रणधीर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्याधर पुंडलीक यांची कथा मराठी कथापरंपरेत वैशिष्टय़पूर्ण ठरली ती तिच्यातील विविधतेमुळे. ‘पोपटी चौकट’, ‘टेकडीवरचे पीस’, ‘माळ’, ‘देवचाफा’ हे त्यांचे कथासंग्रह. नाटक-एकांकिका, अनुवाद, समीक्षा, ललित लेख असे अनेकांगी लेखन त्यांनी केले. जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांच्या साहित्याचा परामर्श..

एक लेखक म्हणून विद्याधर पुंडलीक हे परंपरा आणि आधुनिकतेच्या सीमारेषेवरील लेखक होते. भारतीय परंपरेतील मूल्यांचे त्यांना पराकोटीचे आकर्षण होते. तर दुसऱ्या बाजूला आधुनिकतेतील उदारमतवाद, बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा ही मूल्ये त्यांना जवळची वाटत होती. या दुहेरी विचारांतून बहरलेली जीवनदृष्टी त्यांच्यात होती. या दुहेरी निष्ठेमुळेच त्यांना सावरकर आणि नेहरू, पु. ग. सहस्रबुद्धे आणि श्री. म. माटे असे दोन ध्रुवांवरील विचारवंत-लेखक महत्त्वाचे वाटत होते. हिंदूराष्ट्रवाद आणि उदारमतवादी राष्ट्रवाद त्यांना महत्त्वाचा वाटे. त्यामुळे त्यांच्या लेखन आणि विचारविश्वात या दुहेरी निष्ठांचे प्रतिबिंब पाहायला मिळते. आधुनिकतेतील चाहुलखुंणामुळे त्यांना श्री. म. माटे हे ग्रामीण-दलित साहित्याचे द्रष्टे कथालेखक वाटले. ‘यापुढे संस्कृतीच्या लोकशाहीकरणाचे स्फोट ललित साहित्यात होणार’ याची जाणीव पुंडलीकांना होती. श्री. म. माटे यांच्या कथेतील विज्ञान, बुद्धिवादाच्या सामर्थ्यांबरोबरच संतांची कणखर निर्मळ श्रद्धा त्यांना महत्त्वाची वाटत होती.

विद्यार्थिदशेतच पुंडलीक वाङ्मय जगात रमले ते कायमचेच. वाङ्मयाविषयी अनावर अशी आवड निर्माण झाली. काहीतरी नवे लिहावे असे त्यांना वाटू लागले. मनातील उलघाल आणि कासाविसीमुळे ‘आपले सारे काही पणाला लावून व्यक्त होण्याची बेचैनी आणि चमकण्याच्या आकांक्षेमुळे’ त्यांचा वाङ्मय क्षेत्रात प्रवेश झाला. ‘मी आणि माणसांचे जग थोडेफार कळावे आणि अनुभवाच्या अर्थाचा शोध घ्यावा’ म्हणून ते कथा लेखनाकडे वळले. १९५१ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि ‘सत्यकथा’, ‘मौज’चे लेखक म्हणून विद्याधर पुंडलीक नावारूपाला आले. १९५४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘वार्ड नंबर ०७’ या कथेने त्यांची कथालेखक म्हणून खास ओळख निर्माण झाली. पुंडलीक यांनी समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (तेव्हाचे पुणे विद्यापीठ) काम केले. त्याआधी त्यांनी विजापूर येथे तसेच सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९५०-८४ या काळात पुंडलीक यांचा कथालेखन काळ.

हेही वाचा : ऐसी अधमाची जाती..

