इतरांचे लक्ष गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सुरुवातीच्या दशकभरामध्ये धारपांच्या पुस्तकांची जी समीक्षण वा परीक्षणं आली, त्यात धारपांना भयकथाकारांऐवजी रहस्यकथाकार असेच संबोधले आहे. यात सत्तरीच्या दशकात ‘माणूस’ साप्ताहिकामध्ये त्यांच्या पुस्तकांवर परीक्षण करताना ‘मराठीतील त्याच त्या प्रकारच्या रहस्यकथांची कोंडी धारपांनी फोडली’ अशा अर्थाची दाद देणारे साहित्यिक अरुण साधूदेखील आहेत.

थोडी माहिती…

नारायण धारपांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ चा. शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या धारप यांना अल्पकाळाचे पितृछत्र लाभले. ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना मृत्यू आला. शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यांच्यातील वाचकाचा पिंड त्यांनी स्वत: जाणीवपूर्वक घडविला. ‘पल्प मॅगझिन’ आणि धारपांच्या वाचनघडणीचा काळ एकच. १९२० पासून १९५० पर्यंत या इंग्रजी (ब्रिटिश-अमेरिकी ) ‘पल्प मासिकां’मधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर साहित्य प्रसूत झाले. मुंबई-पुण्यात ही मासिके तेव्हा रद्दीवाल्यांकडे चार-आठ आण्यात मिळत. प्रचंड मनोरंजन करणाऱ्या या कथा धारपांनी आधाशासारख्या वाचल्या होत्या. या मासिकांमधील कथनसाहित्य, अभिजात भयलेखन, महत्त्वाचे मराठी-इंग्रजी साहित्य वाचन केले होते. या वाचनातून त्यांची अ-सरधोपट शैली तयार झाली असावी. धारप आपल्या वाचकांना पहिल्याच पानांतील काही परिच्छेदात नियोजित वातावरणात नेतात. शब्दपिसारा फुलवित वातावरणासाठी उसना आवेश ते कधी घेत नाहीत. दुसऱ्या-तिसऱ्या पानात वाचक कथानकात बुडून जातो. त्यांनी निर्माण केलेल्या भयनगरीचा प्रवासी बनतो. अनाकलनीय, असंभव वाटणाऱ्या कल्पनांबाबत वाचकाला वैज्ञानिक निरुपणासारखे पटवून देत असल्याने धारपांचे वर्णन अद्भुत पकड घेते.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..

बी.एस.सी. (टेक) ही रसायनशास्त्रातील पदवी घेतलेल्या धारपांनी मुंबईत रेल्वेत नोकरीसाठी खटपट केली. पण नातेवाईकांच्या आफ्रिकेतील व्यवसायात अधिक गरज असल्याने ते तेव्हाच्या न्यासालॅण्ड (आताचे मलावी) येथे गेले. तेथे काही वर्षे त्यांनी काम केले. तेेथेही इंग्रजी ‘पल्प फिक्शन’ मासिके त्यांच्याबरोबर होती. १९५० ला ते भारतात परतले आणि नागपूरमध्ये स्थायिक होण्यासाठी गेले. त्या काळातच त्यांच्या कथालेखनाला सुरुवात झाली. आरंभी विज्ञानकथा लिहिण्याचा त्यांचा मानस होता. पण विज्ञानकथांना प्रतिष्ठा आणि मासिकांतून मागणीच नसल्याने त्यांनी भयकथा हा प्रांत निवडला.

‘चंद्राची सावली’ ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर दोनच महिन्यांत (फेब्रुवारी १९६५) ‘कवठीचे वळण’ धारपांची कथा त्या काळी फारच चोखंदळ मानल्या जाणाऱ्या सत्यकथेत आली. सप्टेंबर १९७५ साली त्यांचा ‘भयकथा’ हा संग्रह विशाखा प्रकाशनाने प्रकाशित केला, तोपर्यंत भयकथाकार ते म्हणून नावारूपाला आले होते. यानंतर मग धारपांनी सुरुवातीला लिहिण्याची इच्छा असलेल्या विज्ञानकथा-भयविज्ञानकथांना वाट मोकळी करून दिली. ‘युगपुरुष’, ‘नेनचिम्’, ‘टोळधाड’ (विज्ञानकथायात्रा) या कथा-कादंबऱ्या वाचल्यास त्यांची विज्ञानदृष्टी किती समृद्ध होती, याची प्रचीती येऊ शकते.
pankaj.bhosle@expressindia.com

Story img Loader