पुंडलीक यांची कथासृष्टी ही विविधस्वरूपी आहे. त्यांची कथा मानवी जीवन समजावून घेण्याच्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. मानवी जीवनातील एकटेपण, माणसांचा आत्मशोध, दु:खाच्या विविध पदरांची आणि करुणास्वरूप भावचित्रे त्यांच्या कथावाङ्मयात आहेत. मानवी स्वभावातील आणि वर्तनातील गुंतागुंतीची चित्रणे त्यांच्या कथा वाङ्मयात आहेत. त्यांची कथा ही व्यक्तिदर्शनाची कथा आहे. काळबदलाच्या पार्श्वभूमीवरील ध्येयनिष्ठा उराशी बाळगलेल्या व्यक्ती तसेच पारंपरिक भारतीय स्त्रियांची दु:खदर्शने आणि निरागसता आणि हिंस्रतेचे बहुल दर्शन पुंडलीक यांच्या कथेत आहे. लोकमानसातील श्रद्धाविश्वासाचा एक बळकट धागा त्यांच्या कथा वाङ्मयात आहे.
मरणानुभवाचे गडद आणि घनदाट आशयसूत्र त्यांच्या कथेत केंद्रीय स्वरूपात विसावलेले आहे. किंबहुना त्यांच्या सबंध कथासृष्टीतला ते महत्त्वाचे प्रमेयदर्शन आहे. मरणानुभवाची इतकी व्याप्ती क्वचितच कोणा कथाकाराच्या कथांत पाहायला मिळेल. मरणाशी निगडित विविध भावदर्शने पुंडलीकांच्या कथेत आहेत. त्यामुळे या कथेचे ‘मरणकथा’ असे देखील वर्णन करता येईल. घटना-प्रसंगातून तसेच विविध प्रकारच्या स्थितीतून उद्भवलेली मरणचित्रे पुंडलीकांच्या कथेत आहेत. त्यास समाज, संस्कृतीचे आणि मानसस्थितीचे संदर्भ आहेत. भूतकाळातील ओझे, ताणतणाव, श्रद्धा, जीवनाची अतक्र्यता, सामाजिक चौकटी आणि आध्यात्मिक तळमळीमुळे उद्भवलेली मरणरंगे पुंडलीकांच्या कथांत आहेत. पुंडलीक यांनी पाश्चात्त्य लेखकांच्या ज्या कथा अनुवाद केल्या त्या संग्रहास त्यांनी ‘मरणगंध’ असे नाव दिले. त्यामुळे या मरणगंधाच्या जाणिवांचे अनेकविध पदर पुंडलीकांच्या कथेत आहेत. या मरणकथा बहुमुखी स्वरूपाच्या आहेत. बऱ्याचदा व्यक्ती तसेच समूहाची मने ही श्रद्धेने माखलेली असतात. ती विश्वासाची ओझी बाळगत जीवन जगत असतात. या श्रद्धांचे ताणतणाव त्यांच्या मनावर असतात. अज्ञाताचा शोध आणि त्या वाटेवरील श्रद्धा हे सूत्र त्यांच्या कथावाङ्मयात आहे. सश्रद्धता आणि आध्यात्मिक तळमळीच्या व्याकूळ करुणकथा पुंडलीकांनी लिहिल्या. मानसिक स्थितीशी निगडित श्रद्धांचे सादरीकरण त्यांच्या कथेत घडते. यातील माणसांचा मानसस्थितीशी निगडित योगायोग, प्रारब्धावर विश्वास असतो.

हेही वाचा : आदले । आत्ताचे : अमुकच्या व्याकूळतेचा तळशोध

वास्तव आणि गूढ, वर्तमान आणि भूतकाळ सगळे इथे एकमेकांशी गुंतले आहेत. अडकले आहेत, या श्रद्धेवर व योगायोगावर जीवन जगणाऱ्या माणसांचे जग पुंडलीकांच्या कथेत आहे. मानवी जीवनातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जी इच्छाशक्ती असते, अशा सामूहिक लोकविश्वासाच्या समजुतीला पुंडलीकांच्या कथेत स्थान मिळाले. मांजरप्रेम हा पुंडलीकांच्या जिव्हाळय़ाचा विषय होता. ‘एका मांजरीची कथा’ या हळुवार मरणभयकथेत मांजरप्रेमाच्या खुणा आहेत. ‘प्रवास’ कथेत एक लष्करी तरुणाचा रेल्वेतील प्रवास, एका तरुण स्त्रीचे रेल्वे डब्यात प्रसूत होणं आणि दुसऱ्या दिवशी लष्करी मोहिमेत सहभागी होणं. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हा सनातन आहे. याकडे ते कथांतून लक्ष वेधू इच्छितात. त्यामुळे पुंडलीक यांच्या कथेतील मरणदृष्टीत पार्थिव आणि अपार्थिव, ऐलतीर आणि पैलतीर, प्रत्यक्षता आणि अप्रत्यक्षता, वर्तमान आणि भूतकाळ यातील भावविश्वासाने आकाराला आलेल्या माणसांचे जग केंद्रवर्ती आहे.
मुलामुलींच्या भावविश्वावरील उल्लेखनीय आणि वैशिष्टय़पूर्ण कथा पुंडलीक यांनी लिहिली. त्यांच्या कथांमधील एक अनुभवसूत्र बाल वा किशोर मुला-मुलींचे भावविश्व आहे. मुलांनी लेखकाचे बोट धरले पाहिजे असे पुंडलीक यांना वाटे. त्यांच्या या बालअनुभवकथनाच्या कथेत लहान मुले, आई-वडील व आजी-आजोबा यांच्यातील परस्परसंबंधांना विशेष महत्त्व आहे. ‘आजी शरण येते’ या कथेत एका नातवाच्या दृष्टीने आजी-आजोबांमधील व्रात्य भांडखोरपणा, संतापी स्वभाव व मायाळूपणाचे निरागस चित्र आहे. पुंडलीक यांच्या या प्रकाराच्या कथाचित्रणात कोवळी निरागसता आणि व्यावहारिकता, सहजता आणि हिंस्रता यांतील ताणतणाव आहेत. ‘गाय’, ‘भीती’ आणि ‘विपरीत काही झालं नाही’ यांसारख्या कथांत या बालमनाची व त्याच्या दृष्टीची वेधक चित्रे आहेत. आजी-आजोबांच्या सहवासातील निर्मम कथाचित्रे होत. त्यात मुलांची निरागस चौकसबुद्धी आणि जीवनाविषयीचे कुतूहल आहे.

हेही वाचा : दलितांचा आवाज गेला कुठे?

पुंडलीक यांनी काही हळुवार प्रीतकथाही लिहिल्या. त्यांची प्रेमकथा ही साध्यासुध्या प्रसंगातून फुलणारी प्रेमकथा आहे. या प्रेमकथा अभंग प्रेमापासून विरहार्त प्रेमकथा आहेत. या प्रेमभावनेत समर्पणाची भावना आहे. प्रेमभूल आणि प्रेमहूलीतील आतुर उत्कटचित्रे त्यांनी रंगवली. प्रेमात पांगळय़ा कुतूहलाला पंख फुटण्यापासून फुलझाडाने सूर्यकिरणाला सामोरे जाणाऱ्या सहज भावानुभावाची चित्रे आहेत. याबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादकथांद्वारे पुंडलीक यांच्या राजकीय आशयाच्या कथा आकाराला आल्या आहेत.
पुंडलीक यांच्या कथेचा रूपबंध वैशिष्टय़पूर्ण आहे. आत्मनिवेदनात्मक तसेच तृतीयपुरुषी कथनाच्या कल्पशील आविष्काराची ही कथा आहे. त्यांच्या कथानिवेदनात कथाअंतर्गत वळणे- अंतर्वळणे आहेत. संवादाचा लक्षणीय वापर त्यांच्या कथनात आहे. त्यांच्या बऱ्याच कथांना संवादकथेचे रूप प्राप्त होते. भाषेचा दक्ष आणि जागरूक वापर त्यांच्या कथारूपात आहे. धारदार शब्दकळा, शब्दांमधून साकारणारी सचित्रता तसेच वेधक वेल्हाळभाषेतून झरणाऱ्या भावकोमल संवेदनाचे दर्शन पुंडलीक यांच्या कथाभाषेत आहे. चित्रदर्शी अल्पाक्षरी काव्यात्म शब्दकळा हे पुंडलीक कथेचे आणखी एक वैशिष्टय़. कथा-कहाण्या-आध्यात्मिक रूपबंधाचे आकर्षण त्यांच्या कथारूपास आहे. ‘गुप्त वाट’ कथेतील महाबळेश्वरच्या डोंगररांगावरील गडद धुक्यातील थडथडत्या पावसाची क्षणचित्रे असोत की ‘अखेरची रात्र’ वा ‘दवणा’ कथेतील भरगच्च वातावरणनिर्मितीसाठी भाषेचा गडद अशा प्राचुर्याने केलेला वापर असो, तो मनोवेधक असा आहे. कथाअंतीचे आकस्मिक उद्भवणारे नाटय़ात्मक वळण पुंडलीक यांच्या अनेक कथांत आहे. स्वप्नतंत्राचादेखील त्यांनी सर्जक असा वापर केला आहे. मात्र पुंडलीक यांच्या कथेत विशाल समाज-समूह दर्शन येत नाही. ही कथा कमीत कमी दोन-चार पात्रांची कथा असते. त्यांच्या बऱ्याच कथा या व्यक्तिदर्शनात्मक कथा आहेत.

हेही वाचा : संगीतसंस्कृतीचा उपासक

कथेबरोबरच त्यांचा ‘आवडलेली माणसे’ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. भावलेल्या सुहृदांची ही स्मरणचित्रे आहेत. तर देशोदेशीच्या साहित्यकृतींच्या सौंदर्याचा आनंद आस्वादक समीक्षेत आहे. पुंडलीक यांचे सर्वच लेखन संवादशैलीतील आहे. हृदयस्थ आणि स्वप्नस्थ व्यक्तींविषयीचा हा विनयसंवाद आहे. साने गुरुजी, वि. दा. सावरकर, पु. ग. सहस्रबुद्धे, त्र्यं. शं. शेजवलकर, इरावती कर्वे या ध्येयवादी व्यक्तींविषयी तसेच श्री. म. माटे, श्री. पु. भागवत व चिं. वि. जोशी यांच्या लेखन कामगिरीबद्दल पुंडलीक यांनी मन:पूर्वक आणि जिव्हाळय़ाने लिहिले आहे. अशा ध्येयवेडय़ा माणसांच्या स्वप्नसृष्टीचे पुंडलीक यांना पराकोटीचे आकर्षण होते. साने गुरुजींमधील मातृहृदयता, मांगल्याचा ध्यास आणि कोवळा भक्तिभाव त्यांना महत्त्वाचा वाटत होता. तर त्र्यं. श. शेजवलकरांच्या विचारांमधील दचकविणारी विस्तृत रेंज, वाणीतील परखडपणा, स्वभावातील तिरसटपणा व त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील करुणेमुळे पुंडलीक यांना शेजवलकर दूर कोपऱ्यातील बैरागी चाफा वाटतात.
पुंडलीक यांनी ज्या काळात कथा लिहिण्यास आरंभ केला त्या काळात नवकथेचा बोलबाला होता. त्याचा काहीएक प्रभाव त्यांच्या आरंभीच्या कथांवर होता. याबरोबरच १९६० नंतर मराठीत आधुनिकतावादी तसेच वास्तववादी समाजशील वाङ्मयाचा उधळमोकळा आविष्कार झाला. या काळाचे व वाङ्मयीन पर्यावरणाचे ते साक्षीदार होते. मात्र पुंडलीक यांनी त्यांच्या स्वभावधर्माला अनुसरून कथा लिहिली. आज ज्ञानदृष्टी व वाङ्मयनिर्मितीत बहुल दृष्टिकोण निर्माण झाले आहेत. आज त्यांच्या कथेविषयी वेगवेगळी अर्थनिर्णयने व आकलने होऊ शकतात. प्रा. पुष्पा भावे यांनी पुंडलीक यांच्या कथाविश्वाविषयी एक निरीक्षण मांडले आहे ते असे- ‘पुंडलीकांच्या अभ्यासकीय आयुष्यातील धर्म-निधर्म यांचा शोध त्यांच्या कथेतील हिंदू सांस्कृतिक धागा याचा अर्थपूर्ण अन्वय त्यांच्या कथावाङ्मयात पाहायला मिळतो.’ (‘वेचक पुंडलीक’- प्रस्तावना)

हेही वाचा : आदले । आत्ताचे: गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा शोध..

एकंदरीत विद्याधर पुंडलीक यांनी एक वेगळे कथाशिल्प घडविले- ज्याचा लागाबांधा त्यांच्या काळातील वाङ्मयीन पर्यावरणाशी फारसा नव्हता. त्यांच्या कथादृष्टीत परंपरेविषयीचे संमोहित आकर्षण आणि आधुनिकतेविषयीचा खोलवरचा आस्थाभाव होता. त्यांच्या लेखकीय संवेदनशीलतेची मुळे भारतीय परंपरेत विसावलेली होती. प्रत्यक्षापेक्षा भूतकाळातील सामूहिक लोकजीवनाचा कालावकाशाचे रंगभरण त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांच्यातील समाजशास्त्रज्ञांवर जीवनातील अतक्र्यतेने आणि अज्ञाताने मात केली होती.
randhirshinde76 @gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer vidyadhar pundlik literature work lokrang css
Show comments